मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निहारी

गणपा · · पाककृती
चुकला फकीर जसा मशिदीतच सापडायचा तसेच भरकटलेले अस्मदिक पुन्हा एकदा सामिष पाककृतीकडे वळतो. :) गेल्या आठवड्यात 'मी मराठी'वर न्यहारीच्या पदार्थांवर चर्चा चालली होती. त्यात प्रतिसाद देताना निहारीची आठवण निघाली. दोन्ही शब्दांतल सार्धम्य पण कुतुहलाचा विषय आहे. (थोडंस गुगलल्यावर कळलं की याच मुळ 'Nahar' نهار‎ (मराठी अर्थ दिवस) या एका अरबी शब्दात आहे. जाणकार मंडळी यावर प्रकाश टाकतीलच.) परत त्यात हा पदार्थ शक्यतो सकाळी न्यहारीच्या वेळीच खाल्ला जातो. अनेक उपहार गृहातही निहारी केवळ न्यहारीच्या वेळीच मिळते. अगदी ११ वाजता गेलात तर संपलेला असतो. (कोण रे तो चितळेऽऽऽ चितळेऽऽऽ ओरडतोय? ;)) भारतातही सर्रास बनवला जात असला वा उपहारगृहांत मिळत असला तरी माझी या पदार्थाशी ओळख मी मध्यपुर्वेत असताना झाली. जुम्मे के जुम्मे भल्या पहाटे आम्ही क्रिकेटच्या सरावासाठी जायचो. पहाटे साडेपाच ते साडेनऊ या वेळेत घामटा काढुन झाल्यावर आमची पाऊलं आओपाप एखाद्या उपहार गृहाकडे वळत. कधी उडप्याच तर कधी अस्सल गुजराथी तर मग कधी पठाणी. अश्याच एका पठाणी उपहार गृहात पहिल्यांदा निहारी चाखली आणि मग तिच्या प्रेमातच पडलो. मध्यपुर्व सुटलं आणि मग कस कुणास ठाऊक पण निहारीही विस्मरणात गेली. पण आता आठवण निघालीच तर मन स्वस्थ बसु देईना. फार काही कष्टाचं काम नाही पण वेळकाढु आहे. तसं पाहिलं तर आदल्या दिवशी करुन दुसर्‍या दिवशी खाण्याचा हा पदार्थ. उत्तम चवीची खात्री हवी असेल तर तेवढा वेळ द्यायलाच हवा नाही का? तर मग लागायच ना तयारीला? साहित्यः ३/४ किलो कोवळं मटण. (हाडां सकट. शक्यतो नळ्या (बोनमॅरो(?)) पण घ्याव्या.) (ज्यांना मटण आवडत नाही त्यांनी चिकन घेतले तरी चालेल.) २ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे. २ मोठे चमचे ताजं घट्ट दही. २ मोठे चमचे आलं लसुण वाटण. १ लहान चमचा हळद. १ लहान चमचा सुंठ पुड. २ मोठे चमचे लाल तिखट. २ मोठे चमचे धणे पुड. (लवंग + दालचिनी + काळीमीरी + वेलची (मोठी लहान दोन्ही)+ बडीशेप + शाहजीरं) खडा मसाला कोरडा भाजुन त्याची पुड. किंवा २ मोठे चमचे गरम मसाला. ४-५ कप गरम पाणी. २-३ मोठे चमचे मैदा. १ डाव तेल. मीठ चवी नुसार. आल्याचे ज्युलियंस. (लांब उभे काप.) फोडणीसाठी : २ मोठे चमचे साजुक तुप + हिरव्या मिरच्या. कृती: कांदा तेलावर परतुन घ्यावा. त्याचा कच्चट वास निघुन गेल्यावर त्यात आलं-लसणाच वाटण घालुन परतावं. त्यात सगळे मसाले घालुन तेल सुटे पर्यंत परतुन घ्यावे. नंतर आच लहान करुन त्यात दही घालावं. मसाला परत तेल सोडू लागल्यावर त्यात मटण टाकुन ढवळावं जेणे करुन सगळा मसाला मटणांच्या तुकड्यांना व्यवस्थित लागेल. चवी नुसार मीठ घालावं. ५-६ मिनिटे मोठ्या आचेवर परतल्या नंतर त्यात गरम पाणी टाकावं. एक उकळी आली की आच लहान करुन वरुन झाकण ठेउन चांगलं ३-४ तास शीजु द्यावं. अधुन मधुन दोन चार वेळा ढवळावं. (पुर्वीच्याकाळी म्हणे ही शिजवण्याची क्रिया रात्र भर चालायची. हल्ली गॅसच्या चढत्या किंमती पहाता ३-४ तास म्हणजे एखाद्याच्या तोंडाला फेसच यायचा. पण त्यावर तडजोड म्हणुन प्रेशर कुकर आहेच की. पण अट्ट्ल खवय्या मात्र पहिल्या घासात तुमची ही चोरी पकडेल. ;) ) ३-४ तासां नंतर मैदा वाटीभर पाण्यात भिजवुन मग तो द्रव रश्यात टाकुन ढवळावं. रस्सा दाट होईल. १०-१५ मिनीटांनी आच बंद करावी. फोडणीच्या भांड्यात साजुक तुप गरम करुन त्यात उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरचीचा तडका तयार करावा आणि तयार निहारीवर सोडावा. वरुन आल्याचे उभे काप टाकुन, तंदुरी रोटी वा परांठा यांच्या जोडीने गरमा गरम वाढावे.

वाचने 27769 वाचनखूण प्रतिक्रिया 46

सहज Sun, 09/16/2012 - 18:43
आहाहा!! शेवटचा फोटो, तो रंग !!!!! अप्रतिम .. पुण्यात कोणत्या हाटेलात मिळते का उत्तम निहारी? का पार लखनौ, हैद्राबादला वगैरे जायाचे?

रेवती Sun, 09/16/2012 - 18:50
अगदीच फसले पाकृचे नाव पाहून. इतक्या नाजुक नावाची पाकृ मात्र मौसाहारी असावी ना? ;) तरी सादरीकरणाचे धा पैकी धा मार्क दिलेत.

अरे मला निहारी खायची जाम इच्छा होती पण जिथे (२-३ठिकाणी ) विचारले तिथे ती फक्त बैलाचीच होती. मग नाद सोडून दिला. त्यामुळे ही पाकृ बघून जाम आनंद झाला आहे. धन्यवाद !!! टीप :- रात्रभर कुकिंग साठी स्लो कुकर वापरावा. चिकन किंवा मटण असे शिजते की लोकं विचारतात, काय वेगळे केले. शिवाय तो फार वीज खात नाही. २-३ तास ते ५-६ तास असे शिजवता येते

अविकुमार Sun, 09/16/2012 - 19:51
वा वा! लय भारी! एकदम तों. पा. सु. रच्याकने - पंजाबसाईडला दाल मखनी रात्रभर शिजवली जाते असे ऐकुन आहोत.

प्रभाकर पेठकर Sun, 09/16/2012 - 20:08
अहाहा...इथे मस्कतात आल्या आल्या (३० वर्षांपूर्वी) पाकिस्तान्याकडे निहारी खाल्ली होती. पण ते बीफ होतं (हे नंतर समजलं) त्या मुळे पुन्हा त्या वाटेला गेलो नाही. पण झकास होती. आता घरी करून पाहीन. पारंपारिक निहारी बनविण्याचे भांडे अडीच फुट व्यासाचे पितळेचे जाड रांजण असते. ते तंदूरी सारखे सर्व बाजूंनी मातीने किंवा सिमेंट ने बांधून काढलेले असते. खाली जाळ लावता येतो. लाकूड, कोळसा किंवा गॅस ह्या पैकी काहीही ह्याच प्राधान्य क्रमाने वापरतात. एक स्वयंपाकी, उपहारगृह बंद झाल्यावर (रात्री १ नंतर), रात्रभर जागून, अगदी मंद आंचेवर, हा पदार्थ चार फुटी कलथ्याने हलवत बसलेला असतो. सकाळी ६-७ पर्यंत निहारी गोश्त तयार होते.

सुनील Sun, 09/16/2012 - 19:58
अहाहा!! "निहारी"लाच हे तर, जेवणात काय? फारा वर्षांपूर्वी मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळील एका हॉटेलात खाल्ला होता हा पदार्थ. पण निहारी ही मटणाचीच. चिकन ३-४ तास शिजवले तर चांगले लागणार नाही.

In reply to by सुनील

गणपा Sun, 09/16/2012 - 20:02
पण निहारी ही मटणाचीच. चिकन ३-४ तास शिजवले तर चांगले लागणार नाही.
पुर्वार्धाशी सहमत. मी ही कधी चिकनची निहारी चाखली नाही. पण असते खरी. चवीबद्दल म्हणाल तर ते चाखल्या शिवाय समजायचं नाही. :)

In reply to by सुनील

रामदास Mon, 09/17/2012 - 11:35
म्हणजे बहुतेक बगदादी नावाचे एक हॉटेल होते तेथे असावे. बाहेर एक पाटी होती निहारी -नल्ली भेजा -पाया. निहारी म्हटल्यावर हे एखाद्या उत्तर हिंदुस्थानी रागाचे दक्षीणेतले नाव असावे तसे वाटते.(म्हणजे हे आपले उगाचच)

In reply to by रामदास

गणपा Mon, 09/17/2012 - 12:36
निहारी म्हटल्यावर हे एखाद्या उत्तर हिंदुस्थानी रागाचे दक्षीणेतले नाव असावे तसे वाटते.
हा हा हा. १ नंबरी.

देवा, गणपाला क्षमा कर. शुद्ध शाकाहाराकडे वळलेल्या माणसाला पुन्हा पापात टाकायचा त्यांच्या मनात दिसत आहे. गंपा, सोयाबीनची होते का अशीच भाजी. :) -दिलीप बिरुटे [शाकाहाराकडे वळलेला]

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणपा Sun, 09/16/2012 - 22:36
देवा, गणपाला क्षमा कर. शुद्ध शाकाहाराकडे वळलेल्या माणसाला पुन्हा पापात टाकायचा त्यांच्या मनात दिसत आहे.
खिक् . डॉक सोयाबीन पासुन बनवा येते का माहित नाही (तुम्हाला प्रयोग करुन पहायला हरकत नाही.) पण टोफु वापरुन करतात असं एका ठिकाणी वाचलय. खाल्लं नसल्याने चवी बद्दल अंदाज नाही.

In reply to by सूड

साहित्यिक साहित्यिक साहित्यिक साहित्यिक .... हुश्श्श्श्श्श्श्श............... ;) साहित्यिक साहित्यिक साहित्यिक साहित्यिक साहित्यिक साहित्यिक झाला सूड घेऊन,,, आपलं ते हे ...लिहून लिहून... :-p

In reply to by अत्रुप्त आत्मा

५० फक्त Mon, 09/17/2012 - 12:03
बुवा फसवेगिरी नाही करायची , हे कॉपि पेस्ट आहे, लिहुन दाखवा म्हणलंय ना सु डगु रुजींनीं.

इरसाल Mon, 09/17/2012 - 09:56
३/४ किलो कोवळं मटण. (हाडां सकट. शक्यतो नळ्या (बोनमॅरो(?)) पण घ्याव्या.) मला आधी ३,४ किलो वाटले चालेल चालेल ३, ४ किलो मटण पण चालेल अशी पाकृ असली तर. शेवटी शेवटी सन्जोप राव व मोडक यांच्याशी अतिशय सहमत.

गवि Mon, 09/17/2012 - 12:13
पाककृती खत्रा आकर्षक आहे. पाव किंवा बन बुडवून मस्त लागेल. घरी करणं अवघड वाटतंय (लई टाईम लागतोय.) तेव्हा विमे आणि रामदासकाकांसोबत निहारी मिळणारे हाटेल शोधणे आणि गाठणे आले. बाकी चार तास मटण शिजवल्यावर हाडेही लुसलुशीत होत असावीत. (लपंडाव चित्रपट:"अगं काय दगड शिजायला लावले आहेत का कुकरात? मटणाचं शिजून मेण होऊन गेलं असेल इतक्यात..") चार तास ग्यासवर ठेवून झोप काढावी हेही शक्य नाही कारण पाणी आटेल ते घालत राहायला लागेल. अन्यथा जळेल. तेव्हा समोर तिष्ठणे अनिवार्य असणार...

ऋषिकेश Mon, 09/17/2012 - 13:10
अहा! बाकी हे पाहुन जो चितळे चितळे ओरडेल त्याला मानलं पाहिजे ;)

In reply to by कपिलमुनी

सुहास.. Mon, 09/17/2012 - 15:47
पुण्यात निहारी कोणत्या हॉटेलमधे मिळते ?? >> नायाब आणि रेडियो, लष्कर, कॅम्प ! पाकृ जबराच ( असा प्रतिसाद देवुन देखील थकलो आहे आता :) )

खुशि Mon, 09/17/2012 - 14:42
वा! गणपा,निहारी मस्त.साहित्य किती निगुतीने माण्डले आहेत फोटो साठी. फारच छान. जीवनातही असेच नीटनेटके असणार याची खात्री वाटते. तर्री बघुन मात्र तोन्ड पोळल्याचाच भास झाला. मला मात्र छोटे छोटे बटाटे,सोयाबिनच्या वड्या वापरुन ही निहारी करुन बघावी लागेल. नक्की करेन आणि कशी झाली ते तुम्हाला कळवेन. निहारी नाव वाचुन मला आधी एखादी उपासाची पाककृती असेल असे वाटले. पण खुप छान आहे निहारी.

प्रभाकर पेठकर Mon, 09/17/2012 - 15:04
तर्री बघुन मात्र तोन्ड पोळल्याचाच भास झाला. जीवनांतही असेच तिखटज्जाळ असाल असा अंदाज बांधतो.

राही Mon, 09/17/2012 - 15:42
निहारी शब्द वाचून पनिहारी, बलिहारी अशा नाजुक नाजुक गोष्टी मनात आल्या.पा.कृ. मात्र बडी भारी निकली.