दिवसातल्या २४ तासात आपण काय काय करत असतो......पोटापाण्याच्या सोयीसाठी नोकरी....विद्यार्थीदशेत शिक्षण.....माणूस तोच असला तरी प्रत्येक क्षणाला त्याचे रूप बदलत असते. कधी तो एक नोकरदार असतो...कधी कुटुंबाचा एक घटक,कधी प्रवास करणारा प्रवासी.....सतत धावपळ करण्याचे वरदान (की शाप?) लाभलेले हे आयुष्य...खूप आशा,अपेक्षा,विचार,संवेदना यांनी भरलेली एक पोतडी कधीही कुठेही सतत आपल्या बरोबरच असते....कधीतरी त्या पोतडीचे ओझे असह्य होते आणि मग त्यातले नग एक एक करून बाहेर येण्यासाठी धडपडतात.....हे सगळे घडण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे कातरवेळ..........!
मनुष्य दिवसभर कितीही कणखरतेचा मुखवटा घेऊन वावरला तरी संध्याकाळच्या त्या वेळी सगळे चेहरे एका बाजूला राहतात आणि मग मनातले आतले खोलवर दडवलेले विचार उसळी घेऊन बाहेर पडतात. ज्या संध्याकाळी आपण निसर्गाच्या खूप जवळ आणि इतर माणसांपासून खूप लांब असतो फक्त तेव्हाच ही किमया अनुभवायला मिळू शकते.........कधीतरी शांत वातावरणात मन आपोआप आपल्याशीच वेगवेगळे खेळ खेळू लागतं आणि मग इच्छा असो वा नसो आपल्याला तसेच वाहत जाणे भाग पडते............
समोर अस्ताला जाणारे सूर्यदेव,त्यांची ती लाल,सोनेरी,केशरी किरणे.......समोरचा अफाट पण शांत असलेला निसर्ग.........उंचच उंच डोंगररांगा....त्यावरची झाडे,पाने,फुले.......घरट्याकडे परतण्याची आस लागलेले पक्षी...........आणि आपल्या मनात उठणारे विचार......ती वेळच अद्भुत असते...........उद्या पुन्हा सूर्योदय होणार आहे........पक्षी पुन्हा किलबिलाट करणार आहेत....झाडे पुन्हा सळसळ करणार आहेत हे सगळे ठाऊक असते आपल्याला पण ते सगळे उद्या........आज आत्ता का कोण जाणे पण त्या संध्याकाळचे अंतर्मुख करणारे दृश्य आपल्याला एक अनामिक वैराग्याची भावना देऊन जाते....ही भावना सतत आपल्या मनात तेवत ठेवणे हे फार गरजेचं आहे,केवळ त्यामुळेच आपण कितीही उंची गाठली तरी आपले पाय सतत जमिनीवरच राहतात.....आपण कोण आहोत....का जगतोय,आपले ध्येय काय आहे........आतापर्यंत काय केले आणि इथून पुढे काय करणार आपण ह्याचा मागोवा आपण आपल्याच नकळत घेऊ लागतो.......आतापर्यंतच्या आयुष्यात भेटलेले लोक,घेतलेले अनुभव सगळे डोळ्यांसमोर इतके ताजे होतात कि जणू ते आता कालपरवाच घडलेले असावेत.......सगळे काही असून सुधा आपल्या आयुष्यात अजून आपल्याला काहीच मिळालं नाही आणि जे मिळालंय ते कुठच्याही क्षणी हातून निसटून जाईल ही जाणीव मनाला प्रचंड अस्वस्थ करून सोडते आणि मग समोरचे देहभान हरपून टाकणारे दृश्य पहायची संधीच मिळत नाही...........
माझ्या बाबतीत तरी हे असंच घडतं.........आपल्या जीवनाची दिशा काय असावी हे खरच आपल्या हातात नसते.......विधिलिखित नावाचा जो प्रकार असतो त्याप्रमाणेच हे चक्र चालू असते........पण तरीही आपले आयुष्य आपण स्वतःच नियंत्रित करण्याची धडपड करत असतो आणि मग त्यातून हाती येतो तो केवळ अपेक्षाभंग.......ह्या प्रवासाची मजा घेण्यापेक्षा आपण गाडीचे steering व्हील आपल्याच हातात असावे म्हणून तडफडतो...........गाडीला जिथे जायचं तिथेच ती जाणार असते.......आपले जगणे म्हणजे जत्रेतल्या लहान मुलांच्या गाडीसारखेच...त्याला नियंत्रित करणारा कोणीतरी दुसराच असतो......मुलाला मात्र सतत वाटत राहतं कि आपण चालवतोय तशीच ती चालते आहे.......मग कशाला हा आटापिटा?? जगण्याचा निखळ आनंद घेत जगणेच योग्य आहे.......जी गोष्ट मिळेल ती आपली असे म्हणून चालत राहणे......तुम्हाला काय वाटते ??
वाचने
3728
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
विचारप्रवर्तक लेखन
- मुळात सुख समाधानाने जगायची प्रेरणा आतून यायला हवी त्यासाठी बाह्य प्रेरकाची वाट पाहत बसल्याने फारसे काही हाती लागत नाही.
- आपल्याला जे कळले आहे प्रत्यक्षातही ते तसेच असते हा भ्रम दूर होणे आवश्यक आहे.
- प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतेच अन ते मला कळायला हवेच हा अट्टहास कधी कधी फारच त्रासदायक ठरतो.
- आपल्या आयुष्यात घडलेल्या अप्रिय गोष्टींना दरवेळी आपणच जबाबदार असतो असे नाही त्यामुळे एका मर्यादेपलीकडे त्याचे दुःख करत राहिल्याने काहीच साध्य नाही अन वर्तमानात किंवा भविष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींपासून मिळणारा आनंदही आपण गमावून बसतो.
- मला काय मिळाले ऐवजी मी काय दिले आहे व अजून काय देऊ शकतो असा विचार जेव्हा सुरू होईल, तेव्हा माझ्यातल्या मला आत्यंतिक समाधान मिळू लागेल.
- या सर्व गुणधर्मांची पुढची पायरी म्हणजे स्वतःच्या कृतींकडे तटस्थपणे पाहण्याची क्षमता विकसित करणे जे खरंच अवघड आहे.
या चर्चाविषयावर येणाऱ्या प्रतिसादांची उत्सुकता आहे, विचारप्रक्रियेला चालना मिळेल असे काही नक्कीच वाचायला मिळेल.छान मुक्तक
In reply to विचारप्रवर्तक लेखन by श्रीरंग_जोशी
लेख आणि प्रतिक्रीया दोन्ही छान !!
In reply to विचारप्रवर्तक लेखन by श्रीरंग_जोशी
शेवटचा प्रश्न नसता तर एक
उत्तम प्रतिसाद...
वा.
गवि, दुर्मीळ मधला मी र्ह्स्व
In reply to वा. by गवि
पुन्हा तसंच वाटतंय...
मधूनच कधीतरी अवचित असं
In reply to पुन्हा तसंच वाटतंय... by माम्लेदारचा पन्खा
चांगलं लिहिलय. शेवटचा प्रश्न