✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्राजक्त फुलला दारी

ज
जागु यांनी
Tue, 02/07/2012 - 14:15  ·  लेख
लेख
प्राजक्ताचे नाव काढताच डोळ्यासमोर येतो तो प्राजक्ताचा सडा त्याचा मंद सुगंध. प्राजक्ताच्या फुलाच रुपडंही अगदी सुंदर, केशरी रंगाचे देठ ह्याचे खास आकर्षण. प्राजक्त साधारण जुलै, ऑगस्टमध्ये बहरून येतो. असेच एक प्राजक्ताचे झाड माझ्या लहानपणी माझ्या माहेरच्या अंगणात होते. पावसाला सुरुवात झाली की काही दिवसांतच हा प्राजक्त बहरून यायचा. सकाळी छोट्या असणार्‍या कळ्या संध्याकाळी टपोर्‍या झालेल्या पाहताना मला खूप मजा वाटायची. ह्या टपोर्‍या कळ्या अंधारातच गुपचुप फुलायच्या आणि सकाळी थेट अंगणात त्यांचा सडा पडलेला दिसायचा. सकाळी उठून हा सडा पाहण्यासाठी अंगणात जायचे. ओल्या जमिनीवर मंद सुगंध दरवळणारी ती केशरी-पांढरी फुले पाहून मन उल्हसित व्हायच. मग परडी भरून ही फुले गोळा करायची. Prajakt.JPG ही गोळा करता करता अजून एक छंद असायचा म्हणजे झाड हालवून प्राजक्ताच्या फुलांचा पाऊस अंगावर घ्यायचा. त्या कधी दवाने तर कधी पावसाने भिजलेल्या फुलांचा मऊ, गार स्पर्श मायेचा पाझर घालायचा. ह्या प्राजक्ताच्या फुलांच्या पावसातील आनंद म्हणजे टप टप टप टप पडती प्राजक्ताची फुले ह्या बालगीताच्या ओळी सार्थकी लावायच्या. प्रत्येक सीझनला प्राजक्ताची फुले यायला लागली की आवर्जून प्राजक्ताचे हार बनवून ते देवांच्या तसबिरींना घालायचे. बर हार बनवायचे ते पण वेगवेगळ्या पद्धतीने. एका लाइनमध्ये सगळी फुले, एक पाकळ्याना पाकळ्या व देठांना देठ चिकटवून म्हणजे कमळासारखा आकार येतो दोन फुलांचा मिळून तर एक कष्टाचा प्रकार होता तो म्हणजे देठ काढून नुसत्या फुलांचा हार. हा हार अगदी भरगच्च व गुबगुबीत दिसे. पूजेसाठी हार घालून झाले की उरलेल्या फुलांची ओटीवर रांगोळी काढायची. हे झाले माझे बालपणाचे दिवस. लग्न झाले आणि सासरी आले. माझ्या सासर्‍यांनी नवीनच जागा घेतली होती. त्या जागेत एक छोटं प्राजक्ताच कलम लावल होत. अगदी अंगणातच. २-३ वर्षातच ते मोठ्ठ होऊन त्याचा सडा पडायला लागला. परत माझे बालपणीचे दिवस आठवले. मग आता ह्या सड्याचा आनंद तर उपभोगायलाच हवा. पण पुर्वी सारखा वेळ आता मिळत नाही म्हणून सकाळी मी चहा घेऊन अंगणातल्या लादीवर बसून कपातला चहा संपेपर्यंत गवतात पाय सोडून हिरव्यागार गवतावर पांढरा-केशरी प्राजक्ताचा सडा आणि त्याचा मंद सुगंध अनुभवते. ही अनुभवलेली पाच मिनिटे माझ्यासाठी दिवसभराचा उत्साह निर्माण करतात. Prajakt1.JPG आता बालपणी एवढा रांगोळी वगैरे काढण्यापर्यंत वेळ नसतो. पण प्राजक्ताची फुले पाहिली की राहवत नाही. मग सुट्टीच्या दिवशी परडी भरून फुल गोळा करते आणि सासूबाईंना त्याचे हार बनवून देते वेळ असेल तर स्वतःही घालते. रात्री शतपावली करताना नवीन उमलणाऱ्या फुलांचा पुन्हा सुगंध भरभरून घेते. त्याने रात्रही अगदी सुगंधी होऊन जाते. ह्या फुलांच आणि माझं नातही अस आहे की माझं लग्न झाल आणि माझ्या मिस्टरांनी त्यांच्या पराग ह्या नावाला मिळत जुळत म्हणून माझ नावही प्राजक्ताच ठेवल. आमच एकत्र कुटुंब आहे. माझ्या जाऊबाई रोज ही फुले देवपूजेसाठी गोळा करतात. माझी मुलगी श्रावणी २ वर्षांची असताना एक दिवस लवकर उठली होती आणि तिने पाहील की तिची काकी फुल गोळा करतेय. तेंव्हा ती जोरात ओरडली ए काकी ती माझ्या आईची फुले आहेत तू गोळा नको करुस. एक क्षण मला काही कळले नाही. नंतर मला आणि सगळ्यांना समजल की आम्ही रोज प्राजक्ताची फुल म्हणून उल्लेख करतो त्याचा अर्थ माझ्या मुलीने माझीच फुले असा घेतला होता. दुसर्‍या अर्थाने तिच प्राजक्ताच फुल आहे. असा हा माझ्या अंगणात बहरणारा प्राजक्त. ह्याचे नि माझे मला काही ऋणानुबंध आहेत अस वाटत. हे माझे प्राजक्ताच्या फुलांवरचे प्रेम म्हणून का कोण जाणे पण जरी फुलांचा बहर ओसरला, त्यांचा हंगाम गेला तरी अगदी उन्हाळ्यातही ७-८ तरी फुलांचा सडा आमची मैत्री निभावण्यासाठी, माझे मन प्रसन्न करण्यासाठी अंगणात पडतो.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
24829 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

अगदी असंच

स्मिता.
Wed, 02/08/2012 - 14:27 नवीन
काल रात्री झोपण्याआधी पुन्हा एकदा या धाग्यावरून नजर टाकली तेव्हा अगदी हाच विचार मनात आला. प्राजक्ताच्या झाडाला एवढ्या सगळ्या लोकांच्या भावविश्वात स्थान असलेलं बघून सुखद आश्चर्य वाटलं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

कार्यकर्ते खरच अगदी

जागु
Wed, 02/08/2012 - 11:44 नवीन
कार्यकर्ते खरच अगदी सगळ्यांनाच ह्या प्राजक्ताच्या फुलांनी हळव्या आठवणींचा ठेवा दिला आहे.
  • Log in or register to post comments

ऑफिस मधे धागा उघडल्यावर लगेच

टुकुल
Wed, 02/08/2012 - 11:56 नवीन
ऑफिस मधे धागा उघडल्यावर लगेच लक्षात आले कि हा धागा घरी जावुन निवांत वाचुन अनुभवण्यासारखा आहे. धागा, त्यातील फोटोज आणि प्रतिसाद सुंदर आहेत. माझी आणी प्राजक्ताची तशी धावती भेट झाल्याचे आठवत आहे पण ठिकाणे लक्षात येत नाहीत. पण नवीन घेतलेल्या जागेत माझ्या हाताने प्राजक्ताच झाड लावायची इच्छा खुप दिवसा पासुन आहे, बघु कधी पुर्ण होते :-) --टुकुल
  • Log in or register to post comments

<<माझ्या हाताने प्राजक्ताच

रम्या
गुरुवार, 02/09/2012 - 10:23 नवीन
<<माझ्या हाताने प्राजक्ताच झाड लावायची इच्छा खुप दिवसा पासुन आहे, बघु कधी पुर्ण होते >> पारिजातकाच्या झाडाला प्रचंड बिया येतात. झाड जसं फुलांनी बहरत तसचं बियांनी सुद्धा! एखादी चांगली टपोरी बी सहज उगवते. स्वतः बी उगत घालून झालेलं झाड पाहण्याचा नवनिर्मितीचा आनंद अमाप असतो. अर्थात जवळपास कुठे पारिजातकाचं झाड असेल तरच हे होऊ शकतं. नाही तर नर्सरी आहेच. मी परेल मध्ये बारावीला असताना मे महिन्यात कुठल्याशा क्लास मध्ये जात होतो. मधल्या सुटीत मी बाजूच्याच एका बागेत जाऊन वाचत बसत असे. तिथेच एक पारिजातकाचं झाड होतं. प्रचंड आवडत होतं मला. बागेतून दोन टपोर्‍या बिया गोळा केल्या नि एका दुधाच्या पिशवीत माती भरून उगत घातल्या. एक बी उगवली. चार पानांचं नुकतच लावलेलं ते इवलसं रोपटं यष्टीतून साडे चारशे किलोमीटरचा प्रवास करत कोल्हापूरला पोहोचलं! घरामागच्या परड्यात एक फूटभर खोल खड्ड्यात खत-मातीचं मिश्रणात त्या रोपट्याचं नव घर वसवलं. रोपट जगलं, वाढलं. पुढच्याच वर्षी झाडाखाली छान सडा पडू लागला. आज मुंबईत असताना त्या झाडाची एक अनामिक ओढ लागून राहते. अंधारू लागताच पारिजातकाचा सुगंध घरात दरवळू लागतो. सकाळी मुद्दामच लहान मुलासारखा झाडाखाली उभा राहून झाड गदागदा हालवून त्या पुष्प वर्षावाचा आनंद घेतो. सार्‍या इलाख्यात असं लाख मोलाचं झाड फक्त माझाकडेच आहे! घरात एखादा पाहूणा वस्तीला असला कि रात्रिच्या सुगंधा बद्दल विचारतो नि मी छाती फुगवून सांगतो, "मी लावलेल्या पारिजातकाचा सुगंध आहे तो!"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

रम्या (एकदम खास मित्राला

टुकुल
गुरुवार, 02/09/2012 - 11:51 नवीन
रम्या (एकदम खास मित्राला बोलतोय अस वाटतय :-) ), मस्त माहीती दिली आणी आपल्या हातुन लावलेल्या झाडाचा अनुभव पण मस्तच. --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रम्या

मस्त वाटलं पण एक शंका ???

वपाडाव
गुरुवार, 02/09/2012 - 15:27 नवीन
बाकी सगळं मस्तच आहे पण हे काय??
मी परेल मध्ये बारावीला असताना मे महिन्यात कुठल्याशा क्लास मध्ये जात होतो. मधल्या सुटीत मी बाजूच्याच एका बागेत जाऊन वाचत बसत असे.
कुछ स्पेलिंग मिस्टेक नही लगता क्या? सकाळपासुन आम्हीच भेटलो काय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रम्या

प्रश्न असा आहे की आपला प्रश्न

प्यारे१
गुरुवार, 02/09/2012 - 16:26 नवीन
प्रश्न असा आहे की आपला प्रश्न नेमका काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

समझदार को काय ते...

वपाडाव
गुरुवार, 02/09/2012 - 16:32 नवीन
ज्यांनाकळवुन घ्यायचाय त्यांना कळाला असावा प्रश्न... अवांतर :: तुला स्वाक्षरी बदलण्यासाठी तंबी मिळाली की काय रे संपादकांकडुन, की उगाच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

जागुताई

सविता००१
Wed, 02/08/2012 - 13:35 नवीन
शब्दच संपलेत सांगण्यासाठी की हा लेख खूप खूप छान आहे आणि प्राजक्त तर इतका सुंदर आहे की बास... एवढच सांगते की तू खूप नशीबवान आहेस.
  • Log in or register to post comments

जागुतै, खूप प्रसन्न वाटलं

राघव
Wed, 02/08/2012 - 13:52 नवीन
जागुतै, खूप प्रसन्न वाटलं बघ! खूप खूप धन्यवाद! राघव
  • Log in or register to post comments

मदनबाण, स्मिता, सविता, राघव

जागु
Wed, 02/08/2012 - 15:35 नवीन
मदनबाण, स्मिता, सविता, राघव धन्यवाद.
  • Log in or register to post comments

फोटो

sneharani
गुरुवार, 02/09/2012 - 10:11 नवीन
फोटो अन् प्रतिसाद सुध्दा प्राजक्तासारखे सुंदर!! :)
  • Log in or register to post comments

रम्या खरा आनंद

जागु
गुरुवार, 02/09/2012 - 11:12 नवीन
रम्या खरा आनंद अनुभवता. स्नेहा धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख आणि सुंदर फोटो.

श्यामल
गुरुवार, 02/09/2012 - 11:37 नवीन
सुंदर लेख आणि सुंदर फोटो. जागु, तुझा खरंच हेवा वाटतो गं.
  • Log in or register to post comments

मस्त.....

मिरची
गुरुवार, 02/09/2012 - 15:47 नवीन
वाचूनच इतक प्रसन्न वाटल कि काय सांगु? गॅलरीत लावता येउ शकतो का प्राजक्त? कुंडीमध्ये? कोणी सांगु शकेल का कॄपया?
  • Log in or register to post comments

मिरची कुंडीत जास्तीत जास्त एक

जागु
गुरुवार, 02/09/2012 - 15:52 नवीन
मिरची कुंडीत जास्तीत जास्त एक ते दोन वर्ष कारण हे झाड मोठ होत.
  • Log in or register to post comments

हो का?

मिरची
गुरुवार, 02/09/2012 - 16:14 नवीन
हो का? :( .....धन्यवाद......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

'प्राजक्त फुलांचे स्तोत्र'

हारुन शेख
Fri, 02/10/2012 - 12:43 नवीन
याला 'प्राजक्त फुलांचे स्तोत्र' म्हणावेसे वाटते !! -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा