११ सप्टेंबर २००१ - नेहमीप्रमाणे रात्री रिमोट हातात घेऊन चॅनेल सर्फिंग चालू होतं. रिमोटचं Next बटनं दाबता दाबता अचानक एका न्यूज चॅनेलवर हात थबकला. एका उंच बिल्डींगवर एक विमान जोरात धडकतांना दिसत होतं. अतिशयोक्ती वाटेल पण एका क्षणापुरतं तो सीन मला एखाद्या इंग्रजी मारधाडपटातला वाटला. अमेरिकेच्या Twin Tower वर दहशतवादी हल्ला झाला होता. घटना समजायला ५ मिनीटं गेली आणि पुढची ५ मिनीटं धक्क्यातून सावरायला. "असाही हल्ला होऊ शकतो??" हे फारतर चित्रपटांतच मी कल्पना केलं असतं. या घटनेनंतर काही दिवसांनी "अल-कायदा" या अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. त्यांचा म्होरक्या 'ओसामा बिन लादेन" अफगाणिस्तानात कुठेतरी असल्याची माहिती मिळाली. या घटनेनंतर साधारणपणे महिन्याभरातच बुश सरकारने अफगाणिस्तानवर चढवलेला हल्ला, लादेनला पकडण्यासाठी अमेरिकेने जंगजंग पछाडणं, त्याने विकसित केलेल्या जैविक अस्त्रांची चर्चा, एक ना अनेक अफवा अशा घटना घडत गेल्या. ओसामा हे सर्वपरिचित नाव बनलं.
या घटनेनंतर काही वर्षांनी 'ओमर बिन लादेन' या ओसामाच्या मुलाचे फोटो आंतरजालावर झळकू लागले. निमित्त होतं त्याने ब्रिटीश मुलीशी केललं लग्न. एकूणच त्याच्याबद्द्ल उत्सुकता निर्माण झाली. आंतरजालावर थोडंफार शोधल्यावर खुपच नविन माहीती मिळाली. ओसामाचा हा मुलगा अफगाणिस्तानपासून, लादेनच्या सर्व दहशतवादी कारवायांपासून दूर होता. किंबहुना तो आपल्या वडीलांच्या विरोधात होता. सौदी अरेबिया जिथे आपल्या वयोवृद्ध वडिलांशी बोलतांनाही मुलं मान वर करत नाहीत तिथे हा मुलगा आपल्या वडिलांविरुद्ध अगदी उघड उघड बोलत होता.
नुकतंच Crossword मधे फिरत असतांना "Growing up Bin Laden' हाती लागलं. लेखकाच्या यादीत 'नज्वा बिन लादेन' आणि ओमर बिन लादेन' ही नाव उत्सुकता चाळवण्यासाठी पुरेशी होती. त्यातच तिसरं नव होत 'जीन सॅसन'. 'प्रिन्सेस' वाचल्यानंतर तिच्याबद्दलचा आदर दुणावलेला होताच.
'Growing up Bin Laden' एका वाक्यात सांगायचं तर एक सर्वसामान्य आयुष्य जगणारा माणूस जगातला most wanted अतिरे़की बनण्याचा प्रवास. या पुस्तकाचं वैशिठय म्हणजे ९/११ च्या हल्ल्यानंतर बिन लादेन कुटुंबातले ओसामाबद्द्ल अवाक्षरही बोलण्यास तयार नसतांना, त्याच्या पहिल्या बायकोने आणि चौथ्या मुलाने दाखवलेली हिंमत. पुस्तक अगदी पहिल्या पानापासून आपल्या मनाचा ताबा घ्यायला सुरवात करतं. एकूण तीन भागात विभागलेल्या या पुस्तकात, पहिल्या भागात ओसामची पहिली पत्नी, नज्वाचं बालपण, तिचा लादेनशी झालेला प्रेमविवाह, सौदी अरेबियातले सुरवातीचे दिवस, मुलांचा जन्म, लग्नानंतर काही वर्षांत लादेनने केलेली एकामागोमाग एक लग्न. अफगाणिस्तान-रशिया युद्ध या घटनांचा आढावा घेतला आहे.
दुसर्या भागात आपली जन्मभूमी सौदी अरेबियाशी झालेली ओसामाची फारकत, सुदानने केलेलं त्याचं स्वागत, ओसामा आणि कुटुंबियांचं खार्टुममधलं वास्तव्य, ओसामाला हळूहळू इस्लामी जिहादाची ओढ आणि त्याचे कुटुंबावर पडणारे पडसाद याचं सविस्तर वर्णन नज्वा आणि ओमरच्याच शब्दांत सुंदररीत्या मांडलं आहे. तिसर्या आणि शेवटच्या भागात ओसमाची सुदानमधून झालेली हकालपट्टी, अफगाणिस्तानात केलेलं स्थलांतर, तिथलं खडतर आयुष्य, आणि त्यातून होणारी ओमरची घुसमट,अल- कायदाचा विस्तार, लष्करी छावण्या ओसामाच्या त्याच्याकडून असणार्या अपेक्षा, त्याचा ओसामाला होणारा वाढता विरोध, सरतेशेवटी सर्व शृंखला तोडून ओमर आणि विशेषतः नज्वाने परतण्याचा घेतलेला निर्णय. सगळंच गुंगवून टाकणारं.
'ओसामा बिन लादेन' सौदी अरेबियाच्या एका धनाढय कुटुंबात जन्म झालेला एक धार्मिक मुलगा. त्याच्या कुटुंबाचे सौदीमधे अनेक उद्योगधंदे आहेत. ओसामा स्वतः एक कुशल व्यावसायिक होता. एक साधं सरळ आयुष्य जगणार्या या माणसाच्या आयुष्याला अफगाणिस्तान - रशिया युद्धमुळे कलाटणी मिळते. तो एका धर्मयुद्धात भाग घेतो आणि त्या आगीत संपूर्ण कुटुंबच होरपळून निघतं. 'ओसामा' एक दहशतवादी या पलिकडे एक यशस्वी उद्योजक, धर्मवेडा नवरा, आपल्या मुलांकडून आत्मघातकी हल्लेखोर बनण्याची अपेक्षा करणारा बाप, अल-कायदाचा सर्वेसर्वा, धुरंधर राजकारणी अशी त्याची नवनविन ओळख होत जाते.
नज्वा बिन लादेन ओसामाची मामेबहीण, त्याची पहिली पत्नी, त्याच्या ११ मुलांची आई आणि नवर्याचा शब्द अंतिम मानणारी एक सौदी स्त्री. तिने ओसामाबद्द्ल लिहिणं हेच एक आश्चर्य. परंतु पुर्ण पुस्तकात, ओसमाविरुद्ध अवाक्षरही न काढता त्याच्या वागण्याबद्दल कुठेही तक्रार न करता अतिशय संयतपणे तिने आपला जीवनपट मांडला आहे. खरंतरं ओसामाची बायको यापेक्षाही ती एक आई, तिच्या सवतींची मैत्रिण म्हणूनच ती प्रकर्षाने लक्षात रहाते.
त्याउलट 'ओमर बिन लादेन' ने आपल्या वडीलांचा केलेला विरोध, सर्वसामान्य जीवन जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, आई आणि भावडांवर असलेलं नितांत प्रेम धीटपणे मांडलं आहे. काहीतरी मोठा कट शिजत असल्याची कुणकुण लागल्यावर आपल्या कुटुंबाला त्याच्या परिणामांतून वाचवण्याची ओमरची धडपड, लहान भावंडांना नाईलाजास्तव अफगाणिस्तानात सोड्ताना झालेली त्याच्या मनाची तगमग त्याच्या व्यक्तिमत्त्वातले अनेकविध पैलू उलगडतात.
ओसामाने जिहाद्ला वाहून घेतल्यानंतर आपल्या कुटुंबावर अत्यंत साधं जीवन जगण्याची सक्ती केली. अगदी फ्रिज, ए.सी. सारख्या रोज लागणार्या वस्तूंच्या वापराला त्याने विरोध दर्शवला. मुलांच्या दम्यासाठी अत्यावश्यक इन्हेलरऐवजी मधमाशाच्या पोळ्याच्या तुकडा वापरण्यचा त्याचा आग्रह असे. तोरामोरावरचं सक्तीचं आयुष्य, सुरक्षेच्या कारणस्तव सुदानमधलं चार भिंतीतलं कैद्यासारखं आयुष्य असे बरेच प्रसंग खिळ्वून ठेवतात. पण तालिबान नेता मुल्ला ओमर आणि ओसामाच्या भेटीचा प्रसंग खासच. ओसामाने या भेटीसाठी केलेली व्यवस्था, मुल्ला ओमरने केलेलं दुर्लक्ष, ओसामाचं वाकचातुर्य, मुत्सदेगिरी आणि सरतेशेवटी मुल्ला ओमरने केलेला ओसामाचा जळजळीत अपमान! खिळवून ठेवणारा प्रसंग !
जीन सॅसनच्या इतर पुस्तकांप्रमाणे हे पुस्तकही एक वेगळा विषय हाताळणारं. ओसामाच्या कुटुंबाचे काही निवडक फोटो आणि संक्षिप्त माहीती हे अजून एक वैशिष्ठ्य. 'हातात घेतल्यावर खाली ठेववत नाही' या यादीतलं हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.
ग्रोईंग उप बिन लादेन (Growing up Bin Laden)
नज्वा बिन लादेन, ओमर बिन लादेन आणि जीन सॅसन (अनुवाद-बाळ भागवत)
पृष्ठसंख्या- ३९२
किंमत- ४००/-
ग्रोईंग उप बिन लादेन (Growing up Bin Laden)
नज्वा बिन लादेन, ओमर बिन लादेन आणि जीन सॅसन (अनुवाद-बाळ भागवत)
पृष्ठसंख्या- ३९२
किंमत- ४००/-
याद्या
3482
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान!
छान परिचय करुन दिला आहे या
मस्त माहिती...
सुंदर रित्या पुस्तक परिचय
पुस्तकाचा छान परिचय .
लेखकाने ओसामाचे मानसशास्त्रीय
In reply to पुस्तकाचा छान परिचय . by मनोज श्रीनिवास जोशी
छान पुस्तक परीचय. मिळालं तर
छान.
चांगली ओळ्ख
नक्की वाचायलाच हवं. धन्यवाद!
पुस्तक परीचय आवडला, पण अशी
+१ सहमत
In reply to पुस्तक परीचय आवडला, पण अशी by मराठमोळा
असेच
In reply to पुस्तक परीचय आवडला, पण अशी by मराठमोळा