मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काया ही पंढरी, आत्मा हा विट्ठल..

अमोघ शिंगोर्णीकर · · कलादालन
आजकाल आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्र टाईम्स मधे डॉ. रामचंद्र देखणे यांचं "पालखी" हे सदर प्रकाशीत होतंय. रोज घरून ऑफिसला कितीही लवकर निघालो किंवा घरी येण्यास कितीही उशीर झाला तरी मी ते वाचतोच वाचतो. ते वाचलं की दिवसाचा सगळा थकवा कुठल्याकुठे पळून जातो. आजचं ते सदर वाचूनंच ही पोस्ट सुचली. पालखीला वेळेत पोहोचलोच नसतो जर किश्या ने मदत केली नसती तर. त्याचे खास आभार. आदल्या दिवशी म्हणजे गुरूवारी ऑफिसमधून संध्याकाळी ६.०० ला निघालो तेव्हा मनातली धाकधूक वाढली होती. कारण घर गाठून मग पुणं गाठायचं होतं. घरी पोहोचेस्तोवर १०.०० झाले होते. तसंच थोडं जेवण पोटात ढकलून, वंदनाहून ११.३० ची एस्.टी (स्वारगेट) पकडली. किश्याला फोन करून सांगितलं होतं की यायला पहाटेचे ३.३० - ४.०० होतील. बरोब्बर ४ ला चांदणी चौकात उतरलो. किश्याला फोन केला. थोडा मागे उतरलो होतो पण तो म्हणाला कि थांब तिथेच "शून्य मिनिटांत" पोहोचतो. तेव्हा समजलं की, पुणेकरांची "शून्य" मिनिटे म्हणजे १५ मिनिटे असतात ते स्मित. हवेत गारवा होता. प्रसन्न वातावरण होतं. नुकताच घेतलेली नविन बाईक घेऊन स्वारी आली. हाय हॅलो केल्यावर समजलं की, हा रात्रभर झोपलाच नाही. डकटेल्स बघत होता. मग रूमवर गेल्यावर थोड्या गप्पा मारून फ्रेश होऊन भवानी पेठेकडे मार्गस्थ झालो. म्हात्रे पुलावर मग थोडी फोटाफोटी झाली. वाटेत एक फक्कड चहा मारून पुढे झालो. दिंड्यांची लगबग सुरू झाली होती. किश्याचा निरोप घेऊन संध्याकाळी भेटण्याचे आश्वासन दिलं, आणी पालखीतल्या माऊलींसोबत मिसळलो गेलो. मनात पांडुरंगाला भेटण्याची आस..., टाळ-मृदंगाचा गजर आणि मुखी ज्ञानोबा-तुकारामांचे नाव अशा भक्तीमय वातावरणात भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. दोन दिवस पुण्यनरीतील नागरिकांचा पाहुणचार घेऊन निघालेल्या पालखीला निरोप देण्यासाठी शुक्रवारी पहाटेपासूनच पालखी मार्गावर भाविकांनी मोठी गदीर् केली होती. भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातून सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराजांची, तर नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरातून सकाळी सात वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. कित्येक लाख वैष्णवजन जवळपास तीनशे किलोमीटरची पायी वाटचाल करुन सावळ्या विठूमाईच्या भेटीला एका अनामिक ओढीने जातात. कसला गोंधळ नाही, गडबड नाही, पण संपूर्ण वाटचाल निर्विघ्नपणे पार पडते. संपूर्ण वारीमध्ये प्रत्येकजण एकमेकांना माऊली संबोधतो. अगदी बंदोबस्ताचा पोलिस आणि सार्वजनिक आरोग्यसेवा पथकातले डॉक्टर आणि इतकेच काय आम्ही फोटोग्राफरदेखील माऊलीच. आषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवडमध्ये शहरवासियांनी उत्साहाने स्वागत केले. वारकऱ्यांसाठी सर्वत्र विविध सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. कितीही पायपीट करुन थकवा आला आणि भूक लागली तरी “बोला पुंडलिका…” चा गजर झाल्याशिवाय एकही वारकरी मुखी अन्नाचा घास घेत नाही. प्रत्येकाच्या दिंड्या ठरलेल्या असतात. सर्वजण एका अनामिक ओढीने पंढरपूरच्या दिशेने चालत राहता. कोणाच्याही चेहर्‍यावर कसलं दुखं: नाही ना कसल्या तक्रारीची जाणीव. मनी असतो फक्त एकच ठाव.. "पाडूरंग". माऊली म्हणजे अगदी दिड वर्षाच्या लहान मुलापासून ते अगदी जराजर्जर झालेल्या आजोबांपर्यंत सगळेजण. कोणी अनवाणी, कोणी अपंग... पण मनातला उत्साह कमी पडत असेल तर शप्पथ. हाच उत्साह, आणि मनातली ओढ मला सलग दुसर्‍या वर्षीही सासवडपर्यंत घेऊन गेली. एकटा जरी होतो तरी कुठेही एकटेपण जाणवलं नाही. दिंडीबरोबर चालत जातांना, अभंग, ओव्या, वारीची माहीती अशा बर्‍याच गोष्टी समजल्या. त्या सर्व गोष्टी आता सांगत बसलो तर शब्द संपणार नाहीत. सासवडहून परत पुण्यात आल्यावर किश्या आणी गिरीला भेटलो. आणि मग मुंबई. घरी आल्यावर ना कसला थकवा होता ना काही. हो पण, मनात एक वेगळा आनंद होता. एक उर्जा होती. जी मला पुढच्या वारीपर्यंत नक्कीच उमेद देईल. पण एक मात्र नक्की की, पांडूरंगाच्या आशिर्वादाने आजवर संपूर्ण वारीदरम्यान एकही दुर्घटना घडल्याचे उदाहरण ऐकिवात नाही आणि खात्री आहे की असे कधी होणारही नाही. सर्वांसाठी वारी म्हणजे एक शिस्तीचा सुंदर दाखला आहे. तो शब्दबद्ध करण्याचा हा माझा एक खुजा प्रयत्न. घ्या गोड मानून. नाही आवडला तर मीच म्हणेन, “भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी, विठ्ठला… मीच खरा अपराधी” ॥ रामकृष्ण हरी ॥ ===================================================================== प्रचि १ प्रचि २ प्रचि ३ प्रचि ४ प्रचि ५ प्रचि ६ प्रचि ७ प्रचि ८ प्रचि ९ प्रचि १० प्रचि ११ प्रचि १२ प्रचि १३ प्रचि १४ प्रचि १५ प्रचि १६ प्रचि १७ प्रचि १८ प्रचि १९ प्रचि २० प्रचि २१ प्रचि २२ प्रचि २३ प्रचि २४
लेखनविषय:

वाचने 17026 वाचनखूण प्रतिक्रिया 43

अमृत 30/06/2012 - 11:01
सर्व छायचित्रे व त्यातील वारकर्‍यांचे नैसर्गिक भाव सुंदर. तुमच्या छायाचित्रण कौशल्याचे विषेश कौतुक. आषाढी एकदशीच्या समस्त मिपाकरांना शुभेच्छा. विट्ठल विट्ठल. अमृत

चौकटराजा 30/06/2012 - 11:42
सगळेच उत्तम. कोणता कॅमेरा ? हे मात्र कृपया सांगाल काय? फोटोशोप ब्लर वापरले काय ? असाच धागा गणपती उत्सवावर करावा ही नम्र विनंति.

अमोघ शिंगोर्णीकर 30/06/2012 - 11:57
धन्यवाद मंडळी. चौकटराजा पुढील माहीती तुमच्यासाठी. कॅमेरा : Canon 5D Mark II & Lense: EF70-200 f2.8 L USM फोटोशोप ब्लर वापरले काय ?>>> नाही. मागचा बोके हा लेन्सचं अपेरेचर सेटिंग २.८ ठेऊन फोटो कढल्याने आले आहे. असाच धागा गणपती उत्सवावर करावा ही नम्र विनंति>>>> नक्कीच करेन. धन्यवाद :)

दिपक 30/06/2012 - 11:58
मोटारीतून जाऊन पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेणं कधीही शक्य आहे... पण आषाढी एकादशीच्या निमित्ताने जेव्हा लाखो वारकरी उरीपोटी धावत पंढरपूरला जातात, भक्तीभावाने एकमेकांना गळामिठी घालतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये होणारं विठ्ठलाचं दर्शन हे निव्वळ अलौकिक आहे. --पु.ल. खुपच सुंदर फोटो. भरुन पावलो जय हरी विठ्ठल.!

सर्वसाक्षी 30/06/2012 - 14:18
चांगला विषय, चांगले चित्रण. व्यक्तिचित्रे झकास. (रागावु नका, पण तेवढा विडीचा फोटो टाकला नसतात तर चालले असते; चित्र म्हणुन नव्हे तर वारीशी ते विसंगत वाटते म्हणुन. अनाहुत सल्ल्याबद्दल क्षमस्व)

अमोघ शिंगोर्णीकर 30/06/2012 - 14:34
प्रतिसादांबद्दल आभार लोक्स. सर्वसाक्षी, सल्ल्याबद्दल धन्यवाद. :) या सदरात मला पांडूरंगाच्या दर्शनाला निघालेल्या वारकर्‍यांचे अंतरंग दाखावायचे होते. मग ते कधी भजन म्हणतांना, कधी फुगड्या घालतांना, कधी निव्वळ "त्याच्या" पालखीला बघून नकळत हात जोडले गेले असतांना, तर कधी फावल्या वेळात विडी-काडी ओधत असतांना. त्यामुळे तो फोटो टाकण्यात आलाय.

गणपा 30/06/2012 - 15:18
डोळ्यांच पारणं फिटलं. धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 30/06/2012 - 15:50
वारीतील ग्रेट व्यक्तिचित्र. मालक, असेच सुंदर सुंदर फोटो डकवत राहा. कोणा संताच्या चार ओळी- ऐसी चंद्रभागा ऐसे भिमातीर ऐसा विटेवर देव कोठे || ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नामघोष सांगा कोठे. || -दिलीप बिरुटे (वारकरी)
अप्रतिम प्रकाशचित्रे अमोघ. अतिशय मनापासून केलेलं सुंदर वर्णन पण अजून लिहायला हवे होते असे वाटत राहिले... सगळीच प्रचि उत्तम आहेत परंतु २२ व्या चित्रातला उत्साहभरा वेग, सगळ्यांची एका दिशेने पुढे जाण्याची ओढ अतिशय भावली! पुढील चित्रांना शुभेच्छा. गपपती उत्सवावर असाच एक धागा येऊदेत. (आषाढी भरुन पावलेला)रंगा

अर्धवटराव 01/07/2012 - 02:14
हस्ते परहस्ते आपला प्रसाद सर्वांच्या मुखी प्रेमाने भरवणारी हि उदंड माऊली. __/\__ अर्धवटराव

तुषार काळभोर 01/07/2012 - 11:55
अप्रतिम!!

चिगो 01/07/2012 - 13:04
अत्यंत सुंदर, बोलकी प्रकाशचित्रे.. विठ्ठल विठ्ठल..

अभ्या.. 02/07/2012 - 03:32
सुरे़खच..... सुलेखन सुध्धा. गेल्या साली साधना मधिल सन्देश भंडारेंची वारी आठ्वली.

सौरभ उप्स 02/07/2012 - 10:42
मस्त आलीये photography , झक्कास एकदम

अमोघ शिंगोर्णीकर 02/07/2012 - 17:43
धन्यवाद मंडळी.. प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार.. कलोअ अमोघ शिंगोर्णीकर
पाहुनिया चित्रे, झाला अपार आनंद मन उत्फुल्लित होई वारीने. म्हणे निशदास, भजावा विठ्ठल तोची आहे सत्य, बाकी सारे भ्रम. बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खुप सुंदर फोटो आहेत हे. आयुष्यभर जपुन ठेवावे असे.

सुधीर 05/07/2012 - 14:47
अफलातून व्यक्तिचित्रे!

नीलकांत 05/07/2012 - 15:40
फोटो फारच अप्रतिम आले आहेत. वारीत असल्याचा भास झाला. २०१० साली पुण्यातील भवानीपेठ ते हडपसर एवढा काळ वारी सोबत होतो. तो काळ आठवला. फोटोवरील सुलेखन सुध्दा उत्तम आहे :) पुण्यातील गणपती मिरवणुकीचे सुध्दा असेच फोटो येऊ द्या. विशेषतः ध्वज- ढोल ताश्याचे मंडळ ! - नीलकांत

अमोघ शिंगोर्णीकर 06/07/2012 - 10:26
सर्वांचे मनःपूर्वक आभार मंडळी. :) पुण्यातील गणपती मिरवणुकीचे सुध्दा असेच फोटो येऊ द्या. विशेषतः ध्वज- ढोल ताश्याचे मंडळ >>>>> आहे तो विचार डोक्यात. पण वेळा सुसंगत होत नाहीत. मुंबई - पुणे - मुंबई आणि कामकाज. पण नक्कीच शूट करेन ते सर्व. धन्यवाद. :) कलोअ अमोघ शिंगोर्णीकर

सुहास झेले 07/07/2012 - 01:26
जबरदस्त... सगळे फोटो आवडले :) :)

अनिल तापकीर 19/07/2013 - 15:51
लेखन फोटो सर्वच अप्रतिम,पण एक खट्कलं राव त्या किश्यापेक्षा मि जवळ होतो ना चांदणी चौकाच्या म्हण्जे मी सुद्धा घ्यायला आलो असतो तेवढीच भेट झाली असती वो. आणि तो किश्या कुठे राहतो तेवढे कळ्वा कारण तो मिपावकर असेल तर भेटता तरि येइल आनि परत पुण्यात आले तर भेटा कि राव मो न ९९२२८२१४१२