Skip to main content

मानवी जीवनात धर्माचे स्थान काय?

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी शुक्रवार, 04/05/2012 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. शंकराचार्यावरचा धागा आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचल्या. त्या धाग्यात म्हटले आहे की आपल्या सर्वोच्च धर्मगुरूंविषयी किंवा धर्माविषयी हिंदूंइतके औदासिन्य दाखविणारा दुसरा समाज नसेल!! खरे तर मला "मानवी जीवनात धर्माचे स्थान काय" हा मुद्दा त्याच चर्चेत मांडायचा होता.पण चर्चा अजून भरकटायला नको म्हणून नवा धागा काढत आहे. मुळात धर्माची स्थापना का झाली असावी?माणूस गुहेतून बाहेर आला, समुदाय करून राहायला लागला, शेती करायला लागला त्यावेळी समाजात अर्थातच राजसत्ता नव्हती.जर कोणी दुसऱ्यावर अन्याय केला तर त्याबद्दल जाब विचारायला काही यंत्रणा नव्हती.बळी तो कान पिळी असाच न्याय त्यावेळी असायची शक्यता जास्त.अशा वेळी समाजातील जाणत्या लोकांना अशा प्रकारचा लगाम घालणारी एखादी यंत्रणा असावी असे वाटायला लागले तर ते नवल नाही. यातूनच नक्की कोणती वर्तणूक योग्य आणि कोणती अयोग्य याबद्दल नियमावली पुढे आली. समाजातील ज्या घटकांना अशी नियमावली मान्य नसेल त्या घटकांसाठी "तू नियम मोडलेस तर तुला पाप लागेल" या धर्तीवर पाप-पुण्याची आणि सगळ्यांच्या पाप-पुण्याचा हिशेब ठेवणारी शक्ती म्हणून देवाची संकल्पना पुढे आली. नंतरच्या काळात या नियमांमध्ये कालपरत्वे बदल करून, त्यात भर टाकून एक प्रकारची आचारसंहिता तयार झाली असावी आणि यालाच धर्म असे म्हटले गेले. तेव्हा धर्म म्हणजे समाजात वावरताना पाळायचे नियम. आणि हे नियम अनेक शतकांच्या अनुभवातून तयार झालेले असून अपरिवर्तनीय अजिबात नाहीत. सध्याच्या काळात माणसाची मोबिलिटी आहे तेवढ्या प्रमाणात पूर्वीच्या काळी नव्हती.तसेच सर्व कामे हातानेच करायला लागत. केस कापण्यापासून कपडे शिवण्यापर्यंत अनेक गरजा पूर्ण करायला यंत्रे नाहीत की बाहेर कुठे जाऊन काम होणाऱ्यातले नाही की बाहेरचे कोणी येऊन ते करायची शक्यता नाही. तेव्हा ही कामे गावातल्या गावातच करून द्यायला जीवनाची एक गरज म्हणून सुतार, लोहार, सोनार आणि इतर कामे करणारे बलुतेदार आले.लिहायला-वाचायला शिकविणे हा एक पेशा झाला. तसेच परकीय आक्रमणांपासून संरक्षण करायला सैनिकी पेशा आला आणि इतर कामे करायला विविध पेशे आले. आणि या सगळ्या पेशातील लोकांनी काय करावे यासाठी नियमावलीत बदल केले असायची शक्यता आहेच. या सगळ्या व्यवस्थेत तक्रार करण्यासारखे फारसे काहीच नाही.पण नंतरच्या काळात हे सगळे व्यवसाय पिढीजात झाले. म्हणजे झाडूवाल्याच्या घरी जन्माला आलेल्याला आयुष्यभर झाडू मारायचेच काम करायचे!! मला वाटते की अवनतीला सुरवात त्यापासून झाली. म्हणजे एखाद्याला वेगळे काही करायचे असेल तरी ते कसे करणार? आपल्या नियमावलीत (धर्मात) ते म्हटलेले नाही ना? यातूनच अत्यंत रिजिड अशा जाती निर्माण झाल्या.मग त्या जातींचे अभिमान आले. नियम मोडले तर शिक्षा करायला देव बसला आहे त्या देवाची आराधना करून त्याला खूष ठेवायला हवे हा विचार पुढील काळात बळावला.मग त्यासाठी विविध पूजा-अर्चा, कर्मकांडे, व्रतवैकल्ये आणि इतर अनेक प्रकार आले आणि सगळेच कडबोळे झाले. बरं हे सगळे काही हजार वर्षांच्या काळात evolve झालेले.मुळातले काय आणि घुसडलेले काय हे तपासायला गेले तर त्याचे उत्तर सापडणे केवळ अशक्य.तेव्हा समाजात नितीमत्ता राहावी या उद्देशाने तयार केलेल्या नियमांबरोबरच देवाला खूष करायला केलेली कर्मकांडे, जातीपाती या सगळ्यांची भेसळ "धर्म" या प्रकारात झाली. सध्याच्या काळाचा विचार केला तर आपल्याला दिसून येईल की समाजात नितीमत्ता ठेवायला योग्य प्रकारे बनविलेले कायदे आणि ते कायदे योग्यपणे राबविणारी पोलीस आणि न्यायसंस्था ही घराबाहेरील जीवनासाठी आणि घरातील जीवनासाठी भारतातच पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या चांगल्या गोष्टी: कुटुंबियांची एकमेकांविषयीची कर्तव्ये वगैरे गोष्टी पुरेशा आहेत. मुळातला धर्म तरी काय वेगळा होता? संपूर्ण महाभारताचे सार व्यासांनी एका ओळीत सांगितले आणि ते म्हणजे "दुसऱ्याच्या उपयोगी पडणे म्हणजे पुण्य आणि दुसऱ्याला त्रास देणे म्हणजे पाप". मुळातला धर्म यापेक्षा वेगळा असेल असे वाटत नाही. तेव्हा मिसळपावसारख्या वेबसाईटवर लेखन करणाऱ्या (म्हणजे सुशिक्षित आणि चांगले-वाईट काय याचा विचार करायची क्षमता असलेल्या) वर्गाच्या दृष्टीनेतरी ज्याला सध्या धर्म म्हटले जाते त्या कडबोळ्याचा उपयोग काय?देव म्हणावा तर तो पण "पाप-पुण्याचा अकाऊंटंट" म्हणून माणसानेच जन्माला घातलेला.तेव्हा त्याला खूष ठेवायला केलेल्या पूजा-अर्चा पूर्णपणे निरर्थक.समाजात वावरायचे नियम म्हणाल तर सध्याच्या काळाला अनुसरून असलेले जास्त योग्य नियम सध्याच्या कायद्यात बघायला मिळतील. (कायदा चुकीचा आहे असे कोणाला वाटत असेल तर अधिक योग्य कायदे आपल्यालाच बनवता येऊ शकतात/शकतील). आणि एखाद्या घरी जन्माला आल्यामुळे ते कडबोळे खायला मिळत असेल तर त्याबद्दल वाटणारा अभिमान ही आणखी अनाकलनीय गोष्ट.कारण त्या कडबोळ्याचा गाभा (सद्वर्तनाचे नियम) इतर घरात जन्माला आलेल्यांकडे नसतो हे म्हणणे अतिशय चुकीचे आहे. तेव्हा सध्याच्या काळात धर्म आणि देव हा प्रकारच रद्दबादल केला तर नक्की काय बिघडेल?व्यक्तिश: माझे तरी त्यामुळे अजिबात काहीही बिघडणार नाही.कारण कोणतेही प्रलोभन किंवा कोणतीही भिती नसेल तरी इतर कोणालाही त्रास देऊ नये आणि शक्य तेवढे इतरांच्या उपयोगीच पडावे असे मला मनापासून वाटते (ते अंमलात किती आणणे शक्य होते ही गोष्ट वेगळी). आणि ही गोष्ट फार स्पेशल अशी नक्कीच नाही तर माणसामध्ये असलेला हा किमान चांगुलपणा आहे. तो धर्म या संकल्पनेचे नावही न ऐकलेल्या लहान मुलांमध्येही बघायला मिळतो. तसेच देवाला खूष ठेवायचे म्हणाल तर गणेशोत्सवात आमच्या पुण्यात होणाऱ्या कर्णकर्कश धांगडधिंग्याचा किंवा कधी मुंबईला गेलो तर लोकल ट्रेनमध्ये म्हटल्या जाणाऱ्या भजनांचा मला स्वत:ला तर त्रासच होतो आणि हे प्रकार नसते तर किती बहार आली असती असेच मला वाटते.मी कधीही कोणतीही पूजा करायला जात नाही की कोणतेही स्तोत्र म्हणत नाही. तेव्हा धर्म आणि देव या दोन्ही गोष्टी कॅन्सल करून टाकल्या तरी मला स्वत:ला त्याचा काहीही फरक पडणार नाही (किंबहुना वैयक्तिक पातळीवर मी या दोन गोष्टी कधीच कॅन्सल केल्या आहेत). इतर मिसळपावकरांना याविषयी काय वाटते? धर्माचे आपल्या जीवनातील नक्की स्थान काय?

वाचने 27756
प्रतिक्रिया 88

प्रतिक्रिया

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

मग आपण खाली वाकून दगड उचलून फेकल्याचा अभिनय केला तरी समोरचे कुत्रे पळून का जाते? पळून जाणे ही कृती बेसिक इन्स्टिन्क्टस मधे येते की हा आपल्याला मारेल म्हणुन जीव वाचवावा असा निर्णय असतो? पाळीव मांजर भुक लागली की त्याच्या मालकाच्या/मालकिणीच्या अंगाला अंग घासून म्याव म्याव करतात आणि भुक लागल्याचे सुचित करतात. त्याच वेळेस दुसरे कुणी अनोळखी तिथे असल्यास त्यांच्या अंगाला अशा प्रकारे अंग घासून भुक लागल्याचे सुचित करत नाहीत. मालक कोण आहे, आपल्याला रोज दुध कोण देते ही प्राण्यांना असलेली ओळख बेसिक इन्स्टिंक्ट असते की त्यांनी पुर्वानुभवावरुन असा निर्णय घेतलेला असतो? विचार शक्ती हीच जजशक्ती असते का हा वेगळा प्रश्न आहेच.

In reply to by नाना चेंगट

माशांमधील शार्क, व्हेलसारखे मासे माणसांशी ज्या पद्धतीने रिअ‍ॅक्ट होतात, तसे डॉल्फिन का होत नाहीत? ते लवकर का माणसाळतात? कारण त्यांना नक्कीच अधिक बुद्धिमत्ता असते. वाघ-सिंहापेक्षा हत्ती-घोड्यांमध्ये शिकवलेले लक्षात ठेवण्याची शक्ती अधिक का असते? कारण प्राण्यांमधील बुद्धिमत्तेच्या व विचारशक्तीच्या पातळ्या निसर्गाने भिन्न आणि मर्यादित ठेवल्या आहेत. माणूस घडलेल्या/पुढे घडणार्‍या घटनेवर विचार करु शकतो व वर्तनात बदल करु शकतो. प्राण्यांना ती ताकद नाही. मानवाला मल्टिपल इंटेलिजन्सचे (बहुविध बुद्धिमत्ता) वरदान उत्क्रांतीच्या टप्प्यात मिळाले आहे. त्यामुळे विचारशक्तीचा प्रगत टप्पा म्हणजे चिकित्साशक्ती. प्राण्यांना विचारशक्तीच मर्यादित असल्याने बहुविध बुद्धिमत्ता नाही. कुत्रा ५००० हून अधिक प्रकारचे वास लक्षात ठेऊन त्याचे विश्लेषण करु शकतो, पण या निसर्गदत्त देणगीचा वापर मर्यादित करायचीच त्याला बुद्धी आहे. उदाहरणार्थ - तुम्ही कुत्र्याला फिरायला नेता तेव्हा त्याला अनोळखी मार्गाचे ज्ञान नसते. खुणा लक्षात ठेवण्याचे ज्ञान नसते. अशावेळी कुत्रा रस्त्याकडेला त्याला स्थिर वाटणार्‍या झाडांवर/दगडांवर सातत्याने मूत्रविसर्जन करत जातो. स्वतःच्या मूत्राचा वास व दुसर्‍या कुत्र्याच्या मूत्राचा वास यात तो विश्लेषण करु शकतो. याचा उपयोग कुत्रा रस्ता चुकला तरी तो अचूक शोधून काढण्यात करुन घेतो. जंगलात प्राण्यांची अधिकारक्षेत्रे याच वासांवर ठरतात किंवा नर-माद्यांना आकर्षित करण्यास हाच गंध उपयोगी ठरतो. कुत्र्याच्या याच ताकदीचा वापर मानवाने करुन घेतला आहे. गुन्हेगारांचा/हरवलेल्या व्यक्तींचा माग काढताना किंवा बॉम्ब/अंमली पदार्थ हुडकून काढताना पोलिसांना प्रशिक्षित कुत्रा उपयोगी पडतो. पण कुत्र्याच्या या देणगीचा वापर सुगंधांच्या विविध छटांचे विश्लेषण करण्यात मात्र होत नाही. तिथे मानवी नाकच उपयोगी पडते. कारण मानवी मेंदू कुत्र्याहून कमी वास आठवणीत ठेवत असला तरी विश्लेषणानंतर भिन्न दुवे जुळवण्याची मानवी मेंदूची क्षमता अफाट असते. एक उदाहरण घ्या. समजा आपण कृत्रिम मृदगंध (मातीचा वास) निर्माण केला आणि कुत्र्याला हुंगवला तर तो पुढे त्या बाटलीचा माग काढत जाईल व तेथेच थांबेल. माणसाने मात्र हा वास हुंगला, की त्याचा मेंदू पूर्वी कधीतरी तापल्या मातीत पडलेला पाऊस, त्यातून उठणार्‍या वाफा, असा अनुभवलेला प्रसंग, त्याच्याशी निगडित अन्य स्मृतींचे दुवे एकत्र सांधतो.(वास घरासमोरच्या अंगणात आला होता, की शेतात? बालपणी की तरुणपणी? झोपेत की खेळत असताना? इ. ) राग येणे, हल्ला करणे, प्रतिकार करणे, आहार-निद्रा-भय-मैथुनाची नैसर्गिक ओढ इथपर्यंत प्राण्यांच्या व मानवांच्या प्रेरणा समानच असतात, पण स्मृतीआधारे विश्लेषण करताना पश्चात्ताप ही भावना मात्र केवळ मानवात आहे. प्राणी एकमेकांना मारतात त्यांना पश्चात्ताप होत नाही. माणूस इतर प्राण्यांना किंवा सजातीयाला मारतो तेव्हा त्याला पश्चात्ताप होतो. (आजकाल तसेही म्हणायची सोय उरलेली नाही. :))

In reply to by योगप्रभू

याचाच अर्थ असा की सरसकटपणे आपण प्राण्यांना विचारशक्ती, निर्णयशक्ती, स्मृतीशक्ती (थोडक्यात मन, बुद्धी, स्मृती) नसतातच असे म्हणू शकत नाही. त्यांची इयत्ता कमी जास्त असेल पण तसे तर मानवांमधे सुद्धा दिसतेच की ! :)

In reply to by नाना चेंगट

आपल्याला नक्की कशापासून धोका आहे आणि कोण आपली भूक भागवू शकेल या नैसर्गिक प्रेरणा प्राण्यांमध्ये असतात. एखाद्या कुत्र्याला यू यू करून बोलावले तर त्याला असलेल्या नैसर्गिक प्रेरणेने (हा मनुष्य आपल्याला खायला देईल असे वाटून) तो शेपूट हलवत अनोळखी माणसाच्या पण जवळ येईलच.तसेच काठी हातात असलेल्या अनोळखी माणसापासून तो दूर पळेल. त्यातून एकदा आलेल्या अनुभवावरून तो प्राणी संबंधित माणसाजवळ जायचे की पळून जायचे हे ठरवेल.पण यात प्राण्याचे भूक भागवणे किंवा धोक्यापासून दूर जाणे या नैसर्गिक प्रेरणा कारणीभूत आहेत. त्यापलीकडे जाऊन प्राणी जज करत नाहीत.

In reply to by विटेकर

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अजून जास्त नंतर लिहितो. तरीही
धर्म ही एकमेव गोष्ट मनुष्यास प्राण्यांपासून वेगळी करते.
मला वाटत होते की विचारशक्ती ही गोष्ट माणसांना प्राण्यांपासून वेगळी करते.

In reply to by विटेकर

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अजून जास्त नंतर लिहितो. तरीही
धर्म ही एकमेव गोष्ट मनुष्यास प्राण्यांपासून वेगळी करते.
मला वाटत होते की विचारशक्ती ही गोष्ट माणसांना प्राण्यांपासून वेगळी करते.

In reply to by विटेकर

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अजून जास्त नंतर लिहितो. तरीही
धर्म ही एकमेव गोष्ट मनुष्यास प्राण्यांपासून वेगळी करते.
मला वाटत होते की विचारशक्ती ही गोष्ट माणसांना प्राण्यांपासून वेगळी करते.

In reply to by विटेकर

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अजून जास्त नंतर लिहितो. तरीही
धर्म ही एकमेव गोष्ट मनुष्यास प्राण्यांपासून वेगळी करते.
मला वाटत होते की विचारशक्ती ही गोष्ट माणसांना प्राण्यांपासून वेगळी करते.

In reply to by विटेकर

१. धर्म हा शब्द फक्त हिंदू धर्मालाच लागू होतो..
३. धर्माची आवश्यकता काय ? आहारनिद्राभय मैथुनंच सामान्यमेतम पशुनिर्भराणाम | धर्मोहीतेषाम अधिकोविशेषो धर्मेणहीना: पशु भि: समाना: || आहार , निद्रा, भय आणि मैथुन ह्या मूलभूत गरजा मनुष्य आणि प्राणी यांच्यात सारख्याच असतात ! धर्म ही एकमेव गोष्ट मनुष्यास प्राण्यांपासून वेगळी करते.
या दोन मुद्द्यांवरून असा निष्कर्ष काढता येतो की जगातले सर्व लोक धर्माने हिन्दू आहेत. नाहितर ते प्राणी ठरतात आणि धर्म एकच आणि पंथ अनेक म्हटल्यास पुढे जाउन असेही म्हणता येइल की ख्रिश्चन, इस्लाम हे हिंदु धर्माचेच पन्थ आहेत .. :-)

In reply to by बाळ सप्रे

आणि धर्म एकच आणि पंथ अनेक म्हटल्यास पुढे जाउन असेही म्हणता येइल की ख्रिश्चन, इस्लाम हे हिंदु धर्माचेच पन्थ आहेत .. कदाचित आपण उपहासाने असे म्हणत असाल ..! पण होय .. असे म्हणता येईल. किंबहुना असे निश्चितच म्हणता येईल .. प्रश्न असा आहे की तथाकथित धर्म(पंथ ) मार्तंडाना .. अगदी हिंदूमधील देखील .. हे मान्य होणार नाही. स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या परिषदेत नेमका हाच मुद्दा मांडला होता.. त्या सर्वसमावेशक धर्मांला हिंदू नाही म्हंटले तरी फारसे बिघडत नाही ! Rose with any other name smell exactly like Rose ! पण लक्शात कोण घेतो ? हिंदू धर्माच्या मूलभूत तत्वानुसार जर चराचरात परमेश्वर भरला आहे.. सजीव सोडाच खांबासारख्या निर्जीव वस्तूतून साक्षात नरसिं ह प्रक्ट होऊ शकतो.. तर ख्रिश्चन, इस्लाम ही तर तुमच्या- माझ्यासारखी माणसेच आहेत ना? ती " परकी " कशी असतील? मा़झी आई देवीची उपासना करते , तर वडिल अथर्वशीर्ष पठण करतात , मोठा भाऊ हनुमंताचा भक्त आहे तर मी समर्थ भक्त आहे.. म्हणून आमच्यात अंतर्विरोध आहे का ? हीच भूमिका विशाल केली तर ३३ कोटी देवांत एक यशू मसिहा आणि प्रेषित महंमद समाविष्ट होणार नाहीत का? ती तर सा़क्षात परमात्म्याचीच रुपे आहेत ! तेव्हा सार्या उपासना पद्धती त्या एकाच परम तत्वाकडे जातात .. केशवं प्रति गच्छति | जेव्हा माझीच उपासना पद्धती श्रेष्ठ , माझाच मार्ग खर्या मोक्षाचा, केवळ येशूच , केवळ महंमदच , केवळ आमचेच महाराज ... तेव्हा खरे प्रश्न निर्माण होतात.. या असल्या बेगडी अभिनिवेशामुळेच रक्तपात होतो.. !

In reply to by विटेकर

परत एकदा आपम अप्रतिम प्रतिसाद दिला आहेत. I died a mineral and became a plant. I died a plant and rose an animal. I died an animal and I was man. Why should I fear? When was I less by dying? Yet once more I shall die as a man, to soar with the blessed angels; but even from angel hood I must pass on. All except God perishes. When I have sacrificed my angel soul, I shall become that which no mind ever conceived. O let me not exist! For Non-Existence proclaims, “To HIM we shall return” Jalal ud-Din ar-Rumi– A thirteenth century Persian poet.

माशांमधील शार्क, व्हेलसारखे मासे माणसांशी ज्या पद्धतीने रिअ‍ॅक्ट होतात, तसे डॉल्फिन का होत नाहीत? ते लवकर का माणसाळतात? कारण त्यांना नक्कीच अधिक बुद्धिमत्ता असते. वाघ-सिंहापेक्षा हत्ती-घोड्यांमध्ये शिकवलेले लक्षात ठेवण्याची शक्ती अधिक का असते? ज्यावेळी एखादा प्राणी अधिक माणसाळलेला असतो , तेव्हा तो संस्कारांचा प्रभाव होय ! असे संस्कार करून एखाद्या प्राण्याचा प्रतिसाद निश्चित ( moderate ) करणे म्हणजेच त्याला " धार्मिक " करणे होय, आणि मग जेव्हा माणसे अश्या अर्थाने धार्मिक नसतात , तेव्हा " माणसापरासं मेढरं बरी ! असे म्हणायची पाळी येते. सजीव ( मनुष्य आणि इतर सर्व योनी , झाडेसुद्धा समाविष्ट ) प्रतिक्रिया देतात तेव्हा त्या खालील दोन प्रकारच्या असतात : १. जीजिगिषु ( Flight ) २. विजिगिषु ( Fight ) त्या नेमक्या प्रसंगी कोणता प्रतिसाद निवडायचा हे त्या त्या सजीवाच्या पूर्व संस्कारांवरती अवलंबून असते , ज्याला हिंदू प्रारब्ध ( कर्मानुसार बुद्धी ) असे म्हणतो , त्यात बदल करणे म्हणजे पुरुषार्थ ( बुद्धीनुसार कर्म ) ! स्टिवन कोवे सारखा अमेरिकन खालीलप्रमाणे त्याचे विश्लेषण करतो .. STIMULEE--- > RESPONSE is depend upon 1. Self Awareness 2. Imagination 3.conscience 4. independant Will या सार्याला मिळूनच मी पूर्व संस्कार असे म्हणतो .. यापैकी ..Self Awareness म्हणजे सत सत विवेक बुद्धी ! आणि येथेच धर्माचा संबंध येतो .. धर्माची जी चौकट आहे .. ज्या चौकटीने समाजाला, पर्यायाने जीवाला धारण केले आहे .. त्या चौकटीत राहणे हेच धर्माचरण, ( अर्थात रुढी , परंपरा, कुळधर्म , कुळाचार म्हणजे निश्चितच धर्म नव्हे ! ) आणि ज्यावेळी धर्माचरण म्हणजे नेमके काय अशी गल्लत होते तेव्हा.. महाजनो येनं गतस्यं पंथः |

वटवाघूळ/हत्ती/सिंहराव, हा धागा मी वाचनमात्र असताना वाचतच होतो. गेले काही दिवस लिहायचे असे म्हणतच होतो पण या ना त्या कारणाने ते जमले नाही. तुम्ही लिहिले आहे ते पटले. रूढार्थाने मी पण कोणताच धर्म पाळत नाही किंबहुना धर्म/कर्मकांड यासारख्या गोष्टींना मी पण फाट्यावर मारतो (नव्हे जात्यात घालून दळतो). पण धर्म ही एक अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे.ती पाळायची की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न.तुम्हाला ती पाळायची नसेल तर झाले तर मग.परत ही चर्चा कशाला? कालच्या "सांगे वडिलांची किर्ती" चर्चेतील तुमचे विचार वाचले. साधारण त्याच लाईनवरील विचार आहेत हे पण. तेव्हा परत प्रतिसाद द्यायचा मोह टाळता आला नाही. परत एकदा सांगतो साहेब दमाने घ्या. तुम्ही म्हणत आहात की धर्म/बेसिकमधले लोच्ये यापेक्षा विचार करायला अधिक चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आहेत. संभाजीराजांवरील चर्चेत ते दिसूनही आले आहे.तुमचे अशा चर्चांमधील विचार वाचायला आवडतील. नका उगीच धर्म/अभिमानवाल्यांच्या तोंडी लागू हा परत एकदा अनाहूत सल्ला.