मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

थंडीची पहिली भेट - रोहीडा

जातीवंत भटका · · भटकंती
थंडीची पहिली भेट - रोहीडा १ ऑक्टोबर २०१०, शुक्रवार, ऑफिसमधली कामं आटपून घरी यायला रात्रीचे १२ झाले आणि तेव्हाच दुस-या दिवशीच्या जीवधन-नाणेघाटाच्या ट्रेकची नकारघंटा वाजली. अखेरीस शनिवारी संध्याकाळी किल्ले रोहीडाला मुक्कामास जाण्याचे नक्की केले. ऑक्टोबर हीट सुरु झाली होती म्हणून रात्रीच किल्ला चढायचं ठरवलं होतं. दुपारचे ४ म्हणता म्हणता निघायला ५.३० झाले. यावेळेस विजया आणि दिपकने उशिर केला. राहूल अगदी आयत्यावेळी गोटात सामिल झाला होता. अभिजीतने प्रणव,परेश आणि पल्लवी अशा ’प’ प्रारंभी सहस्रबुद्धे कुटुंबास निमंत्रित केलं होता. अभिजीतची सहस्रबुद्धेंच्या सॅंट्रो (मला त्या गाडीला पॅंट्रो असं म्हणावस वाटलं) मधे सोय झाली होती. मी-वैशाली(साली), दिपक-विजया, राहूल-वसुधा आणि प्रशांत असे आम्ही सातजण बाईकवर होतो. ६.०० च्या सुमारास आम्ही भोरच्या दिशेने निघालो. वाटेत पेट्रोल भरायला म्हणून थांबलो आणि तिथल्या मॅकडोनाल्ड्मधे रात्रीचा डबा घ्यायचे ठरवले. तिथे गेल्यावर कुणाला कोकाकोलाचे कुणाला डॉमिनोच्या पिझ्झ्याचे तर कुणाला CCD च्या कोल्ड कॉफ़ीचे डोहाळे लागले. परत मॅकडोनाल्डमधे कधीच यायला मिळणार नाही या भावनेने प्रत्येकाने भरमसाठ बर्गर पार्सल घेतले.(काही जणांनी मॅकपफ़हि घेतले होते). मी माझी नेहमीची ब्लॅक कॉफ़ी (विदाउट शुगर) घेऊन बाहेर येउन थांबलो होतो. राहूल-वसुधा दांपत्य कोणता तरी पाईनॅपल पिझ्झा चोपण्यात मग्न होतं. अभिजीत त्यांच्या मदतीला गेला नसता तर अजून अर्धा तास तरी तिथेच गेला असता. तो वेळ सत्कारणी लावावा म्हणून की काय, विजया CCD मधे कप्पा-निर्वाणा कि कसली कॉफ़ी घेऊन आली. त्याच्यावर तरंगणारं फ़्रेश क्रिम अर्ध्याहून अधिक अभिजीतनेच संपवलं. टिमचा वेळ वाचवण्यासाठी केलेल्या या मौल्यवान कामगिरीबद्दल मला अभिजीचा अभिमान वाटला (अर्थात त्याला विजयाने थोड्याफ़ार शिव्या दिल्या पण त्या फ़्रेश क्रिम समोर त्याला त्या फ़ारच शिळ्या वाटल्या असणार यात वाद नाही). पुढचा थांबा होता भोरचं S.T. स्टॅंड !! तिथे चहासाठी थांबलो असतां, कावळ्या वरंधा करून पुण्याकडे येणा-या माझ्या काही दुर्गमित्रांची भेट झाली. गप्पाटप्पा झाल्यावर मोर्चा बाजारवाडीकडे वळवला. बाजारवाडी हे रोहीड्याच्या पायथ्याचे गाव. बाईकवर बसून आलेली मरगळ रोहीड्याच्या अंधूकशा दर्शनाने चालती झाली. बाजारवाडीच्या शाळेमागून एक मळलेली पायवाड गडावर जाते. गावातून बाहेर पडून जरा उंचीवर आल्याआल्या थंडगार वार्‍याच्या झोताने एकदम शहारा आला. थंडीची चाहूल लागली होती. पण नुकत्याच जीर्णोद्धार केलेल्या रोहिडमल्लाच्या मंदीरात आमचा मुक्काम पडणार होता, त्यामुळे मी निर्धास्त होतो. पण वर पोहोचल्यावर आमच्या नशिबी काय वाढून ठेवलंय, याची सुतराम कल्पनाही माझ्या मनाला शिवली नव्हती. इकडे जनता निवांतपणे रोहीड्याची वाट तुडवत होती. रात्रीचे ११.०० वाजले होते. भोर आणि आजूबाजूच्या गावातले सोडीयम व्हेपरचे दिवे आपापले अस्तित्व दाखवत होते. शितल चांदण्यात पायवाट तुडवताना, घामेजल्या चेहर्‍यावर गार वार्‍याचे सुंदर झोत येत होते. अत्यंत मोहवून टाकणारं वातावरण होतं. मधेच एका पठारावर थांबून तिथल्या हिरवळीवर जनता चक्क आडवी झाली आणि मग आकाश दर्शनाचा कार्यक्रम सुरु. कोणी आकाशात दिसणार्‍या विमानांच्या दिशांवरून ते नक्की चेन्नईला चाललं आहे की बंगळूरूला याच्याबद्दल चर्चा झाडत होतं. तर कोणी मृगाला शोधत होतं. बर्‍याच वाटाघाटींनंतर आपल्याला रात्रीच गडावर जायचे आहे, यावर जनतेचे एकमत झाले आणि पुढची वाटचाल सुरू झाली. अखेरीस १२.३० च्या आसपास गडाचे प्रवेशद्वार लागले. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर उजव्या हाताला एक पाण्याचे बारमाही टाके आहे. तिथे पाण्याच्या बाटल्या भरून घेऊन आम्ही मंदीराकडे निघालो. वाटेत अजून एक दरवाजा लागतो. या दरवाज्यावर गजशिल्पे कोरलेली आहेत. एक देवनागरीतला शिलालेखही आहे. असाच एक शिलालेख पाण्याच्या टाकीजवळ देखिल आहे. दरवाजातून आत आल्यावर डोलकाठीची जागा आहे. शेजारीच एका मोठ्ठा अर्धगोलाकृती चिलखती बुरूज आहे. इथून डावीकडे जाणारी वाट मंदीराकडे जाते. मंदीराकडे जाताना बरंच अलिकडे एकदम गलका ऐकू आला. थोडं पुढे जाताच कळलं की जवळपासच्या कोण्या गावातील दहा पंधरा जणांचं एक टोळकं मंदीराच्या ओसरीवर आश्रयाला होतं. गडाचा किल्लेदार संध्याकाळीच मंदीरास टाळं लावून खाली गावात मुक्कामास गेला होता आणि आमच्या मुक्कामाचा बाका प्रश्न समोर उभा ठाकला. त्या टोळक्यातल्या आपापसातील संभाषणातील शिव्या आणि संदर्भ ऐकून त्यांच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही हे लक्षात आलं होतं. आता किल्ल्यावर मुक्कामासाठी निवारा म्हणावं अशा दोनच जागा होत्या त्या म्हणजे रोहीड्याचे चिलखती बुरूज.त्यापैकी एका बुरुजावर वरच्या बाजूला जागा अत्यंत मोजकी जागा होती आणि झोपेत कोणी उठला तर कपाळमोक्षाची भीती ! म्हणून दरवाजातून आत शिरल्यावर उजव्या हाताला जो अर्धवर्तुळाकार बुरूज आहे त्या दिशेने परत फिरलो. तिथे रात्र काढणं हे पहिल्या पर्यायापेक्षा कमी जोखमीचं होतं. भीती होती ती फक्त सरपटणार्‍या मित्रांची. बुरूजावर पोहोचताच जनतेला सोबत बांधून आणलेल्या अर्ध्या मॅक्डोनाल्डची आठवण झाली आणि गोल करून मंडळी बर्गर, फ्रेंच फ्राईज, पनीर रॅप, मॅकपफ आणि काय काय उघडून त्यावर तुटून पडली. प्रशांतने तर उच्छाद मांडला होता. काही मंडळींच्या मॅकपफ वर त्याचा डोळा होता. यथेच्छ हादडून सगळे निवांत झाले आणि गप्पांचा फड रंगला. गारवा हळुहळू वाढत चालला होता. तसा एक एक जण हळुहळू पांघरूणात गुडूप होत होता. पहाटे चारच्या आसपास माझाही डोळा लागला. विजया तर रात्रभर जागीच होती. दोनच तासात फटफटलं आणि सगळे हळुहळू आळोखे पिळोखे देत जागते झाले. उठल्या उठल्या फोटो सेशनला सुरूवात झाली. आम्ही गडफेरीला सुरूवात केली. उन्हं चढायच्या आधी गड उतरणं क्रमप्राप्त होतं. ते कालचं टोळकं अजूनही पेंगतच होतं. पानाफुलांच्या काही निवडक छटा कॅमेर्‍यात बंदीस्त करून आम्ही रोहीड्यावरून पायऊतार झालो. थंडीची सुरवात तर मस्त झाली होती. आता वेध लागले होते पुढच्या भटकंतीचे !! काही छायाचित्रे : -- जातीवंत भटका

वाचने 5867 वाचनखूण प्रतिक्रिया 18

सुकामेवा 01/06/2012 - 17:28
तुमची स्मरण शक्ती बरीच दाडंगी आहे. हा ही लेख आवडला आहे.

प्रचेतस 01/06/2012 - 17:29
मस्त फोटो रे. आमच्या रोहिड्याच्या वारीची आठवण झाली. पावसकाळाची सुरुवात ती. http://misalpav.com/node/12843

स्मिता. 01/06/2012 - 17:43
एक नंबर फोटो आहेत! ६वा (किड्याच्या वरचा) फोटो तर काय म्हणावे, सॉफ्टवेअर वापरून केलेला वाटावा एवढा सुरेख.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

जातीवंत भटका 01/06/2012 - 18:53
समजायच्या का या आम्ही ?? (शोभत नाही हो ~~;) )

चौकटराजा 01/06/2012 - 18:17
वृतांत मस्त ! सर्व फोटू ए वन !

परिकथेतील राजकुमार 01/06/2012 - 18:22
फटू तर दिसत नाहीचेत पण शब्द पण सगळे चौकोन चौकोन दिसत आहेत. फक्त मध्ये काहीतरी 'मॅकडोवेल्स' असे लिहील्यासारखे दिसले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ढब्बू पैसा 01/06/2012 - 19:17
बेवडा कुठचा पर्‍या! कुठे न्यायची सोय नाही तुला ;) अवांतरः भटक्या, मस्त लिहीलं आहेस :P

स्वच्छंदी_मनोज 01/06/2012 - 21:13
मस्तच फोटो... वर्णन मात्र सुरु होतेय ने होतेय तेच संपले... गाडीचा इंधन काटा टाकी फुल्ल दाखवावा आणी पहील्या वळणावरच पेट्रोल संपावे तसे झाले.... :( बाकी आमचा काही वर्षांपुर्वीचा ट्रेक रोहीड्याचा ट्रेक पावसाळ्याचा पहीला ट्रेक होता... त्यावेळेला रोहीडेश्वराचे मंदीर अगदीच भग्न होते... आम्ही रोहीडा करून मग पलीकडे पानवळ गावात उतरून रायरेश्वर आणी केंजळगड केला होता... त्याच्या आठवणी जाग्या झाल्या...

निनाद मुक्काम … 03/06/2012 - 15:22
आमच्या सारख्या अनिवासी पाखरांसाठी प्रत्यक्ष गडावरचे वर्णन अजून रोमांचकारी वाटले असते: व माहितीपूर्ण सुद्धा फोटू झकास आहेत

पैसा 03/06/2012 - 16:57
एवढं सगळं आठवणीने लिहिलंस? धन्य आहेस! सगळे फोटो अप्रतिम! विशेषतः ७ प्राणी अफाटच आलेत!