Skip to main content

'श्वान'दार जिंदगी

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 28/08/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीची वेळ! सगळीकडे स्मशान शांतता! नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे रस्ते ओले आहेत. रस्त्यावर लावलेले पिवळे दिवे प्रखर प्रकाशाचा पसारा मांडून बसले आहेत. ओल्या रस्त्यांवर तो प्रकाश सांडून रस्ते पण पिवळे भासतायेत. हवेत गारवा आहे. मोठमोठाल्या इमारती उभ्या उभ्याच डुलक्या घेत आहेत. झाडे निवांत झालेला हा सगळा पसारा बघत उसासे टाकत उभी आहेत. मी हळू-हळू चालत माझ्या इमारतीकडे चालत जातोय. फक्त माझ्या बुटांचा आवाज! इतक्यात समोर काहीतरी शुभ्र पांढरे हलतांना दिसते. माझी पाचावर धारण बसते. वेग कमी होतो. डोळे बारीक करून मी त्या अंधारलेल्या प्रकाशात खोल बघतो. मारुती स्तोत्र येत नसल्याने कुठलेतरी मिनी हनुमान स्तोत्र पुटपुटत मी हळू-हळू पुढे सरकतो. आदल्याच दिवशी झी टीव्हीवर पाहिलेला 'फिअर फाईल्स'चा एपिसोड आठवतो आणि माझी गाळण उडते. त्यात नायिकेला भयाण रात्री अचानक बेडरूमच्या खिडकीत एक भयंकर चेहरा दिसलेला असतो. ती धाडधाड जिना उतरून खाली येते. हॉलमध्ये तिची मोलकरीण फरशी पुसत असलेली दिसते. ती मोलकरीण मागे वळून नायिकेकडे बघते. मोलकरणीच्या डोळ्यांमध्ये बुबुळेच नसतात. फक्त पांढरे डोळे! तोंडातून बाहेर पडणारे लाल भडक रक्त आणि केस अस्ताव्यस्त! हे सगळे मला आठवते आणि माझं मन अर्धमेलं होऊन जातं. तरी मी धीराने पुढे सरकतो. थोडं पुढे गेल्यावर उलगडा होतो. ते पांढरं हलणारं दुसरं तिसरं काही नसून कुत्रा असतो. एका कारच्या मागे उभा राहून तो आळोखे-पिळोखे देत असतो. अंधारात नीट न दिसल्याने थोडा विचित्र दिसत असतो. माझ्या तोंडातले मिनी हनुमान स्तोत्र जाऊन एकदम 'शीला की जवानी...' सुरु होते. मी सुटकेचा नि:श्वास टाकतो. मी आणखी पुढे जातो. प्रेमळ दिसणार्‍या कुत्र्यांची मला भीती वाटत नाही. त्यात हा तर आमच्याच गल्लीतला कुत्रा! म्हणजे आपला दोस्तच! तो माझी चाहुल लागल्यावर माझ्याकडे शेपूट हलवत आला. मी कार्यालयात असतांना जसे भाव माझ्या चेहर्‍यावर असतात तसेच भाव त्याच्या चेहर्‍यावर होते. 'लई बोअर होतंय राव, थोडं खेळ ना माझ्यासोबत' असं तो मला म्हणाल्याचा भास मला झाला. त्याचे काळेभोर डोळे माझ्याकडे रोखले होते. मध्येच एक पाय वर उचलून त्याने त्याच्या काळ्या तोंडावरून फिरवला. मग मागचा एक पाय वर उचलून मानेजवळ उगीच काहीतरी खाजवल्यासारखे केले. कार्यालयात आपण डोके खाजवतांना असेच दिसत असू या विचाराने मला हसू फुटले. मी थोडा तिथेच रेंगाळलो. मग त्याने सगळे अंग दोन्ही बाजूला जोरात झुलवले आणि मागचे दोन्ही पाय ताणत जीभ नाका-तोंडात घालून पुन्हा माझ्याकडे बघत शुंभासारखा उभा राहिला. त्याचे ते प्रसिद्ध हसू त्याच्या चेहर्‍यावर विलसू लागले. कुत्रा जीभ बाहेर काढून हॅहॅ का करत असतो याचे उत्तर शाळेच्या पुस्तकात वाचले होते. त्याचे ते हॅहॅ करणे मला हसल्यासारखेच वाटते. गंभीर चेहरा असलेले कुत्रे अचानक तोंड उघडून जबडा पसरवून जीभ बाहेर काढते आणि हसू लागते. कुत्रा कम्युनिटीमध्ये एखादा जोक झाल्याने ते हसत असावेत असा माझा विश्वास आहे. हा दोस्त आता जरा जास्तच जोरात शेपूट हलवत होता. मी पुढे सरकलो आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागलो. लहानपणी आम्ही रहायचो त्या गल्लीत कुत्र्यांची बरीच जनता होती. दिवसभरात १-२ तास त्यांच्यासोबत खेळल्याशिवाय मला चैन पडायची नाही. कुत्र्याच्या पाठीवर बस; कान पिरगळ, त्याचे पुढचे पाय धरून त्याला चालायला लाव; घरातून पोळ्या आणून-आणून त्यांना खाऊ घाल; हिवाळ्यात त्यांच्या अंगावर स्वतःचे पांघरूण घाल असले बरेच उद्योग मी लहानपणी केलेले आहेत. कधीच कुठल्या कुत्र्याने साधा ओरखडा देखील काढला नाही. चावणे तर लांबच राहिले. त्यांना कदाचित कळत असावे का ही लहान मुले आपल्यासोबत खेळत आहेत; आपल्याला थोडा त्रास झाला तरी चालेल पण यांना इजा व्हायला नको. असो. दोस्त आता खूपच कंटाळल्यासारखा दिसत होता. तेवढ्यात त्याचा एक मित्र दौडत-दौडत त्याच्याजवळ आला. मी समोर उभा असल्याने तो थोडा भांबावला आणि खोळंबून तिथेच उभा राहिला. आता आम्ही तिघेही नुसतेच उभे होतो. बायको दुकानात वस्तू बघत (खरेदी करण्यासाठी) असतांना मी जसा उभा असतो तसाच आता आपला दोस्त उभा होता. हा बावळट असा का उभा आहे असा विचार करत बहुधा दोस्ताचा दोस्त देखील तसाच उभा होता. "झोपला नाहीत का तुम्ही?" मी विचारले. "आता झोपलो तर दिवसा काय करायचं?" दोस्त म्हणाला. मी उडालोच! च्यायला, हा बोलतोय चक्क! की मीच उत्तरे देतोय त्यांची? "अरे, दिवसा तुम्ही भुंकता, थकता म्हणून रात्री झोपायचं. आम्ही रात्रीच झोपतो." "असं तुम्हाला वाटतं. रात्री तुम्ही लोकं काय काय करता हे आम्हाला माहित नाही असं वाटतं की काय तुम्हाला?" असं म्हणून दोस्ताने त्याच्या दोस्ताकडे मान वळवून डोळा मारला आणि जीभ फिरवली. "काय करतो?" मी विचारले. "बरंच काही. चावटपणाच्या गोष्टी सोडून आणखीही बरंच काही करता तुम्ही रात्रीच्या वेळेला. दारू पिता, धिंगाणा घालता, भांडणं करता, मारामार्‍या, खून करता, चोर्‍या करता, दरोडे घालता...इन फॅक्ट, जे आम्ही कधीच करत नाही ते सगळं तुम्ही दिवस-रात्र करत असता. आणि खुशाल आमच्या नावाने एकमेकांना शिव्या देता...माणसं साले!" आता दोस्त थोडासा चिडला होता. त्याच दोस्त गंभीर दिसत होता. "पण तुम्हाला काय त्याचा त्रास होतो?" मी विचारले. "नाही कसा? तुमच्या विचित्र स्वभावामुळे आम्हाला त्रासच त्रास होतो. आम्ही तुमच्या भरधाव गाड्यांखाली भरडले जातो; तुम्ही आम्हाला दगडं मारता; तुम्हाला वाटतं तुम्ही जसे एकमेकांशी वागता तसंच आमच्याशी वागलात तर त्यात काहीच वावगं नाही. तुमच्या ढणढण गाण्यांचा आम्हाला त्रास होतो. तुम्ही पाणी व्यर्थ दवडता त्यामुळे आम्हाला पाणी मिळत नाही. त्रास होतोच; असं कसं?" दोस्त आता जरा वैतागला होता. "अरे पण आमच्या आयुष्यातले त्रास तुम्हाला नसतात त्याचं काय? तुम्हाला तुम्ही ज्या गल्ल्यांमध्ये राहता त्यावर व्हॅट भरायचाय? ईएमआय भरावा लागतो तुम्हाला? इन्शुरन्सची भानगड ऐकलीये कधी? पोरांच्या शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट आणि 'पै'पीट कधी करावी लागते तुम्हाला? स्वयंपाकाचं सिलेंडर मिळेल की नाही या धास्तीमध्ये दिवस जातात तुमचे? पाणीकपात किती होईल हे टेंशन असतं तुम्हाला? वाढत्या महागाईची ओझी वहावी लागतात कधी तुम्हाला? तुम्हाला वाटतं की माणसं म्हणजे खूप सुखी प्राणी पण तसं नाहीये मित्रांनो! गेला तो जमाना!" माझा हुंदका त्याला स्पष्ट ऐकू गेला असावा. "अर्र...तुम्ही तर रडायलाच लागला राव. असं नका रडू." "काय सांगू तुम्हाला या दमलेल्या बाबाची कहाणी..." "हा घ्या रुमाल. नाक शिंकरून घ्या चांगलं. आमचं बरं आहे राव, आमची जीभच सटासट घुसते नाकात; त्यामुळे काही चिंताच नाही. तुमची जीभ फक्त दिसेल ते चरायच्या कामाची आणि वाट्टेल ते बोलून मने चिरायच्या कामाची आहे!" "मग तुझ्याकडे रुमाल कसा काय?" "अरे तुमच्या सोसायटीमध्ये ती नाही का एक सुंदर मुलगी राहते, थोडीशी सनी लिओनसारखी दिसते ती...तिचा पडला रस्त्यात. किस कदर ये हसीन खयाल मिला हैं, राह में एक रेशमी रुमाल मिला हैं, जो गिराया था किसी ने..." "ओ थांबा, तुमचा काय संबंध?" मी डाफरलो. असं कसं? कुणीही कुत्र्याने उठावं आणि आपल्या...म्हणजे ह्यांच्या...म्हणजे आपल्या सोसायटीतल्या मुलीला छेडावं? "काहीच नाही. हॉट आहे म्हणून! हॉटडॉग असू शकतो मग मुलगी हॉट का नाही असू शकत?" दोस्ताने डोळे मिचकावले. "बरं बरं, तुला सनी लिओन कशी काय माहित?" "कोपर्‍यावर केवढा मोठा बोर्ड लागलाय. दहीहंडीला बोलवणार आहेत म्हणे तिला. डावीकडे श्रीकृष्णाचे चित्र आणि उजवीकडे सनी लिओनचा फोटो! मध्ये दूधदह्याची घागर! काय कनेक्शन आहे ना सॉल्लीड!! एका पक्षात तीन दगडं, आपलं एका दगडात तीन पक्षी! तुम्ही पाहिला नाही अजून तो फोटो? कमाल आहे, बरीच माणसे तिकडे टंगळ-मंगळ करतांना दिसतात आजकाल." "माझ्याकडे ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन आहे. ते कनेक्शन पुरेसं आणि चांगलं आहे या कनेक्शनपेक्षा..." "हम्म...मग तुम्हाला बोर्ड बघण्याची गरजच नाही म्हणा." दोस्ताचा दोस्त पचकला. "म्हणजे?" मी विचारले. "नाही, म्हणजे तुम्ही ऑफिसातले काम घरी आणता आणि इंटरनेट कनेक्शनमुळे तुम्हाला काम घरी करणे सोपे जात असेल. मग वेळच नसेल ना मिळत बोर्ड बघायला. म्हणून म्हटलं." दोस्ताचा दोस्त भलताच स्मार्ट वाटला. "हम्म...पण तुमचं बरं असतं, नाही? मस्त इकडे-तिकडे हिंडायचं, खायचं, प्यायचं, कुत्री दिसली तर तिच्या मागे बिनधास्त, कुणालाही न घाबरता गोंडा गोळायचा, पटली तरी तिच्यासाठी काही खरेदी करावी लागत नाही. लग्नाची भानगड नाही, घर शोधायची, फर्निचर करायची कटकट नाही; नोकरी करा, पैसा कमवा असल्या डोकेदुखी नाहीत. चैनच आहे बुआ तुमची." "हो, तशी चैनच आहे पण आजकाल काही राम नाही राहिला आमच्या चैनीत. कॉर्पोरेशनवाले केव्हा येऊन घेऊन जातील काही नेम नाही. पलिकडच्या फूटपाथवर ठाण मांडून बसलेले विक्रेते आणि आम्ही, आमची एकच भीती! कॉर्पोरेशनची माणसे! आमचं एकवेळ ठीक आहे पण तुम्ही माणसंच माणसांशी अशी का वागतात?" "तसंच आहे ते. आम्हीच आमच्याशी आमच्यासारखे वागत नाही." "हो ना, परवाची मुंबईची दंगल किती भयंकर होती; आणि आसामची तर काही विचारू नका. माझे बाबा सांगायचे की मुंबई तर दंगलींसाठी प्रसिद्धच आहे. किती माणसे, किती प्रेतं, रक्त, मांस...तुम्हाला लाज नाही वाटत?" "वाटते ना! पण काय करणार? माणूस माणसाचं ऐकत नाही; माणूस फक्त स्वतःचं ऐकतो; स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षांचं ऐकतो...बस! पण तुला ही माहिती कशी मिळाली रे?" "त्या पलिकडच्या सोसायटीतल्या आगाशे आजोबांचा फ्लॅट ग्राऊंड फ्लोअरवर आहे ना. त्यांचा पेपर दारातच असतो सकाळी. त्यांच्या फ्लॅटजवळच एक मोठा खांब आहे. तिकडे गेलो होतो एकदा..." "कळलं कळलं...साग्रसंगीत सांगायची गरज नाहीये." "अहो, ऐकून तर घ्या; तिकडे काही मी 'त्या' विधीसाठी नव्हतो गेलो. एका कातिल कुत्रीचा तिकडे पोल डान्स ठेवला होता. तो बघायला गेलो होतो आम्ही सगळे. आमचे गल्लीतले जे नेते आहेत ते तुमच्या नेत्यांपेक्षा काही कमी नाहीत. तुम्हाला काय वाटलं तुमच्यातच सनी लिओन आहे?" "अरे वा, मजाच आहे तुमची. बायको काही म्हणत नाही? अरे सॉरी, तुमच्यात बायको नसतेच. मी विसरलो होतो." मी जीभ चावून बोललो. "तुम्ही कंपनीत नोकरी करता का?" दोस्ताच्या दोस्ताने विचारले. "हो, का रे?" "नाही, रोज खूप उशीरा घरी येता तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं." त्याच्या चेहर्‍यावरचे दयेचे भाव मला स्पष्टपणे दिसले. "काय करणार, पोटासाठी करावं लागतं." मी म्हणालो. "पण एवढी भूक वाढवायची कशाला? आम्हाला बघा एखादी पोळी, त्या समोरच्या लहान मुलांनी दिलेली ४-२ बिस्कीटे असं थोडं-थोडं लागतं खायला. तेवढ्यात भागतं आमचं." दोस्त म्हणाला. "आमचं तसं नाही ना बाबा. आम्हाला खूप लागतं. शिवाय उद्यासाठी पण लागतं. आणि नुसतं खायला नाही लागत, चांगले कपडे, घरे, गाड्या, दागिने...सगळंच लागतं. म्हणून म्हणतो ना तुमचं बेस्ट आहे." "तुमचंही बेस्ट आहे की. मस्त सिनेमे बघता, चांगलं-चुंगलं खाता, वर्षभर मजा करता..." "वर्षभर म्हणजे?" "म्हणजे भाद्रपद वगैरे..." "ओके ओके...समजलं." "मग? बघा बरं, उगीच गळे काढत असता. फक्त थोडं नीट जगायला, रहायला शिका म्हणजे झालं." "म्हणजे?" "म्हणजे विचारपूर्वक! आपल्या कुठल्या कृतीने कुणाचं काही नुकसान तर होत नाहीये ना एवढं बघून जगलात तरी पुरेसं आहे, नाही का? आम्ही करतो राव एवढा विचार आणि तुम्हाला जमत नाही म्हणजे जरा आश्चर्यच आहे, नाही का?" "खरंच आहे. थँक्स!" "आणि अजून एक, भेटत रहा असेच. फक्त मलाच नाही; सगळ्यांनाच! बोला, शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच बरं वाटतं. आपण तर काय रोजच भेटतो." दोस्त मस्त हसत होता. मी त्याच्या डोक्यावरून पुन्हा हात फिरवला. त्याने पुढचा एक पाय उचलून माझ्या हातावर ठेवला. मी पुन्हा हळू-हळू चालत माझ्या इमारतीमध्ये शिरलो.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5282
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

शानदार लेख आहे!

अवांतर : गविंच्या प्रोप्रायटरी एरीया मधे घुसलात कि ओ ;)

छान लिहिलंय. :) अगदी पिसाळल्यागत... ;) -सूर्यपुत्र.

अधिक भाद्रपदातला लेख आवडला ;)

श्वानपुराण आवडले. श्वानमुक्ताफळांचा लत्ताप्रसाद भारीच झणझणीत !

आत्ताच गल्लीतल्या मोत्या भुभुशी गप्पा मारुन आलो. त्याला सांगितल अशाच आपल्या गप्पा चालू राहू देत. त्याची मैत्रीण बिचारी या जगातून निघुन गेली. हा सर्व ग्रुप माझ्याशी रोज गप्पा मारतो.

मस्तच ! अगं बाई अरेच्चा पार्ट-२ का ? :-)

छान जमलंय :) अमोल केळकर

समीर सूर अगदी छान लागला आहे. एकदम मस्त आणि मार्मिक. -(श्वानांपासून १४ हात लांब रहाणारा) सोकाजी

भन्नाट लेख ! बरं बरं, तुला सनी लिओन कशी काय माहित? काही दिवसांनी तुला प्रिया राय कशी काय माहित ? असा देखील प्रश्न विचारला जाउ शकतो ! ;)