✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काल

स
संजय क्षीरसागर यांनी
Mon, 07/16/2012 - 00:10  ·  लेख
लेख
सजगता किंवा अवेअरनेस म्हणजे वास्तव आणि कल्पना यात तारतम्य करण्याची आपली क्षमता (The ability to differentiate between a fact & fiction). आपला अवेअरनेस जितका जास्त तितका जीवनात तणाव कमी, तितकं जगणं सोपं. अस्तित्वात `काल' असं काही नाही, ज्याला आपण वेळ म्हणतो तो निव्वळ `भास' आहे. आपण जर (कल्पनेनं) पृथ्वीच्या सरळ वर आकाशात गेलो आणि पृथ्वी आपल्याला खाली दिसायला लागली तर सूर्य सतत प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होते हे लक्षात येइल. आपल्या सर्वांना हे माहिती देखील आहे पण तो बोध आपण आचरणात आणत नाही. वेळ वस्तुस्थिती मानणं ही आपली केवळ धारणा आहे (जस्ट अ कन्विक्शन) आणि अशा अनेक धारणा आपल्याला आपण बंधनात आहोत असा आभास घडवतात. `काल' या अत्यंत बेसिक धारणेचं निरसन करण्याचा हा प्रयत्न. ____________________ या बोधाला अध्यात्मात काल रहितता (इटर्निटी) म्हटलंय आणि कालरहितता जाणणार्‍याला कालज्जयी (कालावर विजय मिळवणारा) म्हटलय. कालरहितता हा सिद्धत्वाचा गुणविषेश मानला गेलाय आणि कालमुक्तीला असाधारण महत्त्व आहे. इटर्निटी जाणणं हे दीर्घ आणि अथक साधनेचं फलित समजलं गेलय पण तो उलगडा व्हायला खरं तर कोणत्याही साधनेची गरज नाही. ___________________ अस्तित्वात प्रक्रिया, प्रसंग आणि घटना आहेत ही गोष्ट उघड आहे आणि त्यांचा कालावधी मोजण्यासाठी आपण काल हे भासमान परिमाण वापरलय. आपण नेहमी कोणत्याना कोणत्या प्रक्रियेत मग्न असल्यानं कालाचा सतत वापर करतो त्यामुळे काल वास्तविक आहे अशी आपली धारणा झालीये. ______________________ वेळ ही कल्पना म्हणून नितांत उपयोगी गोष्ट आहे. या कल्पनेमुळे माणसाची अनेक प्रकारे सोय झालीये आणि जगणं सुखावह झालंय हे निश्चित पण वेळ ही वास्तविकता आहे असं वाटल्यामुळे मनावर वेळेचं सतत दडपण आहे. वेळ भास आहे हे ज्याला कळतं तो वेळेपासून मुक्त होतो! वेळेपासून मुक्ती आणि वक्तशीरपणा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादी गोष्ट कल्पना आहे असं कळलं की आपण ती वापरू शकतो पण ती खरी आहे असं वाटलं की मग तणाव सुरू होतो. वेळ या कल्पनेतून व्यक्तिमत्त्व निर्माण होतं म्हणजे आपण स्वतःला वक्तशीर किंवा वेंधळे समजायला लागतो किंवा बाकीचे आपल्याला तसं समजायला लागतात; मग प्रत्येक वेळी वेळ गाठताना आपली स्वतः विषयीची प्रतिमा आपल्याला सहजतेनं काम पूर्ण करणं किंवा वेळ गाठणं मुष्किल करते. वेळेच्या बाबतीत असा ताण दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना असतो, वक्तशीर व्यक्तीला स्वतःचा वक्तशीरपणा टिकवायचा असतो आणि वेंधळ्या व्यक्तीला वेंधळेपणा चुकवायचा असतो. वेळ कल्पना आहे अशी पक्की खूणगाठ एकदा मनात बसली की तुमच्या मनावरचं वेळेचं दडपण एकदम नाहीसं होतं, तुमची सृजनशीलता पराकोटीची वाढते, तुम्हाला कोणत्याही प्रसंगात अनेक पर्याय दिसायला लागतात. ________________________ वेळ भास आहे हा तुमचा अनुभव झाला, मनोमन खात्री पटली की दुसरी एक अद्भुत घटना आपसूक घडते: आपण स्वत: `कालाबाधीत' आहोत हे तुमच्या लक्षात येतं, आपण अकाल आहोत! ज्याला काल भास आहे हे कळलं त्याच्यावर कालात घडणार्‍या घटनांचा परिणाम हळूहळू न्यून होऊ लागतो. शरीराची निर्मिती कालात आहे त्यामुळे आपण शरीरापासून वेगळे आहोत. शरीर आहे, आपणही आहोत पण आपण 'शरीर झालेलो' नाही, आपल्याला शरीराची जाणीव आहे. तुम्हाला तुमचं `विदेहत्व' लक्षात येतं आता तुम्हाला हे देखील लक्षात येतं की `वय' शरीराला आहे, आपल्याला नाही, आपण सदैव एकसारखे आहोत, आपल्याला बालपण कळलं, तरुणपण कळलं आणि उत्तररंग देखील कळेल पण आपण जसेच्या तसे राहू! शरीराशी तादात्म्य कमी झाल्यामुळे तुम्ही कमालीचे उत्साही होता. याचा अर्थ शारीरिक क्षमता कमालीची वाढून एखादा इंग्लिश खाडी पोहून जाईल किंवा एकदम मॅरेथॉन जिंकेल असा नाही पण शारीरिक क्षमता आणि तुमचा उत्साह याची गल्लत होणार नाही. असेल त्या शारीरिक क्षमतेनं, शरीराला झेपेल ते काम तुम्ही उत्साहानं करू शकाल. थोडक्यात आपलं वय झालं असं वाटल्यामुळे येणारा निरुत्साह संपूर्णपणे नाहीसा होईल कारण आपल्याला वय नाही! वेळ ही कल्पना आहे हा बोध आपल्याला चिरतरुण करतो, शारीरिक वयाचा आपल्यावर चित्तस्थितीवर परिणाम होत नाही. _______________________ वेळ हा भास आहे हे ज्यानं जाणलं त्याला हे देखील कळतं की वेळेत घडणार्‍या प्रत्येक घटनेपेक्षा आपण वेगळे आहोत, त्यामुळे प्रसंग हाताळण्याची त्याची क्षमता कमालीची वाढते. प्रसंगात न सापडता आपण प्रसंग हाताळू शकतो, साक्षी या आध्यात्मिक शब्दाचा नेमका अर्थ तो आहे. वेळेपासून जेवढे आपण मुक्त तितके जाणीवेशी संलग्न होत जातो, म्हणजे किती वाजले? जेवायची वेळ झाली, यापेक्षा भूक लागली की जेवण असं सरळ, साधं, नैसर्गिक जगणं सुरू होतं. जाणीवेनं जगणं किती सुखाचं आहे हे कळायला थोडा वेळ जावा लागतो पण एकदा त्यातली सहजता कळली की मग अनायासे आपण अस्तित्वाशी एकरूप होत जातो. नुसत्या सूर्यप्रकाशावरनं आपल्याला केव्हा जेवावं, केव्हा फिरायला जावं, केव्हा झोपावं आणि कधी उठावं ते कळायला लागतं! जाणीव एकदम प्रगल्भ व्हायला लागते. ____________________ कालरहितता कळणं तुम्हाला `अवकाश' किंवा `स्पेस' या परिमाणाला उपलब्ध करतं. अवकाश हे स्वास्थ्याचं निधान आहे, वेळेमुळे ताण आहे, अवकाशाशी संलग्न होणं तुम्हाला स्वस्थ करतं. अवकाश हे अस्तित्वातलं सर्वात रहस्यमय परिमाण आहे, एका अर्थानं ते सर्वत्र आहे आणि दुसर्‍या अर्थानं ते इतकं अपरंपार आहे, इतकं सर्वव्यापी आहे की नक्की कुठेय ते दर्शवता येत नाही. टाईम फ्रस्टेट करणारा अवकाश परिमाणाला उपलब्ध होतो असं म्हणणं ही तितकंस योग्य नाही, तो स्वत:च अवकाश होतो, कमालीचा निवांत होतो, या निवांतपणाला अध्यात्मात समाधी म्हटलय! _____________________ पैसा निदान कल्पना तरी आहे पण काल तर निव्वळ भास आहे, अर्थात हे तुम्हाला जरी पटलं तरी इतरांना लगेच पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. हा विषय वादाचा नाही, बोधाचा आहे. तुम्ही लगेच त्यावर मानसिक उहापोह करु नका त्या उलगड्यात काही काळ जगा, कालरहिततेचं वेळीअवेळी स्मरण करत तीचा निवांतपणा, त्या बोधातून येणारं स्वास्थ्य उपभोगा. जेव्हा तुम्ही या बोधातून काही दिवस जगाल तशी तुमच्या जगण्यात, हालचालीत सहजता यायला लागेल. ओशोंचं एक अप्रतिम वाक्य आहे, ते म्हणतात : समझ आचरणमें बदल जाती है! जेव्हा हा बोध तुमच्या आचरणात येईल तेव्हा मग तुम्हीही दुसर्‍याला एकदम बिनधास्तपणे सांगू शकाल की `अरे, वेळ हा निव्वळ भास आहे! ' आणि मग ते त्याला पटो न पटो तुम्हाला काहीही फरक पडणार नाही कारण तो तुमचा अनुभव झालेला असेल!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
41248 वाचन

💬 प्रतिसाद (127)

प्रतिक्रिया

२ दा वाचलं...

अर्धवटराव
Mon, 07/16/2012 - 00:55 नवीन
आणखी काहि वेळा शांतपणे वाचावं लागेल. अवांतर : "पैसा" लेख जर या लेखानंतर आला असता तर त्यावर फार वेगळ्या पर्स्पेक्टीव्ह ने चर्चा झाली असती बहुतेक. हे दोन्ही लेख समांतर वाटताहेत. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

हा हा हा

रामपुरी
Mon, 07/16/2012 - 03:53 नवीन
मनोरंजक!!!
  • Log in or register to post comments

सध्या छान लिहिलय,इतकच

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/16/2012 - 08:36 नवीन
सध्या छान लिहिलय,इतकच म्हणतो. नंतर निवांत वाचुन प्रतिक्रीया देणेत येइल.
  • Log in or register to post comments

डु का टा आ

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/16/2012 - 08:40 नवीन
डु का टा आ
  • Log in or register to post comments

शरीराची निर्मिती कालात आहे

नगरीनिरंजन
Mon, 07/16/2012 - 08:50 नवीन
शरीराची निर्मिती कालात आहे त्यामुळे आपण शरीरापासून वेगळे आहोत. शरीर आहे, आपणही आहोत पण आपण 'शरीर झालेलो' नाही, आपल्याला शरीराची जाणीव आहे. तुम्हाला तुमचं `विदेहत्व' लक्षात येतं
काळ हा जसा भास आहे तसाच "आपण शरीरापासून वेगळे आहोत" हाही एक भासच आहे.
  • Log in or register to post comments

>"आपण शरीरापासून वेगळे आहोत" हाही एक भासच आहे

संजय क्षीरसागर
Mon, 07/16/2012 - 11:24 नवीन
प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, मी शब्दालाशब्द जोडून उगीच शब्दविभ्रम करत नाहीये तर एक तथ्य तुमच्यासमोर मांडतोय. शब्दाशिवाय अभिव्यक्तीला पर्याय नसला तरी प्रयत्न अर्थ पोहोचवण्याचा आहे. भास होण्यासाठी किमान एक गोष्ट तरी वास्तविक हवी; या विषयाच्या संदर्भात `आपण' वास्तविकता आहोत, `मी नाही' असं आपण म्हणू शकत नाही. दुसरी गोष्ट, शरीर देखील वास्तविक आहे नाही तर मग लिहिणार कश्यानं? त्यामुळे आपण आणि शरीर या दोन्ही वास्तविकता आहेत. `भास' चा अर्थ आपल्याला आपण शरीर आहोत असं वाटणं आहे कारण आपण शरीर असतो तर आपल्याला शरीराची जाणीव कशी झाली असती? एखाद्या गोष्टीची जाणीव व्हायला ती आपल्यापेक्षा `अन्य' हवी. वेळ खरी वाटण्याच कारण त्या `भासाचा' सतत केला गेलेला `वापर' आहे तसं आपण शरीर आहोत असं वाटण्याच कारण `भाषा' आहे. शरीर चालतं आणि आपल्याला कळतं पण आपण डायरेक्ट `मी आलो' `मी येतो' `मी निघालो' असं म्हणतो. अर्थात, शरीर या माझ्या आधीच्या लेखावर ही चर्चा समर्पक ठरली असती पण काही हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

वाद घालायचा म्हणून नाही, पण

नगरीनिरंजन
Tue, 07/17/2012 - 10:15 नवीन
वाद घालायचा म्हणून नाही, पण खरोखर मला नीट पटत नाहीय म्हणून लिहीतोय. त्या धाग्यावर समर्पक झाली असती खरी पण इथे केली चर्चा तरी काही बिघडत नाही असे वाटते. तर,
एखाद्या गोष्टीची जाणीव व्हायला ती आपल्यापेक्षा `अन्य' हवी.
हा नियम कसा ठरला? या नियमात एक पॅराडॉक्स आहे. जर एखाद्या गोष्टीची जाणिव व्हायला ती आपल्यापेक्षा अन्य हवी तर 'आपण' आपण आहोत हे कधीच जाणवायला नको. म्हणजे शरीर आपल्याला जाणवतंय म्हणून आपण वेगळे आहोत ही अप्रत्यक्ष सिद्धता झाली, निरपेक्षपणे आपण आहोत हे यातून सिद्ध होत नाही. याचाच दुसरा अर्थ असा की आपण शरीर नाही हे जाणवण्यासाठी शरीर असणे आवश्यक ठरते. म्हणूनच आपण शरीर आहोत हा भास नसून शरीरापेक्षा वेगळे काहीतरी आहे हा भास आहे. शरीर जाणवते कारण हाताची प्रतिमा डोळे मेंदूकडे पाठवू शकतात, हाताने डोळ्यांना स्पर्श करून त्याची संवेदना मेंदूकडे जाते म्हणून आपल्याला डोळे जाणवतात. मेंदूला मेंदू जाणवत नाही कारण मेंदूला स्पर्शज्ञान नाही किंवा स्वतःची प्रतिमा त्यावर पडत नाही. जर डोक्यात कॅमेरा घातला तर टीव्हीवर मेंदू दिसेल (म्हणजे मेंदूवर मेंदूचीच प्रतिमा उमटेल) याचा अर्थ टीव्हीतला मेंदू 'अन्य' आहे असा होत नाही. सगळ्या संवेदना मिळून मेंदूत असा एकसंध भास तयार होतो की शरीराच्या आवरणातून 'मी' नावाचे कोणीतरी वावरत आहे. शरीर वास्तविकता आहे आणि 'मी ' हा भास आहे. जर 'मी' ही वास्तविकता असती तर शरीर नष्ट झाल्यावरही ती उरली असती. तसे होत नाही, पण त्याउलट मात्र होते. मी यावर विचार करत असताना एक कल्पना केली. समजा, AI आणि Robotics मध्ये जे दावे केले जातात ते खरे ठरले आणि काही वर्षांनी माणसाइतका बुद्धिमान आणि माणसासारखा अनुभवातून शिकणारा यंत्रमानव आपण तयार केला तर त्या यंत्रमानवाचे शरीर आणि तो या दोन वेगळ्या गोष्टी असतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

सुरेख प्रतिसाद! >'आपण' आपण आहोत हे कधीच जाणवायला नको.

संजय क्षीरसागर
Tue, 07/17/2012 - 10:42 नवीन
येस! हीच तर सिद्धावस्था आहे, मी शून्य आहे, मी नाही किंवा मी पूर्ण आहे ही सगळी विधानं `आपल्याला आपण न जाणवणं' या अत्यंत तरल स्थिती चं वर्णन आहे. आपण निराकार आणि सार्वभौम किंवा सर्वत्र आणि सदैव आहोत हा उलगडा म्हणजे साक्षात्कार पण इतक्या चटकन तुम्हाला ते मंजूर होणार नाही. एकेका धारणेचं निराकरण करावं लागेल, वेळ वस्तुस्थिती नसून भास आहे ही एक महत्त्वाची धारणा आहे, ती या लेखात उलगडतोय. आपण विदेह आहोत या धारणेविषयीची चर्चा `शरीर' या लेखात घडवण्याचा प्रयत्न होता. श्वास आणि पैसा यात `श्वासानं जीवन चाललंय, पैसा दुय्यम आहे', हे `पैसा'मधे सांगण्याचा प्रयत्न होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

"साक्षात्कार" म्हणजे काय...

चित्रगुप्त
Tue, 07/17/2012 - 12:55 नवीन
....आपण निराकार आणि सार्वभौम किंवा सर्वत्र आणि सदैव आहोत हा उलगडा म्हणजे साक्षात्कार .... .... हे अमूक एका विशिष्ट व्यक्तीचे, अमूक एका विशिष्ट वेळी झालेले मत होय. कालानुसार हे मत बदलू शकते, तसेच अन्य व्यक्तींचे "साक्षात्कार" म्हणजे काय, याविषयी अगदी वेगळे मत असेल, तेही कालानुसार बदलू शकेल... तुम्हाला कोण्/काय सेक्सी वाटते" या धाग्यात अनेकांनी त्यांना-त्यांना सेक्सी वाटणार्‍या गोष्टी सांगितल्या, त्यातील अमूकच खरे, असे म्हणता येणार नाही, तद्वतच "साक्षात्कार" म्हणजे अमूकच, असे म्हणता येणार नाही. हीच गोष्ट "मोक्ष" "निर्वाण" "प्रेम" "कर्तव्य" "सौंदर्य" "परमेश्वर".... अश्या शेकडो गोष्टींविषयी. साक्षात्कार म्हणजे जे काही आहे असे मला आज वाटत आहे, ते "आपण निराकार आणि सार्वभौम किंवा सर्वत्र आणि सदैव आहोत हा उलगडा " या पेक्षा अगदी वेगळे आहे. परंतु तेच सत्य असा आग्रह मी धरत नाही, आणि ते काय हे सांगण्याच्या भानगडीतही पडत नाही. ज्याचे त्याने ठरवावे. आणि न ठरवले, तरी काहीच बिघडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मी काय म्हणतो, `कालशून्यता हा सिद्धत्वाचा गुणविषेश आहे'

संजय क्षीरसागर
Tue, 07/17/2012 - 13:20 नवीन
काल न जाणवणं हे साक्षात्काराचं एक लक्षण आहे. मी साक्षात्कार म्हणजे काय हे त्या अंगानं `(सतत जाणवणारी तरलता किंवा आपण आहोत ही जाणीव शून्य होणं किंवा केवळ आपणच आहोत याचं दर्शन होणं ) लिहिलय. आपलं असणं हे निरपेक्ष सत्य आहे त्याला कोणत्याही पुराव्याची गरज नाही या दृष्टीनं लिहिलय. हा लेख साक्षात्काराच्या विविध अंगाचा उहापोह (सत्य, शिवं, सौंदर्य, चिदानंद) वगैरे करत नाही. मी फक्त `काल भास आहे' हे सांगतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

तुम्ही खुबीने मुद्दा टाळलात

नगरीनिरंजन
गुरुवार, 07/19/2012 - 09:20 नवीन
तुम्ही खुबीने मुद्दा टाळलात असेच म्हणावे लागेल. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आपलं असणं याला काय पुराव्याची गरज आहे?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 07/19/2012 - 11:21 नवीन
ती गोष्ट कशा सापेक्ष आहे असं तुम्हाला वाटतं, मुद्दा कुठे टाळलाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

तुम्ही म्हणालात शरीर जाणवते

नगरीनिरंजन
गुरुवार, 07/19/2012 - 12:19 नवीन
तुम्ही म्हणालात शरीर जाणवते म्हणून आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत. ही सापेक्ष सिद्धता नाही काय? मग शरीराशिवाय (शरीर नष्ट झाल्यावर) आपण आहोत हे कसे सिद्ध होईल? नसेल होणार तर आपण म्हणजेच शरीर हे आपोआप सिद्ध होते. शरीर नसेल तर आपलं असणं याला नक्कीच इतर पुराव्याची गरज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुमच्या एक लक्षात येतय का?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 07/19/2012 - 20:29 नवीन
आपल्याला अनेक गोष्टी जाणवतायत (शरीर जाणवतय, विचार जाणवतायत, शरीरामुळे ध्वनी, दृष्य, स्पर्श, गंध जाणवतायत) पण या सर्वात `आपण' कॉमन आहोत. जरी सर्व गोष्टी मेंदूमार्फत डिकोड होत असल्या तरी ज्याला त्या जाणवतायत ते `आपण' आहोत. हे `आपलं असणं', हा `अनुभवणार्‍याचा शोध' अध्यात्म आहे; ज्या क्षणी तुम्हाला कळेल की हा अनुभवणारा एक आहे त्या क्षणी तुम्हाला लक्षात येईल की तो निरपेक्षपणे सिद्ध आहे किंवा तो इतका उघड आहे की त्याला स्वतःला सिद्ध करायची आवश्यकताच नाही मग तुम्हाला हे देखील कळेल की तो आणि आपण वेगळे नाही, याला सिद्धत्व म्हटलय. ज्या क्षणी तुम्ही सिद्ध होता त्या क्षणी तुम्हाला कळतं की आपल्या अनुभवावर कुणाच्या शिक्कामोर्तबाची गरज नाही कारण तुमचा अनुभव कशाही सापेक्ष नसतो. मी उत्तर अत्यंत प्रामाणिकपणे दिलय, तुमच्या लक्षात येईल न येईल कल्पना नाही पण हे उत्तर जतन करा तुम्हाला उपयोगी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

धन्यवाद

नगरीनिरंजन
Fri, 07/20/2012 - 09:14 नवीन
माझ्या लक्षात येईल असे वाटत नाही. मी तुमच्या विरूद्ध बाजूच्या टोकावर उभा आहे असे दिसतेय. पृथ्वीपासून दूर जाऊन काळ वगैरे सगळं भास आहे हे दिसतही असेल कदाचित किंवा वाळूच्या एका कणासारखी पृथ्वी दिसत असेलही कदाचित पण तसं मी कधीच बघणार नाहीय. आयुष्य क्षणभंगुर आहे हे माहित असूनही एक खेळ म्हणून मला ते खेळायचंय, त्यातले सुख-दु:ख, ताण-तणाव सगळ्याचेच नियम पाळून आणि त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन. त्यामुळे शरीर म्हणजेच मी एवढे अध्यात्म मला सध्या पुरेसे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ननि... फार सुंदर बोललास..

गवि
Fri, 07/20/2012 - 09:42 नवीन
ननि... फार सुंदर बोललास.. शेवटची वाक्यं म्हणजे बुल्स आय. स्टीफन हॉकिंग्जच्या द ग्रँड डिझाईन या थरारक पुस्तकात त्याने जगाच्या अस्तित्वाविषयी जे काही विचार मांडले आहेत ते मुळापासून वाचण्यासारखे आहेत. ग्लास बाऊलमधल्या गोल्डफिशला बाहेरचं जग अत्यंत डिस्टॉर्टेड, मेग्निफाईड आणि भलतंच दिसतं. त्याचा तोच पर्स्पेक्टिव्ह आहे. त्याने त्या आभासाशी जुळवून घेतलं आहे. आपणही गोल्डफिश आहोत आणि आपल्याला जे भासतं (काळ म्हणा किंवा स्पेस म्हणा किंवा आणि काही मसण म्हणा) ते आपल्याला भासतं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि जरी गोल्डफिशने हे परसेप्शन आहे, भास आहे आणि बाऊलबाहेर खरं जग आहे किंवा नाही इत्यादि तात्विक शक्यता कितीही चर्वण केल्या तरी बाऊलमधून जे दिसतंय त्याला खरं मानून जगण्याखेरीज गोल्डफिशला दुसरा ऑप्शनही नाहीये.. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

गोल्डफिशसमोर ऑप्शन आहे ना...

अर्धवटराव
Fri, 07/20/2012 - 09:50 नवीन
आपण गोल्डफिश आहोत हा एक भास आहे असं त्याने स्वतःला पटवुन दिले म्हणजे झाले ;) पण यात एकच गोची आहे... हा सारा युक्तीवाद त्याने पाण्यात राहुनच करावा आणि बगळे, मांजरी वगैरे समोर करु नये... हि मंडळी त्याला तु नेमका कोण आहेस वगैरे प्रश्न विचारणार नाहित... सरळ गट्टम करतील. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि, स्टिफनचं म्हणणं मान्य करुन तुम्ही जगा, आनंद आहे

संजय क्षीरसागर
Fri, 07/20/2012 - 12:29 नवीन
कारण आता ही चर्चा आकार आणि निराकार या डायमेन्शनला जाईल म्हणून इथे थांबतो पण जाताजाता संदीप खरेच्या या ओळी पाहा: मी जुनाट दारापरि किरकिरा बंदी तो सताड उघड्या खिडकीपरि स्वच्छंदी मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो तो लंघून चौकट पार निघाया बघतो तुम्ही शरीरच अंतीम मानून जगा, तो तुमचा ऑप्शन आहे पण ही चौकट लंघून पार निघण्याचं साहस करणारेही आहेत याची जाणीव असू द्या, काही प्रॉब्लम नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

क्लास्सिक

मन१
Sat, 08/11/2012 - 22:16 नवीन
आयुष्य क्षणभंगुर आहे हे माहित असूनही एक खेळ म्हणून मला ते खेळायचंय, त्यातले सुख-दु:ख, ताण-तणाव सगळ्याचेच नियम पाळून आणि त्यात इन्व्हॉल्व्ह होऊन. त्यामुळे शरीर म्हणजेच मी एवढे अध्यात्म मला सध्या पुरेसे आहे. ह्या दोन ओळिंसठी धाग्यावर येणं सार्थक झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

अगदी अगदी.. +१०००००००

शैलेन्द्र
Sun, 08/12/2012 - 00:42 नवीन
अगदी अगदी.. +१०००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

एक ओबड धोबड थेअरी :)

अर्धवटराव
Tue, 07/17/2012 - 11:10 नवीन
"आपण शरीर नाहि" या प्रमेयाला "कर्मस्वातंत्र्याची धारणा" हे एक एक्स्प्लेनेशन असु शकतं. शरीर म्हणजे काहि रसायनांचा गलबला. हा गलबला भौतीक शास्त्राच्या नियमांनी चालतो. पदार्थाला कंट्रोल करणारे भौतीक शास्त्राचे सर्व नियम स्थल /काल सापेक्ष्य आहेत, म्हणजे ते नियम स्थळ आणि काळ या परिमाणांतुन डिफाईन केले जातात.( अशी मतं ठोकुन द्यायला काय मजा वाटते...व्व्वा ) S = f(s, t) where S is the state of system, s is space and t is time. function f() नुसार आपल्याला आपल्या कुठल्याहे स्थितीचे स्थळ/काळानुसार १००% अचुक वर्णन करता येईल कारण आपली स्थिती function f() च्या बाहेर असुच शकत नाहि. (बोंबला... म्हणजे ज्योतीषशास्त्र आलं). थोडक्यात काय, तर "मी माझ्या कर्माने माझं भविष्य घडवील" या दाव्याला कुठलाही आधार राहाणार नाहि... पण जर आपलं भविष्य आपण "ठरवु" शकतो, ते प्रिडिफाइन्ड / लादलेलं नाहि असं आपल्याला वाटत असेल, तर हे "कर्म करण्याची" शक्ती असणारा function f() च्या बाहेरचा असल्यावाचुन पर्याय नाहि, म्हणजे हा कर्म करणारा स्थळ/काळ अबाधीत आहे (ही आत्म्याची व्याख्या आहे). भौतीक शास्त्रात हाच सिद्धंत The Will Factor Of Universe अशा काहिश्या नावाने अभ्यासला जातो ( आपली मतं ठोकुन द्यायची... संदर्भ वगैरे तसही फारसं मनावर घेऊ नये शहाण्या माणसाने ;) ) कृत्रीम बुद्धीमत्तेला कितीही विकसीत केले तरी शेवटी ते अल्गोरिदम आहेत... आणि शेवटी "अगणीत शक्यतांमधुन एक शक्यता उचलणे" या पलिकडे ते काहि करु शकणार नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

ठोकाठोकी

नगरीनिरंजन
Wed, 07/18/2012 - 11:19 नवीन
ठोकाठोकी मजेशीर आहे. त्या फंक्शनमध्ये प्रोबॅबिलिटी असते आणि कोणत्या घटकाला किती प्रोबॅबिलिटी लावायची हे आधी कळत नाही (असे मी ही ठोकून देतो.)
कृत्रीम बुद्धीमत्तेला कितीही विकसीत केले तरी शेवटी ते अल्गोरिदम आहेत... आणि शेवटी "अगणीत शक्यतांमधुन एक शक्यता उचलणे" या पलिकडे ते काहि करु शकणार नाहि.
आपले विचार हे अल्गोरिदम्स नाहीत? आपला मेंदूही अल्गोरिदम्स चालवतो आणि भिन्न पातळ्यांवर भिन्न अलगोरिदम्स चालवतो (म्हणजे एका अलगोरिदमचे मूल्यमापन करणारे दुसरे अल्गोरिदम वेगळ्या पातळीवर). अशी भिन्न पातळ्यांची बुद्धिमत्ता तयार करण्यावर संशोधन चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

गोडेल, इशर, बाख या पुस्तकात

बॅटमॅन
Wed, 07/18/2012 - 11:34 नवीन
गोडेल, इशर, बाख या पुस्तकात डग्लस हॉफस्टॅडटर तर फूल्ड बाय रँडमनेस या पुस्तकात तालेब (विशेषतः ४था चॅप्टर) याबद्दल डिस्कशन करतो. हॉफस्टॅडटरचे विवेचन खतरनाक आहे. तालेब पण रोचक कैतरी बोलतो, पण जरा कन्फ्यूजिंग आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

अल्गोरिदम तर आहेच !!

अर्धवटराव
Wed, 07/18/2012 - 20:31 नवीन
पण "फ्री वील" हा डिसायडींग "लाईफ" फॅक्टर आहे... अर्थात ते तसच आहे हा ही वादाचा विषय आहे. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

मजा सांगतो. फ्री विल हा

बॅटमॅन
Wed, 07/18/2012 - 21:44 नवीन
मजा सांगतो. फ्री विल हा डिसायडिंग लाईफ फॅक्टर नसून, इलेक्ट्रॉनसारख्या कणांमध्येदेखील फ्री विल असते, असे जॉन हॉर्टन कॉनवे या प्रथितयश गणितीने सिद्ध केले आहे. त्याचे नाव आहे फ्री विल थिओरम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

हा थेरम लिमेटेड आहे !!

अर्धवटराव
Wed, 07/18/2012 - 21:51 नवीन
fin, spin, twin ला जेंव्हा f() मध्ये बसवलं जाईल तेंव्हा त्यात फ्री वील राहाणार नाहि. पण त्या करता काळाची फार सुक्ष्म परिमाणं तयार करावी लागतील. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मान्य की. पण स्ट्राँग फ्री

बॅटमॅन
Wed, 07/18/2012 - 22:11 नवीन
मान्य की. पण स्ट्राँग फ्री विल थिओरम देखील आहेच ना. अर्थात काही अ‍ॅजम्प्शन्स तिथेही आहेतच म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

त्याचं कसं आहे...

अर्धवटराव
Wed, 07/18/2012 - 22:29 नवीन
हो, आहे... पण सध्यातरी भौतीकशास्त्र S, T कक्षेच्या संपूर्णपणे बाहेर असं काहिही मांडु शकलं नाहि. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष S, T येतातच येतात. याचं कारण असं, कि शेवटी सर्वकाहि उर्जेच्या रूपपरिवर्तनाच्या अंगाने मांडावं लागतं... आणि परिवर्तनाला S, T शिवाय पर्याय नाहि. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

भौतिकशास्त्र हे स्पेस व

बॅटमॅन
Wed, 07/18/2012 - 23:12 नवीन
भौतिकशास्त्र हे स्पेस व टाईमच्या कक्षेबाहेर न जाता देखील अशा काड्या करू शकते हेही नसे थोडके :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

हा हा हा

अर्धवटराव
Wed, 07/18/2012 - 23:19 नवीन
पर्यटन म्हणुन ठीक आहे, अदरवाईज उगाच टाईम आणि स्पेस च्या बाहेर जावच कश्याला म्हणतो मी ;) अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दर बिग बँग च्या वेळी हे

बॅटमॅन
गुरुवार, 07/19/2012 - 01:32 नवीन
दर बिग बँग च्या वेळी हे करावंच लागतं तसंही ;) परसोकीच बात बोलरा रे भाई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

सुंदर, मननीय लेख.

चित्रगुप्त
Mon, 07/16/2012 - 10:09 नवीन
... किती वाजले? जेवायची वेळ झाली, यापेक्षा भूक लागली की जेवण असं सरळ, साधं, नैसर्गिक जगणं सुरू होतं... 'ब्रम्हचर्य' याचा वस्तुतः हाच अर्थ आहे. ब्रम्हाला (वा निसर्ग म्हणा हवं तर) अनुकूल असे आचरण. सूर्य मावळला, की अन्य जीव झोपी जाऊ लागतात, मनुष्य मात्र करमणुकीच्या नावाखाली मध्यरात्रीपर्यंत जागतो, परिणामी 'ब्रम्ह-मुहुर्तावर' आपसूकच उठण्या ऐवजी गजर लावून, चडफडत कामावर जायलाच हवे म्हणून उठतो. सुट्टीच्या दिवशी दहा-अकरापर्यंत झोपणारी तरूण मंडळी बघून मला तर सखेद आश्चर्य वाटते. आम्ही नेहमी पहाटे चार वाजता आपोआप उठून शहराबाहेर सायकलने निसर्ग-चित्रणासाठी जायचो, त्यात कोणताही नाइलाज नव्हता, तर निव्वळ आंतरिक ऊर्मीने जगणे होते. 'ब्रम्हचर्य' या शब्दाचा असा साधा सोपा अर्थ विलयास जाऊन 'काम-निषेध' असा अर्थ कुणी, केंव्हा आणि का प्रचलित केला, कुणास ठाऊक. मागे एकदा एका जैन मंदिरात महावीरांची काही वचने आणि त्याखाली त्यांचा अतिशय विपर्यास केलेला अर्थ दिलेला बघितले होते. कृष्ण, पतंजली, बुद्ध, महावीर, येशू, महंमद आदि सर्वांच्या उपदेशाचा अतिशय चुकीचा अर्थ प्रचलित केला गेलेला दिसतो. 'ओशो' हा शब्द उच्चारणे म्हणजे सुद्धा जणू पाप वा मूर्खपणा, असा एक अतिशय आचरट प्रचार अजून सुद्धा केला जातो. वस्तुतः ओशोंनी जगभरातल्या या सर्व महामानवांच्या वचनांचा वास्तविक आणि आजच्या मानवाला कळेल, रुचेल, पचेल, आणि उपयोगी पडेल, असा अर्थ उलगडून सांगितलेला आहे. याचा अनुभव ज्याचा त्याने घेऊन बघावा. बाकी त्यांच्याकडे किती गाड्या वा घड्याळे होती, अमेरिका का सोडावे लागले, वगैरे चर्चेत अडकणे निष्फळ कालापव्यय आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

संजय क्षीरसागर
Mon, 07/16/2012 - 11:55 नवीन
ब्रह्मचर्य म्हणजे कामसंयम नाही हे नक्की पण त्याचा अर्थ आणखी गहन आहे; ब्रह्मचर्य म्हणजे आपणच सत्य आहोत असं जगणं, तसं आचरण. तो वेगळा चर्चा विषय होईल, सध्या फक्त `काल भास आहे' या अनुरोधानं चर्चा चालू रहावी म्हणून अधिक लिहित नाही. याच अनुषंगानं आणखी एक सांगावसं वाटतं की ओशोंचे काही क्वोटस माझ्या लेखनात आले तरी मी ओशोंना सरकट समर्थन देत नाही, माझं आकलन मी माझ्या पद्धतीनं मांडतो त्यामुळे त्यांच्या संबधित विधाना व्यतीरिक्त इतर विधानांचं स्पष्टीकरण देण्याची जवाबदारी माझी नाही. विषय लाईनवर रहावा म्हणून खुलासा केलाय, प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

काहीही कळले नाही !

विटेकर
Tue, 07/17/2012 - 09:21 नवीन
अध्यात्म खरोखरच एवढं जडं जडं आणि अवघड आहे का?
  • Log in or register to post comments

+१. शब्द शब्द शष्प शब्द....

प्यारे१
Tue, 07/17/2012 - 09:58 नवीन
+१. शब्द शब्द शष्प शब्द.... ए क अ क्ष र क ळे ल त र श प थ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

मग ते सोपं करुन सांगा ना...

अर्धवटराव
Tue, 07/17/2012 - 10:01 नवीन
काहि कळले नाहि या विधानाशी बराचसा सहमत. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

>>यापेक्षा भूक लागली की जेवण

अर्धवट
Tue, 07/17/2012 - 09:48 नवीन
>>यापेक्षा भूक लागली की जेवण असं सरळ, साधं, नैसर्गिक जगणं सुरू होतं. हे जरा अवघडच आहे ब्वॉ. असं सगळं नैसर्गिकच जगणं सुरू झालं तर अवघडच की. सगळ्या लेखात असं बरंच कायकाय फालतू आणि शेंडाबुडखा नसलेलं दाखवता येइल पण सध्या असोच.
  • Log in or register to post comments

आयला...

अर्धवटराव
Tue, 07/17/2012 - 09:59 नवीन
आता आमच्या अर्धवटपणावर देखील शंका यायला लागली आहे... मला तर हे नैसर्गीक जगण्याची कल्पना फार इण्टरेस्टींग वाटत होती .. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

एक प्रश्न...

अर्धवटराव
Tue, 07/17/2012 - 10:04 नवीन
काळ फक्त प्रक्रिया, घटना वगैरेचा कालावधी मोजायचा एकक नाहि. जर प्रक्रिया सत्य आहे तर प्रक्रियेची गाडी इर्रिव्हर्सेबली काळाच्या रुळावरुन धावतेय. मग काळ भासमान कसा? अर्धवटराव
  • Log in or register to post comments

काल ही वस्तुस्थिती नसून भास आहे

संजय क्षीरसागर
Tue, 07/17/2012 - 10:09 नवीन
पण आपण ती अनंत कालापासून वस्तुस्थिती मानत आलोय त्यामुळे आपल्याला आपण कालबद्ध आहोत असं वाटतंय इतकंच माझं म्हणणय, यात न समजेलस किंवा इल्लॉजिकल काय आहे? आपल्याला वेळ बघून जेवायची सवय झालीये त्यामुळे भूकेनं जेवणाची मजा काय आहे हे वेळेची भासमानता संपूर्ण अंगीकारल्याशिवाय कसं समजेल?( एखादे वेळी ट्रिपला ती मजा तुम्ही अनुभवली असेल) बोध आचरणात आणल्याशिवाय निष्कर्श कसा निघेल? प्रथम मनःपूर्वक वाचावं लागेल, मग ते पटलं तर आचरणात येईल, (आचरण बदलणं साहस आहे), आचरणात आलं तर तुमच्यासाठी ते सार्थ होईल आणि नंतर तिरकस प्रतिसाद देण्याची आवश्यकता नव्हती हे लक्षात येईल.
  • Log in or register to post comments

???

अर्धवटराव
Tue, 07/17/2012 - 10:37 नवीन
१) काल ही वस्तुस्थिती नसून भास आहे आणि २) आपण ती अनंत कालापासून वस्तुस्थिती मानत आलोय जर प्रक्रिया #२ सत्य आहे (अनंत "कालापासुन" ) तर प्रमेय #१ मध्ये गोची आहे. >>प्रथम मनःपूर्वक वाचावं लागेल, मग ते पटलं तर आचरणात येईल, (आचरण बदलणं साहस आहे), आचरणात आलं तर तुमच्यासाठी ते सार्थ होईल आणि नंतर तिरकस प्रतिसाद देण्याची आवश्यकता नव्हती हे लक्षात येईल. -- यातला तिरकसपणाचा आरोप आमच्यासाठी नाहि असं गृहीत धरतो. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

प्रामाणिक पणे प्रश्न विचारला..

विटेकर
Tue, 07/17/2012 - 16:59 नवीन
प्रामाणिक पणे प्रश्न विचारला.... त्यात तिरकसपणा कोठून आला ? शप्पत ..काही ही कळले नाही हो . मला तर आता आपण मि.पा. वर आहोत हाच भास वाटू लागला आहे..... काय चाललय काही म्हणता काही ..ही कळत नाही. ..आणि विचारायची पण चोरी.. तिरकस म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

>प्रथम मनःपूर्वक वाचावं

अर्धवट
Tue, 07/17/2012 - 18:18 नवीन
>प्रथम मनःपूर्वक वाचावं लागेल, मग ते पटलं तर आचरणात येईल, (आचरण बदलणं साहस आहे), आचरणात आलं तर तुमच्यासाठी ते सार्थ होईल आणि नंतर तिरकस प्रतिसाद देण्याची आवश्यकता नव्हती हे लक्षात येईल. थोडक्यात काय, लिहिलंय ते वाचा, प्रश्न विचारू नका, वाचल्यावर तुम्हाला समजेलंच, समजलं नाही तर पुन्हा मनापासुन वाचा, तरी नाही समजलं तर, पुन्हा मनापासून वाचा वगैरे वगैरे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

शरीर अन आपण वेगवेगळे म्हणे तर

शिल्पा ब
Tue, 07/17/2012 - 10:22 नवीन
शरीर अन आपण वेगवेगळे म्हणे तर माझा एक गंभीर प्रश्न आहे. : माझी कंबर दुखते, म्हणजे शरीराची कंबर दुखते पण मग माझ्या मनाला का त्रास होतो? शरीराचा त्रास तिथेच कसा ठेवायचा याबद्दल मार्गदर्शन केलंत तर सगळ्यांनाच उपयोगी होईल.
  • Log in or register to post comments

शरीराचा त्रास तिथेच कसा

अर्धवट
Tue, 07/17/2012 - 19:47 नवीन
शरीराचा त्रास तिथेच कसा ठेवायचा याबद्दल मार्गदर्शन केलंत तर सगळ्यांनाच उपयोगी होईल. अगदी असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

काळ आणि पैसा

चित्रगुप्त
Tue, 07/17/2012 - 10:25 नवीन
काळ आणि पैसा या गोष्टी भासमान मानव्यात वा सत्य हा मुद्दा तूर्त बाजूला ठेऊन या दोन्हीतेल एक फरकः पैसा हा प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रमाणात (कमी -जास्त) उपलब्ध असतो, तर वेळ मात्र प्रत्येकाला दर दिवशी चोवीस तासच उपलब्ध असते... अनुभवांचे ओरखडे मनावर उमटू न देता, बालकाप्रमाणे क्षणोक्षणी जगणं, जसं जे. कृष्णमूर्ती सांगत, आनंदायक आहे खरं, पण त्याच्या परिणामी स्मरणशक्तीची पार वाट लागते, आणि व्यवहारातील साध्या साध्या गोष्टी अवघड होत जातात, हे स्वानुभवानं सांगू शकतो.
  • Log in or register to post comments

सदस्यहो!

संजय क्षीरसागर
Tue, 07/17/2012 - 11:47 नवीन
एकदम सगळे उठून उभे राहू नका! हा लेख फालतू आहे, एक अक्षर कळत नाही, विदेहत्व एक्स्प्लेन करा, पैसा आणि आयुष्य, बालवत जगणं आणि स्मृती इतक्या विविध विषयावर तुम्ही एकाच वेळी कल्ला केलात तर मला सर्वांची उत्तरं माहिती असून देखील काहीही सांगता येणार नाही. ज्यांना लेख उपयोगी वाटतोय त्यांनी `काल भास आहे' (किंवा नाही) यावर वाट्टेल तो प्रश्न विचारा, काल भास आहे ही खात्री झाली की अनुषंगिक बदल (विदेहत्वाची जाणीव, जाणीवेनं जगणं, स्वास्थ्यं) तुमच्या आयुष्यात नक्की घडतील याची मी ग्वाही देतो ज्यांना कळत नाहीये पण कळावंस वाटतय त्यांनी कृपया लेख सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून पुन्हा वाचा, साध्या- सोप्या भाषेत आणि अनुभावातनं लिहिलय, त्यात न समजेलसं काही नाही. ज्यांना निव्वळ तिरकस प्रतिसाद द्यायचेत ते काय साधतायत याची कल्पना नाही त्यामुळे त्यांच्या विषयी मला काहीही म्हणायच नाही.
  • Log in or register to post comments

?

नितिन थत्ते
Tue, 07/17/2012 - 15:40 नवीन
>>ज्यांना लेख उपयोगी वाटतोय त्यांनी `काल भास आहे' (किंवा नाही) यावर वाट्टेल तो प्रश्न विचारा, काल भास आहे ही खात्री झाली ..... सर्क्युलर रेफरन्स. :( काल भास आहे ही खात्री झाल्याशिवाय हा लेख उपयुक्त आहे हे कसे पटावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

यात कुठेय सर्क्युलरायझेशन?

संजय क्षीरसागर
Tue, 07/17/2012 - 18:37 नवीन
अस्तित्वात `काल' असं काही नाही, ज्याला आपण वेळ म्हणतो तो निव्वळ `भास' आहे. आपण जर (कल्पनेनं) पृथ्वीच्या सरळ वर आकाशात गेलो आणि पृथ्वी आपल्याला खाली दिसायला लागली तर सूर्य सतत प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होते हे लक्षात येइल. आपल्या सर्वांना हे माहिती देखील आहे पण तो बोध आपण आचरणात आणत नाही न पटण्यासारखं यात काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

दिवस व रात्र होणे म्हणजेच तर

शैलेन्द्र
Sun, 08/12/2012 - 00:49 नवीन
दिवस व रात्र होणे म्हणजेच तर काल नाही ना.. ती फक्त काल मापणाच्या अनेक परिणामांपैकी एक आहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा