Skip to main content

एक भिजलेला चहा...!

लेखक वेणू यांनी शुक्रवार, 13/04/2012 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
.......पाणी झरत चालले- आज आभाळ फाटले, पावसाला पावसाने -वर ढगांत गाठले, पाणी झरत चालले - उभ्या रानाला तहान, आता किलबिलत आहे, राना..... सौमित्र कुजबूजत होता... माझ्या जुन्या फिलिप्स च्या टेपरेकॉर्डर वर! बाहेर उन्हाची लाही- लाही होताना, "गारवा" अल्बमने नेहमीच साथ दिलेली... इतकी, की गेल्या २-३ वर्षांत कॅसेट घासून, सौमित्र दोन-दोनदा बोलतोय की काय, असा भास व्हावा!! रणजित देसाईंची 'अभोगी' कादंबरी वाचत होते, अगदी पालथी पडून, छानपैकी पाय हवेत हलवत! उन्हाचा त्रास मात्र खरेच सोसवेना, शेवटी उठून पंख्याचा रेग्यूलेटर खच्चून पिळला आणि जेव्हा लयीत डुलत त्याने '५' चा ताल धरला, तेव्हा कुठे हायसं वाटलं.... खोलीत बसणं जरासं का होईना सुसह्य झालं! आता सौमित्र 'बघ, माझी आठवण येते का?' पर्यंत पोहोचला होता!... ह्या असल्या उन्हांत हा आभासी गारवा जास्त सुखद होता.. उन्हं वाढून- वाढून वाढावीत तरी किती?.. काहिली शब्दाची प्रचिती येईस्तोवर?? आणि हवेतली कळकळही चढत्या आलेखाची! "अभोगीत" मन फारसं रमेना.. जरा फिल्मी प्रकार वाटू लागला.. वाटलं, सोडावी का अर्ध्यावर? पण; देसाईंच्या साहित्यावर जे निस्सीम प्रेम होतं त्याच्याशी प्रतारणाही करवेना... त्यांच्या ऐतिहासिक साहित्य लिखाणांची पारायणं करून झाल्यावर, जरा वेगळा प्रकार वाचायला घेतला होता! खरं तर आख्खं उदगीर पालथं घालूनही मला तेव्हा मनासारखं वाचनालय मिळालं नाही, तेव्हा नांदेडवरुनच पुस्तकं आणायची, असं ठरवलं! आम्ही गेली अनेक वर्ष नांदेडात वास्तव्य करून होतो त्यामुळे भरपूर ओळखी होत्या, वाचनालयचे मालक, बाबांचेच शालेय शिक्षणाच्या काळातील मित्र- तेव्हा मला दरवेळी 'एक' पुस्तक कमाल दोन महिने माझ्या जवळ ठेवण्याची मुभा मिळाली... आता, पुस्तक उदगीरला न्यायचं आणि आईने दिलेल्या "चिवडा-लाडूच्या" शिदोरीसारखं पुरवत राहायचं, नांदेडच्या पुढील चकरेपर्यंत, असा क्रम! कॅसेट थांबल्याचा 'कट्टं' आवाज आला, उठून पुन्हा तिच कॅसेट रिवाईंड ला टाकली! खोलीतील हवादेखील चांगलीच गरमली होती! कळशीतून ग्लासभर पाणी ओतून घेतलं नि आठवण आली, पल्लवीची!! हा तिचा ग्लास होता!... तिच्या बाबांचे तब्बेत बरी नसल्याने ती त्यांना भेटायला नांदेडला गेली होती, पर्यायी माझ्यावर 'एकटीनं' रविवार घालवायची वेळ आली होती.. पुन्हा 'कट्टं'! रिवाईंड झालेली कॅसेट 'प्ले' करुन मी येऊन बसले पुन्हा, माझ्या लोखंडी पलंगावर! पुस्तक वाचायला! उदगीरमधील बर्‍यापैकी श्रीमंत कुटुंबाकडे, मी आणि पल्लू पेयिंग गेस्ट म्हणून राहत होतो! तीन मजली बंगलीची ती ओपन टेरेस खोली- संगमरवरी फरश्यांची- बेडरूम म्हणून बांधलेली, लहानगी पण छानशी! एका बर्नरचा गॅस (पाणी तापविणे किंवा चहा करणे याचसाठी- फोडणी करून भिंती खराब करायच्या नाहीत- असा कडक नियम, घरमालकिणीचा), २-४ डबे- चहापत्ती, चिवडा बिस्कीटांचे, पाणी तापविण्याचं जर्मनचं मोठं पातेलं, एक लोखंडी ऐस-पैस पलंग, वह्या- पुस्तकांची चळत, मोजके काही ड्रेस, फिलिप्सचा टेप आणि पॉकेटमनी मागे टाकत जमविलेल्या कॅसेट्स... एवढाच काय तो संसार! पलंगावर बसलं की उजव्या हाताला बर्‍यापैकी मोठी खिडकी आणि त्यावर घरमालकिणीने लावलेलं निसर्गचित्र-एकांत टेकडीवरचं दुमजली घर.. टेकडीला वळसा देत वाहणारी नदी आणि न वल्हवलेली होडी.. त्या टेकडीला चढ उतारासाठी अस्पष्ट पायर्‍या! भिंतीला पोस्टर लावलेले चालते, हे पाहून मी ही पलंगाच्या बरोबर समोरील भिंतीवर गणपती बाप्पाचं भलं-मोठं पोस्टर चिकटवलं होतं! पितांबर नेसून- मांडी घालून बसलेला-शांत नेत्रांचा तो समर्थ ईश, कायम सोबत असणारा! इथे- उदगीरला येऊन इंजिनीअरिंग करताना, घराबाहेरचं आयुष्य जगतांना आलेले सारे चांगले- वाईट अनुभव त्याच्या कानावर घालण्याची सवय कधी जडली, नाहीच कळालं! तिकडे सौमित्र- मिलिंद इंगळेची धर-पकड टेपवर चांगलीच रंगली होती! आणि मनावर अभोगीची नायिका रेंगाळत! ह्या सार्‍या कादंबर्‍यांमधे अतिसोशिक नायिका का? हा पडलेला नेहमीचा प्रश्न आणि 'भोगले जे दु:ख त्याला..." म्हणत होणारा शेवट तरी का? ह्याचा हिशोब जुळवत बसले होते! सहज हातातल्या घड्याळीकडे लक्ष गेलं तर, अरे बापरे! ४ वाजत आले होते आणि घरमालकिणीने आजही उपवास घडवला होता!! पुस्तक पुरे आजसाठी- उद्याच्या सबमिशनची तयारी राहिलीये, आज नाईट मारत अभ्यास! तसंही "ईट्स टी टाईम" आज चहा- चिवड्याचंच लंच! जरा दरवाजा उघडला, तसा तापलेल्या टेरेसवरचा झळाळणारा उष्ण वारा मला धडकून खोलीत शिरला.. तापलं होतं सारं फारच! दरवाजा तसाच ठेवला.. चहा ठेवून जरा तोंडावर पाणी मारून आले, तर......... ऊन दिसेना.. कमाल आहे!! ढगाने सूर्याला हलकेच पंखांखाली घेतलेलं! क्षणांत निसर्गाचं रुपडं कसं बदलतं असं स्वतःशी म्हणताच, सौमित्र आठवलाच "ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं........ तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो..." वाह्ह! निसर्ग आहेच असा बहूरंगी! शब्द सरसावतातच त्याची हर-एक 'अदा' टिपायला!! चहा गाळून हातात कप घेऊन बाहेर आले तर छान हवा सुटलेली.. 'कुठेतरी नक्कीच पाऊस पडतोय' असं म्हणत मीच माझ्याशी आनंदित झाले होते!! सबंध दिवसाची मरगळ, कळकळ मागे पाडली सुटलेल्या गार हवेने... आणि मग जे समोर दिसलंय.. ते निव्वळ शब्दातीत!! समोर.. लांब... पावसाचा एक पॅच प्रवास करत पुढे सरसावत येतोय... अगदी कुठलीही आगाऊ सूचना न देता, स्वार आपल्या सार्‍या शक्तीनिशी निघाले होते, कक्षेतली सगळी जमीन पादाक्रांत करत करत, जिंकल्याच्या त्वेषात रोंरावत... हे दृष्य... अगम्य!! अचाट! आणि पुढच्या काही सेकंदात तो इथे असेल, ह्या टेरेसवर- अवती भोवती!!! ही जाणीव मनातून मेंदूपर्यंत पोहोचण्याच्या आतच थेंब अंगावर!! काय अनुभवलं होते ते दृष्य! ती ढगांची फौज, ते तप्त भूमीवरचं विजयी अतिक्रमण! सारंच वर्णनातीत! अगदी मिनीटभरात ती फौज माझ्या डोक्यावरून पार पलिकडे निघूनही गेली, त्यांचा आवाका मोठा होता... कदाचित आणखी बरीच जमीन गंधाळण्यासाठी आसूसलेली असावी.. खोलीतून अगदी योगायोगाने यावेत तसे शब्द..."पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्र- चिंब भिजलेला...." निसर्गाने वळवलेली ती कूस पहात, अनुभव घेत, ओलेत्याने मीही प्यायले एक मस्त 'भिजलेला चहा'!!! पण खरं सांगतेय, A cup of tea never tasted so well….. soooo well!!!! -वेणू (बागेश्री)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5528
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

छानच लिहिलंय. खूप आवडलं.

एकदम मस्तच लिहीले आहे. पहील्या पावसामुळे येणारया सुगंधाची आठवण झाली आणी पावसात भिजत चहा प्यायचा राहुन गेलाय हे देखिल आठवले.

सुरेख लिहीलंय!

खुप मनापासुन लिहिलंय, आज पर्यंत राहुन गेलंय ते असं हॉस्टेलवर किंवा पेइंग गेस्ट म्हणुन राहणं, आज पुन्हा काहीतरि चुकल्याची जाणीव होउन राहील दिवसभर.

मी पाहिलाय असा टपटपत येणारा दुरवरचा पाउस, अन तो कसा आपल्या पर्यंत पोहोचतो ते सुद्धा, पुन्हा आटवणी जागल्या .

मस्तच. प्रत्येक वस्तू, व्यक्ती, परिस्थितीला शब्दांकित करण्याची हातोटी अप्रतिम....!

खूप आवडले... कालच गारांसकट झोडपून काढणारा पाऊस अनुभवला. :-) लिहीत राहा. अमृत

In reply to by किसन शिंदे

सुरेख लिहलय असाच एक पाऊस बदलापूरला अनुभवलेला दुपारी असाच बाहेर फिरायला पडलेलो .. गावाबाहेरच्या टेकडीवर गेलो.. सुडक्या आणि त्याचा एक मित्र सोबत... आभाळ भरून आलेल.. पण पावसाच चिंन्ह नव्हत .. आम्ही मस्त फिरत होतो तेवढ्यात भणाण वारा सुटला... समोरचा "चंदेरी" धुक्यात लपेटला गेला ... धुवाधार पाऊस कोसळताना आम्हाला दिसत होत .. पण आमच्यावर मात्र सगळ कोरड .. काही सेकंदातच त्या तडाख्यात आम्ही सापडलो... असला धु धु धुतलाय पावसाने .. अरारा .. एक छत्री सोबत होती.. तिच्या तारा तुटल्या.. मग बंद करावी लागली .... बिल्डींगच्या जाहिरातीचा मोठा बोर्ड सुद्धा वाकला ... सोबतीला भयानक विजांचा खेळ... असलं खुळावलेलं वातावरण .. ह्या लेखाच्या निमित्ताने आठवल.. धन्यवाद

उत्कृष्ट.. असे अनेक पाऊसानुभव एकदम जागे झाले..... दुरून येणारा पण अजून न कोसळलेला पाऊस काय असतो हा मरण्यापूर्वी एकदातरी घेण्याचा अनुभव आहे. गोव्याला चापोरा किल्ल्यावर घेतला होता... नंतर त्याने येऊन धुवून काढलंन.. असेच लिहीत रहा..

काय सुंदर लिखाण आहे! (खरं तर 'अ-प्रतिम' कसं म्हणावं? त्या तापल्या दुपारी जग-भरून येणार्‍या पावसाची हुबेहूब प्रतिमा डोळ्यांसमोर उभी केलीत....तेंव्हा 'सुप्रतिम्' म्हणायला हवं :-))

खूप छान लिहिलंय. वाचून मी पुण्याला शिकायला होते तेव्हाचे दिवस आठवले. आम्ही ४ मुली मिळून एक घरात रहायचो. योगायोग म्हणजे मे महिन्याच्या, अंगाची लाही लाही करणार्‍या उष्णतेत गारव्याचा आभास व्हावा म्हणून आम्हीसुद्धा सौमित्र-मिलिंद इंगळेचा 'गारवा'च ऐकत असू. एकदा असंच मेच्या शेवटी की जूनच्या सुरूवातीला उकाड्यात बसून परिक्षेचा अभ्यास करत होतो, कंटाळा आला म्हणून चहा घेताना गारवा लावलं आणि थोड्या वेळाने अचानक कुठूनतरी अनपेक्षितपणे आलेल्या ढगाने सूर्याला पंखांखाली घेतलं! घामेघूम झालेल्या कायेला सुखावणारा तो गार वारा, त्यासोबत येणारा ओल्या मातीचा सुगंध आणि त्या पाठोपाठ पावसाचे टपोरे थेंब... तो अनुभव, आनंद हा मला तरी शब्दात सांगता येणारा नाहीच, अनुभवायचाच तो!

सुंदर!!

सुन्दर अनुभव, आणि "गारवा" अल्बमची सुन्दर आठवण.

अशा मस्त वातावरणाचा स्वच्छंद पणे आनंद घेणारी 'ती','तो' आणि चहाचा कप. अहाहा! काय मस्त अनुभव. (ती : मुलगी, तो: पाऊस) मी कॉलेजला असताना सायकलवर असा अनुभव घ्यायचे. आठ्वणी जाग्या झाल्या.

खूप सुंदर! स्वाती

असाच एकदा रायगडावर गेलो होतो. होळीचे दिवस होते. सुदूर भवानी टोकाजवळ बसलो होतो. समोर लिंगाण्यावर उनसावलीचा खेळ चालू झाला होता. गडावर मात्र उन्ह भाजून काढत होते. अचानक लिंगाण्यावर अंधारून आलं. सुसाट वारं सुटलं. रागरंग ओळखून होळीच्या माळावर यायला निघालो. शिबंदीची घरटी ओलांडेपर्यंत चहूबाजूंनी ढगांनी आक्रमण केलं होतं. पायतळीच्या वाटेवरून ढग पळत पळत जात होते. बाजारपेठेपाशी येईपर्यंत थेंब थेंब बरसणारा पाऊन एकदम झिम्माड होऊन आला होता. धर्मशाळेत जाईपर्यंत अगदी चिंब चिंब झालो होतो.

In reply to by प्रचेतस

गडावर पावसाची मजा वेगळीच असते... मागच्या वर्षीच्या नवरात्रातला अनुभव.. रविवारी दुपारी २ वाजता मित्राचा फोन, "कोरीगड - लगेच जायचे आहे दर्शनाला" कोरीगड पायथ्याला जाईपर्यंत उकाड्याने हैराण - October Heat. उकाड्यातच निम्मा गड चढलो आणि वाटेत एका ठिकाणून अँबी व्हॅलीचा मस्त नजारा दिसतो तिथे थांबून गप्पा हाणणे चालू होते. पावसाचा मागमूसही नसताना अचानक अंधारून आले आणि जोरदार पावसाला सुरूवात झाली.. प्रचंड वारे.. मातीचा सुवास.. हळूवार पसरत जाणारे धुके.. आणि पावसाची चाहूल लागून जणू तरारूर उठलेली सारी वनराई.. केवळ वर्णनातीत. सलगपणे कोसळणार्‍या पावसाचा पडदा टिपायचा प्रयत्न... अचानकपणे एखादा जुना मित्र भेटावा तसे वाटले त्या पावसात चिंब भिजून.. :-)

अवचित येणार्‍या पावसासारखाच!

छान!

खूप आभार, सर्वांचे :) काहीतरी वाचून आपल्याच जुन्या आठवणी चाळवल्या तर, फार छान वाटते नाही? अनेक प्रतिसादकांना अश्या आठवणी आल्या, त्यांनी त्या इथे शेअरही केल्यात, त्यामूळे खरंच फार मस्त वाटलं.. आभारी आहे :)

मनापासून लिहीलेला लेख मनापासून आवडला! - (भिजलेला चहा आणी भिजलेली सिगारेट अनुभवलेला) सोकाजी

सही च .... .... .... आत्ता च मंचर मधे असाच पहिला पाऊस पडला, त्या मातीचा सुगंध इथे शेअर करावा म्हणुन हा पत्र प्रपंच.