मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाबा गनुश

गणपा · · पाककृती
सर्व रसिक खवय्यांना इंग्रजी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!! २०१२ ची सुरवात एका शाकाहारी पाककृतीने करत आहे. आशा करतो आपल्याला आवडेल. मध्यपुर्वेत रहाताना तिथल्या पदार्थांनी भुरळ घातली होती. शवरमा (शोरमा), फलाफल, वेगवेगळ्या प्रकारचे कबाब, हमस आदी माझ्या काही आवडत्या डिश. आज त्या पैकी बाबागनुशची पाककृती आपल्या पुढे घेउन आलो आहे. खुबुस वा पिट्टा ब्रेड डीप करण्यासाठी बाबा गनुश हे एक प्रकारच डीपिंग आहे. साहित्य : एक मोठं किंवा २ माध्यम वांगी. ३ मोठे चमचे ताहिनी. (भाजलेल्या तिळाची तेलात वाटलेली पेस्ट.) २ लिंबांचा रस. २-३ पाकळ्या लसूण चवी नुसार मीठ. २-३ चमचे ताजं घट्ट दही (ऑपश्नल) सजावटीसाठी : ओलीव्हचं तेल, ऑलीव्ह, लाल तिखट, कोथिंबीर. कृती : वांग्याला काट्याने टोचे मारून वरून तेलाचं बोट फिरवावं. निखारे असल्यास उत्तम पण नसल्यास शेगडीवर वांगं भाजून घ्यावं. (ओव्हन मध्येही भाजता येईल पण त्याला खूप वेळ लागतो साधारण ४५-५० मिनिटे.) भाजलेलं वांगं गार झाल्यावर वरच साल काढून टाकावं आणि काट्या/चमच्याने वांग्याचा गर मोडून घ्यावा. एका बाऊलमध्ये ताहिनी आणि लिंबाचा रस फेटून घ्यावा. सुरवातीस फेटताना मिश्रण एकदम घट्ट जाणवेल, पण नंतर हलकेपणा जाणवायला लागेल. नंतर त्यात आवडी नुसार ताजं दही घालून फेटावं. वांग्याच्या मोडलेल्या गरावर वरील मिश्रण टाकून त्यात चावी नुसार मीठ लाल तिखट टाकून फूड प्रोसेसरमध्ये बारीक वाटून घ्यावं. साधारण श्रीखंडाची घनता येईल. वाढताना थोडं ओलीव्ह्च तेल टाकून वरून लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी. ऑलीव्ह लावून सजवावं. खबुस किंवा पिटा ब्रेड सोबत डीपिंग म्हणून सर्व्ह करावं.

वाचन 24211 प्रतिक्रिया 0