सरस्वती.. एक लोकमाता
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सरस्वती ... एक लोकमाता
सरस्वती लुप्त होऊन हजारो वर्षे झाली. हिमालयात उगम पावून हरियाना, पंजाब, राजस्थान,गुजराथ मधून वहात जाऊन कच्छच्या रणात समुद्राला मिळणारी सरस्वती, ऋग्वेदात जिचे रम्य वर्णन केले आहे, एके काळी जिचे पात्र ८-१० किलोमीटर रुन्द होते, जिच्या काठावर भारतातील सर्वात पुरातन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत , अशी सरस्वती आज मात्र तुम्हाला पहावयासही मिळत नाही. तिच्या पाण्यावर आज तुम्ही शेती करू शकत नाही. तिच्या लेकरांची तहानभूक ती आज भागवू शकत नाही. भूगर्भातील उत्पातामुळे तिचे पात्र आटले पण तिचे प्रेम मात्र आजही आटलेले नाही. आजही ती भारताला सुजलाम्-सुफलाम् करावयास आसुसलेली आहे. गरज आहे फक्त तिच्या मुलांनी आपला कर्तव्याचा भाग उचलण्याची.....
भाकरा-नानगल धरण झाले. पाण्याकरिता आक्रोश करणार्या जमिनीला पाणी मिळाले. पण अडाणी माणसाने त्याचा दुरुपयोग केला. वर्षात दोनदोन, तीनतीन पीके काढण्याच्या ईर्षेने त्याने जमिनीला तिला पचणार नाही इतके पाणी पाजले. जमिनीवर पाणी पडले की काही पाणी जमिनीत मुरते, काही पाण्याचे बाष्पीभवन होते, काही वाहून पुढे निघून जाते. मुरलेले पाणी जमिनीतून पुढे वाहून जाऊ शकते, काही विहीरी-तलाव यांच्या रुपाने परत वर येते. सुक्या दिवसांत माणसाला परत उपयोगी पडते. जमिनीत पाणी किती मुरू शकते याला मर्यादा असते. या मर्यादेपेक्षा तुम्ही दिलेले पाणी जास्त झाले तर ते जास्त पाणी उलटीसारखे परत फिरते. खालून वर येऊ लागते व उलटी प्रमाणेच ते जल निर्मल नसते :त्यात जमिनीतील क्षार असतात.काही वेळा तर हे क्षार जमिनीवर पांढरा थर निर्माण करतात." पंजाब-हरियानात धरणाचे पाणी मिळते आहे म्हणून वापरा कितीही " या धोरणाने हेच घडले. ही अशी संपृक्त (water-logged) जमीन शेतीला निरुपयोगी ठरते. आज पंजाब व हरियानात अशी प्रत्येकी दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन निरुपयोगी बनत आहे आणि याची व्याप्ति वाढतच आहे. महाराष्ट्रात कोल्हापुरात हेच घडत आहे. फार काय, पुणे जिल्ह्यातील दौंड सारख्या कोरड्या भागातही हे दिसत आहे.
याला उपाय नाहीत काय ? आहेत की ! (१) चर काढून त्या द्वारे पाण्याला वाट द्यावयाची. उतार असेल तर
पाणी पुढे वाहून जाईल. (२) नसेल तर पाणी पंपाने वर खेचावयाचे व बांधीव (Lined) कालव्याने पुढे न्यावयाचे. पण या करिता दोन अडचणी आहेत.एक खर्च व दुसरी महत्वाची. चर किंवा कालव्याकरिता जमीन लागते.(surface land) म्हणजे शेतकर्याची जमीन मिळाली पाहिजे. हे (acquisition)आता अशक्यच झाले आहे. मग काय नुसते वाढणारे नुकसान बघत बसावयाचे ?
नाही. तशी गरज नाही. डॉ. रमेश आठवले यांनी एक भारी योजना सुचवली आहे. जमिनीखाली सरस्वतीचे कोरडे पात्र आहे.त्याच प्रमाणे तिला मिळणार्या उपनद्यांची पात्रे आहेत त्याला नैसर्गिक उतार आहे. हरियाना-पंजाब-राजस्थान असा तिचा मार्ग आहे.
जमिनीत (perforated pipes) गाडावयाचे. त्यांच्या द्वारे हरियाना-पंजाब मधील संपृक्त जमीनीतील पाणी या पात्रांत सोडावयाचे. जमिनीखालील कोरड्या पात्रांतून वहातवहात ते सरस्वतीच्या पात्रात येईल.त्या मार्गाने ते राजस्थानमध्ये आले की ते बाहेर काढावयाचे. पहिली काही वर्षे ते थोडे क्षारयुक्त असेल पण नंतर ते शेतीला उपयुक्त होईल. बाहेर हे तंत्र वापरले गेले आहे व सिद्ध झाले आहे. आजही राजस्थानातील वाळवंटी भागात त्याचा उपयोग वनीकरणाकरिता केला तरी तो फार फायदेशीर प्रयोग होईल. फायदे बघा.
(१) पंजाब-हरियानातील जमीन परत उपयोगात येईल. (२) वरची जमीन (Surface land) ताब्यात घ्यावी लागणार नसल्याने शेतकर्याचा विरोध असणार नाही.(३) खर्च कमी लागेल. (४) पाण्याची वाफ होणार नसल्याने जास्त पाणी मिळेल. (५) राजस्थानातील वाळवंटाचे रुपांतर वनात-शेतीत होईल.
सरस्वती लोकमाता आहे. आजही ती आपणास उपयोगी पडणार आहे. राज्यांमधील-राजकीय पक्षांतील क्षुल्लक
भांडणे विसरून आपण तिला उर्जितावस्था प्राप्त करून देणार आहोत का ?
(डॉ. आठवले भूगर्भशास्त्रातील (Geology) तज्ञ असून हैद्राबादमधील National Geophysical Research Institute मधून ( Scientist G) म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत.)
शरद
प्रतिक्रिया
अधिक माहिती हवी.
फार छान माहिती दिलीत...अश्या
सरतेशेव
माहिती आवडली .. असे होउ शकते
अधिक माहिती
सरस्वती ही वेदांची माता
वर उल्लेख केलेलं तंत्र हे
लेख आवडला
चांगले मुद्दे आहेत
थोडी महिती
मस्त माहिती...