Skip to main content

कवी मेघवेडाची 'उरा'तली सर !

Published on शनीवार, 07/07/2012
'उरा'तली सर ! - http://misalpav.com/node/22159 *** 'नेमेचि येतो मग पावसाळा. पाऊस आला की मान्सूनइतकाच मुसळधार बरसणार्‍या वर्षाकवितांचा पाऊसातच आपली माझी एक बारकीशी सर' अशी सुरुवात करुन नावातच मेघ आणि त्याचे वेड सामावलेला कवी जेव्हा पावसावर लिहितो तेव्हा पावसाने जशी धरणी तृप्त होते तसे रसिक मन तृप्त होणार याची खात्री असते आणि मग उरतो केवळ कवीच्या लेखणीतून झरझर उतरलेल्या काव्यामृताचे पान करण्याचा एक उपचार. अमृत मिळणार हे आधीच माहित असते आणि तसेच घडते. चिंब चिंब मन होत जाते, आणि कवीने जे काही सांगितले आहे त्यापेक्षा अधिकच काहीतरी हवेहवेसे पण शब्दात न सांगता येणारे मनात थुई थुई नाचत रहाते. ते काय आहे हे सांगता येणे आपल्या क्षमतेच्या बाहेरचे पण म्हणून दाद देऊ नये असे थोडीच असते ! ती दाद आपसुकच वाह अशा शब्दांनी येते आणि काव्य वाचून, समजून, मनात साचून राहिल्यावर जसा पावसाचा शिडकावा झाल्यावर बर्‍याच काळ गंध रेंगाळत रहातो तसेच ते काव्य मनात रेंगाळत रहाते. कवी प्रांजल मनाने बोरकरांच्या ओळीचे ऋण मान्य करतो आणि तरीही कुठेही कमी पडत नाही कारण काव्यातला भाव काय मांडायचा आहे याबद्दल कवी ठाम आहे, त्याच्याकडील शब्दसंपत्ती विपूल आहे. कदाचित संस्कृतबहुल शब्दांचा आरोप कवीवर येऊ शकतो पण शब्दांची निवड करण्याचे कवीचे स्वातंत्र्य आपण मानलेच पाहिजे. काव्याचा आस्वाद घेतांना शब्द हे महत्वाचे असतात हे खरे, पण एका पातळीवर जेव्हा शब्द बाजूला सारुन आपण अर्थाकडे पाहू लागतो तेव्हा शब्दांच्या पलिकडले गवसण्याची क्रिया सुरु होते. अशावेळेस अमुकच एक शब्द हवा की नको असा खल आस्वादामधे अडथळा ठरतो. आस्वादाची प्रक्रिया तिथे थांबते आणि अस्मितेचा ग्रीष्म भावानुभूतीच्या कोवळ्या अंकुरास जाळून केवळ पाचोळा उरतो. असे होणे हे सुजाण रसिकाचे लक्षण नसते आणि म्हणूनच संस्कृतप्रचुर शब्द ह्या काव्याचे बलस्थान झाले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. पाहुन जळता धरेस ग्रीष्मानलदाहें निष्ठूर दाटुन येई मनी नभाच्या कृष्णमेघकाहूर ग्रीष्माच्या दाहामुळे जळणारी धरती पाहून नभाच्या मनात काहूर मेघांच्या रुपाने आले आहे अशी कल्पना मांडत काव्याची सुरुवात होते आणि एका वेगळ्याच पातळीवर वाचकाला नेऊन ठेवते. नभाचा आणि धरतीचा पुरातन संबंध विविध काव्यकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडला असला तरी त्यामधे एकमेकांविषयी असलेली आस्था दर्शवणे हा प्रमुख भाग आहे. संपूर्णपण भौतिक वस्तु असलेली धरती आणि तिच्या आजुबाजुला असलेले वातावरण, त्यापलीकडील निर्वात पोकळी हे वास्तव. परंतु धरती आणि नभ हे मानवी स्वभावानुसार वर्तन करतात हे काव्यात्मक वर्णन मानवी संस्कृतीचे खासे वरदान. आपल्याप्रमाणेच या पंचमहाभुतांचाही व्यवहार असणार, ज्याप्रमाणे दुसर्‍यास होणारे दु:ख पाहून आपण तळमळतो तसेच सृष्टीतील मनोव्यापार असणार ही भावना याच्या मुळाशी आहे असे म्हणता येते. हाच दृष्टीकोन पुढील ओळींमधे अजूनच छान मांडला आहे. परंपरेने चातक हा पिण्याच्या पाण्याकरता मेघांकडे याचना करत असतो असे मानले आहे. अनेक संस्कृत आणि प्राकॄत काव्यांमधे याविषयी आपणांस वाचायला मिळते. अगदी भर्तृहरीच्या लेखनात सुद्धा चातकाला अरे चातका तु प्रत्येक मेघाकडे याचना करु नकोस कारण काही मेघ नुसतेच आवाज करणारे असतात, तर काही केवळ पोकळ, रिकामे असतात, तेव्हा तु त्याच मेघाकडे याचना कर ज्याच्याकडे जल आहे असे सुचवले आहे. भारतीय देवताशास्त्रानुसार जलाची देवता वरुण आहे. वरुण मेघांना इकडून तिकडे प्रेरीत करुन जलाचे सिंचन करतो असे काही पुराणांमधे वर्णन केले आहे. कवी म्हणतो की चातकाचा आर्जवी सूर ऐकून वरुणाचे मन कैवल्याने भरुन आले आणि त्याने मेघांना प्रेरीत केले. आजकाल अभावाने दृष्टीस पडणारा आणि पुरातन काव्यांमधून विपुलतेने पहायास मिळणारा भारतीय मातीतील मिथकांचा संदर्भ रसिकाचे मन तॄप्त करतो. तहानलेला चातक कोठे आर्त आळवी सूर कैवल्याने वरूणाचे का भरू नये मग ऊर? कितीतरी काळ वाट पहात असलेला पाऊस मग एक दिवस येतो. आधी एक दोन चुकार शुभ्र मेघांचे होणारे दर्शन आता केवळ थोड्या अवधीत पाऊस येणार याची नांदी देते. आणि मग दिसतो एक काळाकुट्ट मेघ. बघता बघता त्याच्या मागुन दुसरा, तिसरा आणि दाटी होत जाते. आकाश भरुन जाते. जणू काही आकाश पिकते आणि त्यातून रसरुपी पाऊस टपकायला लागतो. टप टप. बघता बघता मातीचा वास पसरतो. तो कसा असतो म्हणाल तर तेथे शब्दांचे काम नाही, डोळे मिटून श्वास भरुन मनात साठवून ठेवायचा शाश्वत आनंदाची अत्तरकूपीच जणू. बरसे रस पिकल्या अम्भोदांतुन टापूर-टुपूर सुगंधमृण्मय अभिनव नाजुक पसरे सर्वदूर आषाढाच्या पुरात चिंब न झालेला कुणीही नाही. अगदी कालिदास सुद्धा आषाढमेघांनी चिंब होत मेघदूताची रचना करतांना आषाढामुळे होणार्‍या चंचल मनाचे प्रतिबिंब यक्षाच्या मनोव्यापारातून आणि मेघाला कुबेरनगरीच्या मार्गाचे वर्णन करतांना मधूनच डोकावणार्‍या शृंगारीक वर्णनातून व्यक्त करतो. कामार्त जन हे चंचल असतात असे म्हणणारा कालिदास ही कामार्तता आषाढामुळे अधिक वाढते असे तर सुचवत नाही ना असा प्रश्न रसिकांना पडतो आणि आपला कवी सुद्धा तोच सूर पण जरा हलक्या आवाजात लावतो. कदाचित काळाचा महिमा असेल की आजकाल कवी कालिदासाप्रमाणे शृंगारीक वर्णन करण्यास थोडे काकू करतात. श्लील अश्लील हे समाजाच्या मान्यतेवर असते आणि कवी, लेखकांना कधी कधी समाजाचे नियम मानावेच लागतात त्यामुळे सुचकता दाखवत कवी थांबतो असे वाटते पण पुढच्या ओळींमधे ती कसर आगळा वेगळा नातेसंबंध दर्शवून काढतो. त्या नात्यांतून उमलणारा सौख्याचा अंकूर तरारुन येतो पण सभ्यतेचा बुरखा थोडा पांघरला जातोच ते त्या नात्याला अनामिक न ठेवता. हे नातं असं असतं की नाव कुठलही असो अगर नसो तृप्ती त्यात अंतर्भुत असतेच असते. आणि ती पहाणार्‍याला दिसते. कवी फक्त शब्दांत मांडू शकतो आणि आपण नाही. हाच तो फरक. पण तो फरक किती आणि कसा आहे हे पहायचे तर कवीचेच शब्द वाचलेले बरे, आपण केवळ आस्वाद घेऊन तृप्त होऊ. दिशादिशांतुन आषाढाच्या श्यामघनांना पूर तृणाप्रमाणे मनेंहि होती चंचल तृष्णमयूर कुडा सुरंगी कवळा मुसळी पुंगळी संकासूर पेव फुलांचे फुलता उमले भूवर सौख्यांकुर! इंद्रधनू-वर दृष्टिस पडता नभोमंडपी दूर हरितवनश्रीलेपित सृष्टी वधू लाजुनी चूर! सोनसळी लेऊन नव्हाळी साळि नर्तनातूर, शेतांमधुनी फुले तृप्तिचा पीत वर्ण भरपूर! बघता बघता निरोपाची वेळ येते. जे जन्मास येते त्याचा मृत्यु आहे. ज्याचा संयोग होतो त्याचा वियोग आहे. सुखामागोमाग दु:ख आहे, दु:खामागोमाग सुख आहे. चक्राप्रमाणे असलेली ही गती जशी मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे तसे निसर्गातही आपणास पहायला मिळते. ग्रीष्म संपला की वर्षा ऋतुचे आगमन होते तसे वर्षा ऋतु संपणार हे निश्चित असते. निरोप द्यावा लागणार हे निश्चित. ताटातुट होणार हे निश्चित. मग जे सत्य आहे त्यापासून दूर जायचे किंवा त्याची खंत कशाला करायची ! जे आहे ते हसतमुखाने मान्य करायचे आणि निरोपाच्या वेळेस हसतमुखाने सामोरे जायचे. भद्र भादवा घेऊन ये सौभाग्याचा सिंदूर निरोप देती वर्षाराणी हासे मधुरमधूर! केवळ आठ कडव्यांचे हे काव्य पावसाच्या आगमनाबरोबर रसिकांच्या भेटीला आले आणि जसा पावसाळा सुद्धा यावर्षी जरा उशीरानेच आला पण आल्यावर बरे वाटले त्याप्रमाणे कवीचे लेखन बर्‍याच काळाने आले पण आल्यावर बरे वाटले. हे काव्य वाचून माझ्या मनात जे आले ते मी येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मनात जे काही येते ते तसेच मांडता येत नाही ही माझी मर्यादा आहे. त्या मर्यादेचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करत आहे पण अजून तितकेसे यश येत नाही. पण उरा'तली सर वाचून राहवलेच नाही म्हणून लिहिले. लिहिले खरे, पण लिहिता लिहिता उरात सल दाटून आली. ज्यांना लिहिता येत नाही असे आमच्यासारखे अनेक जण कीबोर्डाचा ढोलक करुन उगाच डोके उठवत असतात आणि ज्यांना लिहिता येते असे कवी मेघवेडासारखे कलावंत, की ज्यांनी नुसती बोटे जरी फिरवली तरी सप्तसूर झंकारत झिनी झिनी नाद करत गंधर्वलोकीतून भूलोकी अवतरतात ते रसिकांना चातकासारखी वाट पहायला का लावतात?
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 3799
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

कविता मस्तच होती. पण नानांच्या रसग्रहणा मुळे तिची अजुन मजा लुटता आली. धन्यवाद मेवे आणि नाना

मेवेची कविता सुंदर आहेच, तिचे रसग्रहणही फार समर्थपणे उतरले आहे. स्वाती

या निमित्ताने पुन्हा एकवार मेवेची अप्रतिम कविता वाचायला मिळाली आणि त्यावरचे तुमचे भाष्य वाचतावाचता तृप्त झालो. (तृप्त चातक) रंगा

एरव्ही कवितांच्या वाट्याला जात नाही. पण हे मात्र तरीही आवडले.

http://misalpav.com/node/22159#comment-411383

रसग्रहण आवडले. 'घन लवला रे' कवितेतली बोरकरांचीच 'मनातले सल रुजून आता, त्यांचा झाला मरवा रे' ही ओळ आठवली :)

कवितेइतकंच छान रसग्रहण! मेव्या उंबराच्या फुलासारखा कधीमधी उगवतो म्हणूनच आपण त्याच्या कवितांची वाट बघतो. रोज लिहीत असता तर नानाने रोज असं रसग्रहण केलं नसतं. आणखी एक म्हणजे जेव्हा बोरकरांच्या ओळी मध्यवर्ती घेतल्या तेव्हाच संस्कृत शब्द येणार हे निश्चित झालं. नाहीतर अशी नादमय, वृत्तात पूर्ण बांधलेली रचना आलीच नसती.

एकतर कविता सुंदर अन त्यावर रसिकतेने केलेले विवेचन सुंदर. दुधामध्ये साखरच जणू. नाना असले परिक्षण वेळोवेळी करत जा हो.

अप्रतिम कवितेचे रसग्रहण छानच झाले आहे.
ज्यांनी नुसती बोटे जरी फिरवली तरी सप्तसूर झंकारत झिनी झिनी नाद करत गंधर्वलोकीतून भूलोकी अवतरतात ते रसिकांना चातकासारखी वाट पहायला का लावतात?
ही खंत देखील अचुक. सहमत आहेच! कवी मेघवेडा कधी मनावर घेतात ते पहायचं :)

नानासाहेब, छान सहजसोपं लिहिलंय, आवडलं. माझ्या कवितेबद्दल इतकं सुंदर लिहिल्याबद्दल अनेक धन्यवाद. :) वास्तविक मला स्वतःला ही कविता खूप आवडली. माझ्यापरीनं कवितेच्या मूलद्रव्यांबाबत कुठलीही तडजोड न करण्याचा प्रयत्न मी केला आहे. संस्कृतबहुल शब्दांच्या वापराबाबत म्हणाल तर तो जाणीवपूर्वक केलेला आहे, मला आवश्यक वाटल्यामुळे. बाकी शेवटचा परिच्छेद म्हणजे कौतुकाचा ओव्हरडोस आहे हो. वर्षाला एखाददुसरी चांगली कविता वगैरे लिहिणार्‍या म्या पामराबद्दल तुमचे बरेच गैरसमज आहेतसे दिसतात. थोरामोठ्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो झालं. कधीतरी लागली तर सेहवागसारखी लागते एखाददुसरी इनिंग्ज. इतर वेळेस बोंबच आहे. कसले सप्तसूर झंकारून अवतरणं वगैरे. आणखी एक - हे मी स्वतः सांगणं कदाचित योग्य नाही. पण मी काही लै भारी नसल्याने - कवितेत दोन शब्दांवर श्लेष आहे. वळका बगू वळका बगू.. :) :) आणि 'कवी मेघवेडा' वगैरे संबोधन शब्दशः भारी वाटतंय. जड होतंय. :)

In reply to by मेघवेडा

कविता आणि रसग्रहण दोन्हीही सुंदर उतरलेत. जणू काही आकाश पिकते आणि त्यातून रसरुपी पाऊस टपकायला लागतो. टप टप. > ही उपमा फार आवडली. बाकी, श्लेष इंद्रधनू-वर आणि तृप्तिचा पीत वर्ण इथे आहेत का?

क्लासच लिहलं आहात रसग्रहण! मस्तच!! :)

सर्व वाचक, प्रतिसादक, तसेच ज्यांनी सदर लेख आवडल्याचे खरड, व्यनी, जीमेल माध्यमातून कळवले त्यांचा आभारी आहे. :)