एक सुखद फ्युजन

प्रास जनातलं, मनातलं
काही गोष्टी अपघाताने घडतात. अशा अपघाताचा परिणाम बघता, ते वेळोवेळी का होत नाहीत याबद्दल खट्टू व्हायला होतं. अर्थात असे अपघात पैशापासरी न घडणं यातच त्यांचं महत्त्व अधोरेखित होत असतं, नाही का? असे हे उपरोल्लेखित अपघात आपल्या संगीत सृष्टीत ठराविक काळाने पुन्हा पुन्हा घडत असतात आणि त्यातून ते आपलं जीवन आणखी सुसह्य करून सोडतात असं आपलं मला वाटतं. असाच एक अपघात १९९२ मध्ये कधीतरी घडला आणि आपलं सांगीतिक विश्व समृद्ध करता झाला. जाहिरातींच्या जिंगल्सना संगीत देणारा संगीत दिग्दर्शक त्या वेळेला रेकॉर्डिंग रूममध्ये जिंगलचे शब्द अर्थात जिंगलचा फायनल ड्राफ्ट येण्याची वाट बघत होता. त्याची चाल तयार होती, वेगवेगळ्या वाद्यांची संरचना आवश्यकतेप्रमाणे करून झालेली, वादकांनी आपापल्या जागा धरलेल्या, त्याचा गायक येऊन तयार होऊन रेकॉर्डिंगसाठी उभा होता आणि रेकॉर्डिस्ट्स नि साऊण्ड इंजिनीयर्स त्यांची त्यांची कामं पूर्ण करून रेकॉर्डिंगच्या तयारीत होते, गायकाबरोबर गाण्याची धुन वाजवून कच्च्या मसुद्यावर रियाजही करून झालेला पण जे गायचंय त्या निश्चित केलेल्या गाण्याचाच पत्ता नव्हता. जसा तो संगीत दिग्दर्शक नावाजलेला होता तसाच त्याचा गायकही प्रथितयश होता. रेकॉर्डिंग ठरवलेला दिवस नुसताच ढळून जात होता आणि संगीत दिग्दर्शकाचा संयमही. रेकॉर्ड रूम मधून एका अस्वस्थतेत संगीत दिग्दर्शक बाहेर पडला आणि आपल्या वाद्य समूहाकडे जाऊन त्याने गिटार हातात घेतली. त्याला काय सुचलं कुणास ठाऊक, त्याने त्यातून सुरावट वाजवायला सुरूवात केली. वाद्यवृन्दातील वादकांना त्याच्या या अस्वस्थावस्थेतल्या वागण्याची सवयच होती. त्यांनी अहेतुकपणे त्याच्या सुरावटीला साथ देणं सुरू केलं. तो संगीत दिग्दर्शक नि त्याच्या वादकांच्या त्या सुरावटीने उपस्थित गायकाला काही वेगळीच जाणीव झाली आणि नकळतच त्याच्या तोंडून त्या संध्याकाळच्या वेळेचा परिणाम म्हणून म्हणा किंवा इतर काही पण मारव्याचा आलाप निघाला. सुरावट पुढे सरकता सरकता गायकाने निरनिराळ्या पद्धतीने त्यात मारव्याच्या सुरावटी गुंफल्या आणि या सगळ्याची परिणिती एका अत्यंत श्रवणीय फ्युजन संगीतानुभवामध्ये झाली. यामध्ये पौर्वात्य नि पाश्चात्य संगीत प्रकारांचं एक वेगळंच मिश्रण तयार झालं. ते तसं पूर्वीच्या रविशंकर-झाकिर-मॅक्लॉफ्लिनच्या प्रसिद्ध 'शक्ती'पेक्षा जरा निराळ्याच प्रकारचं होतं पण होतं फ्युजनच. दोन्ही संगीत प्रकार आपापलं स्वतंत्र अस्तित्त्व राखून खुमारी वाढवत होते. संगीत रंगात येऊ लागताच रेकॉर्डिस्ट्स ते तुकडे ध्वनिमुद्रित करू लागले. किती तरी वेळ हे जॅम सेशन सुरू होतं, किंबहुना ते, जिंगल्सचे शब्द आल्यावरच थांबलं पण कुणीच कंटाळलेलं नव्हतं. संगीत क्षेत्रानं एका अपघाताची नोंद तेव्हा घेतली असणार हे निश्चित. या सत्य घटनेमधला संगीत दिग्दर्शक होता लेस्ली लुईस उर्फ लेस् आणि गायक होता हरिहरन्. जिंगल्सना संगीत देणारा लेस् पाश्चात्य संगीतातला जाणकार नि स्वतः गायक. हरिहरन् कर्नाटक आणि हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतज्ञ नि आपल्या मखमली आवाजासाठी प्रसिद्ध. वरच्या अपघाताचा परिणाम म्हणून ऑफिशियली १९९६ साली निर्माण झाले, 'कॉलोनियल कझिन्स' आणि त्यांचा याच नावाचा पहिला अल्बम.
लेस् आणि हरिहरन् आपापल्या संगीताशी प्रामाणिक राहून नि एकमेकांवर कुरघोडी न करता जे सादर करतात त्याला खरोखरच तोड नाही असं वाटतं. पुढे त्यांनी आणखी दोन अल्बम्स काढले (द वे वुई डू इट आणि आत्मा) शिवाय दोन तमिळ सिनेमांना संगीतही दिलंय. त्यांच्या अल्बम्स मधली तीन गाणी त्यांची विस्तृत रेन्ज दर्शवण्यासाठी पुरेशी ठरतील याची खात्री आहे. आनंद घ्या. पहिलं, कृष्णा
दुसरं, सा नी ध प
तिसरं, ओ! ओ! काय झालं? या गाण्यातली इव्हा ग्रोवर काळजाचं पार पाणी पाणी करते राव, नै? ;-)
कलोनियल कझिन्सने चांगल्या दर्ज्याचं फ्युजन संगीत दिलं, त्यावेळच्या गरजेप्रमाणे गाण्यांचे सुंदर विडिओसुद्धा बनवले. अनेक आंतरराष्ट्रीय अवॉर्ड्स मिळवले. पुढे लेस् ने फ्युजन संगीतामध्ये एकल प्रवासही केला. त्यांच्या नव्या अल्बमची घोषणा होऊनही बराच काळ लोटलाय. एखादा आधीसारखाच झकास फ्युजन अल्बम आता कलोनियल कझिन्स काढतीलच पण तोवर त्यांच्या वर दिलेल्या मस्त गाण्यांचा आस्वाद घेऊ या...!
वर्गीकरण
लेखनप्रकार

11 टिप्पण्या 3,600 दृश्ये

Comments

सुनील नवीन

त्याकाळी टिव्हीवर भरपूर गाजले होते हे गाणे! चांगली माहिती. असेच माहितीपूर्ण किस्से येऊद्यात.

पैसा नवीन

लेझ आणि हरिहरन यांची सगळीच गाणी आवडतात. मस्त! आणखी किस्से पायजेत!!

स्पंदना नवीन

अतिशय आवडती जोडगोळी. दे पर्फेक्टली काँप्लिमेंट इचअदर. सुरुवात कशी अपघातान झाली हा किस्सा अतिशय आवडला.

गवि नवीन

उत्तम रिमिक्स जमला किंवा फ्युजन जमलं ते लेस्ली लुईसलाच असं माझं मत झालं आहे...एखादा अपवाद असेलही. पण लेखात म्हटल्याप्रमाणे अपघातच म्हणावा असा.. बाकीन्बँड्सचे असे बरेच प्रयोग फसले आहेत किंवा बोअर मारले आहेत. कलोनियल कजिन्सला हा प्रकार परफेक्ट जमून गेला. सानीधप गाण्याच्या सुरुवातीला एक चेंजओव्हर आहे बहुधा बेस गिटारवर. त्याने पागल व्हायला होऊन ते गाणं पुन्हापुन्हा ऐकलं जायचं.. झक्कास...

अन्या दातार नवीन

In reply to by गवि

उत्तम रिमिक्स जमला किंवा फ्युजन जमलं ते लेस्ली लुईसलाच असं माझं मत झालं आहे.
दणदणीत अनुमोदन. सध्या कोक स्टुडियो बघताना हे प्रकर्षाने जाणवतंय. एक अपवाद करावा वाटतो तो पं. अजय पोहनकर यांचा मुलगा; अभिजित पोहनकर. त्याने "पायलिया झनकार" चे सुरेख फ्युजन केले आहे. तो संपूर्ण अल्बम मस्त होता.
बाकीन्बँड्सचे असे बरेच प्रयोग फसले आहेत किंवा बोअर मारले आहेत.
बँड्सबद्दल बोलायचे झाले तर सध्याचा अद्वैता हा बँड लै फॉर्मात आहे. सारंगीचा योग्य जागी सुरेख वापर हे यांचे वैशिष्ट्य.

चैतन्य दीक्षित नवीन

अपघाताची कथा आवडली. ओ ओ काय झालं हे गाणं का कुणास ठाऊक इतकं भावलं नाही मला. पण कृष्णा आणि सानिधपमग..मगरेसा एकदम मस्त!

गवि नवीन

In reply to by चैतन्य दीक्षित

+१... सानीधप गाण्याबाबत गंमत अशी की ते शब्द सानिधपमग..मगरेसा असे असले तरी सूर वेगळेच आहेत.. :) अर्थात हे ऐकून लगेच लक्षात येतंच म्हणा, कारण बाकी काही नसलं तरी "सानीधपमगरेसा"चा पॅटर्न आपल्या मनात लहानपणापासून बसलेला आहे.