एक संध्याकाळ "संतूर"लेली

जयवी जनातलं, मनातलं
संतूरच्या सुरांनी दरवळलेली एक संध्याकाळ ..... कुवेतच्या वाळवंटात एक सुखद, तरल, गोड झुळूक !! संतूर हे वाद्यच मुळी अतिशय आनंदी आणि Romantic आहे आणि ते वाजवणारे जर साक्षात पंडित शिवकुमार शर्मा असतील तर.... ह्याहून जास्त कुणी काय अन् कशाची अपेक्षा करेल ..... ? मंचावर ७४ वर्षे वयाचा अतिशय देखणा तरुण ..... आपल्या सुरांनी समोर जमलेल्या प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतो. तरुणाई अजून वेगळी काय असेल ? कमालीचं आकर्षक व्यक्तिमत्व लाभलेले शिवाकुमारजी आपल्या आदबशीर बोलण्यानं मैफिलीची सुरवात करतात. फक्त कान नाही तर डोळे सुद्धा आसुसून वाट बघायला लागतात. काय पेश करणार आहेत ते छानपैकी समजावून सांगतात. साथीला तबलजी पंडित रामकुमार मिश्रा आणि तानपुऱ्यावर जपानी शिष्य ताकाहीरो अराई !! 1256813951175-santoor player shivkumar sharma" width="363" height="500" alt="" /> पहिला भाग फक्त क्लासिकल ....शास्त्रीय. राग वाचस्पती. हळूहळू संतूर बोलायला लागतो ...... गायला लागतो, दरवळायला लागतो आणि बघता बघता स्वत:चं साम्राज्य उभं करतो आणि प्रत्येकाला स्वत:च्या पाशात बांधायला लागतो. भान येतं तेव्हा मध्यांतर झालेलं असतं. शब्दात काय वर्णन करणार.... ते अनुभवायलाच हवं. मध्यांतर होता होता पंडितजी धीरगंभीर आवाजात कलेची तारीफ कशी करायची ते सांगतात. ताली बजाने के सिवा और भी तरीके होते है तारीफ करनेके !! मग मिश्कील स्वरात म्हणतात, “बहोत खूब “, “क्या बात है”, “वाहवा”…….. ऐसी भी नजाकत भरी तारीफ कर सकते हो !! दुसऱ्या भागात इसी प्रकार की तारीफ सुनना ज्यादा पसंद करुंगा..... !! एक छोटा म्हणता म्हणता एका तासाचा झालेला ब्रेक, चहा, बिस्किटं..... गप्पा.....!! पुन्हा एकवार तशीच बैठक..... !! आता थोडं सेमिक्लासिकल !! राग पहाडी !! रागातले सूर.... सुरावट.... रागाचा विस्तार ...... हळूहळू रागाची ओळख, मग मैत्री, पुढे पुढे तर जिगरी दोस्तीच होते. सूर इतके ओळखीचे होतात की नकळत आपणही गुणगुणायला लागतो. आता संतूर अगदी रंगात आलेला असतो. बोटं जादूसारखी फिरत असतात......तबलाही मस्तीत येतो...... वेग वाढतो, श्वास वाढतो.....आवेग वाढतो.... सूर अगदी टिपेला पोचतात.... श्वास रोखल्या जातो..... आणि तिहाई होऊन संतूर विसावतं. टाळ्यांचा गडगडाट.........कितीतरी वेळ.........!! पंडितजींचा भावपूर्ण सत्कार !! मंत्रमुग्ध श्रोते........ नकळत उभे राहतात.......पुन्हा एकवार टाळ्या ........ !! संपली मैफिल ......नाही नाही........अजूनही डोक्यात तेच सूर आहेत..... तीच नशा....... उतरायला वेळ लागणारच !!
वर्गीकरण
लेखनप्रकार

15 टिप्पण्या 3,035 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

यकु नवीन

व्वाऽ! या ‍अवलियाचे संतुरवादन एक स्वर्गीय अनुभव असतो. औरंगाबादचे बहिरगावकर बंधू त्यांच्या वडीलांच्या स्मृतीप्रित्यर्थ जागतिक किर्तीच्या अशा अनेक कलावंताना औरंगाबादेत आणतात. एकदा त्यात लागोपाठ हरिप्रसाद चौरासिया आणि शिवकुमार शर्मा आले होते. शर्मांनी माईक सिस्टीम सेट करायलाच अर्धा तास घेतला. हे ठिक सेट झाल्याशिवाय मजाच येत नाही म्हणे. त्यानंतरचा दीड तास संतूरमधून निघणार्‍या त्यांच्या डोक्यावरच्या केसांपेक्षाही सूक्ष्म सूरांनी पब्लिक खुळे झाले. शेवटी तेच म्हणाले, उठो घर नहीं जाना है क्या? पब्लिकमधून कुणीतरी ओरडले घर भूल गये हम! मग त्यांनी आणखी अर्धा तास वाजवले. त्यांनी संगीत दिलेल्या सिनेमातील एक गाणे वाजवून ते कोणते ते लोकांना ओळखायला लावले. तो कार्यक्रम मनावर कोरला गेलाय. सीडी, डीव्हीडीवर नंतर क‍ितीदाही ऐकलं तरी ती लाइव्ह कन्सर्टची मजा आली नाही.

मोदक नवीन

In reply to by यकु

पुणे फेस्टिवल २००७ ला पंडीत हरिप्रसाद चौरासिया आणि पंडीत शिवकुमार शर्मा एकाच स्टेजवर होते.. कार्यक्रम रंगात आल्यानंतर आणि हात तापल्यानंतर एका हातातील संतूर वाजवणारे कलाम खाली ठेवून निव्वळ बोटे आणी हातचा पंजा वापरून वाजवलेली संतूरही तितक्याच नाजूकपणे बोलत होती.... पंडीत हरिप्रसाद चौरासियांबद्दल काय बोलावे, श्वासावरचे अप्रतीम नियंत्रण, दसमास हे सगळे यशस्वीपणे पेलून नेणारी शरीरसंपदा आणि अतिशय मिश्कील व्यक्तीमत्व __/\__ . (पंडीत हरिप्रसाद चौरासिया मुंबईत कृष्णजन्मोत्सवाच्या वेळी बहुदा गवालीया टँक मैदानात रात्रभर कार्यक्रम करायचे असे ऐकून आहे.. अधिक माहिती आहे का कोणाजवळ..?)

मूकवाचक नवीन

संधी मिळाल्यास शिवकुमार शर्मा - झाकिर हुसेन यांच्या मैफिलीला अवश्य जा. या दोन दिग्गज कलाकारांच्या 'आतल्या तारा' अफलातून जुळलेल्या असल्याने मैफिलीत एक वेगळाच रंग भरतो.

जयवी नवीन

In reply to by मूकवाचक

हो.......... खरंय तुमचं !! टीव्हीवर बघितलंय. पण प्रत्यक्षात काय धम्माल येत असेल ह्याची कल्पना करु शकते :) लवकरच अशी संधी मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना !!

तिमा नवीन

शिवकुमार शर्मा यांच्याविषयी आदर आहेच. पण मागे एकदा 'वसंतखाँ' म्हणाल्याचे स्मरते की संतुर हे असे वाद्य आहे की त्यावरुन उंदीर जरी पळत गेला तरी गोड सूर निघतील.

मूकवाचक नवीन

भजन सोपोरी: संतूरवर मिंड, गमक आणि ठुमरीतल्या काही हरकती वाजवण्यासाठीचे आगळेवेगळे तंत्र यांनी विकसीत केले आहे. दुवा: http://www.youtube.com/watch?v=1iXUsIywDJM उल्हास बापटः यांची संतूरचा स्वरमेळ साधण्याची (ट्यूनिंग) पद्धत 'क्रोमॅटिक' असल्याने हे फारशी 'झटापट' न करता विनासायास वेगवेगळे थाट/ राग वाजवू शकतात. पार्श्वसंगीतात संतूरचा वापर करताना हे फार सोयीचे होते. दुवा: http://www.youtube.com/watch?v=TRS5ym02kFo&feature=related संतूरचा पर्शियन अवतारः संतूर तांत्रिकदृष्ट्या पियानोच्या जातकुळीतले वाद्य आहे. जगभर संतूरसारखी वाद्ये प्रचारात आहेत. संतूरचा शततंत्री वीणा असा प्राचिन संस्कृत साहित्यातही उल्लेख आहे. दुवा: http://www.youtube.com/watch?v=gpJMcL9tVrs

जयवी नवीन

In reply to by मूकवाचक

माझ्या "सारे तुझ्यात आहे" ह्या सीडी मध्ये उल्हासाजींचं संतूर आहे. त्यावेळी त्यांना आपल्या गाण्यासाठी वाजवतांना बघून वेडीच झाले होते ;)

संदीप चित्रे नवीन

पंडितजींच्या मैफली म्हणजे अप्रतिमच अनुभव असतो. माझ्या विशेष लक्षात राहिलेल्या मैफिली म्हणजे -- एकदा सवाई गंधर्वमधे पंडितजीं आणि उ. झाकीर हुसेनने जो माहोल बनवला होता तो आणि द्सरी म्हणजे पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती शताब्दीवर्षी सारसबागेशेजारच्या मैदानातली मैफिल. (अवांतर -- त्या शताब्दीनिमित्ताने झालेल्या मैफलींत कै. उ. विलायत खांसाहेबांनी साडेचार तास रंगवलेली मैफल तर शब्दांच्या पलीकडली होती. पहाटेच्या सुमारास खांसाहेंनी वाजवलेली भैरवी ऐकताना डोळ्यांतून आलेल्या पाण्याचा स्पर्श इतक्या वर्षांनंतरही मनात स्पष्ट आठवतोय!)

मूकवाचक नवीन

In reply to by संदीप चित्रे

उ. विलायत खाँ, पं. किशन महाराज यांची युकेमधल्या एक मैफिलीची (दरबारी/ भैरवी) व्हीसीडी मिळते. दोन्ही कलाकारांच्या उतारवयातले ते वादन ऐकताना वयोमानाने आलेल्या मर्यादांवर मात करून नादब्रह्माचा कसा विलक्षण अनुभव ते देउ शकतात याचा प्रत्यय येतो. (दरबारी वाजवताना मधे एक विराम घेऊन खाँसाहेब म्हणतात - "जो भी थोडीबहोत उमर थी, वो गुजार दी आप लोगोंकी खिदमत मे. सुन लिजीये इस किस्म का सितार, फिर ऐसा सितार सुनने को नही मिलेगा". दुर्दैवाने त्यांचे हे बोल लवकरच शब्दशः खरे झाले.)

जयवी नवीन

संदीप....... ह्म्म्म्म्म...... स्वर्गीय आनंद मिळतो रे ह्या उस्ताद लोकांची कला बघून !!