प्राणप्रतिष्ठा
लेखनप्रकार
“आबा, अत्ता गणपतीच्या जवळ का जायचं नाही?”
“अत्ताच त्याला आणलंय ना घरी, जरा बसू दे त्याला!”
“मग उद्या सकाळी उठल्या उठल्या जायचं ना गं आजी?”
“अंघोळ करून मग ! गुरुजी येतील, ते पूजा करतील आणि मग आपण जायचं.”
“पण गुरुजी आपल्या आधी त्याच्याजवळ का जाणार आहेत?”
“अगं, गणपतीची प्राणप्रतिष्ठा करायला म्हणून.”
“प्राणप्रतिष्ठा म्हणजे?” हे कुतुहल ओठांशी यायच्या आतच आम्ही झोपायचो.
उद्याची वाट बघत. त्या दिवशीची झोप अर्धवट असायची आणि झोपेत पडलेली स्वप्नही! बाहेरच्या खोलीतले दिवे अजूनही मालवलेले नाहीत, दबलेल्या आवाजात तिथून हसण्याचे, गप्पांचे आवाज कानावर येत आहेत. परडीभर मोग-याची फुलं आहेत...पण माझं हार करायचं काम दुसरंच कोणीतरी करतंय वाटतं?
जास्वंदीचं फूल तरी मलाच ओवायचंय, मधोमध तुरा रुळला पाहिजे!
नारळाच्या वड्यांचा वास येतोय, एखादी तोंडात टाकायला हरकत नाही... नाहीतरी निर्जळी उपासाची सुरुवात रताळ्याचा कीस खाऊनच केली आज! तहानही लागली आहे खूप, उठून पाणी पिऊया.
बाहेरचे आवाज आता बंद झालेत पण अंधुकशा उजेडात गणपतीच्या मूर्तीकडे टक लावून बसलंय कोणीतरी. खोलीत फारसा उजेड नाही पण त्यांचे डोळे मात्र चमकताहेत...मामा आहे का तो? की आजी असेल? आबा असतील कदाचित किंवा मग काकू-आजी!
यांपैकी स्वप्न कुठलं आणि ‘खरं’ कुठलं? कधीच कळलं नाही... आजही ठाऊक नाही.
रात्रीची झोप कशीही झाली असली तरी सकाळी मात्र सगळी भावंड टकटकीत जागी! केर काढण्यापासून पूजेचं ताट तयार करण्यापर्यंत आणि स्वतः अंघोळ करण्यापासून गुरुजींना खिचडी नेऊन देण्यापर्यंत कोणतंही काम करायला एका पायावर तयार! गुरुजींनी पूजा सुरू केली की मात्र बाहेरच्या खोलीतच घुटमळायचो. ते गणपतीला दरवर्षी काहीतरी ‘सिक्रेट’ सांगतात असं वाटत रहायचं. दिवस उजाडताच खडबडून जाग्या झालेल्या स्वयंपाकघरातून अधून मधून कोणीतरी डोकावून जायचं. पंचखाद्य, मोदक, पेढे हळुहळू बाहेर यायला लागायचे आणि मग सुखकर्ता दुखहर्ता च्या शर्यतीत गुरुजी एकटेच पळायचे. त्यांची आरती चालू असताना मी घड्याळाच्या सेकंद काट्याकडे चोरनजर ठेवून असायचे. मग उत्साहाच्या आणि आनंदाच्या भरात काय दणदणीत आवाज लागायचे आमच्या पहिल्या आरतीला!
“झाली प्राणप्रतिष्ठा?” समंजस मुलीचा आव आणत मी विचारायचे.
“हो, झाली तर!”
“म्हणजे काय झालं?”
“जागं केलं.”
तेव्हा काहीच समजायचं नाही. समजून घेण्याची गरजही वाटली नाही. गणपतीच्या अगदी जवळ जाऊन उभं रहायला परवानगी, इतकंच काय ते कळायचं! चित्रपटात कॅमेरा सावकाश फिरावा तशी मी मूर्तीभोवती पाऊण प्रदक्षिणा घालायचे. समजायचं इतकंच की ताज्या कमळाच्या पाकळीसारखे त्याचे डोळे सुंदर, आखीव आणि टवटवीत होते. मी कुठेही गेले तरी त्याची नजर माझ्याकडेच असल्यासारखी वाटायची.
पुढचे पाच सहा दिवस ही एक गोष्ट लक्षात ठेवून ‘शहाण्यासारखं’ वागणं जमायचं, हट्ट न करणं जमायचं, सांगितलेली (आणि जास्तीची) कामं करणं जमायचं आणि आठवड्याभराचे पाढे आणि शुद्धलेखन एका दिवसात पूर्ण करणंही जमायचं! नेहमी अथर्वशीर्ष म्हणताना ‘डोळे कधी एकदा उघडतोय’ या नादात चुळबूळ करणा-या आम्हाला गणपतीत मात्र अथर्वशीर्षाची आवर्तनं झाल्यावरही मिनिटभर डोळे बंद ठेवून बसणं जमायचं.
आजही गणपतीच्या आदल्या दिवशी अर्धवट आणि अधीर झोप होते... पण बाहेरच्या खोलीतून येणा-या गप्पांच्या आवाजांमधला एक आवाज माझा असतो. अंधुक उजेडात मूर्तीसमोर बसणारी मीही एक असते. गणपतीबद्दल लहानपणीचेच प्रश्न आदल्या रात्री पडतात पण विचारायची बालिश हिंमत करवत नाही.
पहिली आरती करताना, ‘वत्स तुझा मी भटकत फिरतो विसरून तुज ऐसा’ या ओळीला आवाज कापतो, गणपतीच्या नजरेला नजर देताना कससंच होतं.
आमच्या घरातील सगळ्यात लहान सदस्य, जो कदाचित नकळत रोज गणपतीची आठवण काढत असेल, तो एकटाच ही ओळ खुल्या गळ्याने, गणपतीकडे बघत, मनोभावे म्हणतो... मी गणपतीऐवजी त्याच्याकडेच बघते!
आजुबाजूला जमलेली आपली माणसं घरापासून फार लांब रहात नसली तरी इतक्या सवडीने एकत्र येऊन शिळोप्याच्या गप्पा करणं याच वेळी जमतं. बाहेर सगळीकडे फराळाचे जिन्नस मिळत असले तरी आठवड्याभरासाठी येणा-या सगळ्या पाहुण्यांसाठी ‘घरचंच’ केलं पाहिजे असा प्रेमळ हट्ट आजी आणि मामी स्वतःशीच करतात.
सहाच तास झोप झाली म्हणून रात्री थकवा येणारी मी घरच्यांबरोबर रात्री दोन तीनच तास झोपून नव्या उत्साहाने दुस-या दिवशी कामाला लागते. रोजची पानं आवरणं नकोसं होत असलं तरी गणपतीत कितीही पंगती वाढायला आणि आवरायला कोणाचीच ना नसते.
ढोल-ताशांचा आवाज ऐकून नेहमी कान झाकणाराही विसर्जनाच्या वेळी ढोलकीच्याच तालात चार पावलं टाकतो. एरवी केवळ जेवताना फिक्या कपड्यांना डाग पडतात पण गणपतीत नवे कोरे कपडे घालून स्वयंपाकघरात वावरलो तरी कपडे स्वच्छ रहातात. तरीही पुढचे कित्येक दिवस त्या धुवून आलेल्या कपड्यांमधे उदबत्तीचा, ताज्या भज्यांचा, मोदकावरच्या साजूक तुपाचा, मूर्तीला वाहिलेल्या फुलांचा दरवळ सापडत रहातो. सणाचे दिवस आठवूनच मरगळ जरा दूर होते.
‘जागं केलं’ म्हणजे प्राणप्रतिष्ठा केली असं लहानपणी सांगायचे. त्याचा अर्थ कळतो की नाही हे महित नाही, पण एक मात्र नक्की कळतं...प्राणप्रतिष्ठा आपण त्याची करत असलो तरी जागं तो आपल्याला करून जातो...
वाचने
4292
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
!
:-) लेखन आवडले.
फारच सुंदर!!!! अतिशय वेधक लिखाण .
विशेषतः शेवटचं वाक्य.
रात्री कधीतरी १०-११ नंतर समोरच्या चाळीतल्या कुणाकडे मृदुंगाच्या साथीने आरती व्हायची. गादिवर पडल्या पडल्या अर्धवट गुंगीत ऐकलेली ती आरती, मृदुंगाचा रेखीव ठेका नी बाहेरच्या खोलीतल्या समईचा मंद प्रकाश...छान आठवणी जाग्या केल्यास...
वा!
तो आपल्याला जागं करून जातो >> अगदी अगदी! आवडलं लिखाण.
मोरया. :)
सुंदर लिखाण! सर्व प्रसंग डोळ्यांसमोर उभे केलेत.
साधं सुधं छानसं.
आवडलं.
व्वा.....! प्राण-प्रतिष्ठा,,,या संकल्पनेच्या आशयाला मस्त मांडलत...! :congrats
अतिशय सुंदर लिखान केलंय.
शेवटच्या वाक्यासाठी तर शंभर शिट्ट्या..!
सुरेख!
कालच सकाळी ५ वाजल्या पासुन उठुन १२० उकडीचे मोदक एकटीन केले. संध्याकाळी ३५ लोक होते पंगतीला. अन सारा स्वयंपाक कांदा लसुण विरहित असुनही किती चविष्ट लागला. हे सार कस जमल देव जाणे, पण जमल खर.
सुरेख!
कालच सकाळी ५ वाजल्या पासुन उठुन १२० उकडीचे मोदक एकटीन केले. संध्याकाळी ३५ लोक होते पंगतीला. अन सारा स्वयंपाक कांदा लसुण विरहित असुनही किती चविष्ट लागला. हे सार कस जमल देव जाणे, पण जमल खर.
लिखाण अतिशय जिवंत झालेय.
भक्तीभावे लिहीलेला लेख छानच झाला आहे. अभिनंदन.
>>प्राणप्रतिष्ठा आपण त्याची करत असलो तरी जागं तो आपल्याला करून जातो... >> अगदी १००% खरंय, लेख फारच छान आहे, अप्रतिम :)
//ढोल-ताशांचा आवाज ऐकून नेहमी कान झाकणाराही विसर्जनाच्या वेळी ढोलकीच्याच तालात चार पावलं टाकतो. एरवी केवळ जेवताना फिक्या कपड्यांना डाग पडतात पण गणपतीत नवे कोरे कपडे घालून स्वयंपाकघरात वावरलो तरी कपडे स्वच्छ रहातात. तरीही पुढचे कित्येक दिवस त्या धुवून आलेल्या कपड्यांमधे उदबत्तीचा, ताज्या भज्यांचा, मोदकावरच्या साजूक तुपाचा, मूर्तीला वाहिलेल्या फुलांचा दरवळ सापडत रहातो. सणाचे दिवस आठवूनच मरगळ जरा दूर होते///
--------------------------------------------
निव्वळ अप्रतिम!
मनाच्या तळाचा ठाव घेणारे प्रत्ययकारी लेखन.
खूप खूप छान लिहिलंय आणि मनापासून आवडलं!
"ढोल-ताशांचा आवाज ऐकून नेहमी कान झाकणाराही विसर्जनाच्या वेळी ढोलकीच्याच तालात चार पावलं टाकतो. एरवी केवळ जेवताना फिक्या कपड्यांना डाग पडतात पण गणपतीत नवे कोरे कपडे घालून स्वयंपाकघरात वावरलो तरी कपडे स्वच्छ रहातात. तरीही पुढचे कित्येक दिवस त्या धुवून आलेल्या कपड्यांमधे उदबत्तीचा, ताज्या भज्यांचा, मोदकावरच्या साजूक तुपाचा, मूर्तीला वाहिलेल्या फुलांचा दरवळ सापडत रहातो. सणाचे दिवस आठवूनच मरगळ जरा दूर होते."
"प्राणप्रतिष्ठा आपण त्याची करत असलो तरी जागं तो आपल्याला करून जातो..."
अतिशय जिवंतपणा आहे लिखाणात. आपल्या आयुष्यात सहज डोकावून पहाव असा सह अनुभूतीचा आनंद वाटला..
शेवट खरंच या क्षणी जागं करून गेला...
... आत्मानं च प्रोक्षयेत...
फारच सुंदर.
छान लिहिलय. एखाद्या सणाबद्दल सगळ्यांच्या भावना तशाच असतात याची गंमत वाटते.
काय मस्त लिहिलंय एकदम!
आयला, प्रयत्न करूनही आम्ही असलं लिहू शकत नाही.
छोटी छोटी वाक्य असलेला संवाद आणि त्यात आलेला मोठा आशय.
आवडलंय तुमचं लिखाण.
पुलेशु
छान
!