Skip to main content

मिपा संपादकीय - "अब और कितना गिरना बाकी है "?

लेखक संपादक यांनी रविवार, 27/07/2008 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद...
"अब और कितना गिरना बाकी है "?
२००५ मध्ये "मातृभूमी ए नेशन विदाउट विमेन" नावाचा सिनेमा पाहिला..बरीच परीक्षणं वाचलेली होती,गोष्ट माहित होती, आपण एक सामाजिक आशय असलेला सिनेमा पाहून संदेश वगैरे घेऊन प्रसन्न मनाने बाहेर पडणार इतकी बाळबोध अपेक्षा नव्हती तरी सिनेमा इतका त्रास देऊ शकेल असंही वाटलं नव्हतं... लिंगभेद, स्त्रीभ्रूणहत्या, जातिभेद यांचं इतकं भडक भयानक रूप पाहताना कोणीतरी कानाखाली आवाज काढल्यासारखं वाटलं.....बाहेर येताना सुन्न वगैरे झालोच, मग एक पहिली प्रतिक्रिया म्हणजे एका संवेदनशील विषयावर इतका भडक सिनेमा बनवल्याबद्दल "मनीष झा'ला यथेच्छ शिव्या घातल्या... पुढचे काही दिवस "मला सिनेमा अजिबात आवडला नाही " असे म्हणत राहिलो " असं कुठे असतं का? आपला समाज इतका काही वाईट व्हायचा नाही "अशा डिनायलमध्येही गेलो....त्यालाही काही अर्थ नव्हता...या विषयावर गुळमुळीत, सपक, गोग्गोड सिनेमा कसा बनवणार होता तो ? आणि समजा बनवला असता तरी इतका भिडला असता का? तंत्रज्ञान जसं वाढत गेलं तशा गर्भलिंगनिदानाच्या टेस्ट अधिकाहिक विश्वसनीय, परवडणार्‍या होत गेल्या पण त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्येचं प्रमाण फ़ार वाढलं. १९९४ला स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कायदा झाला व गर्भलिंगनिश्चितीवर बंधने घालण्यात आली. तरी १९९१ मध्ये भारतातील स्त्रियांचं प्रमाण हजारी ९७१ होतं ते २००१ च्या सुमारास ९४१ इतकं कमी झालं.असल्या प्रॊब्लेमचं मूळ खेड्यात आणि अशिक्षित जनतेत असावं असा गैरसमज मी सुद्धा अनेक वर्षं जोपासला. पण आकडेवारी काही वेगळंच सांगते. हरयाणा आणि पंजाबमधल्या काही सधन जिल्ह्यांमध्ये स्त्रियांचा जन्मदर ८५०च्याही खाली उतरला आहे, असं ऐकतो... महाराष्ट्र प्रगत आहे, तिथे असलं नसेल किंवा कमी असेल असं मानण्याचं काही कारण नाही..उलट भारतातील सर्वात जास्त अल्ट्रासाउंड क्लिनिक्स महाराष्ट्रात आहेत आणि जिथे अल्ट्रासाऊंड क्लिनिक्स जास्त तिथे जुवेनाईल सेक्स रेशो घटतोच हे नक्की सिद्ध झाले आहे. ...श्रीमंत आणि प्रगतिशील जिल्ह्यांमध्ये , कारखाने आणि बागायती असलेल्या जिल्ह्यांमध्ये स्त्रीभ्रूणहत्या जास्त दिसते...पुणे मुंबई, कोल्हापूर, नाशिक आणि सांगली हे जिल्हे यात प्रचंड आघाडीवर आहेत.... ( आणि अरुणाचल, मणिपूर आणि छत्तीसगढमधले आदिवासी बहुसंख्य असलेले काही जिल्हे असे आहेत जिथे स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक आहेत.) जालावरच्या एका चर्चेत सुशिक्षितांपैकी अनेक जण व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली लिंगनिश्चितीचं समर्थन करताना पाहिले तेव्हा अंगावर काटा आला. हायकोर्टात याचसंदर्भात एका जोडप्याने गेल्या वर्षी एक याचिका दाखल केली होती, "पहिली मुलगी असल्यास आम्हाला दुसर्या मुलासाठी लिंगनिश्चितीचा अधिकार मिळायला हवा..माझ्या कुटुंबाचा समतोल राखणं हा माझा मूलभूत मानवी अधिकार आहे" असं त्यांचं म्हणणं होतं....ही याचिका हायकोर्टने कडक शब्दांत फ़ेटाळली की अशी परवानगी देणं हे स्त्रीभ्रूणहत्येला कायदेशीर परवानगी दिल्यासारखं होईल ... ती याचिका फ़ेटाळली म्हणून बरे...तशाही पळवाटा आहेतच... १९९४ च्या गर्भनिदान विरोधी कायद्यान्वये खालील कारणासाठी गर्भपातांना परवानगी आहे १....(failure of contraception) चुकून झालेली / नको असलेली गर्भधारणा.. २....( genetic abnormality) गर्भामध्ये काही गंभीर आजार / डिफ़ॊर्मिटी असतील तर परंतु याच गोष्टी इच्छुकांसाठी उत्तम पळवाटा आहेत... एका हॊस्पिटलमध्ये नोकरी करणार्या सोनॊलोजिस्टने सांगितलेली गोष्ट प्रातिनिधीक मानता येईल... त्यांनी एका जोडप्याला गर्भलिंगनिदानासाठी स्पष्ट शब्दांत नकार दिला आणि हे बेकायदेशीर आहे अशी जाणीव करून दिली. मग त्यांनी बाहेरून कुठून तरी लिंगनिश्चितीचे काम करून घेतले, आणि पुन्हा त्याच हॊस्पिटलला येऊन गायनॆकॊलोजिस्टकडे जाऊन पुढचा कार्यभाग उरकला...अशा वेळी हे जोडपे त्या गायनेकॊलोजिस्टला ही नको असलेली गर्भधारणा आहे असे कारण देते.... ते सोनॊलोजिस्ट म्हणाले, "हे असेच चालू असते, मी तरी काय करू शकतो?" मला या बाबतीत दोन महत्त्वाचे मुद्दे मांडावेसे वाटतात... ... १. डॊक्टरांनी जबाबदारीने वागायची आवश्यकता... वरील उदाहरणात जर बाहेरच्या डॊक्टरांनी गर्भलिंगनिदान सांगितलेच नाही तर हे घडायचा संबंधच येत नाही... बहुसंख्य डॉक्टर जरी हे नियम पाळत असले तरी थोड्या पैशांच्या मोहाने हे सारे करणारे डॉक्टरही आहेतच... याला कोणतेही नैतिक कारण वगैरे असेल असे पटण्यासारखेच नाही... ...असाही एक किस्सा वाचला होता की एक डॊक्टर कायद्याच्या भीतीने स्पष्ट लिंगनिदान सांगत नसत परंतु पुढची अपॉइन्ट्मेंट monday ला दिली तर मेल आणि friday ला दिली तर फ़ीमेल अशी त्यांची पद्धत होती.( त्याबद्दल इतर स्टाफ़कडून पेशंटला आधीच पढवून ठेवण्यात येत असे).. आता या डॊक्टरला कसं काय पकडणार? एक दक्षिण महाराष्ट्रातले एक मोठे गायनॆकॊलोजिस्ट आहेत ... ३० वगैरे वर्षांची प्रॆक्टिस, मुलगा सून वगैरे सुद्धा डॊक्टर्स, रेप्यूटेड मोठे हॊस्पिटल वगैरे वगैरे झकास आहे.. पण त्यांना बेकायदेशीर गर्भपाताच्या कायद्यान्वये अटक होऊन त्यांचं सोनोग्राफी मशीन सील केलं गेलं, हा पेपरातला फोटो पाहून माझ्या काकानं मला माहिती दिली की त्यांना काही वर्षांपूर्वी सुद्धा अशीच अटक झाली होती, आरोप सिद्ध न होता त्यांना सोडून देण्यात आलं.... म्हणजे एकदा अटक होऊनही त्यांचं काम चालूच राहिलं होतं... इतकी वर्षं प्रचंड कमावूनसुद्धा हेच काम पुन्हा आपल्या मुलाला सुनेला करायला लावणार्या या डॉक्टरांना केवळ पैशांचं मोटिव्हेशन असेल की अजून काही उदात्त विचार असतील ? मला तरी काही उत्तर सापडलं नाही... जनाची नाही निदान मनाची तरी लाज ठेवावी...? मग कन्व्हिक्शन नसल्यामुळे अशा डॊक्टरांना कायद्याचं भय उरलेलं नाही, कायदा अजून कडक केला पाहिजे, दंड वाढवला पाहिजे, सक्तमजुरी वाढवली पाहिजे वगैरे सारं ठीक आहे पण डॊक्टरांची आणि एकूणच समाजाची मानसिकता बदलेपर्यंत हा मार्ग प्रभावी ठरेल असे मला वाटत नाही. ( कायद्याचा बडगा आणि पोलीस असल्याशिवाय आपण चांगलं वागूच नये का ? दंडुका घेतलेल्या पोलिसानं किती कायदे इम्प्लिमेंट करायचे ? सगळी जबाबदारी पोलिसांचीच का? पोलीसांनी दंगली खून दरोडे यांचा तपास करायचा की तुमचा पोरगा हुक्का ,सिगरेट, ड्रग्ज ओढतो का ते पहायचे? असा प्रश्न एका टॊक शो मध्ये पोलीस अधिक्षक नांगरे पाटलांनी विचारल्याचं इथे आठवतं.. ) २.लिंगभेदाची मानसिकता बदलायची गरज ... ....आपल्याकडे आशीर्वाद तरी कसे असतात? पुत्रवती भव वगैरे.... कथा कादंबर्‍यांतूनसुद्धा देशरक्षणासाठी शूर पुत्र होऊ दे वगैरेच भाषा.... का?.नवीन लग्न झालेल्या बाईला आडून आडून का होईना " मुलगाच हवा" वगैरे टाईपातले सूचक इशारे, कधी टोमणे, घरगुती समारंभात मुलगा असलेल्या बाईला स्पेशल प्रिव्हलेजेस असणे, हुंडा आणि लग्नसमारंभाचा प्रचंड खर्च वधुपित्याला करावा लागणे ( इथे माहितीतला एक आय टीमध्ये काम करणारा एक आंध्रातला इंजिनियर आठवतो जो स्वत:चा लग्नाच्या बाजारातला भाव अंमळ अभिमानानेच २० लाखापर्यंत असेल असे सांगत होता) या असल्या गोष्टीच गर्भवती स्त्रीवरचा मानसिक ताण प्रचंड वाढवत असणार यात शंका नाही. त्यातूनच ती कुटुंबाच्या दबावामुळे स्त्रीभ्रूणहत्येचा टोकाचा निर्णय घेत असणार... एका दूरच्या नातेवाईक स्त्रीने पहिल्या मुलीनंतर मुलासाठी तीन वेळा गर्भपात करून घेतला होता, असं ऐकलं.... तिचे विचार असे की ती स्वत: तीन बहिणींबरोबर एकत्र वाढलेली होती आणि तिला म्हणे तिच्या मुलीचं असं होऊ द्यायच नव्हतं. ( असं म्हणजे नक्की कसं ते काही मला कळलं नाही आणि तिचंही तेच म्हणणं होतं की बाकीच्यांना काय कळणार माझ्या भावना?") मातृभूमी सिनेमा पाहिला त्याच काळात एका नातेवाईकांकडे गेलो होतो आणि तिथे महिलावर्गाची आसपास कोणाकडेतरी मूल जन्माला आल्यानंतर काही गुंतागुंत होऊन दुर्दैवाने वाचले नाही , यावर काही चर्चा चालू असताना एक बाई एकदम म्हणाल्या ," ... आणि मुलगा होता हो...." सगळ्या बायकांनी संमतीदर्शक माना हलवल्या...मी जाम उखडलो, "याचा अर्थ काय , तर ती गेलेली मुलगी असती तर तुम्हाला कमी दु:ख झालं असतं, असंच ना?" मान्यय, या सगळ्या मनात खोलवर रुजलेल्या गोष्टी असतात, पण प्रयत्नपूर्वक त्या कमी तर करायला हव्यात... जिथे अशा गोष्टी दिसतात, अशा रूढी-परंपरांना क्वेश्चन तरी करायला हवं.. ही जबाबदारी कोणाची ?? आपण ते करतो का? की हा तर प्रत्येकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न म्हणून गप्प बसतो ? की कधी हा आगदी चावून चोथा झालेला विषय म्हणून दूर ढकलत राहतो?? साहजिक आहे , मग साउथ दिल्लीचा सेक्स रेशो पोचतो ७६२ वरती आणि बोरीवलीमधला ७२८ वरती... दहा पंधरा वर्षांत आपण केवढे खाली गेलो आहोत...अजून पाच दहा वर्षांत हे आकडे ६०० होतील, ५०० सुद्धा होतील कदाचित.....हे असंच चालू राहिलं तर मातृभूमी सिनेमातलं मनीष झानं वर्तवलेलं भविष्य फ़ार दूर नाही.. म्हणूनच म्हणतो, "अब और कितना गिरना बाकी है "? पाहुणा संपादक : भडकमकर मास्तर.
विशेष

वाचने 41673
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

या मुलींवरील अत्याचारांमुळे/भृणहत्यांमुळे एक विचित्र गोष्ट झालीये. सगळेजण मुलींचीच बाजू घेतात आणि एखाद्या जोडप्याला मुलगा हवा हे म्हणणं अवघड होऊन बसलय. दरवेळी त्यात मुलगा आणि मुलगी हा भेद असतोच असे नाही. "आम्हाला मुलगी झाली तर आनंद होईल." असे म्हणणार्‍या जोडप्यांकडे आदराने पाहिले जाते तर्'मुलगा हवासा वाटतोय' म्हटले की झाले कल्याण! खरी लिंगनिरपेक्षता तीच म्हणता येईल जेंव्हा दोन्ही जीवांना सारख्याच आनंदाने स्विकारले जाईल. चीनमध्ये म्हणे मुलाला हुंडा द्यावा लागतो, बायको आणण्यासाठी. माझ्या कॉलेजात एक चीनी मुलगी नोकरीतून ठराविक रक्कम आपल्या भावाला मदत म्हणून साठवत असे......त्याचे लग्न लवकर व्हावे म्हणून.

आपल्याकडे आशीर्वाद तरी कसे असतात? पुत्रवती भव वगैरे.... कथा कादंबर्‍यांतूनसुद्धा देशरक्षणासाठी शूर पुत्र होऊ दे वगैरेच भाषा.... का?.नवीन लग्न झालेल्या बाईला आडून आडून का होईना " मुलगाच हवा" वगैरे टाईपातले सूचक इशारे, कधी टोमणे, घरगुती समारंभात मुलगा असलेल्या बाईला स्पेशल प्रिव्हलेजेस असणे, हुंडा आणि लग्नसमारंभाचा प्रचंड खर्च वधुपित्याला करावा लागणे
हाहा.. लग्नातही मुलगा 'चिरंजीव' आणि नवरी मुलगी 'चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी' असते. आणि याबद्दल अगदी तिच्या घरच्या कुणालाही काही वाटत नाही. आणि चुकून जर हे 'चिरंजीव' आपलं चिरंजीवीत्व हरवून बसले की.... असो!!

उत्तम लेख ! लेख उत्तम आहे ह्यात शंका नाही , पण खुप जुना आहे , जवळपास १४ वर्षे जुना ! इतक्या वेळात पुलाखालुन खुप पाणी वाहुन गेले आहे ! आधीच्या पिढीने केलेल्या पापांची फळं आता आजच्या पिढीला भोगायला लागत आहेत ! आमच्या सातार्‍याच्या गल्लीतील कित्येक तरुण ३०-३५ पुढे जाऊन अजुनही गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलेले आहेत , लग्नाला पोरीच नाहीत ! आता बसा हलवत अन आधीच्या पिढ्यांना शिव्या घालत ! त्यातील गुटखा खाऊन पचापचा थुंकणारे अन बापाच्या पैशावर गाड्या पळवणारे सोडुन द्या पण काही काही खुप उच्च विद्या विभुषित , चांगल्या घरातील मुलांनाही लग्नाला मुली मिळत नाहीयेत ही खरी शोकांतिका आहे. शिवाय मुलींनाही डिमांड सप्लाय चे गणीत कळुन चुकलं आहे की मुलांची संख्या इतकी जास्त आहे की त्यामुळे मुलींना प्रचंड डिमांड आलेला आहे , त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत , सातारा सांगली कराड कोलापुर ह्या साडेतीन जिल्ह्यात वगैरे व्यवसाय नोकरी करणार्‍या पोरांना पोरी अशाच फाट्यावर मारत आहेत , शेती करणार्‍यांचा तर विषयच सोडा ! अगदी जरा नाकी डोळी ठिक असलेल्या पोरीलाही पुण्यात आय्टी मध्ये जॉब करणारा , स्वतः त्चा पुण्यात २बी.एच.के असणारा अन आई वडील बहिण वगैरे जबाबदार्‍यांची ओझी नसणारा मुलगा हवा आहे =)))) मुलांना स्वतःचा स्टंडर्ड वाढवणे हे आता अनिवार्य झालेले आहे ! थातुरमातुर पोरांना लग्नाला स्थळेच नाहीत आता !! आता ज्या पिढ्यांनी , ज्या अधुनिक अश्वथाम्यांनी स्त्रीभ्रुणहत्या केल्या त्यांच्या पुढच्या पिढ्यांना प्रजोत्पादनासाठी मुलीच मिळत नाहीत हा निसर्गाचा एकदम काव्यमय न्याय पोएटिक जस्टिस म्हणायला हरकत नाही ! ह्या असल्या नीच लोकांचा जीनपुल समाजातुन हळु हळु नष्ट होईल , अन सुज्ञ लोकांचाच समाज टिकेल असा एक आशावाद आहे . पण तोवर ही "छोट्या मित्राला शांत न केलेली" अन लग्न संसार पोरंबाळं असले पाश नसलेली , टवाळ पोरं कोणत्याही भंपक आंदोलनांना टाकीभर पेट्रोल, ३००-५०० रुपये अन एक चपटी देऊन उपलब्ध्द होतील त्यामुळे राजकारणात मात्र मजा येणार आहे , आपण आधी सारखेच पॉपकॉर्न घेऊन बसु ! द्या रे कोणती ती घोषणा एकदम वरच्या आवाजात =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

आपला सात्विक संताप ठीक आहे परंतु वस्तुस्थिती काही वेगळी आहे. आपण लिहिलेले आहे ते मध्यम वर्गापुरते ठीक आहे. गरीब वर्गात फार वाईट स्थिती आहे मुली उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी बलात्काराचे प्रमाण वाढते आणि वेश्या व्यवसाय फोफावतो हरयाणात तर भयानक स्थिती आहे. तेथे हरयाणातील मुली मिळत नाहीत म्हणून दोन किंवा तीन भावात मिळून एक गरीब मुलगी वधू म्हणून बिहार मधून आणली जाते (लग्न धाकट्याशी केलेले असते) आणि अक्षरशः तिचा लैंगिक गुलाम किंवा भोगवस्तू म्हणून वापर केला जातो. गरीब मुलगी कुठेही जाऊ शकत नाही किंवा पोलिसात तक्रार करू शकत नाही. तक्रार केली तरी नवरा हा घरचा मामला आहे म्हणून सारवासारव केली जाते. मेली तरी पैशाचा वापर करून दुसरी आणली जाते. गरीब आईबाप पैशाचे पाठबळ नाही म्हणून काहीही करू शकत नाहीत. मुळात असे लग्न हेच "खायला एक तोंड कमी" व्हावे म्हणून केलेले असते. पोएटिक जस्टीस वगैरे सर्व मनाचे समाधान असते. वस्तुस्थिती फार फार वेगळी आणि वाईट आहे.

In reply to by सुबोध खरे

फक्त परिणामांबद्दल भाष्य करणारा आपला हा प्रतिसाद फारच अपुरा आहे असं वाटतं.

मार्कसनी लिहिल्याप्रमाणे मुलींचे प्रमाण घटत चालल्याने त्यांचा लग्नाच्या बाजारातील भाव वधारला आहे व आहे तोच ट्रेंड चालू राहिला तर पुढील १५/२० वर्षे हा भाव अजूनच वाढेल. अश्या स्थितीत जोडप्यानी मुली होऊ दिल्या तर त्या मुलींना पुढे चांगलेच दिवस दिसणार ह्यात शंका नाही. एक प्रकारे स्त्रीभ्रूण हत्या न होऊ देण्यामागचे ते एक सबळ कारण ठरू शकेल.