टिनपाट हा शब्द फार लहानपणी कानावर पडला आणि मनात घर करुन बसला.
बिनकामाची, क्षुल्लक असलेली वस्तुचा उल्लेख करायला टिनपाट हा शब्द वापरला जातो हे कळालं. बरेच दिवस तो शब्द तोंडात घर करुन होता. मधल्या काळात आय असेल ते असो पण तो शब्द काही कानावर आला नाही. काही शब्द नंतर कधीतरी आठवतात आणि आपल्याच आयुष्यातले काही संदर्भ जागे होतात.
दहावीच्या सुट्टीत सहज शाळेजवळून चक्कर मारत चाललो होतो. परिक्षा संपलेल्या होत्या त्यामुळे शाळा रिकामी पडलेली होती. आत डोकावून पाहिले तर कुणी नाही. आत जावे की नाही अशा विचारात असतांनाच ती दिसली. नेहमी युनिफॉर्ममधे, दोन वेण्या करकचून बांधून येणारी आज पंजाबी ड्रेस आणि अर्धवट बांधलेले केस अशा वेषात होती. पाहून हसली. काय करतोस इथे? काही नाही सहज फिरत आलो. चल शाळेत जाऊन आपला वर्ग पाहू ती म्हणाली. डोक्याने काही विचार करायच्या आत चल म्हणालो आणि गेटमधून आत आलो. वर्गाजवळ आलो. वर्गात डोकावले. कुणी नाही. आत मधे आलो.
ती तिच्या नेहमीच्या पहिल्या बेंचवर बसली. मी तिच्यासमोर बेंचवर बसलो. काय बोलावे ते सुचत नव्हते. पुढे काय करणार? सायन्स की कॉमर्स. तिने विचारले. तेव्हा कुठे काय कळत होते? आजकाल पहिलीपासून नक्की झाले असते. बघु अजुन नक्की नाही. तु? मी उत्तरलो. बाबा म्हणतात सीए हो. मी कॉमर्सलाच जाईन. बरे. अचानक वारा आला. ओढणी उडाली. पलिकडच्या बेंचवर जाऊन पडली.
काय वाटले काय माहित. उठलो. ओढणी उचलली. हाताला खूप मुलायम लागली. झटकली आणि हलकेच तिच्या डोक्यावरुन खांद्यावर टाकली. तिने डोळे मिटले.हळूच ओढणी नीट करुन तिचे हात हातात घेतले. शॉक बसणे म्हणजे काय ते कळले. किती वेळ हात हातात होता ते कळले नाही. पण धडाम आवाज झाला आणि स्वर्गसुख संपले. वॉचमनला दिवसा झोपायला काय होते ? दाणकन पाठीत धपका बसला. आणि डोळ्यातून पाणी आले. शाळेच्या बाहेर पळत आलो. रडू आणि हसू एकावेळी कसे असते ते कळाले. कितीतरी वेळ खुप लागले का रे म्हणून विचारत होती. कॉमर्सला गेली. अधून मधून दिसायची. गोड हसायची. नंतर कुठे गेली माहीत नाही. मी ही शोधले नाही. का शोधले नाही माहीत नाही. आजही कधीतरी मित्रांसमवेत बसून हा किस्सा सांगतो तेव्हा हसू येते आणि एकटा असलो की अश्रु येतात. चालायचेच.
त्याचवेळेस नवी मैत्रीण मिळाली. सायकल. नवी कोरी सायकल घेऊन गावभर फिरायचो. अभ्यासाकडे दुर्लक्ष. रोज तिला पुसायचो. स्वच्छ ठेवायचो. घरी पंप आणला होता. रोज हवा चेक करुन, भरुन बाहेर पडायचो. कधी इकडे कधी तिकडे. लांबवर गेलो की एखाद्या ठिकाणी बसून तिच्याशी गप्पा मारायचो. काय बाई दमलीस का ? घरी जायचे की अजून दुर जायचे? एका मोठ्या मित्राला एकदा ही गंमत सांगितली. हम्म म्हणत गंभीर चेहरा करत त्याने सांगितले ज्या वयात मुलींच्या मागे फिरायचे त्या वयात तु सायकलशी गप्पा मारतोस हे लक्षण ठीक नाही. उपाय काय मी धास्तावून विचारले. त्याने रोगापेक्षा भयंकर उपाय दिला. कपाट उघडले आणि दहावीस पुस्तकांचा गठ्ठा समोर आदळला. वाच जरा. माझ्या वजनापेक्षा जास्त वजनाची पुस्तके कशी बशी पेलवत घरी आलो. दोन दिवस सुट्टी होती. वाचता वाचता गुंगुन गेलो. आणि नवा रोग लागला.
तरुणपणात माणसांपेक्षा पुस्तकात रमणार्याच्या आयुष्याचं काय होतं हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. आयुष्य म्हणजे कुणी उघडून सुद्धा पहाणार नाही असं पुस्तक झालं पण पुस्तकांबद्दल कधीच राग मनात आला नाही. आजही दिसले पुस्तक की वाचावेसे वाटते. विशिष्ट विषयाचाच असा आग्रह नाही. काहीही चालते. एकाच विषयावर विस्तृत वाचन करुन त्यात प्राविण्य मिळवणार्या लोकांबद्दल मला आदर आहे. ते मला जमण्यासारखे नाही.
मागे वळून पहातो तर असं वाटतं की पुस्तकांपेक्षा माणसांमधे रमलो असतो तर आयुष्य वेगळं झालं असतं. ज्या पद्धतीने जगलो त्यापेक्षा वेगळी वाट धरली असती तर कदाचित आयुष्य बदललं असतं. संदर्भ बदलले असते. पण आता त्याचा विचार करुन उपयोग नाही. काही गाठी सुटल्या आहेत. काही गाठी बाकी आहेत. लवकरच त्या सुद्धा सुटतील. एकेक भार कमी करत आलो आहे. बोलावणं यावं ही इच्छा नाही पण आल्यास नकार नाही. ज्याच्या आयुष्यातली ट्रेन सुटून गेली आहे अशा प्रवाशाला ट्रेन मिळावी म्हणून केलेल्या धडपडीतला फोलपणा कळला आहे. धापा अजून आहेत. उसासे थोडे आहेत. पुढची ट्रेन येणार असली तरी प्रवासातली आतुरता संपली आहे. बाकावर बसून शांतपणे कोलाहलाकडे पहात बसण्यात आनंद असतो. तो तरी उपभोगावा.
आता ही स्टोरी नक्की कुणाची? ह्या कथेचा नायक कोण? असेल कूणीतरी टिनपाट ! आपल्याला काय करायचे, नाही का?
वाचने
6348
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहिले आहे. पण या वयात
छान लिहिलेय
तरुणपणात माणसांपेक्षा
झक्कास!!!!!!!!!!!!!!!!!!!!
नाना लेख!!
हम्म.. कळले आम्हाला नान्या
+१
In reply to हम्म.. कळले आम्हाला नान्या by llपुण्याचे पेशवेll
लेख वाचून तरी लेखकाच्या
+१
In reply to लेख वाचून तरी लेखकाच्या by सस्नेह
छान
लेखनात " रामदासांची" श्टाइल
_/\_
सुंदर!!
In reply to _/\_ by मूकवाचक
छान. लेख आवडला.
रडू आणि हसू एकावेळी कसे असते
मस्त रे...
..
मस्त
हम्म... खरे तर हळव्या
गोष्ट
हम्म
+१
In reply to हम्म by रमताराम
मस्त.
छानच लिहिले आहे
मस्त ..
ह्म्म...
सरस छे!!
हम्म कधी कधी डेस्टिनेशनला
छान...
सुन्दर लेखन..
भावडल!
मस्त लिहिलं आहे, धन्यवाद.
हम्म्म
नान्या आवडलंच... असं
झक्कास!
लै भारी!