Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शुचि on Fri, 08/24/2012 - 15:02
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
कवितेचे पुस्तक किंवा कवितेचा एखादा ब्लॉग वाचणे हा माझ्याकरता नितांतसुंदर अनुभव असतो. लहानपणी केव्हा या आनंदाची गोडी लागली ते आठवत नाही पण एक पक्के लक्षात आहे - गणितातील प्रमेय सोडविल्यावर झालेल्या शब्दातीत आनंदाची तुलना आतापर्यंत फक्त एकाच आनंदाने झाली आणि ती म्हणजे "कवितेतील सौंदर्यस्थळ" अचानक गवसणे. खरोखर अंतःस्फुरणाने उतरलेली प्रत्येक कविता ही वाचकाच्या मनाशी सूक्ष्म संवाद साधते याबद्दल मला यत्किंचीतही संदेह नाही. नीबीड आणि वनश्रीने नटलेल्या गर्द रानवाटेवरून अनेकदा गेल्यानंतर हळूहळू त्या वाटेवरची दडलेली सौंदर्यस्थळे आपल्या लक्षात येऊ लागतात त्याप्रमाणेच बर्‍याच कविता या पुनर्वाचनानंतर हळूहळू उलगडू लागतात हा अनुभव आहे. जणू काही कवितेला, एखाद्या स्तोत्राला देखील सूक्ष्म"सेल्फविल" (स्वेच्छा) असते. जेव्हा तिला , आपल्यापुढे पूर्ण सौंदर्यानिशी साकार व्हावयाचे असते तेव्हाच ती साकार होते. रामरक्षा हे स्तोत्र (कविता) बुधकौशिक ऋषींना स्वतः शंकरांनी स्वप्नामध्ये सांगीतले आणि बुधकौशिक ऋषींनी ते आठवेल तसे प्रातःकाळी लिहून काढले असा उल्लेख या स्तोत्रांत आहे. मी लहानपणापासून कितीदा तरी रामरक्षा ऐकली, पठण केली. परंतु खूप उशीरा मला या स्तोत्रांतील काही संदर्भ लागले. जसे - जिव्हां विद्यानिधी: पातु, कण्ठं भरतवंदितः, स्कंधौ दिव्यायुधः पातु या काही ओळी. माझ्या जिव्हेचे रक्षण विद्येचा ठेवा (निधी) करो यामध्ये विद्या आणि जिव्हा हा संबंध भेदक आहे. राम-भरत भेटीमध्ये रामचंद्रांनी , भरतास कडकडून मीठी मारली आणि असा हे भरतास वंदनीय श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करो हा गळाभेटीचा आणि कंठाचा अन्वय किती मनोहर आहे. माझ्या स्कंधाचे रक्षण दिव्य आयुधे (खांद्यावर धनुष्य) धारण केलेले प्रभू रामचंद्र करोत. - या प्रत्येक अवयव आणि नामाच्या जोडीमधील अन्वय (संबंध) माझ्या लक्षात आला. करौ = सीतापती: (सीतेचे पाणिग्रहण केलेले राम), शृती = विश्वामित्रप्रियः वगैरे. तीच गोष्ट विष्णूशोडषनाम स्तोत्राची - भोजने च जनार्दनं (सर्व जनांचे पालन करणारा), विवाहे तु प्रजापतीम (प्रजेचा नाथ), युद्धे चक्रधरं देवं या ओळीत पहा युद्धात रक्षण करण्यासाठी पद्महस्त वगैरे नावाने आठवण न काढता सुदर्शन चक्रधारी रुपाची आठवण काढली आहे. प्रवासे च त्रिविक्रमम (तीन पावलांत पृथ्वी व्यापणारा), संकटे मधुसूदनम (मधु राक्षसाचा वध करणारा), कानने नारसिंहं च म्हणजे वनामध्ये रक्षण करण्यास साक्षात नरसिंह रूप आठविले आहे, पावके जलशायिनम म्हणजे अग्नीपासून रक्षण करण्यासाठी क्षीरसागरामध्ये शयन करणार्‍या रुपाचे चिंतन आहे. प्रत्यक नामाचा अन्वय नंतरच्या चिंतन केलेल्या विशेषणास किती भेदक चपखल लागतो आहे. हे जेव्हा लक्षात आले , तेव्हा मला एक अननुभूत आनंद मिळाला. तीसरे उदाहरण "हनुमान चालीसा"चे. बरेच दिवस म्हणत असे आणि एके दिवशी एका ओळीचा अर्थ लागला. "कुमती निवार सुमती के संगी" - आहाहा. सुमती म्हणजे शुभ बुद्धी असलेले प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र हे कळले आणि मला अवर्णनिय आनंद झाला. एका लक्ष्मीस्तोत्रात , देवीचा उल्लेख श्रीपतीप्रिया आहे. सहज वाचतेवेळी किंवा अन्य कामात असताना स्फुरले अरे याचे २ अर्थ होऊ शकतात श्री जी पतीची प्रिय (लाडकी) आहे किंवा ती जिला श्रीपती (विष्णू) प्रिय आहेत. आणि अवर्णनिय वाटले. एकंदर आतपर्यंतचा काव्याच्या गोडीचा प्रवास असा आहे. लहानपणी स्तोत्रांचे बोट धरुन बाळपावले टाकलेली आहेत. खूपदा मनात येते मुलीला ही गोडी लावता येत नाही कारण ती इंग्रजी माध्यमातून शिकते, मीदेखील दूर असते आणि मन खंतावते. असो त्या आडरानात नको शिरायला. आपल्याला कधी कोणत्या कवितेच्या ओळीचा अर्थ असा स्फुरला असेल, गवसला असेल, तर तो आनंद या धाग्यावर जरुर शेअर करा.
  • Log in or register to post comments
  • 30011 views

प्रतिक्रिया

Submitted by शुचि on Mon, 08/27/2012 - 13:07

In reply to जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते by निनाद

Permalink

हे स्तोत्र अवघड आहे खरे पण

हे स्तोत्र अवघड आहे खरे पण ठाशीव शब्दोच्चारांमुळे छान वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Tue, 08/28/2012 - 04:44

In reply to हे स्तोत्र अवघड आहे खरे पण by शुचि

Permalink

आणि

ठाशीव शब्दोच्चारांमुळे छान वाटते. आणि गायन करणार्‍यांच्या खास हेल काढण्याने आणि क्षणिक विरामामुळे अजूनच मजा येते.
  • Log in or register to post comments

Submitted by नंदन on Mon, 08/27/2012 - 13:19

Permalink

अजून काही...

मंत्रपुष्पांजली कदाचित काटेकोरपणे स्तोत्रांत बसणार नाही. पण त्याबरोबर 'ॐ गणानाम् त्वा गणपतिं हवामहे' आणि श्री वेंकटेश्वर सुप्रभातम्.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 08/27/2012 - 13:51

In reply to अजून काही... by नंदन

Permalink

वेंकटेश्वर सुप्रभातम फारच

वेंकटेश्वर सुप्रभातम फारच मधुर आहे. माझे आवडते काशीविश्वनाथ सुप्रभातम. गंमत म्हणजे - अन्नपूर्णा, मणिकर्णिका, धुंडीराज, काशीपुरी या सार्‍यांचे सुप्रभात करुन झाल्यावर मग शेवटी शंकरांचे सुप्रभातम आहे. सार्‍यांनी जणू आधी उठून सेवेस सज्ज व्हावे - हा माझा कयास आहे. मी जर फारच "बिटवीन द लाईन्स" वाचत असेन तर जरुर सांगावे. : (
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Mon, 08/27/2012 - 16:09

Permalink

कोणला नर्मदा सुक्त महिती आहे का ?

देवी अहिल्याबाई सिनेमा मध्ये कलापिनीबाईनी म्हटले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 08/27/2012 - 16:44

In reply to कोणला नर्मदा सुक्त महिती आहे का ? by तर्री

Permalink

कॉलिंग खुशितै.

कॉलिंग खुशितै.
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Mon, 08/27/2012 - 17:05

In reply to कोणला नर्मदा सुक्त महिती आहे का ? by तर्री

Permalink

संस्कृत डॉक्युमेंट्स वर

संस्कृत डॉक्युमेंट्स वर नर्मदाष्टक आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निशदे on Mon, 08/27/2012 - 19:30

Permalink

छान.......

अथर्वशीर्ष माझेही अत्यंत आवडते........ शिरडीच्या साईबाबांच्या आरतीत शेवटी...... "सदा सत्स्वरूपं, चिदानंदकंदम.... " हेदेखील अत्यंत गोड...... विशेषतः आरतीचा सगळा खणखणाट संपून केवळ ते स्वर कानावर पडू लागताच खूप शांत वाटते....
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Tue, 08/28/2012 - 11:30

Permalink

वाचनखूण साठवली आहे. मला

वाचनखूण साठवली आहे. मला http://www.youtube.com/watch?v=0ifQJv22G90 इथली गायलेली हनुमान चालिसा फार आवडते.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सृष्टीलावण्या

Submitted by सृष्टीलावण्या on Tue, 08/28/2012 - 13:09

Permalink

निर्वाण षटकम्

मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं । न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे। न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः। चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। १ ।। न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुः । न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः। न वाक्पाणिपादम् न चोपस्थपायु । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। २ ।। न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ । मदो नैव मे नैव मात्सर्यभावः। न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ३ ।। न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं । न मन्त्रो न तीर्थो न वेदा न यज्ञ। अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ४ ।। न मे मृत्युशंका न मे जातिभेदः । पिता नैव माता नैव न जन्मः। न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ५ ।। अहं निर्विकल्पो निराकार रूपो । विभुत्वाच सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्। न चासङ्गत नैव मुक्तिर्न बन्धः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ६ ।।
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Tue, 08/28/2012 - 14:29

Permalink

सुंदर धागा

शुचितै, इतका सुंदर धागा काढल्याबद्दल आधी आभार. अनेक स्तोत्रं आवडीची आहेत. पण वर म्हटल्याप्रमाणे एखाद्या शांत संध्याकाळी घरातल्या सर्वांनी निरांजन आणि उदबत्ती लावून रामरक्षा म्हणण्यासारखा निरामय आनंद नाही. अगदी आयुष्याचा भाग झालेलं स्तोत्र म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. स्थळ काळ वेळ कसलंही बंधन न बाळगता सहजपणे जे मनातून बाहेर येतं ते अथर्वशीर्ष. गणेशाची अनेक उत्तम स्तोत्रं आणि स्तवनं आहेत. पण हे खरोखर 'शीर्ष' आहे. शंकर अभ्यंकरांची 'शिवस्तुती' ची अतिशय अप्रतिम कॅसेट होती. आता सीडी मिळत असावी. इतका गोड आणि तरीही बेसचा आवाज, सुंदर ताल आणि लय. त्यातलं सगळ्यात आवडणारं स्तोत्र म्हणजे वेदसार शिवस्तव. पशुनां पतिं पापनाशं सुरेशं गजेन्द्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यम | जटाजूटमध्ये स्फुरद्गांग्वारिं महादेवमेकं स्मरामि स्मरारिम || वर इतरांनी उल्लेख केलेली चिदानंदरुपं शिवोहम, गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी आणि अन्नपूर्णास्तोत्रं इ. अनेक स्तोत्रं या शिवस्तुती कॅसेट सीडी मध्ये आहेत. पंडित जसराज यांनी अनेक स्तोत्रं अजरामर केली आहेत - गोविंद दामोदर माधवेति, मधुराष्टकम, कस्तुरीतिलकम इ. मराठी मध्ये सगळ्यात आवडणारे म्हणजे अथर्वशीर्षाइतकेच मनात असलेले समर्थ रामदासस्वामींचे मनाचे श्लोक. सकाळी प्रसन्न वेळी मनाला शांत तरीही योग्य पद्धतीने वागण्याचा, कर्तव्याचा 'कर्मयोग' सांगणारे श्लोक. तितकेच रामरक्षेप्रमाणे दिवा लावल्यावर - करूणाष्टकांचे सगळे शब्द आणि श्लोक "अनुदिनी अनुतापे" का कुणास ठाऊक सगळा अहंकार कमी करतात. सज्जनगडावर नित्य प्रार्थनेचा भाग असलेली 'कल्याण करी रामराया' ही आळवणी अनेक दिवस मनात घोळत राहते. http://www.samarthramdas400.in/eng/download_aud.php इथे गडावरची बहुतेक सर्व स्तोत्रं नित्य प्रार्थना आहेत, चारुदत्त आफळे यांच्या आवाजात. आणि हो आंध्राशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे अर्थात सुब्बलक्ष्मींच्या आवाजातलं वेंकटेश सुप्रभातम ही तितकंच प्रिय आहे. मूळ पद्धती मध्ये ते सलग इतर दोन स्तोत्रांसह म्हटलं जातं.
  • Log in or register to post comments

Submitted by जयनीत on Tue, 08/28/2012 - 15:19

Permalink

<<<एकंदर आतपर्यंतचा काव्याच्या गोडीचा प्रवास असा आहे.>>>

धन्यवाद हा प्रवास शेअर केल्या बद्दल. लेखा सोबतच प्रतीसादतील स्तोत्रे सुद्धा साठवून ठेवण्या योग्य.
  • Log in or register to post comments

Submitted by Pearl on Wed, 08/29/2012 - 19:49

Permalink

धागा आवडला

धागा आवडला. खूप छान लिंक्स मिळाल्या. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by मेघवेडा on Wed, 08/29/2012 - 20:47

Permalink

वा!

झकास! स्तोत्रे, कविता, गाणी हा अत्यंत आवडीचा विषय आहे. संध्याकाळी खेळून दमून घरी आल्यावर आंघोळ करून देवापुढं बसून म्हटलेली रामरक्षा/भीमरूपी असो, की मुंजीनंतर मे महिन्यात आजोळी असताना पहाटे उठून आजोबांकडून घेतलेली पुरूषसूक्त, श्रीसूक्त, शिवमहिम्नादिंची संथा असो, शाळेत/घरी जोरजोरात घोकत पाठ केलेल्या कविता नि सुभाषितं असोत, की आजोबांसोबत केलेली नाट्यगीतांची पारायणं असोत, ज्यात लय आहे त्या गोष्टींचा आपल्याला तर ब्वॉ ल्हानपणापासूनच नाद आहे! ;) आणि म्हणूनच महर्षी वेदव्यासांपासून समर्थ, तुकोबा, ज्ञानोबांपर्यंत ते केशवसुत, बोरकर, कुसुमाग्रजांपासून पाडगांवकरांपर्यंत, मास्टर दीनानाथ, पंडित अभिषेकी, सुमनताईंपासून ते अजित कडकडे, सुरेश वाडकरांपर्यंत समस्त मंडळी म्हणजे अगदी दैवी अवतारच वाटत आलेली आहेत. अंधार पडू लागलाहे, आई पोळ्या लाटते आहे, घरात इतर कुणीच नाही. आणि मी तिच्या पुढ्यात बसून रामरक्षा म्हणतोय. किती विलक्षण वाटायचं. सगळ्या जगाशी संपर्क तुटल्यासारखं. तेवढ्या काळापुरते श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण, भरत, हनुमान व त्याची समस्त वानरसेना, सुग्रीव, जनक नि चक्क वाल्मीकिही तिथं माझ्याजवळ येऊन बसलेतसा भास मला कित्येकदा झालेला आहे. तीच गत आजोबांकडून संथा घेताना. पहाटे तांबडं जरा कुठे फुटू लागलेलं आहे, घरातली मंडळी अजून उठतच आहेत, तोच थंडगार पाण्यानं न्हाऊन अंगणात येऊन तुळशीसमोर बसून आजोबांचं खर्जातलं "श्री सहस्रशीर्षा: पुरूषः सहस्राक्षः सहस्रपात्" ऐकलं की मी तडक वेद/पुराणकाळात पोचलोच! शेजारून वाहणार्‍या पाटाच्या पाण्याची गाज आणखी वातावरण निर्मिती करे. ते कोणीतरी वेदाध्यायी महर्षी आणि मी गुरूगृही आलेला बटू असंच चित्र माझ्या डोळ्यांसमोर असे. याबरोबरच आणखी एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आरत्या! हे तर आणखी विलक्षण प्रकरण! असो. खूप दिवसांनी बर्‍याच जुन्याजुन्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यु शुचि. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 08/30/2012 - 00:18

In reply to वा! by मेघवेडा

Permalink

मस्त प्रतिसाद!!!

मस्त प्रतिसाद!!!
  • Log in or register to post comments

Submitted by आर्य on Wed, 08/29/2012 - 23:48

Permalink

स्तोत्रम

सांगलीला असताना स्तोत्रम नावाच्या संग्रहातील गाणी आणि श्लोक एकाला मिळाले आज १० वर्षांनी दे खील त्या संगीताची आणि शंकराचार्यांच्या रचनाची गोडी अवीट वाट्ते . सहस्रनामतल्या श्लोकांचे व्याकरण आणि अर्थ समजल्यावर खरी मजा येते
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Mon, 09/03/2012 - 10:00

Permalink

शुद्ध लेखन

संस्कृत स्तोत्रांचे लेखन शुद्ध करून देऊ शकेल असा कुणी जाणकार आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 09/03/2012 - 18:18

In reply to शुद्ध लेखन by निनाद

Permalink

आहेत की बरेच जण. धनंजय हे या

आहेत की बरेच जण. धनंजय हे या विषयातले मला माहिती असलेले तज्ज्ञ इथे मिपावरदेखील वावरतात. शुद्धलेखनाबरोबरच शुद्ध उच्चारांबद्दलदेखील त्यांचा गायडन्स घेण्यासारखा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद on Tue, 09/04/2012 - 07:23

In reply to आहेत की बरेच जण. धनंजय हे या by बॅटमॅन

Permalink

सध्या

सध्या त्यांना कार्यबाहुल्य आहे असे कळते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 02/12/2013 - 16:01

Permalink

मस्त धागा !

मस्तच !! आमचे आवडते स्तोत्र - एकश्लोकी - शंकराचार्य ! एका श्लोकात सगळं तत्त्वज्ञान ..!! इथे पहा http://sanskritdocuments.org जय हो
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Tue, 02/12/2013 - 22:06

Permalink

खजिना ...

http://www.khapre.org/ हा एक अनमोल ठेवा मला काही दिवसापूर्वी गवसला ! हया धाग्याच्या वाचकांना रुचेल ही आशा .
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Tue, 02/12/2013 - 22:08

In reply to खजिना ... by तर्री

Permalink

होय खजिना आहे.

होय खजिना आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Tue, 02/12/2013 - 23:25

Permalink

हा धागा

म्हणजे कुबेराचं भांडार आहे सगळ्या दुव्यांसह आणि प्रतिसादांसह!
  • Log in or register to post comments

Submitted by शैलजा शेवडे on Wed, 09/10/2014 - 22:20

Permalink

खूप सुंदर चर्चा....मनापासून आवडली.

खूप सुंदर चर्चा....मनापासून आवडली.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com