Skip to main content

परी टॅक्सिडर्मीरूपे उरला

लेखक सुधांशुनूलकर यांनी रविवार, 11/11/2012 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
दसर्‍याचा दिवस. सूर्योदयाची वेळ. रोजच्यासारखा प्रभातफेरीसाठी निघालो होतो. एका सोसायटीच्या दारातल्या दोन सप्तपर्णी भरघोस फुलल्या होत्या, गालिचा अंथरल्यासारखा रस्त्यावर फुलांचा सडा पडला होता आणि फुलांचा उग्रसा गंध दरवळत होता. तो गंध मनात दरवळत असतानाच रस्त्याच्या दुसर्‍याकडील बाजूला माझं अचानक लक्ष गेलं. रस्त्याच्या कडेला साळुंकीएवढा एक पक्षी उताणा पडलेला दिसला. जवळ जाऊन बघतो, तो आमचा लाडका, परिचित पक्षी नवरंग ऊर्फ पिट्टा (Indian Pitta) अचेतन अवस्थेत पडला होता. त्याला बघितल्यावर एकदम फ्लॅशबॅकमध्ये २००५ सालात गेलो. २००५मधली मे महिन्यातली एक टळटळीत दुपार होती. कामात असतानाच चेंबूरहून एका मित्राचा फोन आला की इथे भर बाजारात एक निराळाच पक्षी जखमी अवस्थेत जमिनीवर आहे, त्याला उडता येत नाहीये आणि त्याला ‘मुंबईचे कावळे’ चोच मारून भंडावून सोडत आहेत. पक्ष्याच्या वर्णनावरून त्याची ओळख पटली. तो नवरंग (पिट्टा) होता. मग मित्राला दिलेल्या सूचनांप्रमाणे त्याने जवळच्याच एका दुकानातून एक खोका मिळवून त्यात त्या पक्ष्याला घालून घरी आणलं होतं. प्राण्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावर उपचार सुरू केले होते आणि आठवडाभराने तो बरा झाल्यावर त्याला विक्रोळीच्या गोदरेजच्या तिवराच्या जंगलात सोडून दिलं होतं. हे सर्व एका दैनिकात सविस्तर छापून आलं होतं आणि आम्ही एकदम प्रसिद्ध झालो होतो. 37 यानंतर पिट्याटकशी आमचे जणू ऋणानुबंध जुळले. दर वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चेंबूरमध्ये पिट्टा दिसत राहिला. याचं कारण, हिमालयाच्या तळटेकड्यांच्या थंडगार परिसराचा हा रहिवासी. दिवाळीनंतर तिथे थंडी पडायला सुरुवात झाली की अन्नाची टंचाई जाणवायला लागते. मग तो दक्षिणेकडे स्थलांतर करतो. तीनचार महिने दक्षिणेत राहून, वसंत ऋतू सुरू झाला की परत उत्तरेकडे स्वगृही परततो. तिथे पावसाळ्यात (जून-ऑगस्टमध्ये) त्याची वीण होते. आणि पुन्हा थंडी सुरू झाली की दक्षिणेकडे पुन्हा स्थलांतर करतो, असं हे स्थानिक स्थलांतराचं चक्र. मेमध्ये स्वगृही परतताना तो मुंबईमार्गे जात असावा, आणि विश्रांती-अन्न-पाण्यासाठी मुंबईस थांबत असावा, चेंबूर हा हिरवागार परिसर (ग्रीन झोन) असल्यामुळे चेंबूरमध्ये उतरत असावा, आणि आम्हाला दिसत असावा. प्रत्येक वेळी जखमी (कावळ्यांनी चोची मारल्यामुळे), निर्जलीकरणामुळे तहानलेल्या, भुकेजलेल्या, थकलेल्या, भरकटलेल्या अवस्थेत मिळत असे. त्याच्यावर उपचार करून बरा झाल्यावर विक्रोळीला सोडून देत असू. या वर्षी असं पहिल्यांदाच झालं, की तो ऑक्टोबरमध्येही दिसला. नवरंग या नावाप्रमाणे खरोखर नऊ रंग ल्यालेला, अत्यंत सुंदर. मुख्यत: कीटकभक्षी. जमिनीवर, झाडावर उड्या मारत कीटक टिपणे हा त्याचा उद्योग. 38 39 फ्लॅशबॅक संपला. या नवरंगाला एका कागदात गुंडाळून घरी आणलं आणि हवाबंद पिशवीत घालून डीप फ्रीझरमध्ये ठेवून दिलं. आता याचं काय करावं? एखाद्या कॉलेजच्या जीवशास्त्र विभागाला द्यावं का? आणि लख्खकन् एक कल्पना सुचली. काही महिन्यांपूर्वी एक बातमी वाचली होती, महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या राजभवनातला, राज्यपालांचा अत्यंत लाडका मोर मृत्यू पावल्यावर एका डॉक्टरांनी त्याच्यावर प्रक्रिया (टॅक्सिडर्मी) करून राजभवनात परत नेऊन ठेवला. म्हणजे, त्याला एक प्रकारे संजीवनी दिल्यासारखंच झालं. आपल्या या पिट्ट्यालाही अशीच संजीवनी देता येईल का? मग थोडं गुगलून पाहिल्यावर काही माहिती मिळाली. मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात पशू शरीररचनाशास्त्र (व्हेटर्नरी अॅनाटॉमी) विभागात सहयोगी प्राध्यापक असलेले डॉ. संतोष गायकवाड हे भारतातले या क्षेत्रातले (एकमेव) प्रशिक्षित आणि अनुभवी व्यक्ती (टॅक्सिडर्मिस्ट) आहेत. थोड्या प्रयत्नांती त्यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी पिट्ट्यावर प्रक्रिया करायचं आनंदाने मान्य केलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, या प्रक्रियेनंतर तो आता पुढची ५० वर्षं तरी लोकांना बघायला मिळेल. लोकशिक्षणासाठी त्याचा खूप उपयोग होईल. एका अर्थाने त्याला एक नवजीवन, संजीवनी, एक नवी ओळखच मिळेल. ‘आमचा’ पिट्टा टॅक्सिडर्मीरूपे उरेल. वन विभागाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात डॉ. संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक टॅक्सिडर्मी सेंटरही सुरू केलं आहे. तिथे आज अनेक प्राणी-पक्षी जतन केलेले दिसतात. त्यामध्ये आता या पिट्ट्याचीही लवकरच भर पडेल. footer

वाचने 2561
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

गौरवशाली कामगिरी करणाऱ्यांचे मेणाचे पुतळे बनवल्याचे आपण वाचतो, पहातो. पुर्वी राजे राजवाड्यांत वा इंग्रजांच्या सेनादलातील मेसेस मधे विविध प्राण्यांचे मुखवटे वा अवयव बहाद्दुरीचे कारनामे म्हणून पाहायला मिळतात. आपण नवरंगीला एका अर्थाने नवजीवन दिलेत. मानवेतर प्राणीजगताला आपमतलबासाठी जिवे मारून हैराण करणाऱ्या माणसातील सद्सत् बुद्धी कॅमेऱ्याच्या मदतीने जागृत होऊन हिंसेला विधायक बाक मिळाला आहे. विविध प्राणी जगतावरील कार्यक्रमांच्या माध्यमांतून त्यांचे जीवन जवळून टिपण्याचा एक नवा पायंडा पडलेला दिसतो त्याची आठवण झाली. आपण असेच काम करत रहा. आम्हीही त्याची जाण ठेवून अशा पीडित प्राण्यांना योग्य ठिकाणी पोहोचवायची तसदी घेऊ. असे मनात वाटते.

छान लेखन. आमच्या शहरात अश्या जखमी प्राण्या - पक्ष्यांसाठी एक वाईल्ड लाईफ सेन्टर आहे, तेथे त्या सर्व प्राण्यांची काळजी घेतली जाते व उपचार होऊन ते बरे झाले की त्यांना परत सोडले जाते. तुमचा लेख वाचून सहज एक विचार आला, असेच काही या नवरंगी साठी चेंबुर मध्ये सुरु करणे शक्य आहे काय?