Skip to main content

त्या 'यो'

लेखक सुधीर मुतालीक यांनी मंगळवार, 05/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
काल पुण्यात एका अजस्त्र कंपनीने त्यांच्या निवडक वीस इंजिनियर्स साठी एका क्लिष्ट टेक्निकल विषयासाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम ठेवला होता. ट्रेनिंग द्यायला मला बोलावले होते. मला दोन तासांचा वेळ दिला होता. दुपारी अडीच वाजता ट्रेनिंग सुरु होणार होते. बसायची जागा मर्यादित असलेने आधी यादी काढुन, येणा-यांची गरज, पात्रता, त्यातून कंपनीला होणारा फायदा याचा विचार करून, ती यादी मला आधी कळवुन वगैरे म्हणजे बरीच तयारी करून इंजिनियर्स ना बोलावले होते. मलाही त्यामुळे खूप तयार असणे गरजेचे होते. आधी पाऊण तास माझ्या दोन सहका-यां बरोबर ट्रेनिंग रूम मध्ये पोहोचलो. औपचारिकता आणि चहापान झाल्यावर मी आणि माझ्या सहका-यांनी धावत पळत जाऊन ट्रेनिंग रूम गाठली. ट्रेनिंग रूम झकपक आणि प्रचंड अद्ययावत होती , दिपुन टाकणारी! माफक आणि निमंत्रीतच लोकांना बसायला जागा. भराभर मी bag टेबल वर टाकुन आधी laptop काढला. भल्याभल्या ठिकाणी बहुतेक वेळेला प्रोजेक्टर, laptop आणि ऑडियो यांचा ताळमेळ न जुळल्यामुळे सुरुवातीचा वेळ ते सगळं जुळवून आणण्यात जातो आणि नंतरच्या धम्माल गतीला सुरुवातीलाच ब्रेक मिळतो. माझे सहकारी ट्रेनिंगरूम अधिका-याबरोबर वायरींची खोचाखोची करत असताना एक सुमारे पंचवीस सव्वीस वर्षाची जीन्स टी शर्ट घातलेली एकदम " यो " दिसणारी पोरगी हातात एक वही घेऊन धावत धावत धIडकन रूम मध्ये घुसली. आल्याआल्या तिथे हजर असणा-या सगळ्यांना खाडकन प्रश्न केला - Is the Program gonna start sharp at 2.30 ? मी उत्तर दिलं. “Yes, it is, Sharp at 2.30 !” ट्रेनिंग अधिका-याने पुढे जोडलं “Be on time” विनवणीच्या स्वरात ती म्हणाली “ Sir, I am a mechanical engineer & I want to attend this training in any case !” माझाशी तिचा संवाद मग सुरु झाला, मी विचारलं “You work with which department?” “Application Engineering, Sir” “Ok, if you are invited by your seniors & if your name appears in this list, you will attend.” That’s what sir, I could not get an email to inform me about this training nor my name appears in the list displayed in the canteen.” “Without wasting time, rush to your Department Head & convince him, if you can. I am not the person who can decide who should attend ! मी तिची बोळवण केली. ती झपकन नाहीशी झाली. माझे सहकारी आणि तो ट्रेनिंग अधिकारी जुगाड करण्यात गुंतले होते. मला तिचे कौतुक वाटुन पुढे ते वाटणे माझ्यातल्या विवेकी विचार गटांनी पकडुन काही चांगले, Positive तर्क काढायच्या आत माझ्या मनातील दुस-या एका गटाने माझे काही तयार दृष्टीकोन धडाधड पुढे करून तिची जीन्स, तिचा टी शर्ट, तिचे ते "यो" दिसणे यांच्या मदतीने टिंगल करणारे तर्क काढुन काम संपवुन टाकले. म्हणजे " इतके दिवस झोपली होती का " " इथे काय Fashion Show आहे का " "वगैरे" मला फारसा वेळ नव्हता तेव्हा तिचा विचार ४०-५० सेकंदानी लॉग आउट करून मी माझ्या कामाला लागलो. पहिल्या सात मिनिटात माझी ओळख आणि काही औपचारिक बाबी संपायच्या सुमारास ती "यो" धावत पळत आली. पंचविसात आठ मुली आधीच होत्या, एकत्रच बसल्या होत्या, त्यात हिने नववी बनून कसबसं स्वत:ला माववुन घेतलं. तिने आत मध्ये येणं यापलीकडे मी फारसा विचलित झालो नाही. माझे बोलणे सुरु झाले, पहिल्या दीड दोन मिनिटात आभार वगैरे संपवुन विषय सुरु केला, दोनच तासांचा अवधी होता, मुद्दे बरेच होते. बेभान होऊन एक एक स्लाईड पुढे सरकवत होतो, त्यानुसार बोलत होतो, सुरुवातीच्या काही स्लाईडस संपल्यावर बोलण्याच्या ओघात जशी वातावरणातील भीड मी चेपवली तसे एक एक जण माझ्याशी बोलु लागला, सटासट प्रश्न येवु लागले होते. मला खूप धमाल येत होती. कधीतरी भानावर येवून घड्याळ बघितलं तर सुरु केल्याला पाउणे तीन तास उलटून गेले होते. पुढल्या पंधरा मिनिटात मी संपवले. प्रोग्राम संपल्यावरची आवरा आवर आणि भेटीगाठी वगैरेची जबाबदारी माझ्या सहका-यांवर सोपवुन मी सटकलो. भाषण संपवल्यावर किंवा एखादा ट्रेनिंग प्रोग्राम संपवल्यावर बोलताना चढलेली ती झिंग मला जास्ती ज्यास्त अंगावर ल्यालेली आवडते. त्या बेभान अवस्थेत मला खुप वेळ राहायला आवडतं. विषयाशी संपूर्ण तादात्म्य पावल्यावर ऐकणा-यांनी त्यांची तंद्री जर माझ्या बोलण्याशी संपुर्ण मिळविल्याचे दिसले तर लहानपणी निपाणीतल्या समाधी मठात व्हायचे तसं होतं. समाधी मठातल्या गाभा-यातला तो ढामढीम करणारा प्रचंड नगारा, लहान मोठ्या त्या कित्येक घंटा आणि त्यातुनही ऐकू येणारे आरतीचे कानडी स्वर हे सगळे एकत्रित ऐकताना मी बेभान व्हायचो, दिवसेंदिवस रात्रोरात्र त्या आवाजांचे धो धो कोसळणे थांबू नये असे वाटायचे, खर तर त्यातल्या प्रत्येक स्वर स्वतंत्र पणे ऐकला असता ना, तर तो ओरबडणारा, चावरा असायचा. संगीताच्या अंगाने तपासला तर प्रत्येक स्वर म्हणजे नगI-याचा, आरतीचा, घंटांचा , टाळ्यांचा अगदी वेगवेगळ्या पट्ट्यांमधला असायचा. पण का कोण जाणे त्या सर्वांचा एकत्रित आदळणा-या स्वरांनी माझी समाधीच लागायची. सॉलिड झिंग चढायची. अगदी तशीच झिंग असं एखादे भाषण दिल्यावर येते, ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तर कहर होतो कारण सहभागी मर्यादित असतात. वीस. पंचवीस. फार तर फार तीस. चाळीस किंवा पन्नास किवा साठ डोळे आणि तितकेच कान अगदी जवळून आपल्या वर सुरुवातीला त्यांच्या बंदुका रोखून उभ्या असतात. बंदुका अपेक्षांच्या, तिरस्काराच्या, उतावळेपणाच्या, कंटाळलेल्या वगैरे. आपला आवाज, देहबोली, माहिती, ज्ञान यांच्या माध्यमातुन त्या सगळ्या बंदुका गळून पाडण्यात आणि शेवटी त्या चाळीस, पन्नास किवा साठांना भजनी लावण्यात भलती झिंग असते. ती झिंग अंगावर चढते. आणि अशावेळी बोलताना सुद्धा त्याच विषयातला काहीतरी कदम वेगळाच शोध लागतो.किंवा लक्खकन एकदम वीज चमकावी तसे काही तरी सुचते, म्हणजे काहीही. त्या धो धो अवस्थेत मी लिफ्ट मध्ये उभा राहिलो. अगदी सुदैवाने एकटाच होतो. लिफ्ट चे "G" दाबलं. लीफ्ट खाली सरकायला लागली. आणि अचानक एक चेहरा डोळ्यासमोर चमकुन गेला. मी मला थोडं, अगदी थोडंच भानावर आणुन समोर बघितलं. लिफ्ट तर पूर्ण बंदिस्त होती. काचेचे दरवाजे वा अन्य काही ज्यातून त्या त्या मजल्यावरचे दिसेलसे काही नव्हते. कुणाचा तरी चेहरा मी बघीतला. डोक्यावरून पदर असणारा. कोणाचा....? जाऊदे ना, मघाशी अचानक उपटला तसा एखादा unwanted विचार पुन्हा उसळी मारून आला वर असेल. या unwanted विचार गटांचा एक फार त्रास असतो बुवा. एकतर त्यांना काही चांगलंचुंगलं चालत नाही, wanted विचार गटां वरती यांची सतत दादागिरी चालते. आणि चांगल्या दृष्टीकोनाची प्रचंड नासधूस हे गट करतात. मला त्यांचा फार त्रास होतो. आणि आगदी च्यायला नको त्यावेळी मनात उपटतात. झुरळ मारण्याचे कसं ते HIT वगैरे असते. तसं काही फुसफुस औषध पाहिजे. किंवा तशी एखादी मच्छरदाणी. जाऊदे. रेटा बाजुला. जोर लावुन. झिंग उतरायला लागलीय. तो चेहरा कुणाचा बरं ? आणि असा अचानक समोर का आला. वरती त्या सगळ्या ललना अगदी " यो" होत्या, त्यात ही डोक्यावर पदर काय भानगड आहे काही क्लु मिळेना त्यामुळे पुन्हा एकदा मी आपली मी आपली डुबकी मारली. कैफ उतरल्यावर राहिला मात्र तो डोकीवरचा पदर. त्यात एक भर पडली होती ती कपाळावरल्या लालबुंद मळवटाची! त्या तीन तासांची उजळणी करताना मध्येच कुठेतरी तो डोईवरचा पदर आणि आता तो लालबुंद मळवट डोळ्यांसमोर चमकुन जायचे !!!!!! शोध घ्यायचा ध्यास मनाने घेतला. खोलीतले दिवे तर कधीच बंद झालेत हे मला जरा उशिरा लक्षात आलं. एका विशिष्ट वेळी तो मळवट. हो त्या नऊ "यो" सपासप प्रश्नं विचारात होत्या आणि त्यामुळे धमाल येत होती. पण इथे तो पदर आणि मळवटचे काय ? त्या नऊ जणींचा सहभाग ज्यास्तच होता. त्यांनीच कमलीचा जिवंत पण आणला. च्यायला, पोरी तेही मेकॅनिकल इंजिनियर ! एवढ्या शार्प !!! जणु बाकीचे सतराजण तिथे नव्हतेच. त्यांच्या विषयीच्या भावना आता अभिमाना कडे झुकायला लागल्या होत्या. पंधरा मिनिटे होती त्यावेळी घड्याळाकडे बघितले ना, त्यावेळी असा जोरदार करंट लागुन जाग आली होती. तो करंट अभिमान, कौतुकाचे मिश्रणाने आला होता, पण त्यात मिश्रणात आणखी एक धातु होता. उपकृत असल्याचा. ऋणात असल्याचा. त्या तिस-या धातुच्या शोधाच्या वेळीच तो मळवट दिसला. डोई वरती पदर दिसला. एक माउली दिसली. आणि नऊ मुली दिसल्या. माउली त्यांचा पाठ घेत होती. चिमुकल्या मन लावुन शिकत होत्या. आजचा पाठ संपला. नऊच जणींची आजची शाळा संपली. थोड्या पोरीना घ्यायला त्यांचे बाप आले होते. माउलीनी त्यातल्या दोघी तिघींना घट्ट पोटाशी धरलं. बाहेर पागोटे वाला उभा होता. त्याने दोघी तिघी चिमुकल्यांना पोचवतो असे सांगितलं आणि पागोटे वाला निघुन गेला. माउली निघाली, लेकरांना घेऊन. थोडी पुढे गेली तो काय, पाठीवर नासके अंडे पडले तिच्या, तेवढ्यात पुढून धोंडा आला डायरेक्ट कपाळावर. सोबत अश्लील शिव्यांची लाखोली. माउली खंबीर पणे पुढे चालली होती. प्रचंड निर्धाराने, माझ्या लेकींना मी शिकवणार. तुम्ही मला दगड मारा. शिव्या द्या. मी सगळं सहन करीन. पण पुण्यातल्याच नाही, तर देशभरच्या माझ्या लेकी शिकल्या पाहिजेत. शिकणं ही काही तुम्हा पुरुषांची मक्तेदारी नाही. तुम्ही ही शिका ना, पण आम्हालाही ईतिहास, भूगोल, विज्ञान, गणित, चाखु द्या. माझ्या समोरच्या या सगळ्या "यो" त्या माउलीच्याच लेकी. बापरे विषयाची केवढी भक्ती, ......I want to attend this training in any case " केवढा हा ध्यास! सावित्रीबाई एकशे त्रेसष्ठ वर्षे झाली तुम्ही तुमच्या नऊ लेकींच्या हाती पाटी पेन्सिल देवून. एक नक्की, आज या नऊ "यो" क्लिष्ट तंत्रज्ञानाचा अभ्यास करू शकताहेत कारण बाई तुम्ही अंगावर चक्क दगड झेलले, नासक्या अंड्यांचा मार खाल्ला आणि पुण्यात नऊ पोरीना गमभनचे धडे दिले ! तुमच्या ऋणातून हा समाज कसा बरं उतराई होणार ? धन्य तुम्ही, आणि धन्य तुमच्या लेकी सुद्धा. तुमच्या योगदाना शिवाय भारत एका अतिशय समर्थ मनुष्य बळाला मुकला असता! सुधीर मुतालीक sudhirmutalik@gmail.com
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5852
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

एकदम सुरेख! लेख अतिशय आवडला. सावित्रीबाईंचे अपार ऋण आहेतच. तुम्ही त्याची पुन्हा एकदा आठवण करुन दिलीत, त्याबद्दल तुमचे आभार.

In reply to by पैसा

माझ्या "त्या यो" या लेखावर आपण दिलेल्या प्रतिक्रीयेबद्दल खुप धन्यवाद. अशी मनमुराद दाद मिळाली की कामाच्या रगाड्यामधुनही लि़खाणासाठी जोमाने वेळ काढ्ता येतो. सुधीर

झकास लेखन मालक. आवडले. :) - छोटा डॉन

अतिशय छान ........

खुप छान लेख आहे..आवडला!

लेख आवडला. मस्त लिहलय!

विषयापर्यंत पोचण्याची वेगळीच हातोटी! एकदम अपीलिंग! :) -चतुरंग

अगदी धबधब्यासारखे तुमच्या विचारप्रवाहात वाहून गेलो..........सुंदर निरिक्षणशक्ती.......:)

समोरच्या या सगळ्या "यो" त्या माउलीच्याच लेकी. अगदी...सावित्रीबाईंनी पुढाकार घेउन त्रास सहन केला अन त्यामुळेच आम्ही आज शिकु शकतो...प्रचंड त्याग अन उपकार आहेत त्यांचे. अर्थात खवचटपणा अन त्रास द्यायची वृत्ती गेली आहे असे नाही...त्याचेच एक उदा. तुम्ही सुरुवातीला दिले आहे. असो.

In reply to by शिल्पा ब

अगदी सहमत! मुलांनी जन्माबरोबरच मिळालेल्या स्वतंत्र्याचं काय एवढं ग्रेट केलय ते दिसतच आहे. आपल्याच घरात असलेल्या मुलींसारखीच मुलगी बहेर दिसल्यावर मात्र दृष्टीकोन बदललेला दिसतो.

लेखन सुरेखच. एक शंका: किती 'यो' ना आपला 'इतिहास' माहित असतो? या उदाहरणात कुणाच्या 'खांद्यावर' उभे राहून आम्ही आजचे विस्तृत जग बघू शकत आहेत हे या 'यो'ना ठाऊक असते? साध्यासाध्या प्रश्नांची उत्तरे न देता येणारी मुले, मुली बघितले की झीट येते. चुकून माकून रोडीज किंवा इतर कार्यक्रम लावला की डोके हलते.

अतिशय सुंदर लेख! एकदम आवडला! पुण्या मुंबईतील स्लॅन्ग सध्या माहीत नसल्याने 'यो' मात्र नीट कळाले नाही. जनरल अंदाज आहे, पूर्वी ज्याला मॉड वगैरे म्हणायचो तसे असावे काहीतरी :)

सुंदर लेख. तुमच्याकडून अजून खूप काही चांगलं असं वाचायला मिळेल अशी अपेक्षा आहे. अवांतर: मांडणीमुळे मधेच थोडंस गोंधळायला झालं. किंचित बदल केला तर तसं होणार नाही.

सुंदर लेख. त्या सावित्रीच्या लेकी. आता शिकून शहाण्या झाल्या आहेत. त्यांची बुद्धीमत्ता वापरात आणताहेत. सावित्रीबाईंनी अंगावर दगड धोंडे झेलले म्हणून आज आपल्याला हे दिवस दिसले. अन्यथा त्या लेकींची बुद्धीमत्ता वायाच घालवली असती

सुधीरभौ, फारच छान लिखाण आहे तुमचं! मधला 'वळण बिंदू'ही भारी आणला आहे. सावित्रीबाईंच्या कार्याला सादर प्रणाम! पुलेशु

मिपा वर टाकलेला हा लेख आज मुद्दाम आठवला !!!!

छान लेख आहे. आधीही वाचला होता. खरचं महान होत्या सावित्रीबाई फुले. सावित्रीबाईंना मानाचा मुजरा. त्यांचे अनंत उपकार आहेत.

अतिशय सुंदर!ह्या लेखासाठी टाळ्या. महात्मा फुले, सावित्रीबाई,कर्वे ,स्वामी विवेकांनद या सर्वांचे खूप खूप आभार.त्यांनी कठीण परीस्थित आम्हाला शिकवायच्या प्रयत्न केला. स्वामी विवेकानान्दाबद्दल नुकतीच ऐकलेली एक गोष्ट: स्वामीजी जेव्हा अमेरिकेत होते.तेव्हा ज्यांचा घरी त्यांचा मुक्काम होता त्यांची छोटी मुलगी एकदा स्वामीजींच्या मांडीवर बसून त्यांना तिची शाळेची पुस्तके दाखवत होती.स्वामीजींनी जेव्हा भूगोलाच पुस्तक हातात घेतलं तेव्हा त्यांनी तिला जगाच्या नकाशात भारत कुठे ते दाखवलं.ती पुस्तके बघून स्वामीजींच्या डोळ्यात पाणी आल.आपल्या देशातल्या स्त्रियांचं चित्र त्यांच्यासमोर उभ राहील.स्वामीजी बोलले कि मी जेव्हा मायदेशी परत जाईल तेव्हा माझ्या देशातल्या मुलींना शिकण्यासाठी अशीच पुस्तके मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करील. भारतातील दुसर्या शाळेची मी विद्यार्थिनी.हुजूरपागा.माझी शाळा कोणी स्थापन केली मला माहित नाही.पण ज्यांनी स्थापन केली त्यांची मी शतश: ऋणी आहे.

अप्रतिम .. शब्दही अपूरे पडावेत इतका सुंदर असा लेख .. धन्यवाद , खूप छान वाचायला मिळाल तुमच्यामुळे सुधीर. लिहित रहा .. खूप खूप शुभेछा.

माउ, पुजा, किचेन, मोती(टिवल्या बावल्या) आपल्या प्रतिक्रीयांनी प्रचंड सुखवलो.खुप धन्यवाद.

लिफ्टमधला प्रसंग आधी कळळाच नाही. असं वाटलं कि त्या यो मुलींना पदर घेतलेल्या अवस्थेत पाहीलं असा शेवट होतोय कि काय.. पण लेख सावित्रीबाईंकडे वळला आणि असा सुंदर इफेक्ट साधला गेला कि बस्स.. अप्रतिम !

सांजसंध्या, आपला प्रतिसाद अप्रतिम. प्रतिसाद मिळाला की लिहीण्याची उमेद सॉलीड वाढते. थॅन्क्यु.

झपाटल्या सारख लिहल आहात तुम्ही, अन ते झपाटल पण आमच्या वाचनात उतरत गेल. जरी सुरवातीला विषय कळला नाही तरीही लिहिण्याच्या स्टाइल न पुरत वाचल गेल. आवडल हे वेगळ सांगायला हव का?

लेख आवडला. त्या क्लिष्ट टेक्निकल विषयाचे नांव समजू शकेल का ? का तेही आमच्या डोक्यावरुन जाणारे आहे ?

In reply to by तिमा

तिरसिंगरावजी, खुप धन्यवाद.