Skip to main content

बालुशाही

बालुशाही

Published on 26/09/2012 - 02:52 प्रकाशित मुखपृष्ठ
साहित्यः मैदा - दिड वाटी तुप - २ चमचे दही - २ चमचे साखर - १ वाटी बेकिंग पावडर - १/४ चमचा मिठ - १/४ चमचा केशर - १/२ चमचा वेलची पवडर - १/४ चमचा तुप तळण्यासाठी कृती : १. एका भांड्यामधे मैदा व बेकिंग पावडर चाळुन घ्यावे. त्यात २ चमचे तुप टाकुन निट मिक्स करावे. त्यातच २ चमचे दही घालावे व एकत्र करावे. २. ह्या मिश्रणाचा गोळा होई पर्यंत एकत्र करावे. थोडे पाणी लागल्यास, एकदम गार पाणी वापरावे. पण ह्याची मळलेली कणिक जास्त मळु नये. कणिक अगदी हलक्या हाताने मळावी व २०-२५ मिनिटे झाकुन ठेवावी. ३. तो पर्यंत पाक करुन घ्यावा. एका पातेल्यात साखर व साखर बुडेल एवढेच पाणी टाकावे. हे मिश्रण गॅसवर ठेवुन उकळु द्यावे. त्यात थोडी वेलची पावडर व केशर टाकावे. ह्याचा एकतारी पाक करुन घ्यावा. ४. कढईमधे बालुशाही तळण्यासाठी तेल गरम करावे. ५. आता मळलेल्या कणकेचे छोटे गोळे करुन घ्यावे. हे करताना देखील कणिक जास्त मळु नये. हे गोळे हाताने थोडे चपटे करुन, त्याच्या मधोमध अंगठ्याने दाबावे. त्यामुळे त्याला बालुशाहीचा आकार येईल. ६. ह्या बालुशाही तळताना, त्यांचा आकार दुपट्टीने वाढतो. त्यामुळे त्या करतानाच लहान आकारात कराव्यात. ७. तेल गरम झाल्यावर त्यात ह्या बालुशाही सोडाव्यात. बालुशाही ह्या एकदम मंद आचेवर तळायला लागतात, त्यामुळे त्या आतुन कच्च्या रहात नाहीत. ८. बालुशाही तेलावर तरंगायला लागल्यावर, त्या पलटाव्यात. अशा प्रकारे सर्व बालुशाही golden रंग येईपर्यंत तळुन घ्याव्यात. ९. बालुशाही तळल्यावर, बाहेर काढुन थोड्यावेळ गार होउन द्याव्यात व नंतर पाकात टाकाव्यात. त्यामुळे बालुशाही कडक राह्तात. १०. ५ मिनिटे पाकात ठेवुन, त्या बाहेर काढाव्यात. त्या एका प्लेट्मधे ठेवुन, त्यावर पिस्त्याचे काप, केशर ह्यानी सजवावे. असेच २-३ तास ठेवावे. बालुशाही खाण्यासाठी तयार आहे. ११. बालुशाही आज करुन दुसर्‍या दिवशी खाल्ल्यास, त्याची जास्त छान चव लागते. balushahi balushahi2

याद्या 60732
प्रतिक्रिया 36

In reply to by किसन शिंदे

"खाजा" हेच नाव आहे अलिबाग्,कर्जतकडे मारवाडी लोक याला बालुशाही म्हणतात. लागतो मस्त पण सध्या कॅलरी कॅलरी खेळताना जरा कंट्रोल करावा लागतो इतकेच.

हलवायाच्या दुकानातल्या बालुशाहीच्या कानाखाली जाळ काढील अशी दिसतेय ही बालुशाही.

बालुशाही मस्त ! तळ कोकणात "खाजा" नावाचा बालुशाही च्या जवळचा पदार्थ मिळतो. त्याची ही पाकृ द्यावी !

मंडळ आपले आभारी आहे.. :) बहुतेक खाजा हा वेगळा असतो. त्याचा आकार पण वेगळा असतो. त्या मधे सारण भरलेले असते. मला नक्की माहित नाही.

In reply to by Mrunalini

माझ्या मते खाजा हा आकाराने मोठा असतो. बालुशाही चवीला गोड असते तर खाजावर अक्षरशः साखरेचे आवरण असते. त्यात सारण वगैरे काही नसते. बालुशाही बंगाली मिठाई आहे आणि केशर वगैरे टाकून ती जरा उच्चभ्रू बनली आहे. खाजा बिचारा गरीब आणि फारातफार मध्यम वर्गीय आहे. गुगलून पाहीले असता, पट्टी स्वरूपाचे खाजाही पाहायला मिळतात. हे असे, दक्षीण भारतात आणि बांगला देशात बनवितात असा माझा अंदाज आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

https://lh5.googleusercontent.com/-V2kzkJjxnbc/UGW_-6oMQEI/AAAAAAAAAK0/9BMrX0kOL-E/s512/Photo0050.jpg हा पहा . आमच्या कडे याला खाजा म्हणतात. इथे फोटो का दिसत नाही ? मदत प्लीज.

@पेठकर काका >>>>माझ्या मते खाजा हा आकाराने मोठा असतो. बालुशाही पण बर्‍याच आकारात मिळते. मी बघितलेला खाजा साधारण बालुशाही एवढाच होता. (मिरज येथे पाहिला, खाल्ला होता. कॉलिंग बॅटमॅन प्लीज) https://lh3.googleusercontent.com/-Y6G5DQ53aPw/UGNgTi7d2pI/AAAAAAAAAFs/ci42_brbRy0/s304/khaja.jpg >>>>बालुशाही चवीला गोड असते तर खाजावर अक्षरशः साखरेचे आवरण असते. आवरण नव्हते. अगदी पाकाची चमक फक्त. >>>>त्यात सारण वगैरे काही नसते. अगदी बरोबर. बादवे मालवणी खाजा नावाचे एक सदर सा. मार्मिक मध्ये प्रभाकर भोगले चालवायचे. मालवणी खाजा म्हणजे अजून काय?

In reply to by अभ्या..

मालवणी खाजा बेसन -गुळापासून बनवतात . त्यात सुंठ ही घातलेली असते http://www.karuppaswamygeneralstores.com/full-images/malvani-khaja-863569.jpg चित्र आंजावरुन

In reply to by सानिकास्वप्निल

अच्छा हा आहे होय मालवणी खाजा. ह्याला लहानपणी आम्ही 'गोडी शेव' म्हणायचो. दहिसरला मंडपेश्वरच्या जत्रेत लावलेल्या स्टॉल्सवर मोठ्या थाळ्यात ह्या शेवेचा (मालवणी खाजाचा) डोंगर रचून वरून त्याला रंगीत जिलेटीन पेपर लावलेला असायचा.

In reply to by अभ्या..

अभिजित, खाजा गड्ड्यावर पोलिस चौकीच्या समोर जे उत्तर प्रदेशी हलवायाचं दुकान असतं तिथं मिळतो पुढच्या वर्षी दोघं जण जाउ आपण. तिथं खाजा खाल्यावर गुढी पाडव्याच्या दिवशी गळ्यात साखरेचा हार पडेपर्यंत काही गोड खाल्लं नाही तरी चालतं. डायबेटीसवाल्याला विनापुरावा मारायचा अतिशय सोपा उपाय आहे हा खाजा.

तूप आणि मैदा फेसून त्याचा साठा लावलेल्या चार (कणकेच्या) पोळ्या एकावर एक ठेवून त्यांची गुंडाळी करून ती एकेक इंचावर आडवी कापल्यावर पडलेल्या गोळ्या पुरीसारख्याच पण हलकेच लाटून तुपात तळल्यावर निघालेल्या चिरोटासदृश आकृतीवर गरम असतानाच पिठीसाखर भुरभुरवून अथवा साखरेच्या पाकात टाकून निथळवलेल्या पदार्थास खाजा म्हटलेले काही घरांत पाहिलेले आहे.

सुरेख!! मिपाने आता... संजीव कपूर च्या 'खाना खजाना' सारखे मिपाचे स्वतःचे असे पाककृतींना समर्पित संकेतस्थळ चालू करावे... मिपाखाद्य संस्कृती... नावाचे. :)

बालुसाही हा खाजा नसुन सुतरफेणी च्या जवळचा प्रकार आहे. खाजा हा उत्तर गुजराथ, सुतरफेणी हा सौराष्ट्र, आणी बालुसाही हा राजस्थान चा पदार्थ आहे. त्याला बालुशाही नाही तर 'बालुसाही' म्हणतात.