राष्ट्रपती: भाग १ (राष्ट्रपतींची निवड कशी होते?)
नमस्कार मंडळी,
पुढील महिन्यात राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक होईल.सध्या तरी प्रणव मुखर्जी सहज निवडून येतील असे चित्र दिसत आहे. पेपरात युपीएची राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत ४३% मते आहेत, एन.डी.ए ची २८% मते आहेत या पध्दतीची माहिती येत आहे.आता ही ४३%, २८% मते नक्की कशी मोजतात? या लेखाचा उद्देश राष्ट्रपतीपदासाठी निवडणुक कशी होते याविषयी आहे आणि त्यात या प्रश्नाचे उत्तर मिळेलच.
Electoral college
राज्यघटनेच्या कलम ५४ मध्ये राष्ट्रपतीपदाची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहातील आणि राज्य विधानसभांमधील निर्वाचित सदस्यांच्या electoral college द्वारे होईल असे म्हटले आहे. म्हणजेच लोकसभेतील दोन नियुक्त ऍन्ग्लो-इंडियन सदस्यांना,राज्यसभेतील नियुक्त सदस्यांना (सचिन तेंडुलकरसारख्या) आणि राज्य विधानपरिषदेतील सदस्यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करता येत नाही.
राष्ट्रपतीपदाची निवडणुक कशी होते याविषयी राज्यघटनेच्या कलम ५५ मध्ये माहिती दिली आहे.
कलम ५५(१): " As far as practicable, there shall be uniformity in the scale of representation of the different States at the election of the President."
म्हणजेच electoral college मध्ये विविध राज्यांना सर्वसाधारणपणे सारखेच प्रतिनिधित्व असेल. आता हे सारखे प्रतिनिधित्व कसे ensure केले आहे? याविषयी कलम ५५(२) मध्ये माहिती दिली आहे. या कलमाप्रमाणे प्रत्येक राज्य विधानसभांमधील सदस्यांच्या प्रत्येकी एका मताला "मूल्य" दिले आहे.हे मूल्य कसे काढतात? तर राज्याची लोकसंख्येला राज्य विधानसभांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येने भागावे आणि आलेल्या भागाकाराला परत १००० ने भागावे. आणि आलेला भागाकार round-off करावा.आणि २०२६ सालापर्यंत विविध राज्यांमधील १९७१ च्या जनगणनेप्रमाणे असलेली लोकसंख्या या भागाकारासाठी वापरावी असे या कलमाच्या explanation मध्ये लिहिले आहे.
उदाहरणार्थ महाराष्ट्राची १९७१ च्या जनगणनेप्रमाणे लोकसंख्या ५,०४,१२,२३५ होती.आणि महाराष्ट्र विधानसभेत एकूण निर्वाचित सदस्यांची संख्या २८८ आहे. तेव्हा लोकसंख्या भागिले २८८ = १,७५,०४२. या भागाकाराला १००० ने भागल्यास उत्तर येईल १७५.०४२ आणि round-off करून उत्तर येईल १७५. मी विविध राज्यांमधील १९७१ च्या जनगणनेप्रमाणे असलेली लोकसंख्या आणि विविध राज्य विधानसभांमधील सदस्य एका excel sheet मध्ये घेऊन आकडेमोड केली.ती पुढीलप्रमाणे:

From Articles
या एक्सेल शीटमधील शेवटच्या कॉलममध्ये प्रत्येक राज्याचे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील मूल्य (त्या राज्यातील विधानसभेतील निर्वाचित सदस्य गुणिले प्रत्येक मताचे मूल्य) दिले आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रात विधानसभेतील निर्वाचित सदस्यांची संख्या २८८ आणि प्रत्येक मताचे मूल्य १७५. म्हणजे महाराष्ट्र विधानसभेतील सदस्यांचे राष्ट्रपतीपदातील निवडणुकीत एकूण मूल्य झाले: २८८ गुणिले १७५= ५०,४००. अशा पध्दतीने सर्व राज्य विधासभांमधील सदस्यांचे मूल्य काढले. याची बेरीज ५,४९,४७४ येईल.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील निर्वाचित सदस्यांचे एकूण मूल्य आणि राज्य विधानसभांमधील निर्वाचित सदस्यांचे एकूण मूल्य सारखेच असते. म्हणजे संसदेतील दोन्ही सभागृहांमधील सदस्यांचे एकूण मूल्य ५,४९,४७४ आहे. लोकसभेत एकूण निर्वाचित सदस्य ५४५ तर राज्यसभेत २३८ (एकूण ७८३) आहेत. म्हणजेच लोकसभेतील आणि राज्यसभेतील प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य ५,४९,४७४ भागिले ७८३ = ७०१.७५ किंवा ७०२ एवढे आहे.
तेव्हा राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीत मतांचे एकूण मूल्य झाले ५,४९,४७४ अधिक (७०२ गुणिले ७८३) = १०,९९,१४०. जर युपीए चे विविध राज्य विधानसभांमधील आणि संसदेतील दोन्ही सभागृहांमधील संख्याबळ लक्षात घेतल्यास ते ४३% येईल. (हा प्रयोग मी अजून करून बघितलेला नाही पण वर्तमानपत्रात अनेक वेळा हा आकडा मी वाचला आहे तेव्हा त्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही).
जर काही राज्य विधानसभांमधील/संसदेतील काही जागा रिकाम्या असतील तर या आकड्यांमध्ये थोडाफार बदल होईलच.१९८७ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी पंजाबची तर १९९२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी जम्मू-काश्मीरची विधानसभा अस्तित्वात नव्हती तर त्या राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट होती.त्यामुळे त्या निवडणुकांसाठी वर दिलेल्या आकड्यांमध्ये थोडेफार बदल झाले होते.
राष्ट्रपतीपदाची निवडणुक कशी होते?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मत देणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतपत्रिकेवर निवडणुकीत जितके उमेदवार असतील तितके preferences लिहून द्यावे लागतात. २०१२ च्या निवडणुकीत प्रणव मुखर्जी आणि पी.ए.संगमा हे दोन उमेदवार आहेत. तेव्हा प्रत्येक मतदाराला आपला पहिला आणि दुसरा preference मुखर्जी की संगमा हे लिहून द्यावे लागते.जर दोन्ही preferences लिहून न दिल्यास माझ्या माहितीप्रमाणे ते मत बाद होते (ही माहिती चुकीची असल्यास ती सुधारावी ही विनंती).
राज्यघटनेप्रमाणे राष्ट्रपतीपदाची निवडणूक electoral college च्या सदस्यांकडून single transferrable vote म्हणजे परिवर्तनीय मतांद्वारे होते.हे परिवर्तनीय मत म्हणजे नक्की काय?जर निवडणुकीत दोनच उमेदवार असतील तर ही पध्दत समजायला फारशी किचकट नाही.पण जर तीन किंवा अधिक उमेदवार असतील तर मात्र ही पध्दत किचकट होऊ शकते. उदाहरणार्थ १९६९ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नीलम संजीव रेड्डी, सर्व विरोधी पक्षांचे चिंतामणराव देशमुख आणि (इंदिरा गांधींनी पाठिंबा दिलेले) अपक्ष व्ही.व्ही.गिरी असे तीन मुख्य उमेदवार रिंगणात होते (त्याशिवाय इतर १२ उमेदवारही रिंगणात होते).आणि त्या निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या एकूण मतांचे मूल्य ८,३६,३३७ होते.विजयी होण्यासाठी यापैकी अर्धी+१ म्हणजेच ४,१८,१६९ मते मिळणे गरजेचे होते.पण पहिल्या फेरीत तितकी मते कोणत्याही उमेदवाराला मिळाली नाही.विविध उमेदवारांना पहिल्या फेरीत मिळालेली मते पुढीलप्रमाणे :
व्ही.व्ही.गिरी: ४,०१,५१५
नीलम संजीव रेड्डी: ३,१३,५४८
चिंतामणराव देशमुख: १,१२,७६९
बाकी मते इतर उमेदवारांना मिळाली.
जर कोणाही उमेदवाराला निवडून यायला गरजेची मते पहिल्या फेरीत मिळाली नाहीत तर मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत सर्व मतदारांनी दिलेली दुसऱ्या पसंतीची मते विचारात घेतली जातात. मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत सर्वात तळाला असलेला उमेदवार निवडणुकीतून बाहेर होतो. या निवडणुकीत दुसऱ्या पसंतीची व्ही.व्ही.गिरी यांना १८,५६२ मते तर नीलम संजीव रेड्डी यांना ९१,८७९ मते मिळाली होती.ही दुसऱ्या पसंतीची मते त्या त्या उमेदवाराला मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये मिळवली जातात.यानंतर व्ही.व्ही.गिरी यांना एकूण ४,२०,०७७ तर नीलम संजीव रेड्डी यांना ४,०५,४२७ मते मिळाली. व्ही.व्ही.गिरी यांना मिळालेली मते निवडून यायला गरजेच्या असलेल्या ४,१८,१६९ मतांपेक्षा जास्त होती.त्यामुळे व्ही.व्ही.गिरी राष्ट्रपतीपदी निवडून आले. जर ती मते दुसऱ्या फेरीनंतरही पुरेशी नसती तर मतमोजणीची तिसरी फेरी घ्यावी लागली असती आणि या फेरीत सर्व मतदारांनी दिलेली तिसऱ्या पसंतीची मते विचारात घेतली गेली असती. अशा पध्दतीने मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत एकेक उमेदवार कमी करत दुसऱ्या/तिसऱ्या/चौथ्या इत्यादी पसंतीची मते विचारात घेतली जातात आणि ज्या फेरीमध्ये एखाद्या उमेदवाराला निवडून यायला गरजेची असलेली एकूण मते मिळतात त्या फेरीत तो उमेदवार जिंकल्याचे घोषित केले जाते. (राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांसाठीही हिच transferrable vote ची पध्दत वापरली जाते. मतदानाच्या चौथ्या फेरीनंतर अमुकएक उमेदवार विजयी घोषित झाला अशा स्वरूपाचे उल्लेख बातम्यांमध्ये असतात त्यामागचे कारण हे आहे).
वेळ मिळेल त्याप्रमाणे राष्ट्रपतींचे अधिकार आणि पूर्वीच्या राष्ट्रपतींच्या/ राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांच्या कृतीवर माझे भाष्य पुढील भागात.

Book traversal links for राष्ट्रपती: भाग १ (राष्ट्रपतींची निवड कशी होते?)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान....
माहितीपूर्ण ...
१००% सहमत....
जियो क्लिंटन
+१
समजले ... सोपे करुन
सुधारणा
उत्तम माहिती
किचकट --तर्क
तो अधिकार राज्यांचा नाही
प्रतिसाद
छान...
छान माहीती. थोडीफार आकडेमोड
अमेरीकेचे राष्ट्रपति
उत्तम लेख!
वाचनखूण साठवली आहे.
उत्तम माहिती. मूळ लेखातली
१. जम्मु काश्मिरच्या
मला वाटते...
प्रतिसाद
अनेक आभार. सगळ्या प्रश्नांची
+१/-१
चांगली माहिती
खुप चांगली माहिती धन्यवाद
उत्तम माहिती !!
चांगली माहिती. मराठी विकीवर
छान माहिती..
प्रतिसाद