भारतात घरी महालक्ष्मी पूजेनिमित्त गोडाधोडाच्या जेवणाचा घाट घातलेला असतांना सासूबाईंना इथे मी आणि नातू परदेशात एकटे आहोत याचं वाईट वाटत होतं. "उद्या शनिवार आहे, निदान काहीतरी गोड कर, साधा शिरा केलास तरी चालेल, पण पोराच्या आणि तुझ्या पोटात काहीतरी गोड जाऊ देत!" म्हणाल्या.
'बरं' म्हंटलं, आणि शिरा सोडून आपल्याला झेपेल असं गोड काय करता येईल यासाठी घरात काय आहे ते शोधायला लागलो. खारीक, बदाम आणि कंडेन्स्ड मिल्कचा डबा सापडला.
मग, इथे 'मिसळपाव'वरच पूर्वी कधीतरी वाचलेली बर्फीची पाककृती आठवली, कुणाची होती ते नक्की आठवत नाही (बहुधा सानिकाताईंची असेल), त्यात वापरलेले बाकी घटक देखील नेमके आठवत नाहीत, पण साधारण कृती आठवत होती आणि सोपी होती असं लक्षात होतं, म्हणून मी हा 'उद्योग' केला आहे. तो पर-प्रकाशित आहे हे ऋण मान्य करतो.
साहित्यः
२०० ग्रॅम खोबर्याचा कीस (फ्लेक्स)
१०० ग्रॅम ब्रेड क्रम्ब्ज
१० ग्रॅम अनसॉल्टेड बटर
१०० ग्रॅम चारोळ्या
२०० ग्रॅम बिया काढलेली खारीक (बारीक तुकडे करून)
२०० ग्रॅम चॉकोलेट चिप्स
१०० ग्रॅम बदाम काप
८ औंस (~२४० ml) कंडेन्स्ड मिल्क
कृती:
आधी ओव्हन ३५० डिग्री फॅरनहाईट तापमानाला तापवून घेतला. त्यात १३" X ९" काचेचा बेकिंग ट्रे ५ मिनिटे ठेवून बाहेर काढला आणि त्याला आतून अनसॉल्टेड बटर लावून घेतलं. त्यावर ब्रेड क्रंब्जचा थर देऊन घेतला. यानंतर क्रमाक्रमाने चारोळ्या, चॉकोलेट चिप्स आणि बदाम काप यांचे थर केले. यावर अर्धे कंडेन्स्ड मिल्क ओतून एक थर केला. त्यावर खोबर्याचा कीस, पुन्हा एकदा (उरलेलं) कंडेन्स्ड मिल्क घातलं, शेवटी खारकेचे बारीक तुकडे घालून एक थर केला. हे सर्व असलेला ट्रे ओव्हन मध्ये ३० मिनिटे ठेवला आणि बेक केला.
३० मिनिटांनी बाहेर काढून, पूर्ण गार झाल्यावर त्या बर्फीचे साधारण चौकोनी तुकडे केले (करण्याचा प्रयत्न केला :-). एकंदरीत 'बर्फीचा प्रयत्न चांगला जमला' असं मुलाने चव घेऊन सांगितलं. म्हंटलं करावी कृती इथे पेश, आणि त्या अनामिक मूळ कलाकाराला श्रेय आणि धन्यवाद द्यावेत!
वाचने
4810
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला प्रयत्न आहे.
छान दिसतंय!
सहमत.
In reply to छान दिसतंय! by पैसा
सापडली!
बर्फी / बार छान दिसत आहे
न्यूट्रीबार म्हणा न्यूट्रीबार
करदंटाची आठवण झाली.