दोन बहिणी
शाळेत ह्या दोन्ही बहिणी सगळ्यानाच प्रीय!
दोघींच्या स्वभावात केवढे अंतर होते!
मोठी शांत, सुविचारी, सुशील.
लहानी धसमुसळी, तडकफडक, बाणेदार
मोठी कलाप्रवीण. संगीत, लेखन, हस्तकला, चित्रकला.
शिक्षकांचा आदर करणारी.
कधी उलटून बोलणार नाही.
सगळ्याना मदत करायला तत्पर.
तेवत्या मन्द ज्योतीसारखा तिचा सहवास,
सुगन्धी पारिजातकासारखी तिची संगत.
लहान बहीण नेहमी घोड्यावर स्वार!
येणार आणि झंझावाताप्रमाणे जाणार.
आपल्या पाउलखुणा सर्वत्र सोडून.
तिला कोणी विसरूच शकत नाही!
तिचे धाडशी विचार ऐकले की
समोरचा भारावूनच जाणार!
बिजलीसारखा तिचा वावर!
शाळेत वक्तृत्वस्पर्धा व्हायच्या.
त्यात दोघी नेहमी भाग घेत असत.
मोठीची मांडणी प्रगल्भ असे.
शतकानुशतके चालत आलेले सुविचार
ती मोठ्या खुबीने पेरून आताचा विषय सजवी.
लहान बहीण तिच्या स्वभानुसार घणाघाती बोलायची.
जे वाईट ते सगळे तोडा सोडा.
तुम्ही स्वत: सत्याच्या बाजूने लढत असाल तर,
कोणाचा मुलाहिजा बाळगू नका.
जे पाहिजे ते बळकावून घ्या.
तिचे बोलणे ऐकून श्रोते थरारून जात.
कडाडून टाळ्या आणि बक्षिसे दोघीही घेऊन जात.
पण एकमेकींचे अभिनन्दन मात्र करीत नसत.
अभिनन्दन जाऊदे,
सर्वामधे लोकप्रीय असलेल्या ह्या बहिणी
एकमेकींशी नीटपणे वागत देखील नसत.
न जाणे कुठले वैर मनात बाळगून होत्या.
एक दिवस नवीन सत्र सुरू होताना ह्या बहिणींची आई
त्यांच्या छोट्या भावाला- संस्कारला शाळेत दाखल करण्यास घेऊन आली.
आई अर्थातच ह्या दोघींचे वैर ओळखून होती.
त्यामुळे आईला प्रश्नच पडला.
छोट्या संस्कारकडे शाळेत लक्ष द्यायला
मी मोठ्या बहिणीला- संस्कृतीला सांगू
की लहान बहिण- क्रांतीला?
खूप विचार करूनही ती काही ठरवू शकली नाही.
तुम्हाला काय वाटते?
*************************************
वाचने
2754
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
संस्कृतीच
संस्कृती
मस्त
दोस्ती
छान!