Skip to main content

दीपावलीच्या अनेकोत्तम शुभेच्छा!

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 09/11/2012 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मंडळी, नमस्कार! सकाळची हवीहवीशी थंडी मनाला गुदगुल्या करायला लागलीये; सकाळचा लखलखता सूर्य मऊगरम किरणे फेकून थंडीची लज्जत वाढवतोय; सकाळची प्रसन्न आणि तजेलदार हवा मनाला एक निराळीच उभारी देतेय. हेच ते दिवाळीचे सुखद दिवस. एक नवी प्रसन्न ऊर्जा सगळ्यांना भरभरून मिळावी म्हणूनच दिवाळीसारख्या सणाचे आयोजन करण्यात आले असावे. दिवाळी म्हणजे चांगला ४-५ दिवसांचा भरगच्च सण! वसुबारस, धनत्रयोदशी, बलिप्रतिपदा, नर्कचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा ५-६ दिवसांची दिवाळी हा एक आनंदसोहळाच असतो. सगळ्यांनी एकत्र यावे; खावे-प्यावे; खूप गप्पा माराव्यात; नेहमीच्या धावपळीच्या दिवसांमधून थोडी उसंत घेऊन थोडा विसावा घ्यावा; मस्त फिरून यावे आणि हा निवांतपणा पुढे वर्षभर पुरवावा...ही कल्पनाच किती भन्नाट आहे! दिवाळी अंक, फराळाच्या ताटांची होणारी देवाण-घेवाण, अंगणातल्या रांगोळ्या, सड्याचा सुगंध, उटण्याचा सुवास, फटाक्यांचा उग्र दर्प, सगळ्यांच्या चेहर्‍यावर फुललेले हास्य आणि मनमुक्त गप्पा! दिवाळी खरंच सगळ्यांना अधिकाधिक जवळ आणते. दिवाळी एक नुसताच सण नाही तर दिवाळी म्हणजे घरातली प्रेमळ आई वाटते. आपापल्या घरी आतुरतेने आपली वाट पाहणारी, आपल्यासाठी घर लख्ख करून ठेवणारी, आपल्यासाठी गरम-गरम चकल्या तळून देणारी, आपण घरात प्रवेश केल्यानंतर जगातलं सगळ्यात सुंदर आणि अकृत्रिम स्मित देणारी, डोळ्याच्या कडांमधून बाहेर येऊ पाहणारे पाणी रोखून धरतांनाच डोळ्यातच आनंदाचे भुईनळे उडवणारी...आईच करते ना हे सगळं आपल्या लेकरांसाठी? मग दिवाळी आईसारखीच वाटली तर आश्चर्य नको वाटायला. सकाळी सकाळी आपल्या गावात रस्त्यावरून घरी जातांना दिसते ते आपले बालपण; आपली मुळे, आपली जीवनाची बाराखडी जिथून सुरु झाली ती शाळा, ज्यांनी निरपेक्ष माया दिली ती माणसे...काहीशी थकलेली, म्हातारी झालेली तरी पण चेहर्‍यावरचे नितळ भाव तसेच! मग घर दिसतं. ते नुसतं घर नसतं, ते आई असतं, शिक्षक असतं, आजी आणि आजोबा देखील असतं. त्याच घराच्या अंगाखांद्यावर खेळून आपण मोठे झालेलो असतो. घर तिथंच असतं! आपण पोहोचल्यावर आपल्याकडे बघून हसतं. अगदी हात हातात घेऊन फेर धरायला लागतं आपल्या कटू-गोड आठवणींभोवती! मग आपणही एक थुईथुई उडणारे कारंजे होऊन जातो अगदी! दिवाळी अशी आठवणींचा पट उलगडून बसते आपल्यासमोर! त्या तिथे मी अभ्यास करायचो; तिथे जेवायला बसायचो; या अश्वासक देवघरासमोर मी 'शुभंकरोति..' म्हणायचो; इथून शाळेत जायचो; जातांना वडाच्या भल्यामोठ्या झाडासमोरच्या वाड्यात हमखास नजर जायची; कधी कधी ती उभी असायची. आता देखील आहे का ती उभी? नाही! आता वड ही नाही आणि ती पण नाही. रस्त्यात मित्रांसोबत हुंदडतांना दिवस कसा डोंगराआड जायचा कळायचं नाही. दिवाळी अशी एक मित्र म्हणून अलगद येते; आठवणींचा चित्रपट दाखवते. मन पिसासारखं होऊन जातं; डोलत-डोलत उडत कुठे कुठे बसतं. दिवाळीच्या दिव्यांसारखंच मन शांत तेवत राहतं. उजेड कुठे पडतो माहित नाही पण आतून शांत वाटतं हे खरं. हा शांतपणा, हलकेपणा आयुष्यभर टिकवता आला तर? हा अप्रतिम आनंद अगदी नेहमीकरता लुटता आला तर? स्मरणरंजन तसे थोडे वाईटच पण मनाचा तजेला टिकवून ठेवता येत असेलच की! समस्त मिपाकरांना दीपावलीच्या खूप मनापासून शुभेच्छा! ही दिवाळी आपणा सर्वांना सुखाची, आनंदाची, आणि समाधानाची जाओ ही सदिच्छा! धन्यवाद! समीर

वाचने 2059
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

!!! समीरसूर, तुमच्यासहित सर्व मिपाकरांना दीपावलीच्या अनेकोत्तम हार्दिक शुभेच्छा !!! - (दिवाळसणासाठी पुण्याला निघालेला) सोकाजी

मस्त स्मृतिरंजन! प्रत्येक जण आपल्या मनात अशा स्मृति जागवत असतो. दीपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा!

या सर्वांसोबतच किल्ला करणे अन किल्ला करताना कल्ला करणे हा ओलसर, मातकट, मळलेला, चिखलात बरबटलेला पण हवाहवासा वाटणारा एक गढुळ सुगंध.. कधीच विसरता येणार नाही.. अन ते किल्ल्याचं प्राणपणानं केलेलं रक्षण.. आई वडिलांकडून उटणं लावून घेणं.. सोसायटीत पहिला फटाका कोण फोडतो हे सगळ्यांना कळावं म्हणून पहाटे साडेतीन वाजल्यापासून आवरायची घाई..न उशीर झालाच तर घराच्या खिडकीतुन फटाक्याची वात शिलगावून बाहेर फेकण्याचे केलेले पराक्रम.. दिवाळीच्या सर्वांना बालपण लक्षात आणुन देनार्‍या शुभेच्छा..

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! ह.भ.प.ह्यांनी म्हणल्याप्रमाणे किल्ल्याचे संरक्षण तर मी आत्ताही करतोय, मुलासाठी किल्ला केलाय, त्याच्यापासूनच :) (जंगल लवकर उगवावं म्हणून तो तांब्याभर पाणी ओततो)

>>उजेड कुठे पडतो माहित नाही पण आतून शांत वाटतं हे खरं. हे आवडलं आणि पटलंही!! तुमच्यासह सर्व मिपाकरांना दिवाळीच्या शुभेच्छा.

हा शांतपणा, हलकेपणा आयुष्यभर टिकवता आला तर? हा अप्रतिम आनंद अगदी नेहमीकरता लुटता आला तर?
का नाही? दिवाळी एक मूड आहे. बाहेर सगळे जल्लोषात असल्यानं आपणही आतनं सुखावतो. तो मूड एकदा पकडता आला की रोजच्या जगण्याचा देखील उत्सव करता येतो. यंदाच्या दिवाळीत तो मूड जतन करण्याची कला तुम्हाला मिळू दे! किसी शायरने क्या सही फरमाया है : सावन आए या ना आए, जिया जब झुमे सावन है!

दीपावलीच्या सर्व मिपाकरांना आणि त्यांच्या पारिवाराला हार्दिक शुभेच्छा! विशेषतः, हा शांतपणा, हलकेपणा आयुष्यभर टिकवता आला तर? हा अप्रतिम आनंद अगदी नेहमीकरता लुटता आला तर? हा तुमचा विचार फार भावला. धन्यवाद! (आणि यापुढे वर लेखात दिलेल्या रांगोळ्या, रोषणाई, फटाके, फराळ, नातेवाईक या आठवणींच्या पटातल्या असंख्य गोष्टीबरोबर आणखी एका गोष्टीची वाट पहाणं आलं - मिपाचा दिवाळी अंक!) अवांतरः @क्षीरसागर साहेब आणि मी_आहे_ना: त्या सुंदर गाण्याचे शायर आहेत शकील बदायुनी, चित्रपट दिल दिया दर्द लिया. आशा-रफीने गायलेलं हे सुंदर गाणं बृंदावनी सारंग या रागातलं आहे असं वाचल्याचं आठवतं. चुभूदेघे.

खूप सुंदर मुक्तक लिहिलंय. दरवर्षी दिवाळी आली की मन स्मृतिरंजनातच रमतं आणि तीच दिवाळी जगतं.
दिवाळी अशी एक मित्र म्हणून अलगद येते; आठवणींचा चित्रपट दाखवते. मन पिसासारखं होऊन जातं; डोलत-डोलत उडत कुठे कुठे बसतं. दिवाळीच्या दिव्यांसारखंच मन शांत तेवत राहतं. उजेड कुठे पडतो माहित नाही पण आतून शांत वाटतं हे खरं.
अगदी अगदी! या निमित्ताने सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

मुक्तक आवडले!
समस्त मिपाकरांना दीपावलीच्या खूप मनापासून शुभेच्छा! ही दिवाळी आपणा सर्वांना सुखाची, आनंदाची, आणि समाधानाची जाओ ही सदिच्छा! धन्यवाद!
हेच म्हणतो!

सर्व मिपाकरांना, वाचकांना, दिवाळीच्या खुप खुप शुभेचच्छा.....!!! -दिलीप बिरुटे