Skip to main content

व्हेज कडाई

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 03/10/2012 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
Veg Kadai साहित्यः फरसबी १० नग गाजर २ नग कॉली फ्लॉवर १ मोठी वाटी भरून. मटार १/२ मोठी वाटी. भोपळी मिरची २ नग कांदा २ नग मध्यम अख्खे धणे १ मोठा चमचा (टेबल स्पून) जीरं १ लहान चमचा (टि स्पून) काश्मिरी मिरच्या ३ नग लसूण ५-६ पाकळ्या आलं १ इंच हिरवी मिरची १ नग हळद १/२ लहान चमचा धणे पावडर १ मोठा चमचा टोमॅटो २ मध्यम तेल अर्धी वाटी मीठ चवीनुसार काजूपाकळी ८-१० (वैकल्पिक) कोथिंबीर आणि आलं सजावटीसाठी. तयारी: फरसबी, गाजर, भोपळी मिरची, टोमॅटो ह्या भाज्यांचे अर्ध्या इंचाचे तुकडे करून घ्या. कांदा लांब आकारात चिरुन घ्या. कॉलीफ्लॉवरचे छोट्या आकाराचे तुरे काढून घ्या. आख्खे धणे, जीरे आणि काश्मिरी मिरच्यांचे तुकडे कोरडेच परतून त्याची पावडर करून घ्या. आलं, लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरवर वाटून घ्या. कोथिंबीर चिरून घ्या. आल्याचे, काड्यापेटीच्या काडीच्या आकारात, तुकडे करून घ्या. कृती: एका कढईत तेल तापवा. त्यात काजूपा़कळी फिकट रंगावर परतून घ्या. त्यावर कांदा टाकून परता. कांदा शिजून मऊ होईपर्यंत परता. धणे, जीरे, काश्मिरी मिरच्यांची वाटलेली पावडर थोड्या पाण्यात कालवून कढईत टाका. पाणी आटेपर्यंत मध्यम आंचेवर परता. पाणी आटल्यावर आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट त्यात मिसळा. पुन्हा परतत राहा. भोपळी मिरच्या आणि टोमॅटो वगळून बाकी भाज्या कढईत टाकून परता. थोडे पाणी घालून, नीट मिसळून, झाकण ठेऊन मंद आंचेवर भाज्या शिजवून घ्या. भाज्या अर्धवट शिजल्यावर त्यात भोपळी मिरच्या आणि टोमॅटो मिसळा. हळद, धणे पावडर आणि मीठ मिसळा. गरज असल्यास थोडे पाणी घालून (अंतीम पातळीला भाजीत जास्त पाणी असता कामा नये हे लक्षात असू द्यावे) झाकण ठेवून भाज्या पूर्ण शिजवा. भाज्या शिजल्यावर बाऊलमध्ये काढून कोथिंबीर आणि आल्याच्या काड्यांनी सजवा. शुभेच्छा....!

वाचने 54171
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

इतकी मस्त रेसिपी दिल्याबद्दल तुमचे आभार. आत्ता फक्त फरसबी नाहिये ती आणली की हीच भाजी करणार.

-^- दंडवत स्वीकारा! फोटो तर लई भारी! भाजीही सोपी वाटतेय करायला.

खूप छान पाकृ आहे. रंग ही सुरेख आलाय काका. इतक्या छान चवीची पाकृ दिल्याबद्द्ल धन्यवाद :)

पाकृ चवीष्ट असेल त्यात शंकाच नाही. छोटी सुटसुटीत कृती आवडली. बाकीचं पाल्हाळ न लावता थोडक्यात पाकृ लिहिल्याबद्दल आणि करतानाचे कलात्मकता की काय दाखवून उगाच पण्णास फोटो न टाकल्याबद्दल आभार. ;)

मिपा चा पाकृ विभाग भलताच फार्मात आलेला आहे. काय एक एक कलाकृती सादर होत आहेत ? वा रे वा !

मिक्सर नाही.. सगळ्या भाज्या. आणि चवीला मस्त .. जरा चमचमीत.. नक्की करण्यात येईल धन्यवाद पेठकर काका!

मिक्सर आहे पाककृतीत.. त्या शिवायचा पर्याय सुचवा ... बर्‍याच बॅचलर आणि भारताबाहेर असणार्‍यांचा नेहमीचा प्रॉब्लेम..

In reply to by मैत्र

मिक्सर नसेल तर निदान छोटा, पितळेचा, खलबत्ता असतो तो घरात असावा. त्यात सर्व कुटून घ्यावे. तोही नसेल तर आलं + लसूण + हिरवी मिरची अगदी बारीक चिरुन पोळपाटावर ठेवून वरून लाटण्याचे दाब देऊन लाटायचे आणि ते मिश्रण वापरायचे. पोळपाट लाटणंही नसेल तर कटींगबोर्डावर बारीक चिरलेलं आलं + लसूण + हिरवी मिरची हे मिश्रण घेउन एखाद्या वाटीने चेपून घ्यायचे. आणि तेही नसेल तर आलं + लसूण + हिरवी मिरची शक्य तितकी बारीक चिरून पाककृतीत वापरायची. व्हेज कडाई चांगली होईल.

In reply to by मैत्र

मैत्रसाहेब, अगदी स्वस्तातले मिक्सर मिळतात. नसेल घ्यायचा तर मला सांगा. हिरव्या देशात माझ्या जवळपास असाल तर (इलिनॉय) माझ्याकडचा जादाचा घेऊन जावा. एवढी काळजी करू नका व या यंत्रयुगात असे चांगल्या पाकृपासून स्वत:ला वंचित ठेऊ नका. मस्त स्वयंपाक, वाटणाघाटणाच्या भाज्या करा. घरच्यांना तुमची काळजी वाटणे कमी होईल, शिवाय तब्येत छान राहील.

In reply to by रेवती

उगाच थ्री पीस सूट / फ्लॅनेलचा सूट घातल्या सारखं वाटतं.. रेवती काकू / आज्जी.. :) पण वरचे दोन्ही प्रतिसाद - (पेठकर काका आणि रेवती)दिसत नाहीयेत विना मिक्सर पर्यायांचे .. त्यामुळे उत्तर समजलं नाही..

आत्ताच ही भाजी केलिये. मी एकटीनेच चव घेऊन पाहिली. ;) धण्याच्या स्वादाची छान झालिये (बहुतेक मी नुकतेच आणलेले धणे ष्ट्राँग आहेत).

In reply to by रेवती

ऑर्गॅनिकही असावेत , अन्यथा या हायब्रीडच्या जमान्यात अशी चव मिळणे म्हणजे अशक्यच ! ;-)

In reply to by कुंदन

असतील हो असतील. तुम्हाला पाठवू का थोडे.......काळजी नको, माझ्याच खर्चानं पाठ्वते. ;)

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश,
आख्खे धणे, जीरे आणि काश्मिरी मिरच्यांचे तुकडे कोरडेच परतून त्याची पावडर करून घ्या.
पाककृतीत आख्खे धणे नाही तर त्याची पावडरच वापरली आहे.