श्रावणमास! निसर्ग सौंदर्याचा मास. व्रत-वैकल्यांचा मास. त्याच बरोबर मद्य-मांस विरहित मास. रोज `मद्यमासा'वाचून अजिबात न चालणारे अनेक मद्य-मांस प्रेमी, कुत्रा-मांजर पाळायचे ठरवावे इतक्या सहजतेने श्रावण पाळायचे ठरवतात. पण ते इतके सोपे नाही याची जाणीव एक दोन दिवसात होते. (काहीना एक दोन तासातच. असो.) न पेलणारी व्रते करायला गेले की हे असेच हाल हाल होतात. बालकवींचा श्रावणमास या `श्रावणपाळ' मंडळींच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा हा एक प्रयत्न. हे विडंबन सर्व श्रावणपाळांना अर्पण!
श्रावणमासी विरस मानसी हळहळ दाटे चोहिकडे
श्रावणमासी, विरस मानसी,हळहळ दाटे चोहिकडे
क्षणात येते मनात पाप, क्षणात पश्चाताप घडे.
भवती बघता भाविक नवरे पत्नी भयाने मौनव्रती
"श्रावण-श्रावण" जपता जपता गलितगात्र हे महारथी
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा! तो आठवे-
"सध्या श्रावण!" हळूच पाउल घराकडे अपुल्याच वळे.
उठती बसती कामे करती, अंगी नाही त्राण पहा
सर्व जगावर हाय! पसरले विषण्णतेचे रुप महा.
"गलास" साधा फुटता भासे, न पिता ही कशी चढे?
श्रावण म्हणूनी त्राण न हाती, हातामधुनी खाली पडे.
बडबड करुनी उगीच आपुले, दिवस जुने ते आठवती
सुंदर साकी, मैफल, मस्ती, मनात अपुल्या साठवती.
"उदास"* गझला पडता कानी, पाउल शोधत वाट फिरे
परि आठवता श्रावणमहिमा, मुकाट मंदिरात शिरे.
वाट असे ही जरी नित्याची कोण बेवडा अडखळला?
दारी आपुल्या अचूक येऊनी कोण नेमका गोंधळला?
पुरण नकोसे, वरण नकोसे, उतरेना कंठी बासमती
मटणाच्या त्या रश्श्यावाचून कुंठित होई येथ मती.
शून्यामध्ये लावून डोळे बसून राहे तासन्तास
वदनी त्यांच्या वाचुनी घ्यावा, भुका-तहाना श्रावणमास.
(*पंकज उदासच्या शराबी गझला.)
(हालकवी) -अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4601
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहाहा
ह ह पुर्ण वाट
छान झालंय विडंबन ओगलेशेठ!
सह्ह्ही...
भन्नाट विडंबन
हेच म्हणतो..
In reply to भन्नाट विडंबन by बेसनलाडू
वा वा वा वा वा!
जबरा...
हे घ्या संपूर्ण मूळ गीत
पुरण
वा! भाई वा!!
मूळ कविता अशी आहे...
धन्यवाद ओगलेशेठ!
In reply to मूळ कविता अशी आहे... by अविनाश ओगले