Skip to main content

समुद्र-शंखशिंपले

लेखक शुचि यांनी रविवार, 19/02/2012 या दिवशी प्रकाशित केले.
समुद्राची गाज ऐकणे हा तुझा आवडीचा छंदच होता म्हणा ना. आपण कॉलेजचे तास बंक करून समुद्रकिनार्‍यावर गाज ऐकत तासनतास घालवले आहेत. तुला समुद्र आणि आकाशाच्या शांत नीळाईची ओढ असायची. समुद्राचा धीरगंभीर आणि मर्यादाशील स्वभाव तुला आकर्षित करायचे. याउलट समुद्रपक्षांची झेप, नारळीची झाडे, भणाणणारा खारा वारा हे माझे वीक पॉईंट्स असत. मला आकर्षक वाटणारी अजून एक गोष्ट जी केवळ माझ्या हट्टाखातर तू करत असे ती म्हणजे - चपला हातात धरून, मऊ मखमली रेतीतून चालणे. आठवतं तुला सुबक, कंगोरेदार , सोनेरी अथवा शुभ्र शंख-शिंपले मिळवण्यासाठी मी किती अट्टाहास करीत असे ते. गिर्रेबाज, जीन्यासारख्या दातेरी कडा कोरीवकाम असलेला शंख मिळवण्यासाठी माझा आटापीटा चालत असे.
तू मात्र मिष्कीलपणे माझी धडपड न्याहाळत म्हणत असे - "अगं वेडे पण नाही मिळाला शंख तर काय आभाळ कोसळणार आहे का?" आणि मी थोडी वैतागून म्हणत असे - "हो माझ्यावर कोसळणार आहे. मला सुंदरसा , पूर्ण आणि शुभ्र शंख तरी हवा नाहीतर जांभळी शिंपल्याची डबी तरी हवी, गुलाबी बसकट शंखही चालतील पण पूर्ण आणि मला आवडणारे हवे." यावर का कोण जाणे थोडासा गंभीर होऊन तू म्हणत असे - "काही गोष्टी या शोधण्याच्या नसतात, खणून काढण्याच्या तर अजिबातच नसतात. जेव्हा समुद्राला इच्छा होइल तेव्हा तो त्याच्या पोटातून तुझ्या पायावर एक भेट आणून सोडेल. जितके शोधशील तितक्या तुझ्या भेटी तुझ्यापासून अधिक दूर पळतील." हा तुझा प्रतिवाद, हे तुझे तत्वज्ञान मला अजिबातच पटत नसे आणि मी अधिकच खणत असे, शोधत असे, हताश होत असे. आता अर्ध्याहून अधिक आयुष्य सरल्यावर मला माहीतदेखील नाही तू कुठे आहेस, पण समुद्राची जागा प्रत्यक्ष जीवनाने घेतली आहे आणि शंख-शिंपल्यांची सुंदर नात्यांनी. अजूनही त्याच आसुसलेपणाने मी शोधते आहे आणि दर वेळेला रिकाम्या हाताने अन भरल्या डोळ्याने तुझे शब्द आठवते आहे-"काही गोष्टी या शोधण्याच्या नसतात, खणून काढण्याच्या तर अजिबातच नसतात. जेव्हा समुद्राला इच्छा होइल तेव्हा तो त्याच्या पोटातून तुझ्या पायावर एक भेट आणून सोडेल. जितके शोधशील तितक्या तुझ्या भेटी तुझ्यापासून अधिक दूर पळतील." . कधी???? कधी???कधी??? लाकडे सरणावर गेल्यावर? का माझ्यापाशी तुझ्या स्वभावातील शीतलता नाही? का मला शाप आहे -"सतत शोध घेण्याचा आणि न सापडण्याचा". दिवस न दिवस माझा त्रागा वाढतच आहे. रात्र रात्र माझ्या उशा अश्रूंनी भीजतच आहेत. मला मात्र खात्री आहे तू जिथे कुठे असशील समुद्र (आयुष्य) शांतपणे उपभोगत असशील. असो, तू म्हणतोस तशी नि:संग होऊन वाट पहाण्याचा प्रयत्न करेन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4162
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

मस्त लिहिलंस शुचि! ते शंखाचं चित्रही छान आहे! कोण जाणे या कथानायिकेला तिची भेट मिळाली असेल पण तिला ती कळलीच नसेल!

एरव्ही कुणी भावनिक वगैरे बोलू लागले कंटाळा येतो. पण तेच आपण स्वतः भावनिक लाटेवर आरूढ झालेले असताना पुन्हा वाचले की अगदि मनास बहवते.

In reply to by मन१

आता पोरं सोरं झाल्यावर आणि आयुष्यातील चढत्या पायरीवर नवा पाठ सुरु झाल्यावर हे समुद्र-शिंपले वगैरे कै च्या कै वाटायला लागतात. आपल्याच बावळटपणावर हसायला यायला लागतं. पण, एकदा का भूतकाळात जीव रमला. आपल्या जीवा-भावाच्या व्यक्तीची आठवण व्हायला लागल्यावर आजुबाजुच्या वास्तव जिवनाचा विसर पडुन अलगदपणे फुलपाखरासारखं मन झुलायला लागतं. मग मत पुछो काय अवस्था होते. आणि एकदा सावरल्यावर लक्षात येतं बशीर बद्र च्या ओळींचा आधार घ्यावा लागेल- अगर मैं लौटना चाहूं तो क्या मै लौट सकता हूं. वो दुनिया साथ जो मेरे चली थी अब कहॉं होगी. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयुष्यातील चढत्या पायरीवर नवा पाठ सुरु झाल्यावर हे समुद्र-शिंपले वगैरे कै च्या कै वाटायला लागतात
अशा लोकांना त्या वेळी हे अगदीच कै च्या कै वाटलं नाही तरी प्रायोरीटीज वेगळ्या असतात लोकांच्या म्हणून प्रॅक्टीकल होउनच निर्णय घेतलेला असतो तेंव्हा. कालांतरानं लौकीकार्थानं सगळं मनासारखं झालं की मग असलं मशी कविता/मुक्तक वगैरे सुचतं! :) असं माझ मत आहे.

In reply to by दादा कोंडके

लौकीकार्थानं सगळं मनासारखं झालं की मग कुणाच्या मनसारखं झालं त्यावर अवलंबून आहे.

In reply to by मन१

जी व्यक्ती त्यावेळी प्रॅक्टिकल होउन निर्णय घेते, त्या व्यक्तीलाच नंतर ह्याची टोचणी जास्त असते. ज्या व्यक्तीवर निर्णय लादला जातो ती व्यक्ती त्यावेळी सफर करते, पण नंतर स्वतःच्या मनाची समजूत घालू शकते. असं माझं निरीक्षण आहे. :)

मुक्तक नुसते आवडलेच नाही तर सहवेदना निर्माण करून गेले. नात्यांचे सुघड शंख शोधून मिळतील का याबद्दल मीही साशंकच आहे. मिळाले तरी आजकालच्या खवळलेल्या आयुष्यात कितपत टिकतील कोण जाणे? लहानपणी मात्र असे शंख खूप सहज मिळायचे. कदाचित तेव्हा माझी नजर इतकी गढूळली नव्हती.

शुचि मामी जरा काहितरी हलके फुलके लिही गो. हे असले काहितरी गंभीर, डोक्याला शॉट लावणारे लिहीत बसतेस आणि मग तू पण तशीच गंभीर वागायला लागतेस. :P बाकी वरचे लिखाण आवडले.
काही गोष्टी या शोधण्याच्या नसतात, खणून काढण्याच्या तर अजिबातच नसतात. जेव्हा समुद्राला इच्छा होइल तेव्हा तो त्याच्या पोटातून तुझ्या पायावर एक भेट आणून सोडेल. जितके शोधशील तितक्या तुझ्या भेटी तुझ्यापासून अधिक दूर पळतील."
हे मस्तच.

सुंदर लिहिलंय गं शुचिताई... मुक्तक आवडलं. वाचून अंतर्मुखही झाले.
"काही गोष्टी या शोधण्याच्या नसतात, खणून काढण्याच्या तर अजिबातच नसतात. जेव्हा समुद्राला इच्छा होइल तेव्हा तो त्याच्या पोटातून तुझ्या पायावर एक भेट आणून सोडेल. जितके शोधशील तितक्या तुझ्या भेटी तुझ्यापासून अधिक दूर पळतील."
हा प्रतिवाद कळतो पण वळत नाही... प्रत्येकच ठिकाणी!!

छोट पण मस्त आहे.

हुई मुद्दत के 'गालिब' मर गया पर याद आता है | वो हर एक बात पे कहना के यु होता तो क्या होता || :( :(

खुपच सुंदर मुक्तक. मला भावले.