Skip to main content

जगणे सुरात आले

लेखक गंगाधर मुटे यांनी गुरुवार, 19/04/2012 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
जगणे सुरात आले

वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले

चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले

दुखवू नये कधीही मनभावना कुणाच्या
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले

पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले

मतला, रदीफ, यमके, बहरास योजताना
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले

का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले

कसला ‘अभय’ कवी तू? रचतोस हे मनोरे
जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!

                                          - गंगाधर मुटे
---------------------------------
लेखनविषय:

वाचने 6550
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

गंगाधर मुटे साहेब, कविता सुंदर आहे. मतला, रदीफ, यमके, बहरास योजताना झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले हे तुमचे कडवे एकदम बहारदार झाल आहे.

जान कुर्बान अर्थात जीव ओवाळून टाकावा अशी गझल ! मुटे साहेब, हम्म ! एकूण आपले धोरण असे दिसते की पौणिमेचे चांदणे जमेल जेंव्हा हाती, तेंव्हाच यायचे ! क्या बात है ! आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा “असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले हा कबीराचा संदेशच वाटतो, व्वा क्लास ! कधीतरी यायला हरकत नाही पण अशाच जमलेल्या कविता घेउन या ! धन्यवाद ! पुकशु

In reply to by चौकटराजा

एकूण आपले धोरण असे दिसते की पौणिमेचे चांदणे जमेल जेंव्हा हाती, तेंव्हाच यायचे !>>> चौरासाहेब, तसे वगैरे काही नाही हो. गेल्या सहा महिन्यात पुरेसा वेळ मिळणेच दुर्मिळ झाले आहे. ही माझी खंत आहे. (आंतरजालावर दर्जेदार लेखन उपलब्ध असूनही, वाचायला मिळत नाही, ही दुसरी खंत) एक वर्षा आधी माझ्याकडे एवढी उसंत होती की नऊ महिन्यात मी ८० पेक्षा जास्त कविता रचल्या. (लिहिल्या किंवा पाडल्या असेही म्हणता येईल) आणि दहाव्या महिन्यात "रानमेवा" हा काव्यसंग्रह प्रकाशित करून मोकळा झालो. असो. काळाचा महिमा दुसरे काय. लवकरच मी आंतरजालावर पूर्वीसारखा मुक्तसंचार करू शकेल, अशी आशा आहे.

In reply to by मूकवाचक

.

वा...वा..वा..! मुटे काका...,एकेक ओळ वाचताना, मन अगदी त्रुप्त झालं :-)

मुटेसाहेब, गझल आवडली... आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा “असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले क्या बात है! वा!!

अप्रतिम!मस्त झालीये गझल!! :)

अतिशय आवडल्या गेली आहे. एकदम सुरेख.

गझल आवडली. पहिला आणि शेवटून दुसरा शेर खासच!

छान गझल. आवडली. -दिलीप बिरुटे