✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

म्हणणं, प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, इशारे, अनुभव वा शंका इ. इ.

क
कौन्तेय यांनी
गुरुवार, 03/22/2012 - 11:47  ·  लेख
लेख
मी जन्मसिद्ध पार्लेकर. आम्हाला गावच नाही. आई-वडील तसे वऱ्हाडातले, पण आता तिथे कुणाचंच काही आणि कोणी शिल्लक नाही. त्यामुळे आमचं सगळं मुंबई एके मुंबईच. 'सब भूमी गोपाल की' हे तत्व प्रथमपासून पाळल्यामुळे याचं कधी दुःख जरी वाटलं नाही तरी एक शल्य सतत मनात होतं. मग आपल्या मुलांना नि त्यांच्याही मुलांना कुंकवापुरतं का होईना पण एक गाव असावं, गावी जायला घर असावं, खेळाबागडायला अंगण असावं, आपले झाडं लावायचे, शांततेत बसायचे शौक (हो, आता शांतता हा मोठा ऐषारामी शौकच म्हटला पाहिजे) पुरवावेत इ. इ. म्हणून एका टुमदार गावात रिकामा गावठाण भूखंड शोधून, रीतसर कायदेशीर बाबी पूर्ण करून तिथे घर बांधायचं काढलं. किल्ल्याच्या पायथ्याचा गाव. मग काय सोन्याहून पिवळं. सेकंड होम, सप्ताह-अखेर बंगले योजना, रो हाउसेस (नावाची खुराडी) अशा लोकप्रिय योजनांत मुद्दामून न जाता प्रत्यक्ष गावात, एकुटवाणं घर बांधायचं, ज्यात जमीनीचा सात-बाराही स्वतःच्या नावावर असेल म्हणजे जमीनीच्या त्या तुकड्यावर खरीखुरी मालकी असेल म्हणून ही उठाठेव केली. एकही नवा पैसा जास्तीचा न देता, वाट्टेल तिथे वाट्टेल तितक्या वेळी अत्यंत ताप-त्रासदायक चकरा मारून का होईना पण सातबारा नावावर झाला या समाधानात जेव्हा ग्रामपंचायतीकडे घरबांधणीची परवानगी घ्यायला गेलो तेव्हा दाताखाली पहिला दगड आला. पंचायत समिती सदश्श्यांनी सहा जणांचे म्हणून लंपसम्‌ २०००० रु. मागितले. काही दिवस चाल ढकल करून ते दिले. आयुष्यात लाचखोरी करण्याचा हा पहिला प्रसंग. आणि शेवटचाच अशी मनाशी घट्ट गाठ बांधून घरबांधणी सुरू केली. सदस्यांनी दिलेल्या प्रेमळ सूचनावजा आदेशांप्रमाणे बांधणीचं कंत्राट गावातल्याच उपसरपंचाला (हाही विनोदच. यांची बायको खरी उपसरपंच. पण हे भाऊ सगळीकडे स्वतःची ओळख उपसरपंच म्हणून देत फ़िरतात. महिला सक्षमीकरण की जय!). मध्यंतरी अण्णा हजाऱ्यांचं वगैरे आंदोलन होऊन गेलं. एकदा भाऊंना फ़ोन लावला तर म्हणे आता एक आठवडाभर खूप बिझी आहे, गावात भ्रष्टाचार विरोधी रॅली काढायचीए ना! पण आता आमचं बांधकाम पूर्णत्वाकडे जाताना घरपट्टी लागू करण्यासाठी आवेदन केलं तर सगळ्यांसाठी त्याचे पंधरा हजार मागत आहेत. 'नाय हो, आम्ही गावात कुणालाच नाय सोडला' हे स्पष्टीकरण. पैसे द्यायचे नाहीत हे ठरलेलंच आहे पण मला वाटतं की ते देऊन टाकून थोडी मनःशांती विकत घेण्याचा मोह कधीही होऊ शकतो. गावातल्यांना नि पंचायत समितीला नडायला माझी ना नाही. पण या कारणांमुळे मनात शंका निर्माण होतात -
  1. अशाने आपली तत्वपूर्ती साधली तरी पुढच्या मोठ्या काळासाठी सगळ्यांशी वाकड्यात जाणं हा वेडेपणा ठरेल अशी भीती वाटते.
  2. पुन्हा 'आहेरे-नाहीरे' वर्ग, शहरचे-गावचे, कदाचित ब्राह्मण-इतर यां अशा भिन्नतांपोटी गावकऱ्यांचा आपल्याबद्दल नेमका काय ग्रह असेल / होईल हेही सांगता येत नाही.
  3. मोक्याच्या ठिकाणीं बसलेल्या व्यक्तींनी असे पैसे मागणे हा त्यांचा हक्क प्रस्थापित झालेला आहे. त्याकडे दुर्लक्ष करून केवळ शासकीय फ़िया भरून आपलं काम होईल असं मानणं म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहण्यासारखं आहे हे वास्तव आहे.
  4. आनंदाचे चार क्षण अनुभवता यावेत म्हणून बांधलेल्या घराच्या रूपाने नवीन विकतची दुखणी नि मनस्ताप येऊ नयेत!
... तर मंडळी, या मुद्द्यांवर कुणाचं काही म्हणणं, प्रोत्साहन, सल्ला, प्रेरणा, इशारे, अनुभव वा शंका इ. इ. असल्यास अवश्य इथे मांडाव्यात.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27502 वाचन

💬 प्रतिसाद (112)

प्रतिक्रिया

कळीचा मुद्दा -

कौन्तेय
गुरुवार, 03/22/2012 - 16:15 नवीन
गवि भाऊ, गोळाबेरीज बघावी या मताचा मी आहे. स्वातीताईंच्या कथनातला "गावच्या लोकांना तुम्ही पैशाने नाही तर प्रेमाने जिंका, तरच तुमची "माझे गाव, गावचे घर" कल्पना अस्तित्वात येईल." हा कळीचा मुद्दा आहे, जो मौल्यवान आहे. पण ते प्रत्यक्षात यायला घरपट्टी तर भेटली पायजेल! हां का नाय? बाकी गाव - तालुका - शहर संकल्पना हे मुद्दे आत्ता लावून धरले तर आणखी एक उपचर्चा फाटेचर्चा इथे सुरू होईल ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गाव म्हणजे ग्रामपंचायत,

स्वातीविशु
गुरुवार, 03/22/2012 - 16:15 नवीन
गाव म्हणजे ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पोलीसपाटील .. इ इ.. गावगाडा हा प्रकार तुम्ही अनुभवला आहे की नाही हे माहीत नसल्याने याबाबत अधिक विधाने करत नाही..
मी तर फक्त एक उदाहरणादाखल मिपाकरांसाठी रत्नागिरीकर / सातारकर/कोल्हापुरकर / सांगलीकर/मिरजकर / इ.इ. असे लिहिले आहे. ;) गावगाडा किंवा ग्रामपंचायत हा प्रकार थोडा कमी माहीत असला तरी निदान माझ्या गावच्या छोट्या खेड्यापाड्यात ("___वाडी" म्हणजे कमी लोकसंख्या असलेल्या गावात) बरेचदा जाऊन राहीले आहे /राहते. :) "गावच्या लोकांना तुम्ही पैशाने नाही तर प्रेमाने जिंका, तरच तुमची "माझे गाव, गावचे घर" कल्पना अस्तित्वात येईल" हे माझे अनुभवाचे बोल मी व्यक्त केले आहे, हे महत्वाचे. :)
  • Log in or register to post comments

तुमचा मुद्दा ढोबळमानाने

गवि
गुरुवार, 03/22/2012 - 16:30 नवीन
तुमचा मुद्दा ढोबळमानाने मान्यच आहे.. मलाही सरसकट मत बनवणं आवडत नाही, पण तसं झालंय खरं.. :) अशा जागी स्वत: जाऊन घर बनवणं, स्थानिक होऊ पाहणं, यात असे त्रास होतात. सुटीत नऊ दिवस नवलाई टिकणारा "पाहुणा" म्हणून जायला मात्र गावासारखं ठिकाण नाही... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वातीविशु

स्वागत

कौन्तेय
गुरुवार, 03/22/2012 - 16:59 नवीन
म्हणता ते बरोबरच. आमच्या आजच्या योजनेनुसार हे घर आत्ता थोडी आवाक्याबाहेरची उडी मारून बांधावं; मुलं मोठी होईस्तोवर बारा पंधरा वर्षे याचा उपयोग सुट्टी, सप्ताह-अखेर, मित्र-मंडळी, मेजवान्या, झाडे लावणे नि समाजकार्य इ.इ.साठी करावा; नि योग्यवेळी पूर्णवेळ वास्तव्यासाठी तिथे जावं असं आहे. यामधे तुम्ही म्हणता तसे गावात अधून मधून जात राहिल्याने परिचय, संपर्क, संबंध वाढत राहतील नि स्थायिक व्हायला अडचण येणार नाही असं वाटतं. आपण योजत जावं ... बाकी त्याची इच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बारा पंधरा वर्षे याचा उपयोग

गवि
गुरुवार, 03/22/2012 - 17:12 नवीन
बारा पंधरा वर्षे याचा उपयोग सुट्टी, सप्ताह-अखेर, मित्र-मंडळी, मेजवान्या, झाडे लावणे नि समाजकार्य इ.इ.साठी करावा; नि योग्यवेळी पूर्णवेळ वास्तव्यासाठी तिथे जावं असं आहे.
मी उपरोधाने किंवा छद्मीपणाने म्हणत नाही याची खात्री आधीच देऊन म्हणतो : वर उल्लेखलेल्या प्रत्येक इच्छेमधली / प्लॅनमधली कोणती गोष्ट किती जमली हे अजून कितीही वर्षांनी सांगा, पण जरुर सांगा. सिरियसली इंटरेस्ट आहे जाणून घेण्यात.. १. वीकेंडसना जाणं जमलं का? जमल्यास महिन्यातून / वर्षातून किती वेळा. २. राहणे कमी अन मेंटेनन्स-सफाई आदि कामातच जास्त वेळ या कारणाने जाणं कमीकमी होत गेलं नाही ना? ३. पूर्णवेळ वास्तव्याला शहर सोडून गावात जाणं खरंच घडलं का? या तिन्हीची उत्तरं कितीही वर्षांनी दिलीत तरी वाट पाहीन. असंख्य (जवळजवळ सर्व) वीकेंड होम्स भग्नावस्थेत मालकांची वाट पाहात पडलेली राहतात किंवा मग सधन मालक माळी, वॉचमन ठेवून ती धूळ झटकती ठेवतात असा अनुभव आहे.. ऐकण्यातले तीनचार अपवाद (प्रत्यक्ष पाहण्यात एकही नाही) वगळता शहरी लाईफमधला मनुष्य गावात कधीही दीर्घकाळ (आठवड्याच्या वर) रहायला किंवा वीकेंड वगैरेला त्याच गावी त्याच घरात पुन्हापुन्हा जायला प्लेन कंटाळतो असा अनुभव आहे. तुमचा वेगळा निघो अशी सदिच्छा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौन्तेय

+1, गावगाडा लै बेक्कार!

यकु
गुरुवार, 03/22/2012 - 17:28 नवीन
पूर्ण आयुष्‍य शहरात गेलेल्या 'मूळच्या' गावातील लोकांना निवृत्तीच्या काळात गावाकडे परतण्याची ओढ निर्माण होणे समजू शकते, पण बर्‍याचवेळा त्यात ताप होतो.. मी तरी माझ्या घरातच एक फार वाईट अनुभव घेतलाय.. माझे आजोबा आयुष्‍यभर नोकरीच्या निमित्तानं या शहरात, त्या शहरात रहात आले. निवृत्त झाल्यावर 'आता गावचे निवांत आयुष्‍य जगू' म्हणून गावात गेले. पण कसचे काय! आजारपणं, थोडंसं काही झालं की डॉक्टरकडे पळण्याची शहरातली सवय.. 'चांगल्या' दवाखान्यात दाखवण्‍यासाठी नेहमी शहराकडे चकरा माराव्या लागणं.. गावातल्या खमक्या लोकांशी खेटण्याची तयारी नसणं, मग मनस्ताप, गावातले असले तरी त्या लोकांशी जुळवून घेता न येणे.. अहो, आजोबांनी काम करायला येणार्‍या मजूरांना नुसते पाच रुपये वाढवून दिले तर लोक च्यावच्याव करायला लागले घरी येऊन रात्री.. कशाला मजूरांचे नखरे करताय म्हणून.. अशाच मनस्तापात ते आठ दहा वर्षे गावात राहिले आणि जायचं वय नसतानाही एक दिवस फटकन गेले.. काही आजार न होता. हे खेड्यातले रोजचे मनस्ताप पुरेसे ठरले. ! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अशा जागी स्वत: जाऊन घर बनवणं,

स्वातीविशु
गुरुवार, 03/22/2012 - 16:54 नवीन
अशा जागी स्वत: जाऊन घर बनवणं, स्थानिक होऊ पाहणं, यात असे त्रास होतात.
मान्य आहे. स्वार्थ कुठे नसतो.... तरीही आपण मार्ग काढतोच ना. काही वाईट अनुभव आले असले तरी थोडेतरी चांगले अनुभव येतीलच ना? शेवटी गाव सुद्धा नव्याच्या नऊ दिवसांत वसत नसते ना..त्यासाठी तुम्हाला किती वेळ, महिने, वर्षे द्यावी लागतील ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. थोडा वेगळा विचार करून पाहायला तर हरकत नाही. "एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ" असे म्हटलेलेच आहे. (बहुतेक तुकारामांनी?) कित्येक लोक आम्हाला गावच नाही असे म्हणतात, तेव्हा वाईट वाटते, म्हणून हा लेखनप्रपंच. :)
  • Log in or register to post comments

अहो म्याडम, कोकणातलं माहीत

शिल्पा ब
Fri, 03/23/2012 - 01:51 नवीन
अहो म्याडम, कोकणातलं माहीत नाही पण देशावर शेतावरुन मारामार्‍या होतात...माझ्या काका अन काकुवर सुद्धा शेतावर असताना हल्ला झाला होता. हास्पिटलात होते दोघेही. आम्ही तिन पिढ्या गावातच आहोत तरी असं. आता तो काका अन त्याचं कुटुंब सोडलं तर बाकी सगळे शहरात विखुरलेत त्यामुळे समजा आम्ही कोणी मुलं तिथे गेलो तरी वाडवडलांच्या पुण्याईने त्रास कमी झाला तर होईल तेवढंच. दोन दिवस भेट देणं अन कायमचं राहणं वेगळं. गावचे लोकं अडाणी वाटतात पण फार च्यापटर असतात. असो, लेखकाला शुभेच्छा. गावातला कोणीतरी पावरबाज माणुस बघुन त्याच्याशी "मैत्री" चं धोरण ठेवलतं तर उपयोगी पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वातीविशु

+१

मोदक
Fri, 03/23/2012 - 23:49 नवीन
>>>गावचे लोकं अडाणी वाटतात पण फार च्यापटर असतात एका अत्यंत छोट्या खेड्यात अलिकडेच आलेला अनुभव... कळसूबाई ट्रेक ला ९ मित्र २ गाड्या घेवून गेलो होतो.. शाळेच्या आवारात (१५ X ३०... यावरून गावाचे आकारमान कळेलच :-)) गाड्या लावल्या तर एक बाई लगेच आली पार्कींग चे पैसे मागयला, किती मागावेत..? ५० रू. आम्ही चालू केले, शाळेची जागा आहे.. सार्वजनीक आहे... असले काही पैसे तुम्ही घेवू शकत नाही.. वगैरे वगैरे.. आम्ही सगळेच जण जास्त हुज्जत घालू लागलो तर म्हणाली, "इथे आमची मुले खेळतात.. आरसे / काचा फोडतात त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते." आम्ही सगळे दोन मिनिटे सुन्न.. असले कांही अपेक्षीतच नव्हते. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

सगळं येऊ द्या -

कौन्तेय
गुरुवार, 03/22/2012 - 17:26 नवीन
प्रत्येकाच्या इथल्या लिखाणाचा फ़ायदाच होणार आहे. गवि, तुमच्या ३ प्रश्नांना मोल आहे. आभार. तुमचा विपत्ता कळवा. अजून पाच वर्षांनी कळवतो ...
  • Log in or register to post comments

सध्या तरी घराच्या प्रश्नावरुन

पिंगू
गुरुवार, 03/22/2012 - 19:31 नवीन
सध्या तरी घराच्या प्रश्नावरुन नाही. पण जमिनीच्या प्रश्नावरुन गेली १५ वर्षे भांडतोय. पण अजून तरी हाती काही लागलेलं नाही आणि म्हणाल तर प्रेमाची भाषा वापरुन काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे आडमुठेपणा आणि खमकेपणा हीच शस्त्रे इथे उपयोगात येतात. त्यांचाच वापर केला तर योग्य.. - पिंगू
  • Log in or register to post comments

काहि उप्योग नाहि ह्य्याचा

स्वछन्दि
गुरुवार, 03/22/2012 - 19:50 नवीन
आडमुठेपणा आणि खमकेपणा हि शस्त्रे चुकुनहि वापरलि गेलि कि जगण मुश्किल करतात लोक. कारण पावर त्यान्चा हातात आहे. आपल गप गुमान सेफ साईड पकडा. ;)
  • Log in or register to post comments

सध्या तरी मी हेच शस्त्र

पिंगू
गुरुवार, 03/22/2012 - 19:54 नवीन
सध्या तरी मी हेच शस्त्र वापरतोय. पण नुसत्या आडमुठेपणाने काही होत नाही हो. थोड्याफार गुंडपुंड आणि पुढार्‍यांच्या ओळखीपण लागतात. - पिंगू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वछन्दि

आपले रुपये जातात त्याच काय?

स्वछन्दि
गुरुवार, 03/22/2012 - 20:03 नवीन
ओळखीपायि त्यान्च्या गरजा पुरवायला आपले रुपये जातात त्याच काय?
  • Log in or register to post comments

लेखकाचा तसेच काही

रेवती
गुरुवार, 03/22/2012 - 20:10 नवीन
लेखकाचा तसेच काही प्रतिसादकर्त्यांचा अनुभव आजकालच्या काळातला आहे (गेल्या काही वर्षांतला). माझ्या आजोबांनी चाळीस खोल्यांचा वाडा (कुठे ते विचारू नका) केवळ ब्राह्मण्/अब्राह्मण या वादामुळे जिवाला वाचवण्यासाठी (अंदाजे ६० - ६५ वर्षांपूर्वी किंवा जास्तही) सोडून दिला तोही सगळ्या वस्तू, सोन्यानाण्यासकट, गाईगुरांसकट. शेती गेली. रात्रीत रस्त्यावर आलेल्या कुटुंबाला वर यायला अनेक वर्षं लागली पण अपार कष्टामुळे ते झालं. आपापली घरं बांधताना पैशापेक्षा जुन्या जखमांच्या आठवणींनी बाबा काकांनाच नाही तर आमच्या पिढीलाही जाळून काढलं. सगळ्यांची दोन चार घरं झालीत. रहायला तिथे कोणीच जात नाही. वास्तूशांतीही एकाच दिवशी केल्या सगळ्यांनी. रात्री सगळी भावंडं एकत्र येऊन रडली. मी तिथे नंतर कधीही गेले नाही. भ्रष्टाचाराचा भाग आपण बनू नये म्हणून बाबा, काकांनी सरळमार्गाने काम करून घेण्यासाठी जीव झिजवला आणि मला त्याची तिडीक बसली. आपल्या मन:शांतीसाठी जिथे कुठे द्यावे लागतील ते द्या आणि चार दिवस सुखाने घरात रहायची सोय करून घ्या. तीन महिन्यांपूर्वी माझ्या सासासूसासर्‍यांनी नातवाला (माझ्या मुलाला) कोकणात असलेलं जुनं घर दाखवायला नेलं. आता पडलय. आत जाण्याचीही इच्छा झाली नाही. फोटो काढला फक्त.
  • Log in or register to post comments

रेवतीआजै मी वर हेच लिहिलं

५० फक्त
गुरुवार, 03/22/2012 - 21:29 नवीन
रेवतीआजै मी वर हेच लिहिलं आहे, तुमचा पगार किती तुम्ही बोलता किती याच चालीवर आपलं आयुष्य किती आपण लढतोय किती- असं विचारायची पाळी आली आहे, एक दिवस असं लढता लढता आपली अवस्था सिकंदराच्या सैन्यासारखी होईल, लढणं नको आणि विजय पण नको पण मायदेशी आपल्या लोकांजवळ जायचं आहे, हा हट्ट धरुन बसु. पण एवढे लांब आलेले असु त्यांच्यापासुन की परत फिरलो तरी त्यांच्याजवळ पोहोचायच्या आधीच आयुष्य संपुन जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

रेवतीताई सगळ इथेच चुकत आप्ल.

स्वछन्दि
गुरुवार, 03/22/2012 - 20:22 नवीन
भ्रष्टाचाराला थारा न देणारे असेच कष्ट उपसतात. आनि भ्रष्टाचार करनारे मजेत राहतात ..
  • Log in or register to post comments

काही मार्ग

सुधीर
Fri, 03/23/2012 - 00:15 नवीन
काहीसं अवांतर, जग किती विचित्र आहे, एकीकडे काही माणसांना गावं नाही, म्हणून कुठल्याशा एका खेड्यात एक कोपरा जमीन घेऊन त्यावर हक्काचं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण करताना इतक्या अडचणींना तोंड द्यावं लागतं, तर काहींना हक्काच्या जमिनीवर नाईलाजास्तव पाणी सोडावं लागतं आणि काही जण तर अशीही असतात की, जी वडिलोपार्जित जमीन-घरदार-परंपरा-भाषा-संस्कृती वार्‍यावर सोडून, परदेशात वा इतरत्र स्थायिक झालेली असतात. काही वर्षांपूर्वी मी पण त्यातलाच होतो, गावं आवडत नव्हतं अशातला भाग नाही, पण सगळं आयतं मिळालं की जी बेफिकिरी वाढते ना त्यातलीच गत होती! अशा गोष्टींमधली अमूर्त (इंन्टँजिबल) किंमत जाणवली ती पणजोबांनी स्वमेहनतीने घातलेला गडगा (कुंपण), लावलेली झाडं पाहिल्यावर! आता तुमच्या प्रश्नाकडे वळतो. तुमचा हा सगळा तिढा, "लाच देऊन काम करवून न घेणे" ह्या तत्त्वामुळे निर्माण झाला आहे. माणसाने नेहमी तत्त्वनिष्ठच असलं पाहिजे. पण ही तत्त्वं आपलीच परीक्षा घेतात. १. जर तुम्ही (वा तुमच्या वतीने तुमची बाजू मांडेल असा) वाक्-चातुर्याने गावातल्या संबंधित मंडळींना लाच न देता, काम करवून घेतलंत तर फारच उत्तम! माणसं चांगलीच असतात, पण त्यांचे विचार चुकीचे असतात आणि ते बदलता येतात. हे सत्य आहे, असं मानून. २. पण जर का त्या माणसांचं मतपरिवर्तन होण्याची सुतराम शक्यता नसेल, तर असा मार्ग ज्यात तत्त्वही मोडणार नाहीत आणि कामही होईल. जसं परा ने सांगितल्याप्रमाणे (वा त्यात काहिसा बदल करून) कुठलेही तत्त्व न मोडता आणि प्रकरणही अंगलट न येता, "काट्याने काटा काढता येतो का ते बघा". जर कुठलीही तत्त्वे मोडणार नसतील, तर काय हरकत आहे? पण काम झाल्यावर "गरज सरो वैद्द मरो" अमलात आणावे लागेल पण त्याला इलाज नाही आणि त्यात चूकही नाही. तो एक रणनितीचा भाग आहे. ३. चौकटीच्या बाहेरचा मार्ग (लाच मागताना छुपं छायाचित्रण करून मग मिडिया पुढे भिंग फोडण्याची धमकी देणं इ.... मला आपलं बोलायला काय जातंय, तुमच्यावर गुजरलय, पण असाच काहीसा मार्ग...) ४. अगदीच नाईलाज होत असेल तर, तुमचा तत्त्वाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. जसं "कुठलंही काम होण्याच्या आधी अधिकार्‍याला जर का तुम्ही पैसे दिलेत तर ती होते "लाच", पण तेच पैसे तुम्ही काम झाल्यावर दिलेत तर ते होते "बक्षीस"!" अगदी तशीच वेळ आली तर काम झाल्यावर द्या.
  • Log in or register to post comments

मस्त चर्चा..

खेडूत
Fri, 03/23/2012 - 00:11 नवीन
सगळ्यांचे प्रतिसाद पाहिले..मस्त चर्चा.. मी प्रत्येकी वीस वर्षे खेड्यात आणि शहरात काढलीयत. आजही तिथे घर आणि शेत आहे. पण आईवडील तिथेच रहातात. त्यामुळे लोकांना आपलेपणा राहतो. खेड्यात (मंजे तालुका पण खेडेच) सुखाने राहायचे असेल तर: तुमचे वर्गमित्र किंवा स्नेही, नातलग तिथे रहात असले पाहिजेत. तुमच्या कुटुंबाचे गावात काही योगदान असेल.. शिक्षक, सरकारी नोकर, डॉक्टर वगैरे.. स्थानिक पुढार्याच्या तुम्ही जवळचे असाल. अनेक वर्षे तिथेच नोकरी केली असेल वगैरे..तर त्रास होत नाही. मुळात वाकडे पणा हा स्थायी भाव असतो. वेळ तर मोप असतो. माणसातला तिरकस पणा कळावा लागतो आणि काही चांगले लोक पण असतात बरं का!.. याशिवाय रात्री वीज बहुधा नसतेच, टी व्ही, फ्रीज वगैरे वापरता येत नाही. अन्न उरले तर मुंग्या/ झुरळे, कुत्री, मांजर, माकडे शेअर करायला येतात. फोन कधीही बंद पडू शकतो. वैद्यकीय सेवा मिळेलच असे नाही. पाणी नळाला येत नाही, मग विहीर शोधत फिरायचे. ( पण रहाट वापरता येतो का?) कामाला कोणी मिळत नाही त्यामुळे गावात साठी नंतर वगैरे राहणे अत्यंत गैरसोयीचे आहे. त्यामुळे मी तर माझ्याच गावी एक दिवसाच्या वर नाही राहू शकत. बाकी आपलेपणा असल्याने जात थोडी दुय्यम होते असा अनुभव आहे. भ्रष्टाचार मात्र फारच आहे. तो शहरापेक्षा कमी किंवा जास्त नाही. एक चांगला उपाय म्हणजे लागतील ते पैसे टाकून सुट्टीत कोकणात किंवा इतरत्र मजेत जाऊन राहावे. किंवा ज्यांचे खेड्यात घर आहे असे (माझ्यासारखे) खेडूत मित्र वाढवावेत..!
  • Log in or register to post comments

गावी घर बांधताना

नेत्रेश
Fri, 03/23/2012 - 02:11 नवीन
जर आपलेच गाव असेल किंवा गावातला तालेवार / पावरफुल माणुस आपल्याबरोबर असेल तर काहीच प्रश्ण येत नाही. अन्यथा सुद्धा गावी घर बांधताना शक्यतो परवानग्या वगैरे घ्यायच्या भानगडीत पडायचे नाही. सगळी कामे माहीतीतल्या चांगल्या माणसांकडुन (किंवा काँट्रॅक्टर कडुन) झटपट करुन घ्यायची. सर्व काम पुर्ण झाले की बांधकामाला दंड भरुन मान्यता मीळवण्यासाठी अर्ज करायचा. आपण लाच अम्हणुन दिलेल्या रक्कमेच्या तुलनेत सरकारी दंड नगण्य असतो. तुमचे अनधीकृत बांधकाम कोणतीही ग्रामपंचायत पाडणार नाही याची खात्री बाळगा. येवढे होई पर्यंत वीज आणी पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक परवानग्या मिळवण्याचे कसब आपोआप अंगी येते. या फॉर्म्युल्याचे जनक कोकणातलाच एक अत्यंत यशस्वी कंत्राटदार आहे. तसेच हा फॉर्म्युला आम्ही व आमच्या अनेक आप्तेष्टांनी अनेकदा व अनेक ठीकाणी यशस्वीपणे वापरुन सिद्ध केलेला आहे.
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर.. शेतकी जमीनीवरही

शैलेन्द्र
Fri, 03/23/2012 - 18:14 नवीन
अगदी बरोबर.. शेतकी जमीनीवरही दणकुन घर बांधयचं.. नंतर वर्षाला ५००-७०० रुपये दंड होतो.. तो भरायचा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नेत्रेश

थोडं वेगळं वळण -

कौन्तेय
Fri, 03/23/2012 - 10:54 नवीन
|| भारतीय नववर्ष ५११४ सर्वांना सुखा समाधानाचे नि आनंदाचे जावो || आभार. शिल्पा, पिंगू, शापित, स्वच्छंदी, रेवती, सुधीर, खेडूत, नेत्रेश आदींच्या म्हणण्यातूनही भरपूर तथ्यांश सापडत आहे. सगळे प्रतिसाद पाहता प्रथमदर्शनी वाटत आहे की गावाच्या पंचायतीमधे उभा राहून कुणी (१) शहरी, (२) सुखवस्तू दिसणारा, (३) फ़ॉरेनवाला, (४) अनोळखी, नव्यानेच प्लॉट खरेदी केलेला माणूस - स्वतःवर शेकत आहे म्हणून सचोटीचे फ़ंडे देऊ लागला तर त्याचे लगेचचे नि दूरगामी परिणाम चांगले नसतील. कदाचित ब्राह्मण हाही पैलू माझ्या इच्छेविरुद्ध तिथे जोडला जाऊ शकतो. गावातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध गावकऱ्यांपैकीच जर कुणी निशाण घेऊन बाहेर आला तर त्याला कुमक पुरवण्याचं काम आपण करू शकतो, पण लढा सुरू करण्याचं नाही हे सत्य कटू आहे. मला आता असं विचारवंसं वाटेल की शहरी वा ग्रामीण कुठल्याही प्रकारच्या घट्टपणे रुळलेल्या लाचखोरीला व्यक्तीगत विरोध केल्याचं कुणाचं स्वतःचं, बघण्यातलं उदाहरण कुणी देऊ शकेल का? मध्यंतरीच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांमुळे लाच देणारे व घेणारे यां दोघांतही काही सकारात्मक बदल झालेले दिसतात का? मी सन २००१पासून भारताच्या नि पर्यायाने राजकीय / सामाजिक चळवळींच्या बाहेरच आहे. त्यामुळे तळाच्या वास्तविकतांचा फ़ार अंदाज नाही. येऊ देन्याची कृपाया ...
  • Log in or register to post comments

शहरातले लोक तरी खेड्यातून

JAGOMOHANPYARE
Fri, 03/23/2012 - 12:38 नवीन
शहरातले लोक तरी खेड्यातून नव्याने येणार्‍या लोकाना आजकाल शहरात कुठे सुखाने जगू देतात? .. मग खेड्यातल्या लोकानी तुम्हाला तुमचे नबाबी शौक पुरे करायला कशाला मदत करायची? जिथे आहात तिथेच सुखाने रहा.... परदेशात होता म्हणताय, मग पास्पोर्ट कुठून काढलात? पार्ल्यातूनच ना? तेंव्हा पार्ल्याच्या पोलिसानी, पास पोर्ट ऑफिसने फुकट कामे करुन दिली होती का? ( माझाही पास्पोर्ट ठाण्याचाच होता, तो तरी फुकट झाला नव्हता.) आता खेड्यातही तोच अनुभव येतोय तर खेड्यातले लोक बघा कसे माजलेत म्हणून मात्र लगेच धागा उघडलात ! आजकाल खेड्यातही भाड्याने जागा मिळणं मुश्किल होत चाललय.. तिथं खेड्यातले घर म्हणजे नबाबी शौक पुरे करण्याची सोय , अशी मेंटॅलिटी असलेल्या लोकाना असे अनुभव येणं यात अगदी काही अनपेक्षित नाही. आणि पैसा खेड्यातल्या सरपंचानं खाल्ला काय आणि मुंबईच्या पोलिसानं खाल्ला काय शेवटी तो मुंबई बसलेला एखादा मंत्री, पक्ष श्रेष्ठी यांच्याच डोंबलावर जाऊन पडणार असतो... तुमच्या पार्ला शिवाजी पार्कातच हे बसलेले असतात.. तुमचेच गाववाले हो! कशाला उगाच त्या खेड्यातल्या लोकांच्या नावानं बोंब मारायची?
  • Log in or register to post comments

+1

यकु
Fri, 03/23/2012 - 12:44 नवीन
फर्मासऽ! ही पण बाजू खरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

मेरे प्यारे -

कौन्तेय
Fri, 03/23/2012 - 13:33 नवीन
ओ येस. शापित, अशा बऱ्याच फ़र्मास, खऱ्या बाजूंच्या नव्या वास्तवांशी जुळवून घेतानाचं चाचपडणं सुकर व्हावं म्हणून तर हा धागा काढला. जगमोहनप्यारे, 'जास्तीचे पैसे लाचस्वरूपात भरावे लागले तर कांगावा करू नये; कारण कुठे ना कुठे आपण सगळ्यांनी ते भरलेलेच आहेत' हा तुमचा मुद्दा समजला. बाकीच्या बहुमूल्य निंदेसाठीही आभार. तुमच्या डोक्यात फ़ुटलेले बार संभवतः त्या पैसे मागणार्‍यांच्याही डोक्यात असू शकतील इतका अर्थबोध तीमुळे झाला. धागा काढला तो कुणी माजलंय बिजलंय अशी रडारड करण्यासाठी नाही. तसा माझा हेतू वा मजकूराचा अर्थ नव्हता, नाही नि नसेल. तुम्हाला कुठे जाणवलाच तर स्वतःची माफ़ी मागून घ्या.
  • Log in or register to post comments

तुम्हाला कुठे जाणवलाच तर

गणपा
Fri, 03/23/2012 - 13:47 नवीन
तुम्हाला कुठे जाणवलाच तर स्वतःची माफ़ी मागून घ्या.
बाबौ शॉल्लीड फुटलो या वाक्यावर. =)) मनीच्या बाता: गण्या लेका ही नव वर्षाच्या स्वागताच्या आतषबाजीची सुरवात तर नव्हे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौन्तेय

खर्रंच मा. गणपाभौ, मी तर

५० फक्त
Fri, 03/23/2012 - 14:23 नवीन
खर्रंच मा. गणपाभौ, मी तर पडलो खुर्चीतुन खाली, खरोखर एक नविन युगारंभ करणारं वाक्य आहे हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

यंत्रणा...

प्रभाकर पेठकर
Fri, 03/23/2012 - 13:50 नवीन
भ्रष्टाचाराचे समर्थन नाही परंतु, यंत्रातील मोठी चाकं फिरतात तेंव्हा लहान चाकांना फिरावेच लागते अन्यथा मोडून, तुटून पडावे लागते.
  • Log in or register to post comments

तेच तर मी लिहिले आहे... मोठी

JAGOMOHANPYARE
Fri, 03/23/2012 - 14:01 नवीन
तेच तर मी लिहिले आहे... मोठी चाकं पार्ला आणि शिवाजी पार्कातच यांच्याच अंगावरनं फिरतात, तेंव्हा हे काही बोलत नाहीत आणि आता खेड्यातली दोन चार चाकं फिरली तर याना लगेच सच्चाई, देशप्रेम्,समाज शुद्धीकरण, भगवद्गीता ... काय काय 'मोहन भार्गवी ' काव्यमय सुचायला लागलंय! पार्ल्यातला फ्लॅट कुणाला पैसे न देताच यांच्या नावावर झाला की काय!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

धन्यवाद जगमोहनप्यारेजी, जे

५० फक्त
Fri, 03/23/2012 - 14:33 नवीन
धन्यवाद जगमोहनप्यारेजी, जे मी साध्या सभ्य शब्दांत लिहिलं होतं तेच तुम्ही उघड उघड लिहिलं, जेंव्हा आपलं जळतं तेंव्हा ती आग आणि उब मिळते तेंव्हा शेकोटी असा उद्योग करणारे लोक ना कायद्याचं राज्य येउ देतात ना दोन नंबरचं, आणि जेंव्हा जशी वेळ येईल तेंव्हा त्या त्या राज्याच्या नावानं किंवा विरोधात मेणबत्या लावत फिरतात, मला तर या बाबतच्या एका धागाकर्त्याने बरेच वैयक्तिक स्वरुपाचे प्रश्न विचारले, त्याबद्दल खरड केली, पण मी त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देउन एक प्रतिप्रश्न केला की मग त्याला उत्तर अपरिहार्य कारणानं मिळालं नाही. (संदर्भ -http://misalpav.com/node/20887#comment-378272)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

तो धागा बघितला.. शहरातल्या

JAGOMOHANPYARE
Fri, 03/23/2012 - 15:46 नवीन
तो धागा बघितला.. शहरातल्या भ्रष्टाचाराच्या मानाने हा खेड्यातला भ्रष्टाचार नगण्यच आहे. http://misalpav.com/node/20887 ----------------------------------------------------- शहरास्ते पंथान: ( एकदा शहराचा रस्ता धरला की षौक फर्मावायला परत खेड्यात येऊ नये.. :) आलच, तर त्याची किंमत मोजावी.) ) ---------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मी आता जे लिहिणार आहे ते

जयंत कुलकर्णी
Fri, 03/23/2012 - 14:45 नवीन
मी आता जे लिहिणार आहे ते वाचायचं आणि विसरून जायचे. आमच्या गावात एक जोशी नावाचे कुटूंब टिकून होते. मुलगा टेल्कोत कामाला. बाकी सर्व गावी शेती. बागायती ५ एकर आणि जिरायत २० एक असेल. गावात त्रास सुरू झाला. पण शेवती हद्दच बदलायला लागली तेव्हा जोशी आजोबांनी नातवाला साद घातली. ही जमीन वाचावायची असेल तर नोकरी सोड गावाकडे ये. नातवाने नोकरी सोडली आणि गावी गेला. गेल्या गेल्या धक्काबुक्की होऊन खाली पडला. मग बरेच छळ झाले.... नातवाने वैतागून नेपाळ गाठले आणि येताना कट्टा घेऊन आला. दुसर्‍या दिवशी दारू पिऊन शेजार्‍याच्या छाताडावर रोखला आणि.... सगळं सुरळीत झाले... आज ५ एकरावर उस आणि २० एकरला पाणी यायची शक्यता आहे.... गावाकडे असेच रहावे लागते. ब्राह्मणांनाच नाही तर सगळ्यांनाच....
  • Log in or register to post comments

मी आता जे लिहिणार आहे ते

गणपा
Fri, 03/23/2012 - 15:28 नवीन
मी आता जे लिहिणार आहे ते वाचायचं आणि विसरून जायचे.
प्रयत्न केला पण
नातवाने वैतागून नेपाळ गाठले आणि येताना कट्टा घेऊन आला.
हे वाचुन रहावलं नाही. एक बाळ बोध प्रश्न आलाच मनी. कट्टा/कुकरी कितीला पडला/पडली? येण्याजाण्याचा खर्च पहाता तेवढ्याच किमतीला पुण्या/मुंबईतुन एखादी तलवार नक्कीच आली असती. नाही का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

गणपा भौ, कट्टा म्हणजे पिस्तुल

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 03/23/2012 - 17:26 नवीन
गणपा भौ, कट्टा म्हणजे पिस्तुल ना ? रोखायला ते बरे कि लांब लचक तलवार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हा हा हा कट्ट्यार / कट्टा गोंधळ उडाला खरा

गणपा
Fri, 03/23/2012 - 17:50 नवीन
हा हा हा कट्ट्यार / कट्टा गोंधळ उडाला खरा माझा. आमच्या त्येला भाषेत 'घोडा' म्हंत्यात नव्हं. ;) तरीबी मुंबई/पुण्यात ते स्वस्त नसतं का मिळाल? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

चित्रमय नि लालभडक

कौन्तेय
Fri, 03/23/2012 - 18:00 नवीन
जयंतराव, रक्तविहीन क्रांती हे दिवास्वप्नच म्हणायचं तर ... आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

हम्म...रोचक अनुभव आणि त्यावर

नगरीनिरंजन
Fri, 03/23/2012 - 15:14 नवीन
हम्म...रोचक अनुभव आणि त्यावर वेधक चर्चा चालू आहे. सगळं कसं पैशापाशी सुरु होऊन पैशापाशी येऊन थांबतं, नाही? एक गाव असतं, एक अंगणही असतं पण पैशाची (शब्द पिशाच्चाशी संबंधित वाटतो ना?) भूक ते सगळं सोडायला लावते. जेव्हा पैसा येतो आणि जे सोडलं ते पुन्हा मिळवावं वाटतं तेव्हा ते सगळं नासलेलं असतं. स्वतःची किंवा दुसर्‍याची पैशाची भूक त्यानंतर कधीच शांत बसू देत नाही. ये महलों ये तख्तों ये ताजों की दुनिया ये दौलत के भूखे रवाजों की दुनिया ये इन्सां के दुश्मन समाजों की दुनिया ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है? ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है?
  • Log in or register to post comments

क्या बात है!

कौन्तेय
Fri, 03/23/2012 - 17:33 नवीन
नगरीनिरंजन गुरूजी, साधारणत: धागाबाह्य प्रतिसाद, बादरायणसंबंधयोजित खिजवाखिजवी वा इतर जावईशोध इ.कडे दुर्लक्ष करण्याचा माझा नेम आहे. पण तुमच्या या टिप्पणीची नजाकत अलग आहे. सुंदर आहे आणि ती १००% ससंदर्भ नसली तरी चर्चाविघटकही नाही म्हणून सहर्ष स्वागत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

टिप्पणीचे स्वागत केल्याबद्दल

नगरीनिरंजन
Fri, 03/23/2012 - 18:47 नवीन
टिप्पणीचे स्वागत केल्याबद्दल धन्यवाद आणि ती कोणा एकावर रोखून केलेली नाही हे ही तुमच्या लक्षात आले असेल अशी आशा करतो. स्वतः पैसे कमावण्याच्या चक्रात अडकल्याने स्वत:ला पडलेले हे प्रश्न आहेत बाकी काही नाही. स्वप्नं पाहणे वाईट नाही पण आपली स्वप्नं प्रत्यक्षात मालकीहक्क आणि भौतिक गोष्टींमध्येच का रुततात? एवढं करून आपण जे मिळवायला बघतो ते मिळेल याची खात्री काय? असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौन्तेय

खेडूत, जयंत कुलकर्णी

भीमाईचा पिपळ्या.
Fri, 03/23/2012 - 15:45 नवीन
खेडूत, जयंत कुलकर्णी यांच्याशी सहमत. एकतर तुम्ही आंधीत जागा/जमीन घेतली. त्यात तुम्ही तसे उपरेच त्यामुळे सबुरीनेच घ्यावे लागेल. कट्टा, बॅनर, पुढार्‍यांच्या ओळखी कामाला येतील असे वाटत नाही. मीही दुसर्‍या गावात जमीन घेतली आहे. मी ज्याच्याकडून जमीन घेतली त्याचा शेजारी (त्यांचे एकमेकाशी वाद होते तरी)त्या जमीनीवर डोळा ठेवून होता. त्याने जमीन त्या शेजर्‍याला न विकता मला विकली. हे मला सर्व नंतर कळले. झाले. मी जमीन घेतली. एकाला वाट्याने जमीन कसायला दिली. तर हा पठ्ठ्या शेजारी त्रास द्यायला लागला. रस्ता बंद करणे, औत अडवणे, पंप बंद करणे. शेती अवजारांची चोरी करणे, बैलांवर विषप्रयोग करणे, वाटेकर्‍याला दमदाटी करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे. असे करुन २ वाटेकरी त्याने पळवून लावले. शेवटी मी सलग १५ दिवस त्या गावाला राहून नवीन वाटेकरी लावला. त्या त्रासदायक शेतकर्‍याचा सगळा ७/१२ काढला तर तो गावातही तसाच उर्मटपणे वागत असल्याचे कळले. त्याने पोर्वीचेच प्रकार चालू केल्यावर त्याला पहिल्यांदा समज दिली. तो बधला नाही मग त्याला एक दिवस अक्षरशः बडवून काढला. तर त्याने माझ्यावर अ‍ॅट्रासिटी टाकली. मीतर त्यात माहीर. मी त्याच्यावर जालीम क्रॉस टाकली. दरम्यान त्याला माझा कोर्टाचा 'अनूभव' कळला नि केस मिटवून घेवू म्हणून मागे लागला. त्याला चांगला ६ महीने तंगवून मगच केस मिटवली. आता एकदम सुरळीत चालू आहे. वाटेकर्‍याकडे कधी खत आणण्यास पैसे नसतील तर तोच शेजारी खते देतो. २-३ महिन्यात मी कधी गेलो तर मी त्याला त्याचे पैसे देतो, तर 'नंतर दिले तरी चालतील' असे म्हणून पैसे घेतो.
  • Log in or register to post comments

हा आणि इतर प्रतिसाद वाचून

नगरीनिरंजन
Fri, 03/23/2012 - 17:32 नवीन
हा आणि इतर प्रतिसाद वाचून शेतकरी लोक गरीब बिचारे वगैरे नसतात एवढे मात्र कळले. :-) माझ्या कृषीअधिकारी असलेल्या भावाने अनेक नमुनेदार किस्से सांगितले होतेच, हे वाचून त्याला बळकटी मिळाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमाईचा पिपळ्या.

हौन्‌ जाऊ द्या ...

कौन्तेय
Fri, 03/23/2012 - 17:54 नवीन
पिपळ्या पैलवान भाऊ, तुम्ही एका दमात उच्चारलेले अनुक्रमे "अडवणूक ... चोरी ... विषप्रयोग ... दमदाटी ... धमक्या ... समज ... बडवणे ... ऍट्रोसिटी ... जालिम क्रॉस टाकणे ... तंगवणे ... मिटवणे" हे सगळे क्रीयाकलाप बघून छातीच दडपली शप्पत. दाद देतो तुमच्या हिंमतीची! तरीही तुम्ही सबुरीचा सल्ला देताय हे त्याहून विशेष. लक्षात ठेवतो. एसोएससाठी तुमचा हस्तध्वनी क्र. देऊन ठेवा राजे. नेमक्या कुठल्या गुहेत पाय टाकतो आहे याची आता हळूहळू कल्पना यायला लागली आहे. पण गुहेतच पाय टाकायचा तर काळीजही वाघाचंच हवं. हौन्‌ जाऊ द्या ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमाईचा पिपळ्या.

शुभ पंथावर आस्ते जावा !!! :p

यकु
Fri, 03/23/2012 - 18:05 नवीन
शुभ पंथावर आस्ते जावा !!! :p :p :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौन्तेय

हम्म... दुसर्‍या बाजूशीही

स्वातीविशु
Fri, 03/23/2012 - 17:27 नवीन
हम्म... दुसर्‍या बाजूशीही सहमत. गावाला जाऊन राहायचे तर वेळ आली तर प्रेमाने अन वेळ आली तर खमकेपणाने. गावी अनेक लोक मोडेन पण वाकणार नाही अशा प्रकारचे असतात, त्यांना वेळीच इंगा दाखवावा लागतो.
  • Log in or register to post comments

एकंदरीत काय, मा. श्री.

५० फक्त
Fri, 03/23/2012 - 17:54 नवीन
एकंदरीत काय, मा. श्री. महात्मा मो.क. गांधीनी जो संदेश दिला खेड्यात चला, त्याला काही अर्थ उरलेला दिसत नाही, किंवा खेड्यात चला अन चार दिवसांनी परत या असं नवं व्हर्जन यायला हवं.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ.. एकंदरीत उद्बोधक

अर्धवट
Fri, 03/23/2012 - 18:21 नवीन
हॅ हॅ हॅ.. एकंदरीत उद्बोधक धागा.. माझंही गाव आहे आणी तिथे मी नियमीत जातो.. या सगळ्या चर्चेला दोन बाजू आहेत... खूप वर्षांनी गावाकडे जाणं हे खरंच अवघड आहे, बसलेल्या, सुरळीत चालणार्‍या सीस्टीममधे तुम्हे बाहेरून जाता म्हणल्यावर त्रास होणारच की... तुमच्याजागी मी मला कल्पून बघितलं आणि जरा निराळा अँगल समोर आला... मला असं जाणवलं की मला असं गावात जाऊन राहाणं तितकंसं अवघड जाणार नाही, निदान आत्तातरी तसं वाटत नाही कारण, गावातून कुणी तरी शहरातलं काही ना काही काम घेउन नेहेमीच माझ्या घरी येत असतो, आणि तो माणूस नात्यागोत्याचा नसताना, केवळ गाववाला म्हणून माझ्याकडे येतो याचा मला आनंदच होतो. ते जे काही काम असेल ते करण्याचा मी मनापासून प्रयत्न करतो. किमान अगदी विस्तॄत माहिती तरी नक्की देतो. कुणी नोकरी मागायला आलेला असतो, तर कुणी सरकारी ऑफीस मधे एखादं काम काढून आलेला असतो, कुणाला चांगला दवाखाना हवा असतो, किंवा डॉक्टरची, वकिलाची ओळख हवी असते.. असे ५-१०-१५ वर्षे झाल्यावर मग संबंध तयार होतात, माणसं जोडली जातात, गावची आमंत्रणं मिळत जातात, वानवळा पोच होतो, मग गावकडं जायला अवघड वाटत नाही.... मला तर उलटं वाटतं आता, मला शहरात काही अडचण आल्यावर गावकडची ओळख निघेल का असा मी नकळत विचार करायला लागतो. आता हे सगळं नसताना, मी काय केलं असतं.. म्हणजे घर बांधणं हे एकमेव ध्येय न ठेवता तिथे कायम राहाणंही सुलभ होइल यासाठी... एखादी स्कॉर्पियो घेतली असती, पांढरे कडक स्टार्चचे कपडे घालून, गाडीवर चालक ठेउन अथवा स्वत:च खंडीभर धुरळा उडवत एक वर्ष ये जा केली असती तिकडे, एखादा पोलीस अधिकारी, एखादा आमदार, एखादा पाटबंधारे अधिकारी, एखादा सिवील सर्जन याला तिकडे दोन तीन वेळा जेवायला घेउन गेलो असतो. तिकडे गेल्यावर ड्रायवरला दिवसभर रिकामा सोडून असली काही वाक्ये पेरायला सांगीतलं असतं. "च्यायला साहेब लै बाराचा आहे, लैच गरम काम आहे" "सायबानं फोनाफोनी केल्यावर मोठ्यामोठ्या लोकांची फाटते" "सेठ कशी पाचर मारंल सांगता येत नाय" वगैरे वगैरे.. गावतल्या तरण्या लोकांच्या पाठीवर हात ठेऊन जाता येता, "कसं काय रे, काय लागलं तर सांगत जा" असं म्हणलो असतो, त्यातलेच ५-७ जण जमवून तालुक्याला अथवा जिल्ल्ह्याला एखाद्या ३ स्टार बारमधे बसून लै पाजली असती, त्यात गावातल्या सगळ्या भानगडी काढून घेतल्या असत्या.. वगैरे वगैरे वगैरे.. एखादा २ वर्षाचा कोर्सच म्हणा ना....
  • Log in or register to post comments

उत्तम सुचना, एक विनंती अशाच

५० फक्त
Fri, 03/23/2012 - 18:37 नवीन
उत्तम सुचना, एक विनंती अशाच सुचना नविन संस्थळ काढणा-यांसाठी देता येतील काय कुणाला, माझ्या कडं एक गुंठा मंत्री आहे त्याला एक संस्थळ काढायचं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

लैच जब्री -

कौन्तेय
Fri, 03/23/2012 - 18:44 नवीन
आता हे म्हंजे तुम्ही निराळंच काढलंत. उत्तरार्धातली अवस्था माझ्या आजच्या परिस्थितीला अनुरूप असल्याने मी तसं तसं करावं असा सल्ला असेल तर त्यातून आपसूक निघणारा अर्थ हा की आत्ताला वरचे पैसे टिकवून काम काढून घ्या, नि पुढच्या काळात लफडा नको असेल तर किमान हे हे करा! एका घराचं मार्गी लावण्यासाठी पांढरे, कडक ष्टार्च इस्त्रीचे कपडे, (कदाचित एक रे ब्यान गागल नि बोटभर रुंदीची सोन्याची चैन) एक स्कोर्पिओ, डायवर, त्याचा पगार, दारू पिण्याची सुरुवात वा पाजण्याची हातोटी हे सगळं जुळवून आणणं आहे. आवघड आहे राव.
  • Log in or register to post comments

कौन्तेय एकतर तुम्ही ५०

भीमाईचा पिपळ्या.
Fri, 03/23/2012 - 20:15 नवीन
कौन्तेय एकतर तुम्ही ५० हजाराला चूना लागल्यानन्तर हा धागा काढला आहे :P थोडेफार व्यवहार नि संवादकौशल्याच्या जोरावर तुमचे हे (किरकोळ) काम झाले असते. प्रत्येक गावात सगळेच माणसे नीतीभ्रष्ट, विघ्नसंतोषी नसतात. सविस्तर व्यनि करतो.
  • Log in or register to post comments

नाही, अजून नाही

कौन्तेय
Fri, 03/23/2012 - 20:59 नवीन
नाही. अजून पैशाचं कबूलही केलेलं नाही नि अव्हेरलंही नाही. मी स्वत: तिथे पोहोचून काही बोलबच्चन करून संवादकौशल्य गाजवायचं म्हणतोय. आता त्यामुळे रक्कम घटते की वाढते हे बघायचं. :-D प्रत्येक माणसाची नियत खराबच असं समजून वागू लागलो तर जगात जगायलाच नको. मला सगळे नीतीभ्रष्ट असतात असं अजिबात वाटत नाही. माणसाच्या चांगूलपणावर विश्वास असल्यानेच बहुदा मला आजवर चांगले अनुभव येत गेले आहेत. यातही येतील. व्यनि.चं स्वागत आहे -
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा