Skip to main content

एकहार्ट

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 19/08/2012 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
सत्य किती सोपंय, किती सहज आहे पाहायचं असेल तर जगात आज एकमेव व्यक्ती आहे, एकहार्ट! कोणताही चमत्कार नाही, सिद्धाच्या लक्षणांचं कोणतंही अवडंबर नाही. तुम्ही दखल घेतली नाही तर लक्षातही येणार नाही इतका साधा एकहार्ट. त्याचं पॉवर ऑफ नाऊ प्रकाशित होऊन अनेक वर्ष झाली. तो भारतात येऊन गेला. इथली आध्यात्मिक बजबजपुरी त्यानं पाहिली, त्याबद्दल अवाक्षर काढलं नाही. अनेक वर्ष त्याच्याकडे कुणाचं लक्षही गेलं नाही. एकदा ओप्रा विनफ्रेनं त्याला टॉक शोला बोलावलं आणि तो प्रकाशात आला. आजही तो इतक्या सादगीनं जगतो की तुम्ही रिसेप्टीव असाल तरच त्याला समजू शकाल. लक्षात आलं नाही तर तुमच्या जीवनातली एक सुरेख संधी हुकेल म्हणून हा लेख. एकहार्ट : सौजन्य विकीपिडीया ___________________ पॉवर ऑफ नाऊ च्या प्रस्तावनेत त्यानं लिहिलंय, तिसाव्या वर्षापर्यंत तो कमालीची अस्वस्थता आणि आत्महत्येप्रत नेणार्‍या विमनस्कतेतून जगत होता. एक दिवस ते सगळं पराकोटीला गेलं, त्याला वाटलं `आता मला स्वत: बरोबर जगणं अशक्य आहे.' तो विचार त्याच्या मनात सतत रुंजी घालू लागला आणि अचानक त्याला त्या विचाराचं आश्चर्य वाटलं, `मी एक आहे की दोन? कोण कुणाबरोबर जगू शकत नाही?' त्या विचारावर तो इतका केंद्रित झाला की इतर सगळे विचार थांबले. सगळं एकदम शांत झालं. ती शांतता क्षणोक्षणी इतकी सघन होत गेली की तिच्यात तो असाहाय्यपणे खेचला जाऊ लागला. मग त्याला जाणवलं की ती सर्वव्यापी वैश्विक शांतता बाहेर नाही, त्याच्या आत आहे. बाहेरची आणि आतली शांतता अचानक एक झाली, त्याचं सारं भय संपलं, तो सिद्ध झाला! पुढे त्यानं लिहिलंय, आज सर्वोच्च काय असेल तर माझा अविभाज्य भाग झालेली ती शांतता. लोक मला विचारतात, `तुला मिळालंय ते आम्हाला कसं मिळेल? तर मी त्यांना सांगतो, `तुमच्याकडे ते आहेच. तुमचं तिकडे लक्ष जात नाहीये कारण मनाची अविरत बडबड तुमचं लक्ष सतत वेधून घेतेय' ( पॉवर ऑफ नाऊ (१९९७): पाने १ ते ३) _____________________________ एकहार्ट म्हणतो, "मी बहुदा उद्विग्नतेच्या परमावस्थेला पोहोचलो होतो आणि तिचा परिपाक म्हणजे एका क्षणी माझी जाणीव मन आणि शरीरापासनं वेगळी झाली." अध्यात्मात याला `सडन एन्लायटन्मेंट' म्हटलंय, तिच्या प्रक्रियेचं विश्लेषण होत नाही. पाणी इतकं बेहद्द उकळलं की एका क्षणी, अचानक त्याची वाफ झाली. ते निराकार झालं. अध्यात्मिक जगात हे अपवादात्मक मानलं गेलंय. स्वतःच्या निराकारत्वाचा बोध क्रमशः देखील होऊ शकतो. ते सर्वात निर्धोक आणि सुनिश्चित आहे. आपल्या एकेक धारणा, आपल्यावरची मनाची पकड, प्रत्येक आकलनासरशी ढिली होत जाते. दोन विचारांच्यामधे समोरचं स्पष्ट दिसायला लागतं आणि आजूबाजूचं नीट ऐकू यायला लागतं. एखाद्या अत्यंत निवांत क्षणी समोर कायम उभा असलेला निराकार दिसतो आणि अचानक उलगडा होतो: `तो आणि आपण वेगळे नाही! ' एकहार्टचं सर्व लेखन अशा क्रमशः सिद्धत्वाकडे नेण्याचा प्रयत्न आहे. __________________________ आजमितीला त्याची फक्त चार पुस्तकं आहेत, पॉवर ऑफ नाऊ, प्रॅक्टीसिंग द पॉवर ऑफ नाऊ, स्टीलनेस स्पीक्स आणि अ न्यू अर्थ. पॉवर ऑफ नाऊ अध्यात्मातला "निराकार" हा फंडा अफलातून मांडतं. एकहार्टनं त्याला "बिइंग" म्हटलय. प्रॅक्टीसिंग द पॉवर ऑफ नाऊ रोजच्या जगण्यात निराकाराची उपयोगिता विशद करतं. स्टीलनेस स्पीक्स तर त्यानं इतकं सूत्रबद्ध आणि बेहद्द लिहिलंय की उपनिषदांची आठवण होते. आणि `अ न्यू अर्थ' लोक समजू शकले तर एकहार्टला जागतिक शांततेचं नोबेल मिळेल. __________________________ पॉवर ऑफ नाऊ मधला मला आवडलेला क्लायमॅक्स, जो त्याच्या एनलायटन्मेंटची उकल करतो, तो असाय: `एनलायटन्ड रिलेशनशिप्स' या प्रकरणात शेवटी त्यानं लिहिलंय: `तुम्हाला स्वत:शी नातं कशाला हवंय? तुम्ही फक्त `असू' शकत नाही का? ज्या वेळी तुम्ही स्वत:शी नातं जोडता तेव्हा तुम्ही दोन होता, एक तुम्ही स्वत: आणि दोन, ज्याच्याशी नातं जोडलंय तो. मनाचं हे विभाजन सर्व कलह आणि द्वंद्वाच कारण आहे. साक्षात्कार म्हणजे स्वत:शी एकरूपता. तुम्ही स्वत:ला जोखत नाही, तुम्हाला स्वत:बद्दल करुणा, अभिमान, प्रेम, तिरस्कार काहीही वाटत नाही. जाणीवेतून होणारं हे स्वविभाजन संपतं. जाणीव एकसंध होते, पूर्णत्वाला येते, शापातनं मुक्त होते. ज्याला वाचवायचंय, सजवायचंय, आणि सतत काही तरी हवंय असा कुणी राहत नाही. तुम्ही सिद्ध होता तेव्हा एकच नातं संपतं, ते म्हणजे तुमचं स्वत:शी असलेलं नातं. एकदा तुमचं ते नातं संपलं की तुमची इतर सर्व नाती प्रेमाची होतात. (पान १४५) _______________________ स्टीलनेस स्पिक्समध्ये अहंकाराबद्दल (दि इगोइक सेल्फ) एकहार्टनं लिहिलंय: जेव्हा विचार तुमचं सर्व लक्ष वेधून घेतात तेव्हा तुम्ही मनाच्या बोलण्याशी एकरूप होता, ते बोलणं मग तुम्हाला तुमचं बोलणं वाटायला लागतं. या मनानं निर्माण केलेल्या `मी'ला सतत अपूर्णता आणि भय वाटत राहतं आणि त्या भयातून आणि अपूर्णतेतून तुम्ही कार्यरत होता. असं जगणं मग इतरांसाठी आणि तुमच्यासाठी क्लेशदायी होतं. ( स्टीलनेस स्पिक्स, २००३, पान २९) _____________________ `अ न्यू अर्थ' मध्ये शेवटच्या प्रकरणात एकहार्टनं अभिव्यक्तीबद्दल (अवेकन्ड डूइंग) अफलातून लिहिलंय. मनाच्या सृजनात्मक उपयोगाविषयी तो म्हणतो: सत्य गवसल्यावर तुम्ही जे करता त्याची सुरुवात आणि शेवट, तुमच्या मानसिक आणि भावनिक स्तरावर आधीच झालेला असतो. त्यामुळे कृत्यातून तुम्हाला काही मिळवायचं नसतं. तुमचं कृत्य तुम्ही जे आहात त्याची अभिव्यक्ती असते. असं कृत्य कोणतीही अपूर्णता पूर्ण करण्यासाठी नसल्यानं ते कृत्यच आनंद असतो. प्रत्येक अभिव्यक्तीतून तुम्ही अव्यक्ताला व्यक्त होण्याचा अवसर देता आणि त्यामुळे ज्यांच्यापर्यंत ती अभिव्यक्ती पोहोचते त्यांना ती आनंदित करते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 15224
प्रतिक्रिया 84

प्रतिक्रिया

In reply to by गोंधळी

ते प्रामाणिक कृत्य अंतिम विश्लेषणात सत्य म्हणजे परमस्वास्थ्य आहे. त्यामुळे तुम्ही जितके अस्वस्थ तितके सत्यापासनं (किंवा स्वतःपासनं ) दूर.
प्रामाणिक (किंवा अप्रामाणिकपणा) तुम्हाला कृत्य करतानाच कळत नसेल तर? आणि अस का होते?
हे असंभव आहे. ओशो म्हणतात " जिंदगी नगदका व्यवहार है, यहां उधारी नही चलती. जैसे अभी आगमे हाथ डालो, अभी जल जायेगा " इथे हिशेब ठेवणारा कुणी नाही. त्या भंपक कल्पना आहेत अप्रामाणिकपणा करणारा करतांनाच मनातून दुभंगतो. वरुन तो काहीही दाखवू दे.

In reply to by संजय क्षीरसागर

तुमच्या मुद्द्यांना प्रतिसाद देणे म्हणजे अस्वलाच्या अंगावरिल केस काढण्यासारखे आहे.जे कधी संपणार नाहित. त्यावरुन अजुन नविन प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे अस काहितरी सांगा,अगदी सोप्या भाषेत जे सर्वांना सम्जेल. जसे पुर्वी प्रुथ्वी सपाट(flat) आहे असा समज होता.पण आंतरिक्षातुन जेव्हा त्याचे फोटो काढुन दाखवन्यात आले. तेव्हा सगळ्यांना समजले कि प्रुथ्वी गोल आहे.

In reply to by गोंधळी

तुमचा पहिला प्रश्न पाहा:
संजयजी यावर आपण टप्या टप्याने बोलु सत्य गवसण्यासाठि पाप आणि पुण्य याचा कहि संबंध असतो का?
मग पुढे तुम्ही काय विचारताय ते पाहा:
संजयजी प्रामाणिक व अप्रामाणिक हे कशाच्या आधारावर ठरवायचे? प्रामाणिक (किंवा अप्रामाणिकपणा) तुम्हाला कृत्य करतानाच कळत नसेल तर? आणि अस का होते?
आणि शेवटी
तुमच्या मुद्द्यांना प्रतिसाद देणे म्हणजे अस्वलाच्या अंगावरिल केस काढण्यासारखे आहे.जे कधी संपणार नाहित. त्यावरुन अजुन नविन प्रश्न निर्माण होतात.
तुम्हाला थोडक्यात उत्तर हवं असेल तर इथे दिलय

In reply to by संजय क्षीरसागर

जे करताना तुम्ही स्वस्थ असता, मनाची चलबिचल होत नाही ते प्रामाणिक कृत्य अंतिम विश्लेषणात सत्य म्हणजे परमस्वास्थ्य आहे. त्यामुळे तुम्ही जितके अस्वस्थ तितके सत्यापासनं (किंवा स्वतःपासनं ) दूर इथे हिशेब ठेवणारा कुणी नाही. त्या भंपक कल्पना आहेत ------ हे असेच वाय झेड पाठ पठवून कसाबला पाठवला. कचाकचा गोळ्या घालून लोकांना मारताना त्या "सत्य गवसलेल्या" इसमाच्या मनाची चलबिचल झाली नाही. हे असे कसाब व त्यांचे वायझेड तत्वज्ञान शिकवणारे गुरु आहेत म्हणून लोकांचे आयुष्य धोक्यात आहे. म्हणून बाकी लोकांना यांचा हिशोब ठेवावा लागतो. लोकहो तुम्ही यांना म्हणा नो एन्ट्री, पुढे धोका आहे.. ---------------------------------------- The problem with the world is that the intelligent people are full of doubts and the stupid people are full of confidence.

In reply to by सहज

ज्यांना समज आहे आणि संवेदनाशिलता आहे अशांशी मी सत्याची चर्चा करतोय. कुठलाही मुद्दा कशाशीही जोडणं व्यर्थ आहे

मग त्याला जाणवलं की ती सर्वव्यापी वैश्विक शांतता बाहेर नाही, त्याच्या आत आहे. बाहेरची आणि आतली शांतता अचानक एक झाली, त्याचं सारं भय संपलं, तो सिद्ध झाला! अगदी खरं आहे बघा. उगाच लोक वैश्विक शांततेच्या पोकळ पुंग्या वाजवित असतात. आमची तर इच्छा आहे माणसाने आतून शांत रहावे. बाहेर मग किती का युद्ध होईनात किती का रक्ताचे पाट, मांसाचा चिखल होईना. वरील वाक्यंच फक्त पटली .

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सध्या व्यावसायिक कामात व्यस्त असल्यानं उत्तराला उशीर होतोय. बिफोर आय रिप्लाय : माझ्या विरोधात इथे बरच काही लिहिलं गेलंय आणि त्याचा सर्वसाधारण सूर `लेखन अनाकलनीय आहे' असाये. ईशावास्य उपनिषादात एक अत्युच्च श्लोक आहे: पूर्णं अदः पूर्णं इदं पूर्णात पूर्णं उदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णं इव अवशिष्यते श्लोकाचा मथितार्थ असाय की अस्तित्व पूर्ण असल्यानं त्यातलं प्रत्येक प्रकटीकरण पूर्ण आहे आणि ते उत्पत्ती किंवा लयीनं अनाबाधित आहे. थोडक्यात, आपण सत्य आहोत. तुम्ही गीता घ्या की उपनिषादं की अष्टावक्र संहिता सर्व अध्यात्मिक ग्रंथ केवळ हीच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे मांडतात. एकहार्ट त्या पूर्णतेला बीइंग म्हणत असेल, बुद्ध शून्य म्हणत असेल, मी निराकार म्हणत असेन, उपनिषदं पूर्ण म्हणत असतील किंवा ब्रह्म म्हणत असतील. निर्देश एकाच वस्तुस्थितीकडे आहे. ओशो तीच वस्तुस्थिती ' एन्लायटन्मेंट इज द स्टफ वीथ वीच द एक्झिसटन्स इज मेड' अशी मांडतात ( तंत्रा द सुप्रीम अंडरस्टँडिंग) इतक्या थोर लोकांनी इतक्या निर्विवादपणे `तुम्ही सत्य आहात' सांगितलय त्यामुळे मी स्वतःला सत्य समजतो. ती वस्तुस्थिती मला मान्य आहे. या उप्पर स्वतःला सत्य मानणं किंवा न मानणं तुमच्या हातात आहे. याचे दोन अर्थ निघू शकतात : मी अहंकारी आहे. किंवा मी एकच गोष्ट सांगतोय पण तुम्हाला समजत नाहीये. आणि त्याचं कारण तुम्ही स्वतःला सत्य मानायला तयार नाही. तुमचा अर्थ तुमच्या आकलनाची दिशा ठरवेल.
उगाच लोक वैश्विक शांततेच्या पोकळ पुंग्या वाजवित असतात. आमची तर इच्छा आहे माणसाने आतून शांत रहावे. बाहेर मग किती का युद्ध होईनात किती का रक्ताचे पाट, मांसाचा चिखल होईना.
हा विरोधी सूर म्हणून प्रातिनिधिक प्रतिसाद आहे. आपण बुद्धाची शांतता बघणार की बाहेर चाललेली युद्ध हा तुमचा निर्णय आहे. मी तर कैक वेळा `युद्ध कोणत्याही मानवी प्रश्नाचं उत्तर नाही' हे लिहिलय. कुणी कितीही निरर्थक आणि विरोधी लेखन केलं तर त्यानं मला काहीएक फरक पडत नाही. ती त्यांची समज आहे. पण प्रत्येकाला उत्तर देण्यात मला स्वारस्य नाही. ज्यांनी विधायक प्रतिसाद दिलेत आणि ज्यांना समजू शकत होतं त्यांच्या बाबतीत मात्र माझा नाईलाज आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

कुणी कितीही निरर्थक आणि विरोधी लेखन केलं तर त्यानं मला काहीएक फरक पडत नाही. ती त्यांची समज आहे. अगदी सहमत आहे. असे बरेच लेखकु मिपा इ. संस्थळांवर आहेत जे निरर्थक अन विरोधी प्रतिक्रियांना न जुमानता कायम पुरुषमुक्तीच्या भविष्याची नाडी धरुन पुनर्जन्माच्या अन स्वत:लाही न. सम, जलेल्या ! गोष्टी कायम लिहित असतात. बाकी आपण स्वत:ला अन एकहार्ट नामिक माणसाला बुद्ध अन उपनिषदांच्या रांगेत बसविलेले पाहुन मनात अतीव आदर दाटला. असेच लिहित चला.

माझा पुढील प्रतिसाद हा प्रामाणिक असून क्रुपया त्यात उपहास शोधण्याचा प्रयत्न करू नये. मला अध्यात्माबद्दल थोडेबहुत कुतूहल नेहमीच होते. मी एकाहार्ताचे 'पावर ऑफ नाऊ' तसेच ओशोंची काही भाषणे ऐकली. दोन्ही मला रटाळ आणि कंटाळवाणी वाटली. काय बोलताहेत तेच कळत नवते. क्षीरसागर साहेबांचे लेखांबद्दल देखील तेच, पण त्यांच्या लेखान्वरची साद प्रतिसादाची जुगलबंदी वाचायला मात्र मजा येते. पण त्यांच्या लेखनामधून एक मुद्दा वारंवार येतो तो म्हणजे अध्यात्म कशासाठी? शांत, आनंदी मनाने जगण्यासाठी.. मला वाटते कि म्हणूनच कदाचित जे लोक आधीच शांत, आनंदी आयुष्य जगात आहेत त्यांना ह्याच्याशी रिलेट करता येत नाही. म्हणजे असे बघा कि प्रेमात पडण्याआधी सर्व प्रेमगीते, विरहगीते काय मेलोड्रामा आहे असेच वाटते.. पण प्रेमात पडल्यावर मात्र ह्या कवीला माझ्या मनातल्या भावना नक्की कशा कळल्या ह्याचे आश्चर्य वाटते. तसेच काहीसे अध्यात्माचे असावे.. अशांत मनाला आपली उत्तरे अध्यात्मात मिळत असावीत. शांत मनाला असे प्रश्नच पडत नसल्याने हा बुवा काय बोलतोय तेच कळत नसावे.. मला अध्यात्म न समजण्याचे ही एक शक्यता असू शकते.. दुसरी शक्यता माझ्या (सुमार) बुद्धीशी संबंधित असल्याने त्याबद्दल विचार करत नाही :)

In reply to by संपत

क्षीरसागर साहेबांचे लेखांबद्दल देखील तेच, पण त्यांच्या लेखान्वरची साद प्रतिसादाची जुगलबंदी वाचायला मात्र मजा येते. पण त्यांच्या लेखनामधून एक मुद्दा वारंवार येतो तो म्हणजे अध्यात्म कशासाठी? शांत, आनंदी मनाने जगण्यासाठी.. मला वाटते कि म्हणूनच कदाचित जे लोक आधीच शांत, आनंदी आयुष्य जगात आहेत त्यांना ह्याच्याशी रिलेट करता येत नाही.
ही शक्यता म्हणून मान्य आहे पण कोणतही वर्तमानपत्र उघडा, टीवी ऑन करा, सामाजिक किंवा जागतिक परिस्थिती पाहा. " लोक आधीच शांत, आनंदी आयुष्य जगात आहेत" आणि म्हणून "त्यांना ह्याच्याशी रिलेट करता येत नाही." हे खरंय का बघा. सत्य बहुमतानी निर्णायक ठरणारा विषय नाही. ते एक आहे , तिथे मतदानाचा प्रश्न नाही. सत्य उघड आहे. ते एकतर समजलं किंवा नाही समजलं. वर एक मजेशीर प्रतिसाद आहे
संजयशेठ, एकहार्टची ओळख आवडली. लेख वाचून त्याच्याबद्दल वाचायची ईच्छा झाली यातच सारे आले. बाकी आपली अध्यात्मिक मते पटत नाहीत त्यामुळे त्यावर इथे काही लिहिण्यात अर्थ नाही.
आता लेखात मी माझं एकहार्टबद्दलचं आकलन लिहिलंय. तो अनुवाद नाही. ते वाचून एकहार्ट वाचायची इच्छा झाली पण माझी मतं पटत नाहीत! लेखनाचा आनंद वाटला तर मी लिहिन. याचा अर्थ विरोधात लिहिणारे यशस्वी झाले असा नाही. निरर्थक वाद-प्रतिवादात मला रस नाही. तर, असो!

In reply to by संजय क्षीरसागर

माझ्या प्रतिसादाचा विशेष उल्लेख करण्याचं कारण समजूनही लिहितोय. निरर्थक वाद-प्रतिवादात मला रस नाही. मीही अगोदरच्या प्रतिसादात अगदी याच भावनेनं सांगीतलं - "बाकी आपली अध्यात्मिक मते पटत नाहीत त्यामुळे त्यावर इथे काही लिहिण्यात अर्थ नाही." एकहार्टबद्दल वाचायची ईच्छा झाली ती तुम्ही चांगल्याप्रकारे त्याची ओळख सांगीतलीत म्हणून. ते प्रामाणिकपणे सांगण्यासाठी तुमची मतं पटण्याची मला गरज नाही. पटली असतीत तर तेही प्रांजळपणे सांगीतले असते. खरंच असो. राघव

ही शक्यता म्हणून मान्य आहे पण कोणतही वर्तमानपत्र उघडा, टीवी ऑन करा, सामाजिक किंवा जागतिक परिस्थिती पाहा. " लोक आधीच शांत, आनंदी आयुष्य जगात आहेत" आणि म्हणून "त्यांना ह्याच्याशी रिलेट करता येत नाही." हे खरंय का बघा. हे मान्य. माझा प्रतिसाद वैयक्तिक होता. तुम्ही किंवा ओशो, एकहार्ट बिन महत्वाचे लिहिता असे म्हणायचे नवते. ते मला अपील का होत नाही याची केलेली कारणमीमांसा होती. मला डायबिटीस नाही म्हणून डायबिटीसवर उपचार करणारे डॉक्टर मुर्ख ठरत नाहीत.

In reply to by संपत

मला डायबिटीस नाही म्हणून डायबिटीसवर उपचार करणारे डॉक्टर मुर्ख ठरत नाहीत.
माणूस सत्याचा शोध अनंत कालापासून घेतोय. बुद्ध राजपुत्र होता, त्याला अंत्ययात्रा पाहिल्यावर, तर अर्जुन धनुर्धारी होता, त्याला रणांगणावर विषाद जाणवला. एकहार्ट कारण विशद करत नाही. याचा अर्थ विषाद वेगवेगळा आहे असा नाही. तो केव्हा जाणवेल ते सांगता येत नाही. पण एक नक्की, ज्याला मृत्यूची अनिवार्यता लक्षात आली त्याला तो जाणवतो.