Skip to main content

बाप्पा मोरया रे

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवीन हो माथा....(असली गाणी ऐकायला मिळाली की समजावं बाप्पा येतोय हो लवकरच) गणेश चतुर्थी जवळ आली की सर्व वातावरण कसं आनंदाने भरून जातं. सगळीकडे ही लगबग सुरु होते पहा. मग सर्वांना मनापासून म्हणावसं वाटत, "आला पहा माझा तो श्री गणेशा, सा-यांचा तारणहार तूच प्रथमेशा; चाहूल लागली तुझी गजवदना, लगबग झाली सुरु तुझ्या रे स्वागता". (सौजन्य: "आमोद - एक आनंद कल्लोळ", के डी.) मग मखरापासून सुरुवात ते अगदी सजावटीतल्या एखाद्या डोंगराच्या शिखरापर्यंत, नुसता आनंदाचा कल्लोळ माजतो, हें पाहून सुखद वाटत. देवासाठी काय करू अन काय काय करू, असं सर्व गृहिणींना वाटत. अगदी मनापासून सर्व तयारी, नैवेद्य अगदी मनोभावे, भक्तिभावे बाप्पास अर्पिला जातो. लहानांसाठी तर ही पर्वणीच. सर्वकाही त्यांच्यासाठी नवीन असतं म्हणा ते. मग आजी-आजोबांकडून गणेशाच्या कहाण्या सांगितल्या जातात त्यांना. विशेषत: गणेश आणि कार्तिकेयाची (त्या निमित्ताने का होईना आई-वडिलांबद्दल आदर असावा, हें त्या लहानग्यांना तेव्हापासूनच बिंबवलं जातं. धन्य ते संस्कार.) पण आजकाल तो आदर असून उपयोग नाही, तो टिकवून नित्य आचरणात आणणे हाच एक गरजेचा संस्कार हवा आहे आजच्या पिढीला... असो.. सर्वश्रुत आहे की टिळकांनी "गणेशोत्सव" का सुरु केला ते ? अगदी शाळेपासून ही चिमुरडी मुलं वाचत आलीयेत म्हणा (तुम्ही आम्ही चिमुरडी होतोच की.. नाही का.. ). चला तुम्ही सांगा पाहू का ते ? (नाही नाही... तुमचं जनरल नॉलेज नाही 'चेक' करायचंय इथे).. सांगाना... का केला असेल बुवा त्यांनी सुरु हा "गणेशोत्सव"....... चला मी पुन्हा इथे सांगतो.... कारण तशी हल्ली सारखी पाळी येते अशा गोष्टी परत परत सांगण्याची. काय करणार म्हणा. आजकालची पिढी ती. असो... कान नाही पिळायचा तुमचा. तर सर्व माणसांनी एकत्र यावं, मिळून मिसळून हा सण साजरा करावा, हा त्यामागचा उद्देश. (खरी कहाणी तर कित्येकांना माहीत नाहीये, की गणेश उत्सव फार पूर्वीपासून अगदी शिवाजी महाराज - पेशव्यांच्या काळापासून चालत आलाय. पण तो फक्त त्या घराण्यापुरता मर्यादित होता, साधारणपणे १८१८-१८९२ दरम्यान. टिळकांनी पाहिलं होतं की कशी या आराध्य दैवताची पूजा केली जाते. मग त्यांनी ठरवलं १८९३ साली की हा गणेशोत्सव नुसता ब्राह्मणांसाठीच मर्यादित ठेवायचा नाही, सर्वांना त्याचा मान मिळावा. लोकांनी एकत्र यावा, की जेणे करून एकमेकांना ओळखता येईल, जाणता येईल. त्यांच्यातली एकी वाढण्यास मदत होईल. ब्रिटीश सरकारविरुद्ध बंड पुकारायला माणसं एकत्र येण गरजेच जे होतं तेव्हा). सर्वत्र गणेशोत्सवाची नांदी आजकाल पाहायला मिळते. गावांकडे जाण्यासाठी लोकांची जय्यत तयारी सुरु होते मग. ती अगदी चार महिने आधीपासून. का तर अहो आजकाल रेल्वेचं आरक्षण नाही ना सहजी मिळत. मग यांचा साहेबांच्या मागे तगादा सुरु. हें पहा साहेब, "आपल्याला गणेश चतुर्थी साठी रजा पाहिजेलय. या वर्षी आमच्या चुलात्याक.. कडे गणेशाची मूर्ती येवाक असा. मग मला जायला पाहिजेलय. गणेशाच तिथे पाहणार कोण हो !"... साहेबांना हें माहीत असतं, की दरवर्षी ठरल्याप्रमाणे हा कोकणी माणूस न चुकता जाणारच. तोही हो म्हणतो. इथे शहरातही लोकांकडे आजकाल गणेश मूर्ती येते. अगदीच काही नाही तर "दीड दिवसांसाठी" तरी येतेच. मग हें म्हटल्यावर त्यांच्याही रजा आल्याच की, निदान चार दिवसांसाठी तरी.. (दोन दिवस तयारीसाठी आणि दीड दिवस गणपतीसाठी, अर्धा दिवस नुसता असाच संपून जातो). आमच्याकडे साहेब यंदा गणपती आहे, तुम्ही सह-कुटुंब याच हो (या मागचा उद्देश निर्मळ नसतो हो पण... कशासाठी ते तुम्हीच समजून घ्या.. बाकी आपण सुज्ञ आहातच). बऱ, सर्वांना इमेल करून अगदी घरचा पत्ता देऊन बोलावणं धाडल जातं खास. (फोन करायला वेळ आहे कुणाला आणि पैसेही कशाला खर्च, फुकटात जर काम होतंय तर...). लोक दर्शनासाठी कमी तुमचं घर बघण्यासाठी येतात, आणि त्यावर खुसफुसत बसतात. बऱ आम्हीही शहाणे, आमची सजावट पहा कशी मस्त जमलीये हें सांगण्याच्या मागे त्यांच्या. बाप्पाला पहा, काय तेज आलंय नाही त्या दिव्यांच्या आरासामुळे....आता या शहाण्यांना काय म्हणाव, अरे जया तेजाने तुम्हा निर्मिले, तया तुमचे कृत्रिम तेज काय ते !! .. असो.. गणेश मंडळांच सांगायचा तर, वर्गणीपासूनच सुरुवात होते गणेशोत्सवाची.. (अगदी कुठल्याही सार्वजनिक सणाची). मग ही भली मोठी मूर्ती, त्यासाठी यांच्या स्पर्धा... अहो फ्लाय ओवर पाडायलाही हें लोक मागे पुढे पाहत नाहीत.. का तर त्रास नको "आमच्या मूर्तीसाठी". मग सेलिब्रिटीज कुठल्या आणायच्या की जेणेकरून आपल्या मंडळाला गर्दी होईल, इथपर्यंत मजल ("मोरया" चित्रपटात आपण हें सर्व आणि बरंच काही पाहिलं असेलच अशी आशा करतो, पाहिलं नसेल तर जरूर पहा. जाहिरात करत नाहीये या चित्रपटाची इथे, पण आजकालच्या गणेशोत्सवाच्या स्वरुपाची झलकच तिथे पाहायला मिळते, यात शंकाच नाही, म्हणून पुन्हा म्हणतो जरूर पहा). (एकूण काय तर सर्वच सार्वजनिक सणांना असं बीभत्सतेचं गालबोट लागत चाललंय ... "गणा धाव रे...तू मर्दन यांचं जरा कर रे"...भावना मारत चालले आहेत रे हे स्वतःच्या.. तूच आता तारण हार.) श्रावण कसाबसा यांनी पाळला हो... ... दुस-या दिवशी लगेच यांची उडी तिथे.... आता कुठे ते तुम्हा आम्हाला माहीतच आहे. तर सांगायचा मुद्दा हा की भाद्रपद सुरु झाला की गणेशाचं आगमन होत ना, (गणेशोत्सव मराठी महिन्याच्या "भाद्रपद" महिन्यात साजरा करत्तात म्हटलं, नाही काय आहे आमची मुलं कॉन्व्हेंट मध्ये शिकलेली ना.. मराठी महिने काय असतात ते उकल करून सांगावं लागतं), मग यांचं तेव्हा मटण-चिकन चा आणि सोमरसाचा उपवास असतो म्हणे.... ना... असं सर्व करता करता, सर्व घडत असलेलं गणेश उत्सवाचं आसपासचं स्वरूप पाहता पाहता, अनंत चतुर्दशी येते की हो.... (या दरम्यानच्या काळातल्या कित्येक घडामोडी, अगदी विवरण करून, सांगण्यासारख्या आहेत, पण उगाच इथे फाफट पसारा नको इथे म्हणून आवर घालतो, बाकी सर्वश्रुत, याची देही याची डोळा सर्वांनी अनुभवल आहेच की, आणि अनुभव करत राहणार यात तिळमात्र शंका नाही. "मन मारावे परी वासना उरी उरावे", अशी काहीशी आजकाल लोकांची अवस्था झाली आहे. मला रोज मटण-चिकन लागतच म्हणे ? पण आपली बाप्पावरची भक्ती 'शोल्लीड' आहे (Solid - असा अर्थ घ्यावा), असे हें म्हणतात बुवा काहीसे. अपुन काही बी खात नाही (पीत तर नाहीच नाही) कित्तीबी मनात असला तरी.. (तम्बुमागे फक्त जाऊन बघा एखाद्या मंडळाच्या, नुसत्या खाण्या-पिण्यावरच्या वासनेचा नाच पाहायला मिळतो).. अहो बाप्पाच अजून तिथे लोकांनी विसर्जनही केला नाहीये ओ sssssss . :( असो.... चूक भूक द्यावी घ्यावी.. कुणाच इथे मन दुखवायच तिळमात्र उद्देश नाहीये तर सद्य परिस्थिती मोजक्या शब्दात, मांडण्याचा हा अट्टाहास -- आपला विनम्र के डी.. "गणपती बाप्पा ... मोरया sssss ....." ------------------------------------------------------------------- "बाप्पा आला रे, बाप्पा अवतरला, बाप्पा आला आला आला स्वागता त्याच्या सुमने उधळू, उधळू उधळू चला... पायघडी घालू, आसनंही सजवू, टिळक करूया चला. " (सौजन्य: आमोद - एक आनंद कल्लोळ) सौजन्य: केदार दिवेकर, http://janpravas.blogspot.in/
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1487
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

आपला ??? तेहि विनम्र ???? केडी कोण ओ केदार विदिवेकर????? अवांतर : लेख व्यवस्थित आणि वाचनेबल .

भा पो केदार मधिल के अन दिवेकर मधिल डी, म्हनुन केडी