मोठ्यांच्या छोट्या आठवणी
–
1 विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार
दुरवरून दिसणारा कळस, मंदिराच्या प्रवेश द्वारावर शेठजींचा लहान पुतळा, वीणाधारी सरस्वती दोन विशाल सिंहांमधे आसनस्थ आहे.
2 सभामंडपाचा दर्शनी भाग व
3 या विठ्ठलमंदिरातील काळ्यापांढऱ्या फरशीच्या मध्यात बसलेल्या बालगंधर्वांचे दर्शन व गायन झाले.
या दुमजली मंदिरात प्रवेशताना पावसापाण्याच्या संपर्काला दूर ठेवायसाठी पत्र्याच्या पन्हाळी, गणवेशातील दोन शस्त्रधारी रखवालदार, वरच्याबाजूला चार ऋषींची सोबत. मधल्या भागात सन १९११ या मंदिरस्थापना वर्षाची नोंद. त्यावर कळसाच्या बाजूला भगवान श्री कृष्ण उभे, समोर एकतारी धारी मीरा?
त्या मंदिराच्या परिसरात पांथस्थांना राहायला ओसऱ्या व पडव्या आहेत. मागे विहिर व मंदिराच्या पुजारीव इतर सेवेकऱ्यांसाठी राहायची सोय.
सभा मंडपात वेलबुट्ट्यातील अर्ध कमानी गुलाबी-पिवळ्या रंगाची पखरण असलेले नक्षी काम, समोर भरपूर फुलमाळांनी सजवलेली रुकमणी-विठोबाची मुर्ती. त्यासमावेत गणपती व हनुमानाची लहान प्रतिमा डाव्या-उजव्या बाजूला.
प्रवचनाच्या दिवशी शेठजीं येणार म्हटल्यावर विशेष थाट असे. सभामंडपात सतरंज्या, मधोमध प्रवचनकारांसाठी रंगीत जाजम. शेठजींसाठी शुभ्र नव्या चादरींखाली मऊमऊ गादी. हात टेकायला लोड, पाठीशी तक्के, समोर पाणी भरलेली चांदीची तांब्या-भांडी. लवंग-इलायचीदाणी. शेठजींच्या पत्नी सौ. अक्कां समावेत त्यावेळच्या प्रतिष्ठित स्त्रिया वरच्या मजल्यावरून संकीर्तनाचा आनंद घेत.
काही नोकरमंडळी शेठजींच्या नजरेत भरावे अशा बेताने पितळेचे मोठे दोरीवाले टाळ गळ्यात घेऊन नामसंकीर्तनाच्या वेळी विठ्ठ्ल-विठ्ठल, रामकृष्णहारी असा हरिनामाचा गजर करताना तल्लीन असल्याचे दर्शवत. हुरुपाने नाच करताना आमच्यासाऱख्यांना खुदकन हसू येई. कारण कधी काही कारणांनी शेठजी मधेच उठून गेले तर ही मंडळी टाळ गळ्यातून काढून टाकून टाळीवर येत. कधी कधी एक बोट वर करायच्या बहाण्याने धूराचे झुरके घेऊन गुप्त होत.
बुवांच्या पायाशी डाव्याहाती पेटीवाले, उजवीकडे बापुराव म्हसकर तबल्याची ठाकठुक करून मानेने हो म्हटले की वीणाधारींकडून कथनासाठी जोशीबुवा पागोटे काढून सज्ज होत. कमर खोचून ‘जेहत्त्ते कालाचे ठाई’ म्हणून सुरवात केली की त्यांच्या अमोघ वाणीत अवीट रंग भरे. तुकारामांचे अभंग, एकनाथ, नामदेव संताच्या काव्यासह, ज्ञानेश्वरीतील कल्पनाविलास, ओव्या, अनेक कवींचे दाखले, त्यांचे त्यावरील भाष्य माझ्यासारख्या बालबुद्धीला समजले नाही तरी जरूर भावले.
‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी ।।’
... ज्ञानोबा माउलींनी हरीमुखे म्हणा हे दोनदा सांगण्याचा गूढभाव काय? अगणित पुण्य मिळवायचे असेल तर वारंवार हरीनाम घ्या. असे वेदशास्त्र हात वर करून ठासून सांगण्यातील कळकळ त्यातून व्यक्त होते....
... अशाच एका प्रवचनाच्या रात्री बुधगावकरांकडे पाहुणचार घेताना बालगंधर्व आज सेवेला हजेरी लावणार आहेत असे कळले. एरव्ही कधी न फिरकणारे बुधगावकर राजे त्यांच्या समावेत बालगंधर्वांची स्वारी. त्यांना उचलून आणावे लागायचे म्हणून नोकर.. वेगळे तबला पेटीवाले असा फौजफाटा गाडीतून आला. त्यांना खच्चुन भरलेल्या लोकांतून जागा करून देऊन काळी टोपी, सफेज कुडता, गोरे पान क्षीण पण तीक्ष्ण नजर, उपस्थितांना नमस्कार करून विठ्ठलासमोर सेवा करायची इच्छा आहे. आवाज गोड करून घ्यावा असे विनम्रमणे म्हणून हात डाव्या कानाला लाऊन ...
‘पतित तू पावना म्हणविसी नारायणा’ भजनाला आरंभ केला. आर्त्र स्वरात भिजलेले कारुण्य. सहज फिरणारा आवाज, तानांची हळुवार सुरावट. संत कान्होपात्रेच्या आळवणीला सुराचा परीसस्पर्ष. बालगंधर्वांच्या गलितगात्र अवस्थेतील त्या करुण भजनातील शब्दांनी वरिठांना त्यांच्यागत वैभवाची आठवण येऊन भडभडून आले. त्यांची दीन स्वरांजली, प्रत्यक्ष दर्शन आणि भजनातील शब्द वैभव. कान, लोचन अणि मनाने स्तब्धपणे अनुभवलेले ते क्षण आंतरिक अनुभूति देऊन गेले.....
चित्रपटाने त्यांच्या वैभवशाली नाट्परंपरेची, शरीर सौष्ठवाची व स्वरगंगेची झलक अनुभवली... आणि आठवणींना उजाळा मिळाला.
वाचन संख्या
3437
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान वर्णन
(No subject)
लिहायला वेळ नाही....
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
ग्रेट!!
काका.. खरचं छान लिहिताय..
मस्त!!
+१
In reply to मस्त!! by श्रीरंग
.
नानांना आपण प्रत्यक्ष ... ?
धन्यवाद !
वेळ मिळाला की
In reply to धन्यवाद ! by विटेकर
मस्त!
-
पुण्यातील माधवनगरकरांचा मेळावा
In reply to - by अमोल केळकर