Skip to main content

मराठी दिनानिमित्त काही अस्सल मराठी अभिव्यक्ती..

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 28/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
काही अस्सल मराठी अभिव्यक्ती ..! फारा दिवसांपासून आम्ही ‘अमृताते जिंकीत पैजा..’वाल्या मराठीच्या अस्सल अभिव्यक्तींचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण अलीकडे मराठी भाषेची क्षितिजे मुंबई नगरी प्रमाणेच अस्ताव्यस्तपणे विस्तारल्याने अस्सल काय नि नक्कल कोणती याबाबत आमचा अंमळ गोंधळ व्हायला लागलाय. याबाबत अस्सल मराठी अभिव्यक्तीच्या व्यासपीठावरील विद्वानांचा व विदुषीनचा सुयोग्य व सूज्ञ सल्ला मिळेल या आशेने आम्ही आलो आहोत. इंग्रजी भाषेचा आहे तसा मराठीचा जागतिक स्तरावरचा शब्दकोष अजून का बनवला गेला नाही याची कारणे आम्हाला मराठी अभिव्यक्तींचा अभ्यास करताना समजली. इंग्रजी भाषा सर्वसमावेशक भलेही असेल पण लवचिकपणात मराठीपुढे नक्कीच हार खाणार . मराठी मायबोलीची लेकरे तिचे हातपाय कितीही ओढु देत, ते पुन्हा बाउंड्रीच्या आतच राहणार ! (आता तर इतर भाषांची लेकरेही मराठी मायबोलीचे हातपाय ओढू लागली आहेत ! ) एका एका शब्दाचे अर्थ ४-५ पाने सहज होतील. वाक्यांचे तर (काढणाऱ्यांना ) वाटेल ते अर्थ काढता येतील . (खोटं वाटतंय ? दादा कोंडक्याना विचारा ! (वरती गेल्यावर..) ) . आहे का अशी सोय इंग्रजीत ? शिवाय शब्दांची लिंगे प्रांतवार बदलतात. मुंबईच्या ‘गेला का डॉक्टर ?’ चं पुण्यात आल्यावर ‘गेले वाटतं डॉक्टर ?’ कोल्हापुरात ‘गेलं काय ते डॉक्टर ? आणि बेळगावात येईपर्यंत ‘गेली काय ते डॉक्टर ?’ होऊ शकतं ! ‘बोलून चालून तो पडला शिवाजी’ याचं ‘walking talking he fall shivaji !’ असं भाषांतर करायला गेलो आणि आम्ही फसलो ! ‘ असेच काही अभाषांतरणीय अविष्कार आम्हाला आमच्या संग्रहात दिसून आले आहेत. जिज्ञासूनी त्यांचे इंग्रजी भाषांतर करण्याचा अवश्य प्रयत्न (जमल्यास) करावा व आम्हाला मदत करावी. तोंड आले आहे... डोळ्यात फूल पडले आहे नाक टोचून घे..... कसली सुरसुरी आलीये ? काल बॉस समोर चांगलीच फाटली राव... दुखरा कान कोरू नये. तुझा मुडदा बशिवला मेल्या... एवंगुणविशिष्ट मराठी भाषेत एक प्रसंग, एक संवाद घेऊन आम्ही मऱ्हाट प्रांत व आसपासच्या प्रान्तात फिरलो असता काही मराठी अभिव्यक्ती आढळल्या. या अस्सल असाव्यात अशी आम्हाला दाट शंका आहे. यातल्या नकला शोधण्यास सुद्धा वरील जिज्ञासू मंडळींनी मदत करावी... 'अहो.., किनई मोरीत पाणी का तुम्बलय जरा पाहता का गडे ?' 'आलोच डिअर ...एवढा कांदा कापून येतो लगेच........'. पुणे (सदाशिव पेठ) आवृत्ती 'हौ रबिश ! पाणी तुंबलेय ...आम्ही स्टेट्स मध्ये असताना ना असं कधी नाही बाई पाहिलं ...' 'अहो स्टेट्स मध्ये गटारे कुठे आहेत ?' पुणे (क्याम्प ) आवृत्ती 'अगो जरा गटार का तुंबलेय ते पाहतत्येस का गो उलीसे ?' 'खालल्या आळीस देवचारान् कोम्बडो कापून टाकलो असान् रातचो गटारात.. ' रत्नांग्री आवृत्ती 'अठीसा इतले पानी का तुंबून रहायले भौ ?' 'का मालूम ? पाहून येतो जी टकाटक ...!' खानदेश आवृत्ती 'नाम्या भोसडीच्या? रातच्याला झोपला हुतास का काय जाऊन गटारात? पानी बग कसं तुम्बलय ते..' 'काय आटवत न्हाई बा ! राती जरा ज्यास्तीच झाली हुती खरी....' कोल्हापूर आवृत्ती 'मामू..! पाणी किती तुम्बलय ड्रेनेज मध्ये ? कार्पोरेशन वाले काय झोपा काढताहेत का? ' 'असतील असतील .. ये है मुंबई मेरी जा...' मुंबई आवृत्ती 'अव्वा बाथरुमात पाणी किती तुम्बलय वो ! जरा बगटलासा काय ?' 'मी कशाला बगू ? ते कोपऱ्यातल टोच्या घे आन निट्ट ढोसून सोड की....' निपाणी आवृत्ती 'रे अब्दुल्ल्या, गटरमे पाणी तुम्ब्या है... जरा टोच्या लेकु ढोस तो...' 'अम्मी, जरा पडोसके परडेमे शेरडी क्यू वरडी देखके आतु...' मिरज आवृत्ती आता बोला, यातली कोन्ची आवृत्ती अस्सल मराठी अन कोन्ची नककल ते ........? (या लेखामधून कोणाही मराठी अगर बिगर मराठी नागरिकांच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. तशी समजूत झाल्यास ती गैर समजूत आहे याची कृपया नोंद घ्यावी...)

वाचने 2976
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

एक प्रश्न : जर तुम्ही मराठीच्या अस्सल अभिव्यक्तींचा संग्रह करण्याचा प्रयत्न करीत आहोत तर तुम्ही वाक्यांचे ईंग्रजीत भाषांतर का करत आहात ?

अभाषांतरणीय अविष्कार आम्हाला आमच्या संग्रहात दिसून आले आहेत. जिज्ञासूनी त्यांचे इंग्रजी भाषांतर करण्याचा अवश्य प्रयत्न (जमल्यास) करावा व आम्हाला मदत करावी. तोंड आले आहे... डोळ्यात फूल पडले आहे नाक टोचून घे..... कसली सुरसुरी आलीये ? काल बॉस समोर चांगलीच फाटली राव... दुखरा कान कोरू नये. तुझा मुडदा बशिवला मेल्या... मराठी व्यतिरिक्त भाषा बोलणार्‍यांच्या डोळ्यात फूल पडत नाही की , त्यांना सुरसुरी येत नाही ? हे घ्या माउथ अल्सर्स ग्लॉकोमा नोझ / इअर्स पीअर्सिंग व्हाय आर यू सो एक्सायटेड हॅड नो बॉ* व्हेन द बॉस वॉज इन द रूम /किंवा हॅड नो स्पाइन

दोन भाषेच्या भावनांमध्ये बरच अंतर आहे,त्यामुळे सध्या लिप्यंतर केलेलं आहे... बघा कसं वाट्टं ते--- ;-) तोंड आले आहे... >> माऊथ इज कम :-p डोळ्यात फूल पडले आहे >>फ्लॉवर फॉल इन आय :-) तुझा मुडदा बशिवला मेल्या... >> युअर डेडबॉडी शिटिंग...यू डाईड...! ;-)

आली लहर केला डायरीचा कहर. डायरी = दैनंदिनी

तुम्ही खरच खूप अ‍ॅक्टीव्ह आणि क्रिएटिव्ह आहात. कीप इट अप ! :) वरचे कलेक्शन मस्तच ...

"Coefficient of Discharge" ला मराठीत काय म्हणतात हो? तुमच्या प्रतिभेचा जास्त आहे म्हणून तुम्हाला माहित असेल असे वाटतेय. (ह.घ्या.) बाकी लेख नेहमीप्रमाणेच 'ऊत्तम'!

In reply to by नगरीनिरंजन

प्रतिभा? कोण प्रतिभा ? आम्ही कोण्या प्रतिभेला ओळखत नाही ! निरंजन भौ, ते coefficient का काय म्हणता ते तुम्हीच मोजा. आम्ही फक्त मनाला भावलं ते जमेल तसं शब्दात उतरवण्याचा प्रयत्न करीत असतो...वाटलं, गोड मानून घ्यावं..नाही, सोडून द्यावं....

काही दिवसांपुर्वी, औधुत गुप्ते यांचं (माझ्या आवडत) एक गाण मला शुद्ध इंग्रजीमध्ये रुपांतरीत करुन हव होत. गाण होत "सखे ग साजनी ये ना.." हे गाणे इंग्रजीत ट्रान्सलेट करण्यासाठी मग मी मराठी साईटवर गाण्याचे बोल टंकून ते गुगल ट्रान्सलेट वर पेस्ट केले. या गाण्याचे ट्रान्सलेटसाठी टाकलेले शब्द होते=> "श्वासात गंध, ध्यासात स्पर्श, का तोल सावरेना आलीस तु की नुसताच भास काही मला कळेना सखे ग साजनी ये ना,,,," आता आपल्या गुगल गुर्जींनी माझे हे शब्द हिंदी म्हणून डिटेक्ट केले आणि त्यानुसार त्यांचे डोके लढवून ज्या काही ओळी दाखवल्या त्या पाहुन मला हार्ट अ‍ॅटॅक यायचाच काय तो बाकी राहीला होता. कारण त्यांचे ते ट्रान्सलेशनचे शब्द काहीसे असे होते=> "Swasat smell, touch Dyasat, the balance Savarena Bas Tu Kahi rubbed Kळena Nusatac of Alis Ske c Sajni otherwise,,," Smiley

स. न. हा लेख उत्तम जमला आहे. वास्तविक मराठीच्या अभ्यासकांनी मराठी बोलण्याचे हे ढंग जपायला पाहिजेत आपण असेच लिहित राहावे ही सदिच्छा