✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

इन्व्हेस्टमेन्ट बँका नक्की काय करतात?

क
क्लिंटन यांनी
Fri, 07/20/2012 - 22:06  ·  लेख
लेख
श्री. मोदक यांच्या आर्सेलर-मित्तल वरील धाग्यात दोन्ही बाजूंच्या दिमतीला इन्व्हेस्टमेन्ट बँकर्सचा फौजफाटा होता असे म्हटले आहे. आता या इन्व्हेस्टमेन्ट बँका म्हणजे नक्की काय आणि त्या काय करतात, साध्या बँकांपेक्षा त्या कशा वेगळ्या असतात या प्रश्नांची उत्तरे या लेखातून द्यायचा प्रयत्न आहे. कोणत्याही उद्योगाला आपला उद्योग चालवायला पैसे लागतातच. उद्योग चालवायला मालक स्वतःचे पैसे वापरू शकतात किंवा बँकेकडून किंवा अन्य कोणाकडून पैसे उधार घेऊ शकतात. यापैकी मालकांनी स्वतः उद्योगात गुंतवलेल्या पैशाला इक्विटी (equity) म्हणतात तर इतरांकडून उधार घेतलेल्या पैशांना "डेट" (debt) म्हणतात. समजा कोणा एका व्यक्तीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर सुरवातीच्या काळात ती व्यक्ती स्वतःचे पैसेच इक्विटी म्हणून वापरेल आणि कर्ज घ्यायला (डेट) बँकेकडे जाईल. अर्थातच बँका काहीतरी तारण ठेऊन पैसे कर्जाऊ देईल. जसा उद्योगाचा पसारा वाढेल त्याप्रमाणे एकट्या माणसाने गुंतवलेल्या पैशात ते भागायचे नाही.तेव्हा इतर कोणाला भागीदार म्हणून उद्योगात सामील केले जाईल. अर्थातच भागीदार हा थोडे तरी पैसे उद्योगात गुंतवेल आणि भागीदाराने गुंतवलेल्या पैशाच्या प्रमाणात उद्योगाचा मालकीहक्क त्या भागीदाराकडे असेल. हा भागीदारीतला उद्योग बँकेकडून पैसे उधार घेऊ शकेलच. पण उद्योगाचा विस्तार अधिक वाढेल त्याप्रमाणे अधिक पैशाची गरज पडेल. भागीदारांची संख्या वाढविण्यावरही मर्यादा आहेत कारण प्रत्येक भागीदारावर unlimited liability असते. म्हणजेच काही कारणाने उद्योग पाहिजे तितक्या प्रमाणात पैसे मिळवू शकत नसेल तर बँकेचे कर्ज फेडायची जबाबदारी प्रत्येक भागीदारावर येऊ शकते. दुसरे म्हणजे प्रत्येक वेळी नवीन भागीदार आल्यावर किंवा सध्याचा भागीदार सोडून गेल्यानंतर परत रजिस्ट्रेशन करणे वगैरे कटकटींना सामोरे जावे लागेल. (परदेशात Limited Liability Partnership पण असतात पण माझ्या माहितीप्रमाणे भारतात तो प्रकार नाही) या कटकटींमधून वाचण्यासाठी उद्योगाचे रूपांतर प्रायव्हेट लिमिटेड किंवा पब्लिक लिमिटेड कंपनीत केले जाते.म्हणजे उद्योगाचे मालक कंपनीचे शेअरधारक बनतात. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी कमितकमी २ आणि पब्लिक लिमिटेड कंपनीसाठी कमीतकमी ७ शेअरधारक असणे गरजेचे असते.या शेअरधारकांची limited liability असते. म्हणजेच जरी कंपनी पैसे कर्जाऊ दिलेल्यांचे क्लेम पूर्ण करू शकली नाही तरी शेअरधारकांना त्याची भरपाई करावी लागत नाही. समजा मी किंगफिशर एअरलाईन्सचे शेअर घेतले असतील तर मी त्या कंपनीचा माझे शेअर आहेत तितक्या प्रमाणातला मालक झालो. तरीही कंपनीला दिलेले कर्ज वसूल करण्यासाठी बँका माझ्याकडे येऊ शकत नाहीत. एकदा कंपनी प्रायव्हेट किंवा पब्लिक लिमिटेड झाली की कायद्याच्या दृष्टीने त्या कंपनीचे त्या कंपनीच्या मालकांपेक्षा (शेअरधारकांपेक्षा) स्वतंत्र अस्तित्व असते. प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड कंपन्यांमध्ये काही फरक आहेत. उदाहरणार्थ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जास्तीतजास्त ५० शेअरधारक असू शकतात. पब्लिक लिमिटेड कंपन्यांना ते बंधन अर्थातच नाही. तसेच शेअर कोणाला आणि कसे विकता येतात यावरूनही प्रायव्हेट आणि पब्लिक लिमिटेड कंपन्यांमध्ये काही फरक आहेत. या कंपन्यांना आपली इक्विटी वाढवायची असेल तर तीन मुख्य मार्ग आहेतः १. प्रायव्हेट इक्विटी २. Qualified Institutional Placement ३. शेअरबाजारात IPO द्वारे पैसे उचलणे. तसेच पैसे कर्जाऊ घ्यायचे असतील तर बँकेकडून पैसे कर्जाऊ घेण्याबरोबरच बाँड जारी करूनही या कंपन्या पैसे कर्जाऊ घेऊ शकतात. (या बाँडचे अनेक प्रकार असतात-- Straight bond, Floating rate bond, Convertible bond, Foreign Currency Convertible Bond इत्यादी). या कंपन्यांना पैसे उभे करायला (इक्विटी/डेट द्वारे) मदत करायला इन्व्हेस्टमेन्ट बँका असतात. माझ्या नातेवाईकांचे महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या ठिकाणी एक मोठा उद्योग आहे. समजा त्यांना शेअरबाजारातून पैसे उभे करायचे असतील तर त्यामध्ये काही अडचणी यायची शक्यता आहे. सर्वात महत्वाची अडचण म्हणजे सरकारी नियमांप्रमाणे शेअरबाजारात विकत असलेल्या शेअरपैकी ५०% शेअर हे सुरवातीला Financial Institutions (Mutual funds/Financial service companies सारख्या संस्थांना) विकावे लागतात.आता या संस्थांना महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या उद्योगाविषयी (तो कितपत चांगला आहे) माहिती असायची शक्यता तशी कमीच. दुसरे म्हणजे या उद्योगाच्या मालकालाही या संस्थांविषयी माहिती असेल आणि त्यांना कधी/कुठे/कसे भेटावे याविषयी माहिती असेल असे नाही. तेव्हा इन्व्हेस्टमेन्ट बँका या उद्योगांना आपले शेअर या संस्थांना विकायला मदत करतात. भारतात शेअरबाजार नियंत्रित करणारी संस्था आहे सेबी (Securities and Exchanges Board of India). या संस्थेच्या नियमांचे पालन करूनच कोणालाही बाजारात पैसे उचलता येतात. स्वतःचे पैसे कोणी उद्योजक वापरत असेल तर त्या पैशाचे त्याने काही केले तरी इतरांना त्याची चिंता असायची गरज नाही. पण जर सामान्य गुंतवणुकदारांकडून पैसे घ्यायचे असतील तर त्या कंपनीला आपल्या उद्योगाविषयी खूप डिटेलमध्ये माहिती सेबीला द्यावी लागते. ही माहिती देणारे document म्हणजे Red Herring Prospectus. या प्रॉस्पेक्टसमध्ये बरीच माहिती दिलेली असते. उदाहरणार्थ कंपनीचा नक्की बिझनेस काय आहे, त्या कंपनीचा इतिहास, गेल्या ३-४ वर्षांचे अकाऊंट, कंपनीवर कोणी खटले भरले आहेत का, कंपनीत गुंतवणुक केल्यास नक्की कोणते रिस्क फॅक्टर असतील इत्यादी बरीच माहिती असते. कोल इंडिया लिमिटेड या कंपनीचे Red Herring Prospectus इथे बघायला मिळेल. हे प्रॉस्पेक्टस किती मोठे असते याची कल्पना त्यावरून येईल.सेबी या Prospectus मध्ये अनेक सुधारणा सुचविते आणि हे वाचून कंपनीत गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य निर्णय घ्यायला लागेल ती सगळी माहिती या Prospectus मध्ये सेबी द्यायला लावते.हे Red Herring Prospectus तयार करायला इन्व्हेस्टमेन्ट बॅंका संबंधित कंपनीला मदत करतात. इन्हेस्टमेन्ट बॅंकांचे अजून एक महत्वाचे काम म्हणजे शेअरची किंमत ठरविणे. मध्यंतरी महेश ट्युटोरिअल चालवत असलेली MT Educare कंपनी शेअरबाजारात लिस्ट झाली. त्यासंबंधी खाली दिलेल्या जाहिरातीप्रमाणे जाहिराती आपण रस्त्याच्या कडेला किंवा पेपरातून बघत असतोच. या जाहिरातीत कंपनीच्या एका शेअरची किंमत ७४ ते ८० रूपये आहे असे म्हटले आहे.या शेअरची किंमत किती हे ठरवायला finance मधील विविध valuation techniques चा वापर केला जातो.हा फायनान्समधील थोडा advanced विषय असल्यामुळे त्याविषयी इथे लिहित नाही. इन्व्हेस्टमेन्ट बॅंका या शेअरची किंमत ठरवायला कंपनीला मदत करतात. त्यानंतर इन्व्हेस्टमेन्ट बॅंका हे शेअर financial institutions मध्ये push करण्यासाठी विविध संस्थांच्या प्रतिनिधींना भेटतात.याला "Road show" म्हणतात.या रोड शो मध्ये इन्व्हेस्टमेन्ट बॅंकाचे प्रतिनिधी या कंपनीचा शेअर विकत घ्या अशा प्रकारची जाहिरात वित्तीय संस्थांकडे करतात.वर दिलेल्या उदाहरणात माझ्या नातेवाईकांनी समजा वित्तीय संस्थांकडे आपल्या शेअरची जाहिरात केली तर "कोण तू" आणि "कशावरून तुझा उद्योग चांगला" हे दोन प्रश्न नक्कीच उभे राहतील.इन्व्हेस्टमेन्ट बॅंका या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देतात.सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या नातेवाईकांना एकदा किंवा फारफार तर दोनदा शेअर बाजारातून पैसे उभे करावे लागतील.पण या इन्व्हेस्टमेन्ट बॅंका याच उद्योगात असतात.एका कंपनीला पैसे उभे करायला मदत केल्यावर दुसरी,तिसरी आणि इतर अनेक कंपन्यांना पैसे उभे करायला या इन्व्हेस्टमेन्ट बॅंका मदत करतात.समजा कोणत्या इन्व्हेस्टमेन्ट बॅंकेने कुठला वाईट शेअर (महागडा) मुद्दामून push केला तर त्या बॅंकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल आणि पुढच्या वेळी त्या बॅंका कोणा अन्य कंपनीच्या शेअरची जाहिरात करतील तेव्हा वित्तीय संस्था त्या बॅंकेवर विश्वास ठेवणार नाहीत.यातूनच त्या बॅंकांच्या बिझनेसवर परिणाम होईल.म्हणूनच कोणतीही चुकीची माहिती न देण्यात या इन्व्हेस्टमेन्ट बॅंकांचे हित असते.तेव्हा एखादी नावाजलेली इन्व्हेस्टमेन्ट बॅंक माझ्या नातेवाईकाच्या कंपनीच्या शेअरची जाहिरात करत आहेत यावरूनच त्या शेअरची विश्वासार्हता वाढते आणि "कोण तू" आणि "कशावरून तुझा उद्योग चांगला" या दोन्ही प्रश्नांचे उत्तर दिले जाते. अनेकदा इन्व्हेस्टमेन्ट बॅंका complete underwriting करतात.म्हणजे त्या कंपनीचे बाजारात विकायला आलेले सगळे शेअर या बॅंका स्वत: विकत घेतात आणि ते शेअर वाढीव दराने त्या शेअर बाजारात विकतात. किंवा Best effort बेसिसमध्ये जितके शेअर विकता येतील तितके इन्व्हेस्टमेन्ट बॅंका (अर्थातच फी घेऊन) विकून देतात. जर Qualified Institutional Placement असेल तर हे शेअर शेअरबाजारात न विकता वित्तीय संस्थांना डायरेक्ट विकायला या इन्व्हेस्टमेन्ट बॅंका संबंधित कंपनीला मदत करतात. काहीवेळा Private equity संस्थांशीही इन्व्हेस्टमेन्ट बॅंका संबंधित कंपनीची गाठ घालून देतात. (बहुतांश वेळा private equity संस्था अशा मध्यस्थाशिवाय संबंधित कंपनीशी संपर्क साधतात). त्याचप्रमाणे शेअराऐवजी बॉंड विकायचे असतील तरी हीच पध्दत थोड्याफार फरकाने अशीच चालते. तसेच Mergers आणि Acquisitions मध्ये एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे शेअर विकत घेते.समजा "अ" कंपनी "ब" चे शेअर विकत घेत असेल तर "अ" ला ते शेअर कमितकमी किंमतीत विकत घेण्य़ात आणि "ब" ला जास्तीत जास्त किंमतीत ते विकण्यात इंटरेस्ट असतो.तेव्हा शेअरला किती किंमत मोजा हा सल्ला "अ" ला आणि कमितकमी किती किंमत घ्या हा सल्ला द्यायला "ब" ला अर्थातच वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेन्ट बॅंका असतात. (एकच बॅंक दोन्ही बाजूंची सल्लागार असू शकत नाही). आर्सेलर-मित्तलच्या गोष्टीत नेमका हा प्रकार करायला दोन्ही बाजूंच्या दिमतीला इन्व्हेस्टमेन्ट बॅंका होत्या. आता यात काय मोठेसे असे वाटू शकेल पण कंपनीच्या शेअरची किंमत ही त्या कंपनीची net worth किती यावर अवलंबून असते आणि net worth ही भविष्यात कंपनीकडे येऊ शकलेल्या cash flows वर अवलंबून असते.विशेषत: कंपनीचे assets कोळशाच्या किंवा लोखंडाच्या खाणी/ पेट्रोलियम उत्पादनाच्या विहिरी/ नैसर्गिक वायूचे साठे अशा पध्दतीच्या असतील तर त्यापासून भविष्यात किती cash flow येऊ शकेल हे projection करणे तितकेसे सोपे नसते हे लक्षात येईलच. जगात गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅन्ले, मेरिल लिंच-बॅंक ऑफ अमेरिका, नोमूरा, क्रिडिट स्विस, बार्कलेज कॅपिटल इत्यादी अनेक इन्व्हेस्टमेन्ट बॅंका आहेत.भारतातही कोटक, आनंद राठी, एडेलवाईज यासारख्या भारतीय इन्व्हेस्टमेन्ट बॅंका आहेत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12002 वाचन

💬 प्रतिसाद (52)

प्रतिक्रिया

छान आणि सोप्या शब्दांत दिलेली

मस्त कलंदर
Fri, 07/20/2012 - 22:24 नवीन
छान आणि सोप्या शब्दांत दिलेली माहिती आवडली!!
  • Log in or register to post comments

अत्यंत सोप्या भाषेत असा विषय

गणामास्तर
Fri, 07/20/2012 - 22:26 नवीन
अत्यंत सोप्या भाषेत असा विषय समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. बर्याच दिवसांपासून पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळाली.. पण फक्त तो Qualified Institutional Placement हा प्रकार तितकासा नीट कळाला नाही.
  • Log in or register to post comments

Qualified Institutional

क्लिंटन
Sun, 07/22/2012 - 10:19 नवीन
Qualified Institutional Placement हा प्रकार तितकासा नीट कळाला नाही.
कंपनीला इक्विटी उभी करायची असेल तर ती शेअर बाजारातून करता येईल.त्याचप्रमाणे आधीच बाजारात लिस्टेड असलेल्या कंपनीला नवी इक्विटी पारत बाजाराच्या मार्गाने न जाता "डायरेक्ट" कोणत्यातरी वित्तीय संस्थेला आपले शेअर विकून उभी करता येते. हा व्यवहार शेअर बाजारामार्फत होत नाही. तरीही हा व्यवहार सेबीच्या परवानगीनेच होतो आणि असे नवे शेअर बाजारात विकण्यावर काही काळाचा लॉक्-इन कालावधी असतो. नक्की किती ते तपासून सांगतो. मध्यंतरी एस्.के.एस मायक्रोफायनान्सने सी.एल्.एस्.ए या वित्तीय संस्थेकडून या मार्गाने इक्विटी उभारली. इतर कंपन्यांनीही वेळोवेळी असे पैसे उभे केले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

डार्क पूल्स

प्रदीप
Sun, 07/22/2012 - 10:46 नवीन
ह्याचा सदर धागाविषयाशी काही संबंध नाही. तेव्हा हे अवांतर आहे. पण
त्याचप्रमाणे आधीच बाजारात लिस्टेड असलेल्या कंपनीला नवी इक्विटी पारत बाजाराच्या मार्गाने न जाता "डायरेक्ट" कोणत्यातरी वित्तीय संस्थेला आपले शेअर विकून उभी करता येते. हा व्यवहार शेअर बाजारामार्फत होत नाही
ह्या उल्लेखावरून डार्क पूल्सची आठवण झाली. शेयर बाजारातील ईलेक्ट्रॉनिक सुविधा वापरून होणार्‍या ट्रेडिंगमधे ब्रोकर्सना, फायनॅन्शियल इंस्टिट्यूशन्सना अत्यंत सजग रहावे लागते. एकाद्या शेयरच्या होत असलेल्या ट्रेडिंगचा पॅटर्न पाहून, काही विशीष्ट अल्गोरिदम्स वापरून इतरांवर कुरघोडी करणारे व्यवहार तक्षणीचघडवून आणता येतात. ह्यामुळे आता अनेक कंपन्या 'डार्क पूल्स'कडे वळत आहेत. हे काही फायनॅन्शियल इन्स्टिट्यूशन्सनी प्रायव्हेट व्यवहारांकरीता निर्मीलेले असतात. आपल्या येथे हे असतात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

माझ्या माहितीप्रमाणे नाही

क्लिंटन
Sun, 07/22/2012 - 10:58 नवीन
आपल्या येथे हे असतात काय?
भारतात डार्क पूल असतात असा संदर्भ माझ्या तरी पाहण्यात आलेला नाही. तरी ज्यांचा पेशा शेअरबाजाराशी संबंधित आहे अशा मिपाकरांना याविषयी माहिती असेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

सामान्यत एका वर्षाचा लाँक इन

जाई.
Mon, 07/23/2012 - 10:32 नवीन
सामान्यत एका वर्षाचा लाँक इन पिरीयड असतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

माझ्या फील्डमधील संकल्पना

जाई.
Fri, 07/20/2012 - 22:42 नवीन
माझ्या फील्डमधील संकल्पना सोप्या शब्दात सांगणार रोचक लेखन आवडलं भारतात LLP ची संकल्पना अगदीच नाही अस नाही माहितीसाठी www.mca.gov.in ही मिनिस्ट्री आँफ काँर्पोरेट अफेअर्सची वेबसाईट पाहा थोडा प्राँब्लेम येईल कारण इंटर्नल एरर गेल्या पाच सहा दिवसापासून येतेय Underwriting या कल्पनेबद्दल थोडा डाऊट आहे माझ्या माहितीप्रमाणे underwriters हे सुरुवातीला सर्व शेअर्स सबस्क्राईब होतील फक्त याची गँरेँटी घेतात शेअर्ससाठी 2.5% डिबेँचर्ससाठी 5% कमिशन घेतात जर शेअर्स सबस्क्राईब झाले नाही तर ते विकत घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते
  • Log in or register to post comments

भारतात LLP नक्किच आहे.. माझी

शैलेन्द्र
Sat, 07/21/2012 - 19:15 नवीन
भारतात LLP नक्किच आहे.. माझी स्वत:ची एक फर्म आहे तशी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.

धन्यवाद

क्लिंटन
Sat, 07/21/2012 - 21:43 नवीन
भारतात LLP ची संकल्पना अगदीच नाही अस नाही माहितीसाठी www.mca.gov.in ही मिनिस्ट्री आँफ काँर्पोरेट अफेअर्सची वेबसाईट पाहा
धन्यवाद जाई आणि शैलेन्द्र. भारतात LLP असतात हे मला माहित नव्हते. ही नवी माहिती कळली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.

लिगल सर्व्हिसेस देण्यार्‍या कंपनीज

भुमन्यु
Wed, 12/04/2013 - 13:53 नवीन
भारतात बर्‍याचश्या लिगल सर्व्हिसेस देण्यार्‍या कंपनीज (LPO) ह्या LLP)तत्वावर चालतात. ईतर क्षेत्रांबद्दल कल्पना नाही. --- रागा ---
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

तपासून बघतो

क्लिंटन
Sat, 07/21/2012 - 22:30 नवीन
Underwriting या कल्पनेबद्दल थोडा डाऊट आहे माझ्या माहितीप्रमाणे underwriters हे सुरुवातीला सर्व शेअर्स सबस्क्राईब होतील फक्त याची गँरेँटी घेतात
इव्हेस्टमेन्ट बँका पूर्ण अंडरराईट करताना शेअर आधी खरेदी करून जास्त भावाने विकतात की पहिल्यांदा केवळ तशी हमी देतात आणि शेअर पूर्ण विकले न गेल्यास न विकले गेलेले शेअर त्यांना विकत घ्यावे लागतात हे परत एकदा तपासून बघतो. जर का लेखातील माहिती परिपूर्ण नसेल तर ती सुधारणे गरजेचे आहेच आणि I will be more than happy to do that.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.

थोडी सुधारणा As per section

जाई.
Sat, 07/21/2012 - 22:39 नवीन
थोडी सुधारणा As per section 76 of companies act,1956 underwriter's commission for 1) shares = 5% 2) debentures = 2.5%
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

अंडरराईटिंग

क्लिंटन
Sat, 07/21/2012 - 22:46 नवीन
आताच Fundamentals of Corporate Finance by Brearley, Myers & Marcus या कॉर्पोरेट फायनान्सवरील नावाजलेल्या पुस्तकात वाचले (पान ५२१, तिसरी आवृत्ती) की अंडरराईटींगमध्ये इन्व्हेस्टमेन्ट बँका कंपनीचे शेअर विकत घेऊन जास्त भावाने विकतात. Image removed. कदाचित अमेरिकेत ही पध्दत असावी आणि भारतातील पध्दत वेगळी असावी. प्रतिसादाबद्दल धन्यवाद जाई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

लेख

प्रदीप
Sun, 07/22/2012 - 09:32 नवीन
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण आहे, आवडला. माझ्या माहितीनुसार अंडररायटींगमधे (अमेरिकेत, तसेच आमच्या येथेही- किंबहुना जगातील सर्वच मोठ्या फायनॅन्शियल सेंटर्सना) इन्वेस्टमेंट बँका (अथवा त्यांचे consortium) सगळे शेयर्स स्वतः प्रथम विकत घेऊन मग ते इतरांना (म्हणजे institutional investors आणि retail investors) ना विकतात असे नाही. शेयर्स IPO असलेल्या कंपनीकडून डायरेक्टच विकले जातात. मात्र, न खपलेले शेयर्स ठरवलेल्या भावात विकत घेण्याची त्यांची जबाबदारी असते. शेयर्सच्या विक्री भावांविषयी तसेच IPO च्या टायमिंगचाही सल्ला इन्वेस्टमेंट बँकेने अथवा त्यांच्या कंसॉर्टियमने, कंपनीस दिलेला असतो, तेव्हा त्यांच्या सल्ल्यानुसार ठरवलेल्या भावा व वेळेनुसार विक्री करण्यास समभाग कंपनीने विकावयास काढल्यावर संपूर्ण विक्री झाली नाही, तर ती जबाबदारी इं. बँकेने स्वीकारावी, असा तर्कवाद ह्यामागे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

टायमिंग

क्लिंटन
Sun, 07/22/2012 - 10:09 नवीन
धन्यवाद प्रदीप. हो इन्व्हेस्टमेन्ट बँकर्स आपल्या कंपनीचे शेअर बाजारात नक्की कधी आणावेत या "टायमिंग" विषयी पण सल्ला देतात.बाजारातील दिवस चांगले नसतील तर बाजारातून कमी पैसे उचलता येतील. तेव्हा जास्तीत जास्त पैसे बाजारातून उचलता येतील अशा पध्दतीने "टायमिंग" करण्यात येते. साधारण मे २००८ पासून भारतातील बाजार कोसळायला लागला आणि मार्च २००९ पर्यंत तो जानेवारी २००८ च्या उंचीपेक्षा तब्बल ६०% ने कमी होता. या काळात भारतात एकही नवीन आय.पी.ओ आला नव्हता.पुढे जुलै २००९ मध्ये अडानी पॉवरचा आय.पी.ओ हा त्या खंडानंतरचा पहिला आय.पी.ओ होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

लई भारी, आयुष्यात कधीतरी

५० फक्त
Fri, 07/20/2012 - 22:47 नवीन
लई भारी, आयुष्यात कधीतरी इन्वेंस्ट्मेंट बँकरची सेवा घ्यावी लागेल असं काहीतरि करावं असं स्वप्न पाहेन आजपासुन.
  • Log in or register to post comments

+१

कुंदन
Sat, 07/21/2012 - 10:44 नवीन
चांगली माहिती दिलीत क्लिंटन ! >>लई भारी, आयुष्यात कधीतरी इन्वेंस्ट्मेंट बँकरची सेवा घ्यावी लागेल असं काहीतरि करावं असं स्वप्न पाहेन आजपासुन. चला आता इथे इन्वेंस्ट्मेंट बँकर शोधणे आले. पतपेढीवाल्याची सेवा परवडत नाय. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

क्लिंटन : लागे रहो..

तर्री
Fri, 07/20/2012 - 23:27 नवीन
अती किचाट विषय -केवळ सोपा करून लिहिला आहे ! अभिनंदन !
  • Log in or register to post comments

धन्यवाद मित्रा !!

अर्धवटराव
Fri, 07/20/2012 - 23:58 नवीन
या अर्थविषयक टर्म्स अगदी सोप्या भाषेत समजावुन सांगितल्यास. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

+१ हेच बोल्तो...

मोदक
Sat, 07/21/2012 - 01:10 नवीन
+१ हेच बोल्तो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

छान

चावटमेला
Sat, 07/21/2012 - 09:03 नवीन
अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत सांगितलेली माहिती आवडली.
  • Log in or register to post comments

सोपी सुटसुटित

मन१
Sat, 07/21/2012 - 10:33 नवीन
सोपी, सुटसुटित माहिती. @५०फक्त लई भारी, आयुष्यात कधीतरी इन्वेंस्ट्मेंट बँकरची सेवा घ्यावी लागेल असं काहीतरि करावं असं स्वप्न पाहेन आजपासुन. +१
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

सुधीर
Sat, 07/21/2012 - 11:31 नवीन
@५०फक्त लई भारी, आयुष्यात कधीतरी इन्वेंस्ट्मेंट बँकरची सेवा घ्यावी लागेल असं काहीतरि करावं असं स्वप्न पाहेन आजपासुन. शुभेच्छा! इन्व्हेस्टमेन्ट बॅंका आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस इन्स्टीट्युशन्स (इन्व्हेस्टमेन्ट बॅंक हा कदाचित यांचा सबसेट असावा) यांच्या बिझनेसमध्ये काही फरक असतो का? बर्‍याच इन्वेस्टमेन्ट बॅंका अंडर-रायटीग बरोबर फंड मॅनेजमेन्ट (म्युचअल, हेज, पेन्शन) करतानाही दिसतात. काही बँकांचे स्वतःचे प्रोप्रायटरी इंडेक्स (अर्थव्यवस्थेवरचे, बाँड रेटीग आणि यिल्ड इ.) कधीकधी वाचनात येतात.
  • Log in or register to post comments

वित्तीय संस्था

क्लिंटन
Sat, 07/21/2012 - 17:45 नवीन
इतर प्रश्नांना उत्तरे नंतर देतो. वित्तीय संस्था म्हणजे नक्की काय? यात म्युच्यअल फंड, वीमा कंपन्या, पेन्शन फंड, हेज फंड, बँका आणि अर्थातच इन्व्हेस्टमेंट बँका यांचा समावेश होतो. या संस्था शेअरबाजारात कमी अधिक प्रमाणात गुंतवणुक करत असतातच. तसेच या संस्था एका प्रकारे लोकांकडून पैसे घेऊन ते बाजारात गुंतवतात. त्यामुळे वित्तीय संस्थांकडून बाजारात लोकांच्या पैशांची अप्रत्यक्षपणे गुंतवणूक होते. इन्व्हेस्टमेंट बँका त्यांच्या "कोअर इन्व्हेस्टमेंट बँकिंग" बरोबरच बाजारातही पैसे गुंतवतात.त्यासाठीचे "ट्रेडिंग डेस्क" स्वतंत्र असतात.आणि ट्रेडिंग करणारी मंडळी इन्व्हेस्टमेन्ट बँकेच्याच अंतर्गत "रिसर्च डिपार्टमेन्ट" च्या रिपोर्टप्रमाणे ट्रेडिंग करतात.तसेच हे रिसर्च रिपोर्ट इन्व्हेस्टमेन्ट बँकेची ब्रोकरेज टिमही वापरते. एकाच इन्व्हेस्टमेंट बँकेच्या इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि ट्रेडिंग डेस्कमध्ये "Conflict of interest" होऊ नये म्हणून इन्व्हेस्टमेन्ट बॅंकिंग टिम नक्की कोणत्या कंपन्यांच्या प्रपोजलवर काम करत आहे याची माहिती रिसर्च टिमला देण्यात येत नाही. (असा "Conflict of interest" कधी उभा राहिल? समजा रिसर्च टिमचे एखाद्या कंपनीविषयीचे मत प्रतिकूल आहे आणि त्या कंपनीचे शेअर विकावे असा सल्ला त्यांना रिपोर्टमध्ये द्यायचा आहे.त्याचवेळी इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग टिम जर त्याच कंपनीचे बाँड/नवे शेअर विकून देत असेल तर असा प्रतिकूल रिपोर्ट येणे म्हणजे त्या कंपनीशी संबंध बिघडविणे असा त्याचा अर्थ होऊ शकेल आणि इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग टिमचा तो बिझनेस हातचा जाऊ शकेल.तसे होऊ नये म्हणून असा प्रतिकूल रिसर्च रिपोर्ट न देण्यासाठी इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग टिमचा रिसर्च टिमवर दबाव येऊ शकेल आणि त्यातूनच रिसर्चची वस्तुनिष्ठता वादात पडेल) अशाप्रकारे इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग आणि रिसर्च टिम एकमेकांपासून विभक्त ठेवण्याच्या व्यवस्थेस "चायनीज वॉल" म्हणतात. चायनीज वॉलचे उल्लंघन होऊ नये म्हणून इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग टिमने पाठविलेल्या ई-मेल वर लक्ष ठेवण्यात येते आणि फोनवरचे संभाषणही रेकॉर्ड केले जाते. इतर मुद्दे नंतर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर

सोप्या भाषेत छान माहिती! लेख

स्वाती२
Sat, 07/21/2012 - 16:40 नवीन
सोप्या भाषेत छान माहिती! लेख आवडला.
  • Log in or register to post comments

धन्यवाद, क्लिंटन!

श्रीरंग
Sat, 07/21/2012 - 17:05 नवीन
धन्यवाद, क्लिंटन! :)
  • Log in or register to post comments

छान लेखन. लेखाशी संबंधित

नाना चेंगट
Sat, 07/21/2012 - 18:36 नवीन
छान लेखन. लेखाशी संबंधित नाही पण एक शंका आहे की बँका त्यांचा असल्या धंद्यातुन मिळणारा नफा कशा पद्धतीने दाखवत असतात?
  • Log in or register to post comments

धन्यवाद

क्लिंटन
Sat, 07/21/2012 - 21:49 नवीन
लेखाशी संबंधित नाही पण एक शंका आहे की बँका त्यांचा असल्या धंद्यातुन मिळणारा नफा कशा पद्धतीने दाखवत असतात?
काही कल्पना नाही बुवा!! पण बँका जाहिरपणे ड्रगवाल्यांना पैसे देतात असे नक्कीच सांगत नसणार :) २००८-०९ मध्ये आलेल्या सबप्राईम क्रायसिसमध्ये इन्व्हेस्टमेन्ट बँका होत्या.पण त्याचा दोष ट्रेडिंग टिमला जातो (सी.डी.ओ, सी.डी.ओ चे सी.डी.ओ आणि अशा प्रकारचे प्रॉडक्ट तयार करून विकणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्या अंडरलाईंग पूलच्या क्वालिटीची पूर्ण खात्री न करताच हे उपद्व्याप करणे) हे प्रकार ट्रेडिंग टिम्सने केले. अर्थात यात इतरांचाही वाटा आहेच-- रेटिंग एजन्सीज वगैरे. कोअर इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग हे अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

सुंदर व महितीपुर्ण लेख.

टिवटिव
Sat, 07/21/2012 - 21:13 नवीन
अत्यंत सुंदर व महितीपुर्ण लेख.
  • Log in or register to post comments

चांगला लेख.

कलंत्री
Sat, 07/21/2012 - 21:55 नवीन
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=323&Itemid=324 आजच लोकसत्तामध्ये अश्याच धर्तीचा लेख वाचला होता. क्लिष्ट असलेले विषय सोप्या पद्धतीने सांगता येतो हे आज दोनदा सिद्ध झाले. मित्रवर्य क्लिंटन यांच्या कडुन आता मात्र माझ्या अपेक्षा वाढलेल्या आहे. त्यांनी आता मिपा आणि एकाद्या वर्तमानपत्रात असे सदर चालावावे आणि त्याची प्रगती एखाद्या पुस्तकापर्यंत पोहोचावी, इन्शाल्ला.
  • Log in or register to post comments

धन्यवाद कलंत्रीकाका

क्लिंटन
Sat, 07/21/2012 - 22:14 नवीन
आता मिपा आणि एकाद्या वर्तमानपत्रात असे सदर चालावावे आणि त्याची प्रगती एखाद्या पुस्तकापर्यंत पोहोचावी, इन्शाल्ला.
धन्यवाद कलंत्रीकाका. किमान २०-२५ भागापर्यंत चालवायचे असे ठरवलेले फायनान्सची तोंडओळख हे सदर सहाव्या भागातच अडकले की!! माझ्या लॅपटॉपची हार्ड डिस्क फॉरमॅट करावी लागली आणि त्यात किमान ५-६ पुढचे लिहून तयार असलेले भाग गेले आणि त्यानंतर माझ्यातल्या धरसोड्याला ते परत लिहायचा महुर्तच सापडला नाही :( ती लेखमाला मला पूर्ण करता आली तरच वर्तमानपत्रात लिहिण्यापर्यंत प्रगती होऊ शकेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री

क्लिष्ट

चिरोटा
Sun, 07/22/2012 - 07:59 नवीन
सोप्या भाषेत क्लिष्ट विषय समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. क्लिंटन ह्यांनी भविष्यात Startup,V.C. Funding अशा विषयावरही लिहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग पेशाविषयी

क्लिंटन
Sun, 07/22/2012 - 11:21 नवीन
सर्वांना त्यांच्या प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद. इन्व्हेस्टमेन्ट बँकिंग पेशात ज्या गोष्टींचा अंतर्भाव असतो त्यात मुख्य म्हणजे शेअरची नक्की किंमत ठरविणे, रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस बनवायला मदत करणे आणि रोड शो करून शेअरची जाहिरात करणे यांचा समावेश होतो. या पेशात जाण्यासाठी गणित आणि अकाऊंटिंग हे विषय पक्के हवेत. आणि अर्थशास्त्राचे पुरेसे ज्ञान हवे (अगदी नवी थिअरी बनविण्याइतके सखोल नसले तरी अर्थव्यवस्थेतील कोणते घटक वेगवेगळ्या इंडस्ट्रीवर कसा परिणाम घडवतील हे व्यवस्थित कळले पाहिजे). हे विषय पक्के असतील तर फायनान्स कळायला वेळ लागणार नाही. आजच्या घडीला निदान भारतात तरी या "कोअर" इन्व्हेस्टमेन्ट बँकिंगमध्ये जायचे असेल तर आय.आय.एम ए,बी किंवा सी ची पदवी असणे जवळपास अत्यावश्यक झाले आहे (याला अपवाद नक्कीच आहेत पण ते कमी). इतकेच नव्हे तर आय.आय.एम मध्ये जाण्यापूर्वी आय.आय.टी जे.ई.ई मध्ये चांगला क्रमांक असणे किंवा सी.ए/ आय.सी.डब्ल्यू.ए.आय यासारख्या परीक्षांमध्ये चांगला क्रमांक असणे किंवा अर्थशास्त्रासाठी नावजलेल्या कॉलेजचे (दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, दिल्लीचे सेंट झिविअर्स/ लेडी श्रीराम कॉलेज किंवा कलकत्त्याचे चे प्रेसिडेन्सी कॉलेज) टॉपर असणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर या पेशात दिवसातून कमीतकमी १६-१८ तास काम असते. हे काम करता येण्याच्या उद्देशाने अशा कंपन्यांना तरूण रक्त हवे असते. (यातील एक सोडून बाकी कोणतीही गोष्ट माझ्याकडे नसल्यामुळे माझा पत्ता आधीच कट झाला :( ) हा पेशा अत्यंत डिमान्डींग असतो आणि या कामात टेन्शनही खूप असते.अर्थात पगार आणि बोनसही प्रचंड असतात. असे म्हणतात की पाण्यात पोहोणारा मासा आपल्याभोवती पाणी आहे हे नोटिस करत नाही.पाणी आहेच असे गृहित धरलेले असते. या पेशात ६-८ वर्षे काम केलेल्याचे तसे पैशाच्या बाबतीत होते. पाहिजे तितका पैसा आहेच हेच गृहित धरले जाते. आणि जर मंदी आली तर नोकरीची अनिश्चिती जास्त प्रमाणात असते हे ही सांगणे न लागे. सध्या मी कॉर्पोरेटमध्ये असलो तरी माझा पिंड शिक्षकाचा आहे.आणि शिक्षण क्षेत्रात आपला एखादा बिझनेस असावा आणि त्यासाठी इन्व्हेस्टमेन्ट बँकर्सची मदत घ्यायची गरज लागावी असे इतर मिपाकरांसारखे मलाही वाटते. कलंत्री काकांच्या भाषेत सांगायचे तर "इन्शाल्ला" तसे व्हावे असे वाटते :)
  • Log in or register to post comments

अनुमोदन.

कलंत्री
Sun, 07/22/2012 - 13:05 नवीन
बर्‍याच वेळेस आपण भविष्याबद्दल विचार करताना सोपेपणाला थारा देत नसतो आणि नंतर बरेच वेळेस हळहळ करत असतो. कधीही छोट्यागोष्टीपासून सुरु करत राहावे, गंगोत्रीपासून गंगासागर निर्माण होत असतोच. क्लिंटन यांना माझा असा सल्ला असेल की त्यांनी दिवसाकाठी काहीतरी लिहायला(च) हवे. भले ते प्रसिद्ध होवो अथवा न होवो. चाकोरीबद्ध अश्या पद्धतीचा म्हणजे वर्तमानपत्रातील सदर याचा स्विकार केला तर वर्तमानपत्राच्या मागणीमुळे लिखाणात बरीच शिस्त येते. त्याच बरोबर नाव आणि प्रसिद्धी ही प्राप्त होते. असे लिखाण बर्‍याच जाणकारांना आणि जिज्ञासूंना प्रभावित आणि प्रेरणादायक करते. ( डायरीही लिहिता येवु शकते). शिक्षण क्षेत्रासी संलग्न असण्यासाठी दुसरे असे एक क्षेत्र असेल की एखादी शिक्षण संस्था निर्माण करणे अर्थातच ती बरीच चिकाटी आणि चिवटपणा पाहणारी पद्धत आहे. ( कोंचिग क्लासेस इत्यादी). माझी खात्री आहे यातून त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्राशी निगडीत राहण्याची संधी नक्कीच मिळेळ. सतत एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्या ती गोष्ट आपोआपच घडताना दिसेलच. पुनश्च शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

मक्तुब!

सुधीर
Sun, 07/22/2012 - 14:48 नवीन
शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन

खुश!

पैसा
Sun, 07/22/2012 - 20:26 नवीन
क्लिंटनचा लेख आरामात वाचायचा म्हणून ठेवून दिला होता, लेख अपेक्षेला पूर्ण उतरला! अगदी सोप्या भाषेत छान माहिती. प्रदीप यांनीही उत्तम भर घातली आहे. मस्त!
  • Log in or register to post comments

+११११११११११११

प्यारे१
Mon, 07/23/2012 - 13:10 नवीन
खूप सोप्या शब्दात माहिती दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

नेहमी

सुमीत भातखंडे
Mon, 07/23/2012 - 10:01 नवीन
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण लेख... तोही अत्यंत सोप्या भाषेत...आवडला
  • Log in or register to post comments

(परदेशात Limited Liability

मृत्युन्जय
Mon, 07/23/2012 - 10:58 नवीन
(परदेशात Limited Liability Partnership पण असतात पण माझ्या माहितीप्रमाणे भारतात तो प्रकार नाही) नाही . आता भारतातही आहेत.
  • Log in or register to post comments

ज्यू

क्लिंटन
Mon, 07/23/2012 - 11:51 नवीन
अमेरिकेत इन्व्हेस्टमेन्ट बँका १९ व्या शतकात सुरू झाल्या. या एकूणच पेशात ज्यू समाजातील व्यक्तींचा वाटा मोठा होता. उदाहरणार्थ गोल्डमन सॅक्सचे संस्थापक मार्कस गोल्डमन आणि सॅम्युएल सॅक्स, मॉर्गन स्टेन्ले चे संस्थापक हॅरी मॉर्गन आणि हॅरॉल्ड स्टॅन्ले, रॉथशील्ड चे संस्थापक इत्यादी अनेक वित्तीय संस्थांचे संस्थापक ज्यू होते. समाजात पैसे कर्जाऊ देणे आणि अन्य प्रकारे पैशाशी खेळणे हे प्रकार करत असलेल्या सावकारांविषयी तसे मत फारसे चांगले नसते. युरोप-अमेरिकेत ज्यू समाजाविषयी मत सामान्यतः चांगले नव्हते (त्याचा हिटलरने फायदा उचलला) याचे हे एक मुख्य कारण आहे.
  • Log in or register to post comments

अत्यंत सोप्या भाषेत असा विषय

अविनाशकुलकर्णी
Mon, 07/23/2012 - 13:16 नवीन
अत्यंत सोप्या भाषेत असा विषय समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

अत्यंत सोप्या भाषेत असा विषय

अविनाशकुलकर्णी
Mon, 07/23/2012 - 13:16 नवीन
अत्यंत सोप्या भाषेत असा विषय समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

तुमच्या शिक्षक पिंडाला दंडवत

टुकुल
Mon, 07/23/2012 - 21:24 नवीन
तुमच्या शिक्षक पिंडाला दंडवत __/\__ किचकट विषय अतिशय सोप्प्या भाषेत सांगणारा तुमचा हा लेख हि आवडला (प्रतिसाद तर नेहमी आवडतातच) . --टुकुल
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Mon, 07/23/2012 - 22:31 नवीन
ओ की ठो माहित नसलेल्या विषयावर अतिशय सोप्या भाषेत लिहिलेला लेख. काही प्रतिसाददेखिल माहितीपूर्ण.
  • Log in or register to post comments

भलतेच काहीतरी.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 12/05/2013 - 12:18 नवीन
ओ की ठो माहित नसलेल्या विषयावर अतिशय सोप्या भाषेत लिहिलेला लेख.
भलतंच काय? क्लिंटन ह्यांना ह्या विषयात ओ की ठो कळत नसतं तर ते एवढ्या तपशिलात लिहू शकले असते का? - ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

छान, आवडेश.कळनेबल माहीती.

ग्रेटथिन्कर
Wed, 12/04/2013 - 18:14 नवीन
छान, आवडेश.कळनेबल माहीती. ब्रिटीश वसाहतींकडे जाणार्या जहाजांवर बोली लावली जायची ,त्यातुनच शेअर बाजाराची संकल्पना उदयास आली.
  • Log in or register to post comments

ब्रिटीश वसाहतींकडे जाणार्या

आदूबाळ
गुरुवार, 12/05/2013 - 12:39 नवीन
ब्रिटीश वसाहतींकडे जाणार्या जहाजांवर बोली लावली जायची ,त्यातुनच शेअर बाजाराची संकल्पना उदयास आली
या बाबत अधिक माहिती जाणून घ्यायला आवडेल. माझा समज असा होता की प्रचंड भांडवल उभं करणं एका माणसाच्या आवाक्यापलिकडचं असल्यामुळे जॉईंट स्टॉक कंपन्या काढल्या गेल्या आणि तो जॉईंट स्टॉक एखाद्या वस्तूसारखा विकत घेता/विकता यावा म्हणून स्टॉक एक्सचेंज निघालं. हा बोली लावण्याचा प्रकार "फॉरवर्ड ट्रेडिंग" सारखा वाटतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

इथे माहिती वाचायला मिळेल.

ग्रेटथिन्कर
गुरुवार, 12/05/2013 - 21:31 नवीन
इथे माहिती वाचायला मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

धन्यवाद!

आदूबाळ
Fri, 12/06/2013 - 01:59 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

खूपच छान लेख

उपाशी बोका
Wed, 12/04/2013 - 20:38 नवीन
धन्यवाद क्लिंटन, खूपच छान लेख लिहिला आहे. इन्व्हेस्टमेन्ट बँकिंगबद्दल अजून माहिती हवी असेल, तर इच्छुकांनी मंकी बिझनेस हे पुस्तक जरूर वाचावे, अशी शिफारस करेन मी. इन्व्हेस्टमेन्ट बँकिंगची काळी बाजू आणि भंपकपणा यात गमतीशीरपणे छान मांडला आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा