✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पॉप संगीतातलं एक सुरेल रत्न - अ‍ॅबा

प
प्रास यांनी
गुरुवार, 12/08/2011 - 19:02  ·  लेख
लेख
सत्तर चं दशक हे पूर्णपणे 'डिस्को'चं दशक होतं. सुरुवात 'बीगीज'ने केलेलीच होती पण त्याला कळस चढवण्यासाठी हातभार लागला 'ABBA'चा. 'अ‍ॅनी-फ्रीड' तथा 'फ्रीडा लिंग्स्टाड', 'बियॉर्न उल्वैस', 'बेनी एन्डरसन' आणि 'अ‍ॅग्नेथा फेल्टस्कुग' या चार जणांच्या नावाच्या आद्याक्षरानी बनवलेला त्यांचा ग्रूप 'ABBA'. यातील बियॉर्न आणि अ‍ॅग्नेथा आधीच एकमेकांच्या लग्नबंधनात अडकलेले तर बेनी आणि फ्रीडा लिव-इन कपल होते (यथावकाश त्यांनीही एकमेकांशी लग्न केलं.) घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने - बियॉर्न, बेनी, अ‍ॅन-फ्रीड आणि अ‍ॅग्नेथा. १९७२ ते १९८३ या काळात अनेक अप्रतिम गाणी यांनी दिली. हा ग्रूप मूळचा स्वीडिश. स्वीडन मध्ये लोकप्रिय झाल्यावर 'बियॉर्न' आणि 'बेनी'ने इंग्लिश गाणी लिहून सादर करण्याला सुरुवात केली. गायिका होत्या अ‍ॅग्नेथा आणि फ्रीडा. साधे साधे कोणालाही समजतील असे इंग्लिश शब्द, साधेसे विचार आणि नृत्योन्मुख करणारं डिस्को म्युझिक यांच्या बळावर 'ABBA'ने संगीत जगतावर राज्य केलं. १९७५ साली त्यांच्या एका गाण्याने प्रचंड धुमाकूळ घातला. एकाच वेळी जगातील १३ देशांमध्ये ते १ल्या क्रमांकावर होते, इतर अनेक देशांतील चार्टस मध्ये ते पहिल्या १० मध्ये होते. 'ABBA'ची गायिका अ‍ॅग्नेथा एका कार्यक्रमात म्हणाली होती की संगीताच्या दुनियेत कोणतं गाणं हिट होईल आणि कोणतं नाही हे नक्की कधीच सांगता येत नाही पण याला अपवाद फक्त या एका गाण्याचा आहे कारण हे जेव्हा बनत होतं, तेव्हापासूनच आम्हाला समजत होतं की गाणं प्रचंड म्हणजे प्रचंड हिट होणार आहे. तर असं हे गाणं होतं, "Dancing Queen" तेव्हा त्या जबरदस्त गाण्याचा आपणही आनंद घेऊ या....... 'ABBA' ची गाणी खूप गाजली. 'बियॉर्न' आणि 'बेनी'चे कॉनसेप्टस, शब्द आणि चाली, अ‍ॅग्नेथा आणि फ्रीडा यांचं सहज सुंदर गायन यांद्वारे एक power packed रसायन बनायचं. त्याची धुंदीच चढायची जणू! आता हे पुढील गाणं त्याचाच नमुना आहे. प्रेमात पडलेली स्त्री आपल्या प्रियकराचे सर्व अपराध पोटात घालते, त्याला क्षमा करते. का? कारण तिचं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याच्याशिवाय इतर कुणाचा ती विचारच करू शकत नाही. बस्स! या एका सिद्धांतावर बनलंय 'ABBA'चं गाणं "Mama Mia". म्हटलं तर 'ABBA'चं सगळच स्टायलिश होतं, म्युझिक, गाणी, पर्फोर्मंस आणि अगदी त्यांचे कपडेसुद्धा. आपल्या बोलीवूडी हिंदी चित्रपटातील अनेक गाण्यांचे प्रसंग- वेशभूषा त्यांच्या फॅशन वरून उचलल्याचं स्पष्ट दिसतं. आता हे गाणं ऐकल्यावर काहींना गाण्याच्या चालीही उचलल्याचं आढळलं तर त्या 'इन्स्पायर्ड' होत्या असा आपण युक्तिवाद करून टाकू या.... काय? ;-) आनंद घ्या 'ABBA'च्या "Mama Mia"चा...... 'ABBA'ची गायिका 'फ्रीडा' हिच्यासाठी 'ABBA'चे मेंबर 'बियॉर्न' आणि 'बेनी' यांनी लिहिलेले गाणे "Fernando". हे तिच्या पहिल्या स्वीडिश अल्बममध्ये वापरले गेले आणि तुफान हिट झाले. त्यामुळे लगेचच बियॉर्न आणि बेनी यांनी ते 'इंग्लिश'मध्ये लिहून 'ABBA'साठी रेकोर्ड करायची योजना आखली. त्याप्रमाणे 'इंग्लिश'मध्ये हे गाणं १९७५मध्ये 'सिंगल' या स्वरूपात प्रकाशित झालं आणि त्यांच्या जगभरात लोकप्रिय गाण्यांच्या यादीत एकाची भर पडली. या गाण्यासाठी फ्रीडाचा आवाज छान लागलेलाच आहे पण त्यातूनही अ‍ॅग्नेथाचा खर्ज ही भारी लागलेला आहे. एका वेगळ्या धर्तीच्या गाण्यासाठी जरूर ऐका..... "Fernando" सत्तरच्या दशकात युरोपात आंतर-युरोप गाण्याच्या स्पर्धा होत असत. याला 'युरोविजन' असं नाव होतं. यामध्ये युरोपातले देश आपापल्या भाषांतील गाणी सादर करून सामील व्हायचे. यात यशस्वी झालेली गाणी पुढे युरोपात खूपच प्रसिद्ध व्हायची. 'ABBA'चे मेम्बर्स 'ABBA' बनण्यापूर्वीपासूनच संगीत क्षेत्रात प्रसिद्धी पावलेले होते आणि १९७३ साली ते या युरोविजन स्पर्धेत तिस~या क्रमांकावर राहिले होते. १९७४ साली त्यांनी "ABBA'च्या नावे प्रवेशिका धाडली आणि गाणं पाठवलं, "Waterloo". या गाण्याची पार्श्वभूमी फारच मस्त आहे. ऐतिहासिकदृष्ट्या नेपोलियनला पराभवाचा पहिला झटका बसला 'वाटेर्लू' च्या लढाईत. (त्याने आपला पूर्ण पराभव त्यानंतर ४ महिन्यांनी 'रोशफोर्ट'च्या लढाईच्या वेळी मान्य केला असला तरी) या गाण्यात 'वाटेर्लू'चाच संदर्भ घेतलेला आहे. प्रेमाच्या आणाभाका घेण्यात उत्सुक असलेल्या एका मुलीचे मनोगत 'ABBA' यात व्यक्त करत आहेत. ती मुलगी या पूर्ण प्रक्रियेला नेपोलियनच्या वाटेर्लू मधल्या सरेंडरच्या प्रक्रियेशी बद्ध करतेय. त्याच्या सरेंडर प्रमाणेच मी प्रेमात माझ्या प्रियकराला सरेंडर (समर्पित) करत आहे. ती पुढे असं ही म्हणते की यात माझा नेपोलियन सारखाच पराजय झालाय पण माझ्या या पराभवातच माझा विजय लपलेला आहे. हे गाणं १९७४च्या युरोविजन मध्ये 'ABBA'ने जबरदस्त प्रस्तुत केलं. परभाषेतील असूनही अग्नेथा आणि फ्रीडा यांनी हे गाणं फारच छान गायलं. त्यांची वेशभूषा सोल्लिड होती. विडिओची फ्रेम अन फ्रेम झकास बनलेली. त्यावर कहर म्हणजे त्या काळात युरोविजन मध्ये न ऐकू येणारे डिस्को बीट्स. हे गाणं युरोविजनचं विजेता गाणं ठरलंच पण एरवी जी युरोविजन विजेती गाणी युरोपाबाहेर कुठेच लोकप्रिय होत नव्हती त्याला छेद देऊन जगभरात लोकप्रिय झालं. हे तुफान गाणं ऐकायलाच हवंय...... 'ABBA' चं एक गाणं खूपच स्पेशल म्हणावं लागेल. १९७९ मध्ये 'युनिसेफ'च्या 'म्युझिक फोर युनिसेफ कॉनसर्ट' या चेरीटी कार्यक्रमात या गाण्याचा अंतर्भाव करण्यात आला आणि याचं प्रसारण 'युएन जनरल असेम्ब्ली'मधून जगभरात करण्यात आलं. या कार्यक्रमामुळे 'ABBA'ने या गाण्याची अर्धी रॉयलटी 'युनिसेफ'ला दिली. याच्या जगभरातल्या प्रसारणानंतर हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की अनेक देशांत १ल्या क्रमांकावर राहिलं तर अनेक देशांतील चार्टस मध्ये पहिल्या १०त. एकूण या गाण्याने 'युनिसेफ'लाही पुष्कळ पैसा मिळवून दिला. तर असं हे "Chiquitita" गाणं. 'Chiquitita ' या स्पेनिश शब्दाचा अर्थ 'लहान मुलगी' असा आहे. 'युनिसेफ'च्या १९७९ च्या 'आंतरराष्ट्रीय बालकवर्षा'शी सुसंगत असं हे गाणं ऐका...... 'ABBA'चं आणखी एक गाणं जे मला स्वत:ला खूप आवडतं....... १९७९ साली प्रकाशित झालेलं हे गाणं एक अप्रतिम 'इन्स्पिरेशनल' गाणं आहे. साधे पण अर्थगर्भ शब्द, संथ पण सुंदर चाल, शेवटचा कोरस आणि फ्रीडाचा काळीज चिरत जाणारा आवाज...... सारंच कसं एकदम दुस~या जगातील वाटतं, नाही? फक्त गाण्याची सुरुवात आणि शेवट ऐकून आपल्या बॉलीवूडच्या आणखी एका 'इन्स्पायर्ड' गाण्याची आठवण होते आणि आपल्याला पुन्हा याच जगात आणून ठेवते. ही वानगी दाखल काही पण अशा अनेक गाण्यांनी मलाच काय पण जगभरातील असंख्य संगीतप्रेमींना भरभरून आनंद दिलाय. माझा हा प्रयत्न मात्र केवळ माझ्या मिपाकर मित्रांना ही माहिती आणि त्याद्वारे धकाधकीच्या जीवनात थोडा आनंद देण्याचाच आहे. 'अ‍ॅबा' हे खरोखरच पॉप संगीताला पडलेलं एक अत्यंत सुंदर स्वप्न होतं. या स्वप्नाने अनेक अप्रतिम गाण्यांची निर्मिती केली. प्रत्येक गाणं अगदी बावनकशी सोनंच जणू. १९८२ साली 'अ‍ॅबा'चे सदस्य आपापल्या मार्गाने जाण्यासाठी वेगळे झाले. त्यातल्या प्रत्येकाने स्वतंत्र वाट चालली आणि तिथेही काही प्रमाणात यशस्वी झाले पण एकत्रीतपणे अ‍ॅबाने जे यश पाहिले ते त्यांना पुन्हा मिळवणे शक्य झालेही नाही. २००८ साली त्यांच्या संगीतावर आधारीत 'मामा मिया' नावाचा नितांत सुंदर चित्रपट प्रदर्शित झाला. पिअर्स ब्रॉस्नन आणि मेरील स्ट्रीप यांच्या अप्रतिम अदाकारीने नटलेल्या या चित्रपटात अ‍ॅबाची पूर्वीची गाणी गुंफलेली आहेत. या गाण्यांच्या निमित्ताने बियॉर्न नि बेनी एकत्र आले. किमान मला तरी यामुळेच 'मामा मिया'तली गाणी पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेली. 'अ‍ॅबा'बद्दल शेवटी मला जे वाटतं ते त्यांच्याच एका गाण्यात त्यांनी वर्णन केलं आहे असं मला वाटतं. बहुतेक तुम्हीही हे मान्य कराल. So lets say, ABBA, "Thank You For The Music For Giving It To Me" :-)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
7566 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

मामा मिया य गाण्याची चालीची

विजुभाऊ
गुरुवार, 12/08/2011 - 19:35 नवीन
मामा मिया य गाण्याची चालीची हिंदी नक्कल आर डी बर्मन यानी केलेली होती हम किसीसे कम नही मध्ये " तेरे लिये जमाना तेरे लिये" गम्मत म्हणजे या चित्रपटात एका प्रसंगात पार्ष्व संगीतातही आबा चीच रेकॉर्ड वाजवली आहे.
  • Log in or register to post comments

विजुभाऊ,

प्रास
गुरुवार, 12/08/2011 - 20:23 नवीन
आर्. डी. इन्स्पायर्ड बाय अ‍ॅबा (वानगीदाखल) ;-) १. जैसा तेरा प्यार वैसा घुस्सा है तेरा २. मिल गया हमको साथी मिल गया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मस्त

महाबळ
गुरुवार, 12/08/2011 - 20:03 नवीन
तुम्ही इंग्रजी संगीताबद्दल धागे सुरु केल्यापासुन ह्या पॉप ग्रुपच्या धाग्याची वाट पाहात होतो. ह्या ग्रुपचा उमेदीचा काळ मला कळण्याच्या बराच आधिचा असला तरी माझा इंग्रजी संगीताशी परिचय ह्यांच्या गाण्यांनीच झाला. कॉलेज मधे असताना एक कसेट होती, अक्षरशः दिवसातुन १० वेळा लावायचो ती, पण त्यमुळे घरच्यांच्या डोक्याला ताप असायचा. इतकी ऐकयचो ही सगळी गाणी की माझ्या ५ वर्ष्याच्या भाचीलाही ह्यातली बरीच गाणी महिती झाली होती. पुन्हा ते सगळं आठवुन मजा आली. आज पुन्हा ऐकीन गाणी.
  • Log in or register to post comments

मेजवानी आहे रे प्रास हा धागा

गवि
Fri, 12/09/2011 - 13:32 नवीन
मेजवानी आहे रे प्रास हा धागा म्हणजे. पानभर प्रतिसादासाठी जागा पकडत आहे... निना प्रेटी बॅलेरिना, स्टिल आय एम सॅड, हनी हनी.. या अत्युत्कृष्ट गाण्यांचा उल्लेख नसल्याने कळवळलो.. प्रतिसाद पुढे चालू: अ‍ॅबाच्या नावाची ही कहाणी माहीत नव्हती.. धन्यवाद. अ‍ॅबा आणि बोनी-एम हे असे दोन बँड्स होते की एखाद्या मराठी (किंवा फॉर दॅट मॅटर कोणत्याही भाषिक पण शुद्ध नेटिव्ह घरात) किमान दोन इंग्लिश गाणी माहीत असतील तर ती दोन्ही अ‍ॅबा आणि बोनी-एमची असायची. अ‍ॅबाची लाँग प्ले रेकॉर्ड माझ्या बाबांनी मी अगदी पहिलीदुसरीत असतानाच आणली होती. त्यानंतरही त्यांनी अ‍ॅबाचे त्यावेळी निघालेले आल्बम्स तबकडीच्या स्वरुपातच आणले होते. किंचित चरचरीने सुरु होणारी आणि मग अत्यंत सुरेल गोड ठेकेबाज गाणी म्हणून अ‍ॅबाची डिस्कोगाणी मरेपर्यंत मनात राहतील.. "युरोपॉप्स" म्हणून एक गाण्यांचा जमानाच मधे आला होता. दूरदर्शनवरही काहीवेळा ते दाखवायचे. त्यात अ‍ॅबासारखीच डिस्को गाणी असायची आणि टिपिकल व्हिडीओ म्हणजे चमकणारे आरशांचे गोलक, वेगवेगळ्या प्रतलांमधे दिसून वेगळे होत विरत जाणारे गायकाचे क्लोज अप्स, प्रिझम इफेक्ट्स.. बस्स इतकीच स्पेशल इफेक्टसची मर्यादा.. गमतीशीर प्रकार होता .. त्यांची आणखी काही आवडती अफलातून गोड आणि ठेका धरायला लावणारी गाणी म्हणजे: हनी हनी.. निना प्रेटी बॅलेरीना.. अ‍ॅबाचं स्टिल आय अ‍ॅम सॅड हे गाणं सर्व गाण्यांपेक्षा अगदीच वेगळं आहे. गूढ चाल आणि ओहोटीच्या समुद्रासारखी एकदम खोलात ओढून नेणारी. त्याची लिंक मला इथे देता येत नाही. तुम्ही दिलीत तर फार फार आभारी राहीन प्रासभाऊ.. या मालिकेबद्दल अत्यंत आभारी आहे..
  • Log in or register to post comments

गवि,

प्रास
Fri, 12/09/2011 - 14:44 नवीन
स्टील आय अ‍ॅम सॅड हे बोनी एम चं गाणं आहे. बोनी एम हे स्वतःच एक 'प्रकट' गूढ आहे नि यावर नक्कीच लिहिणार आहे पण हे गाणं छान आहे. तसं फ्रँक फॅरियनचं प्रत्येक गाणंच छान असतं ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

स्वारी स्वारी.. गलती झाली..

गवि
Fri, 12/09/2011 - 14:56 नवीन
स्वारी स्वारी.. गलती झाली.. माफी असावी.. "स्टिल आय एम सॅड" हे बोनी-एमचंच आहे. कालपासून अ‍ॅबा आणि बोनी-एम या दोन्ही बँड्सचा एकत्रच विचार मनात चालला असल्याने असं झालं... स्टिल आय अ‍ॅम सॅड बरोबरच ब्राऊन गर्ल इन द रिंग, बाय द रिव्हर्स ऑफ बॅबिलॉन, रास्पुतिन (कभी हां, कभी ना मधले "वो बना कैसे डॉन.."), रिबन्स ऑफ ब्लू, मा बेकर, डॅडी कूल, टेक द हीट ऑफ मी .. आणि अशीच अनेक गाणी अफलातून आहेत.. बोनी-एमवर महेंद्रकाकांनी काय वाटेलते या त्यांच्या ब्लॉगवर लिहिलेलं इथे वाचता येईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

गवि,

प्रास
Fri, 12/09/2011 - 15:23 नवीन
नॉस्टॅल्जिक महेन्द्रकाकांची पोस्ट छान आहे. बॉबी फारेल हा बोनी एम चा चेहरा होता. त्याच्या शेजारीच कुठेतरी फ्रँक फॅरियन (मूळ बोनी एम) उभा असेल आणि काकांना बॉबीची स्वाक्षरी घेताना बघून मुडपलेल्या ओठांमधून जर्मन स्टाईलने हसत असेल..... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गवि,

प्रास
गुरुवार, 12/08/2011 - 21:28 नवीन
तुमच्यासारख्या दर्दी रसिकांसाठी काही जागा मो़कळ्या ठेवायला हव्यात ना.... ;-) त्याचसाठी प्रतिसादाला प्रतिसाद देऊन बूच मारलेले नाही हे तुमच्यासारखे मित्र नक्कीच जाणतील. :-)
  • Log in or register to post comments

जुन्या आठवणीना मस्त

मराठी_माणूस
गुरुवार, 12/08/2011 - 21:29 नवीन
जुन्या आठवणीना मस्त उजाळा. हनी,हनी चा उल्लेख राहीला
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
गुरुवार, 12/08/2011 - 22:03 नवीन
माझ्या एका मैत्रिणीने मेरिल स्ट्रीपसाठी ममा मिया बघायला लावला होता. अ‍ॅबाच्या मूळ गाण्यांची मस्त ओळख करून दिलीत.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

निमिष ध.
गुरुवार, 12/08/2011 - 22:58 नवीन
मस्त ओळख !! सध्या गाडित त्यन्चीच गाणी सुरू आहेत !! अत्यन्त आवडती गाणी !!
  • Log in or register to post comments

प्रास साहेब Gimme Gimme

राजा
Fri, 12/09/2011 - 12:28 नवीन
प्रास साहेब Gimme Gimme Gimme हे गाणे कसे विसरुन चालेल. जुन्या आठवणीना मस्त उजाळा. खरच...
  • Log in or register to post comments

सुरेख धागा. अ‍ॅबा आणि त्यांची

यशोधरा
Fri, 12/09/2011 - 14:51 नवीन
सुरेख धागा. अ‍ॅबा आणि त्यांची सदाबहार गाणी :) धन्यवाद. बोनीएमवर लिहा रे कोणीतरी. जिम क्रोस ठाऊक आहे का कोणाला? त्याच्या गाण्यांबद्दल लिहिणार का कोणी? आणि जॉनी नॅश?
  • Log in or register to post comments

नॉस्टाल्जिया

सुधांशुनूलकर
Fri, 12/09/2011 - 17:09 नवीन
पाश्चात्य संगीतावरच्या या धाग्यावर केव्हातरी अ‍ॅबा येणार हे माहित होतं. इतक्या लवकर अ‍ॅबा टाकलंत हे वाचून खूप आनंदून गेलो. कारण हा माझा अत्यंत / सर्वात आवडता ग्रूप आहे. एकदम १९७०-८० च्या दशकातल्या कॉलेजच्या दिवसांत हरवून गेलो. तेव्हा कुठून कुठून या गाण्यांचे शब्द मिळवून बहुतेक गाणी पाठ केली होती. यानिमित्त वडिलांची आठवणही झाली, कारण अ‍ॅबावरून मी त्यांच्याशी थोडा भांडलो होतो. माझे वडील शास्त्रीय संगीत जाणकार (आणि चांगले गायक) होते. त्यांच्यामुळे मलाही शास्त्रीय संगीतात रुची आणि जाण आली. एकदा त्यांनी मला पाश्चात्य संगीताबद्दल छेडलं - “हे कसलं ढॅणढॅण संगीत ऐकतोस?” त्यावर मी त्यांना उसळून अ‍ॅबा बद्दल सांगितलं आणि मित्राकडून कॅसेटप्लेयर आणून अ‍ॅबा ऐकवलं. त्यांनी मोकळ्या मनानं मान्य केलं की या गायिकांचा आवाज अतिशय सुरेल आहे, त्यांच्या संगीतात अप्रतिम मेलडी आणि हार्मनी आहे, अतिशय सुंदर ताल लय आहे. जाता जाता : वो-ले-वोज् हे माझं सर्वात आवडतं गाणं.
  • Log in or register to post comments

यानिमित्त वडिलांची आठवणही

गवि
Fri, 12/09/2011 - 17:32 नवीन
यानिमित्त वडिलांची आठवणही झाली मलाही एकदम माझ्या बाबांची तीव्रतेने आठवण झाली. त्यांचा तर हा आवडताच बँड होता.. त्यांना जाऊन विसाहून जास्त वर्षं झाली तरी ती तबकडी ठेवून दिली आहे. अनेकदा त्यांच्या त्या रेकॉर्डस डिसकार्ड करण्याची गरज उत्पन्न झाली पण कधीच जमलं नाही प्रत्यक्षात आणायला.. निना प्रेटी बॅलेरिनावर केलेला नाचही आठवला, पाचेक वर्षाचा असताना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधांशुनूलकर

सहमत

केळ्या
Sun, 12/18/2011 - 22:10 नवीन
सुधांशू नूलकर यांच्या प्रतिक्रियेसारखीच प्रतिक्रिया माझ्याही घरी उमटली होती.त्याचीच आठवण झाली.नव्या पीढीला मामा मिया दाखवलाच पाहिजे.आबा काय चीज होते ते कळेल त्यांना. जाता जाता...व्हू ले व्हू असे मी म्हणत होतो.पुढचे टेक इट नाउ ऑर लीव्ह इट्,नथिंग प्रॉमिस्ड नो रिग्रेट्स वगैरे कळते.
  • Log in or register to post comments

अब्बाचं डान्सिंग क्विन

आत्मशून्य
Mon, 12/19/2011 - 00:14 नवीन
अब्बाचं डान्सिंग क्विन आवडतं... असच एकान एम्पीत्रीचा स्टॉक दिला त्यात आलं होतं... ते सोडुन आवर्जुन असं कधी काही ऐकल न्हवतं आता पण आता वरील व्हिडीओ बघुन उत्सूकता चाळवली आहे, नक्किच ऐकेन, धन्यवाद प्रास्जी.
  • Log in or register to post comments

आठवणी! आठवणी!! आठवणी!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 12/19/2011 - 11:17 नवीन
आठवणी! आठवणी!! आठवणी!!! :) धन्यवाद!
  • Log in or register to post comments

आब्बा चे एक गाणे " द विनर

विजुभाऊ
Wed, 03/07/2012 - 15:17 नवीन
आब्बा चे एक गाणे " द विनर टेक्स इट ऑल" हे बहुतेक त्यांच्या शेवटच्या अल्बम मधील असावे. या गाण्यात एका हरलेल्या प्रेयसी ने प्रेमाची तुलना टेनीस सामन्याशी केलेली आहे. ती म्हणते द विनर टेक्स इट ऑल द लूजर हॅज टू फॉल
  • Log in or register to post comments

झक्कास !!!

धन्या
Wed, 03/07/2012 - 18:25 नवीन
झक्कास ओळख करुन दिली आहे बँडची. मस्तच. अशीच सांगितीक दुनियेतील माहितीची मेजवानी देत राहा. ते 'आय हॅव अ ड्रीम, अ सॉंग टू सिंग" यांचंच का?
  • Log in or register to post comments

अ‍ॅबाची आठवण निघाल्याने

गवि
गुरुवार, 01/29/2015 - 13:33 नवीन
अ‍ॅबाची आठवण निघाल्याने स्मरणरंजनासाठी धागा वर काढत आहे.
  • Log in or register to post comments

थँक्यू फॉर द म्युझिक - माझं

गुंड्या
गुरुवार, 01/29/2015 - 13:42 नवीन
थँक्यू फॉर द म्युझिक - माझं अत्यंत आवडतं गाणं
  • Log in or register to post comments

अरेच्चा हा धागा कसा काय नजरेतून सूटला?

मुक्त विहारि
Fri, 01/30/2015 - 05:31 नवीन
अब तो प्रास के साथ एक कट्टा तो बनता ही हय... (कट्टेकरी) मुवि
  • Log in or register to post comments

थॅन्क्स गवि.

विजुभाऊ
Fri, 01/30/2015 - 19:24 नवीन
थॅन्क्स गवि. पुन्हप्रत्ययाचा आनंद काही निराळाच असतो
  • Log in or register to post comments

सुरेख..!!

योगी९००
Sat, 01/31/2015 - 12:56 नवीन
मला english गाणी ऐकायची गोडी ABBA मुळे लागली. त्यांच्या आठवणी या लेखामुळे जाग्या झाल्या. अतिशय सुंदर लेख आणि प्रासभाऊंचे स्पेशल आभार.. आयुष्यात एकदाच स्टॉकहोमला गेलो आणि वेळेअभावी ABBA मुझियम दुरूनच पहावे लागले. याची चुटपूट अजून आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा