आमु आखा... २
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
© 2003 Dana Clark येथून साभार
आमु आखा... १ , आमु आखा... २ , आमु आखा... ३
***
जीवनशाळा. नावच खूप बोलकं आहे. स्वतःबद्दल पुरेशी कल्पना देणारं. माझ्या कानावरून हा शब्द गेल्या काही महिन्यांत बरेचदा गेला होता. गप्पांमधे वगैरे नेहमी जीवनशाळांबद्दल, त्यांच्या झगड्याबद्दल ऐकायला मिळायचं. या दोनतीन दिवसांमधे जे काही ऐकलं, बोललो त्यातून जीवनशाळांचा पूर्ण पटच माझ्यासमोर उलगडला गेला.
जीवनशाळा सुरू होऊन जरी वीसच वर्षं झाली असली तरी ही कहाणी त्याच्याही बरीच आधी सुरू होते. साधारण ऐंशीच्या दशकाच्या सुरूवातीला, फारतर मध्यावर. सरदार सरोवर प्रकल्पाची कल्पना मांडली गेली ती साधारण साठच्या दशकात. त्यावर आराखडा, चर्चा, मंजुरी वगैरे होत होत प्रत्यक्ष काम सुरू व्हायला ऐंशीचे दशक उजाडले. सर्वेक्षणं वगैरेंना गती येत होती. माणसांची, अधिकार्यांची ये जा सुरू झाली होती. मात्र इतकं सगळं चालू असून, ज्यांची गावं, शेतं पाण्याखाली जाणार आहेत त्या आदिवासींना त्याचा पत्ताच नव्हता. त्यांना विश्वासात घ्यायची कोणालाच गरज वाटली नव्हती. किंबहुना तशी पद्धतच नव्हती. मात्र जशी कामाची धावपळ सुरू झाली तशी तशी आदिवासींना कुणकुण लागू लागली. आपले काय आणि किती जाणार आहे हे त्यांना समजू लागले. पण नुसते समजून उपयोग काय? त्याबद्दल काय करायचे हे कोणालाच माहित नव्हते. शहरी कपडे घातलेला माणूस जंगलात शिरला की लांब पळून जाऊन डोंगरदर्यात लपून बसणारे हे लोक. प्रतिकार कसा करायचा याचा थांगपत्ता असणेच शक्य नव्हते.
त्याच सुमारास मेधा पाटकर नावाची एक तरूण बाई तिथे पोचली आणि तिने या आदिवासींमधे राहून त्यांचे संघटन करायला सुरूवात केली. आदिवासींना त्यांच्यावर येणार्या संकटाची खरी जाणीव झाली. त्याहूनही महत्वाचे म्हणजे स्वतःच्या न्याय्य हक्कांचे, माणूस म्हणून जगण्याच्या अधिकाराचे आणि विस्थापनाच्या अनुषंगाने असणार्या सरकारी यंत्रणेच्या त्यांच्याप्रती असलेल्या उत्तरदायित्वाचे भान आले. आधी पुनर्वसन आणि मगच विस्थापन हे मुख्य सूत्र ठरले. त्यासाठी लढा उभा राहिला. सरकारी यंत्रणा नेहमीप्रमाणे दुर्लक्ष ते दमन या मार्गाने जात होती. पण लोकांचे संघटन हे एक फार प्रभावी शस्त्र असते आणि ते संघटन अहिंसात्मक पद्धतीने लढत असेल तर मग त्याहून मोठे शस्त्रच नसते हे नर्मदा बचाओ आंदोलनाने परत एकदा सिद्ध केले. त्याचवेळी न्यायालयीन लढायाही चालू होत्याच.
हजारो वर्षे जंगलात राहिलेला आदिवासी काटक, जिद्दी, लढवय्या वगैरे आहेच. निसर्गाला धरून राहण्याची आणि त्याच्याच आधाराने कोणत्याही परिस्थितीत जगत राहण्याची कला त्याला अवगत आहे. पण आधुनिक जगाचा मुकाबला करण्याची किंवा त्यात सहभागी होण्याची कला मात्र त्याला चकवून गेली होती. ऐंशीच्या दशकातही संपूर्ण नर्मदा खोर्यात केवळ दोनच आदिवासी तरूण शिकलेले, म्हणजे अक्षरओळख असलेले, होते. वास्तव्य जंगलात असले तरी पदोपदी वनखात्याच्या रूपाने सरकारशी गाठ पडत होती. वनखात्याच्या नोटिसा यायच्या. गुन्हे दाखल व्हायचे. यांना काहीच कळायचे नाही. कागद वाचायचा म्हणला तरी पार धडगाव गाठावे लागायचे. प्रवास म्हणजे, आधी वीस तीस किलोमीटर पायी चालायचे. मग पक्की सडक दिसणार. तिथे बसून रहायचे. जेव्हा कधी बस येईल त्यात बसायचे आणि मग तीन चार तासाच्या प्रवासानंतर येणार धडगाव, किंवा तालुक्याचे गाव. तिथे कोणाला तरी दादापुता करून त्यांच्याकडून तो कागद वाचून घ्यायचा. सल्ला घ्यायचा. परतीचा प्रवासही असाच. बसवरच्या पाट्याही वाचता येत नसत. सगळीच बोंब.
हे सगळे, नर्मदा बचाओ आंदोलनाच्या निमित्ताने तिथे आलेल्या कार्यकर्त्यांना दिसत होते. अस्वस्थ करत होते. आंदोलनाशी पूरक असे काम म्हणून मग आदिवासींना अक्षर ओळख करून देण्याचे काम त्यांनी अंगावर घेतले. प्रौढशिक्षण वर्ग चालवले. आपल्या अज्ञानापायी आपण कसे नागवले जात आहोत याची तोपर्यंत पूर्ण जाणीव झालेले आदिवासी अतिशय उत्साहाने लिहावाचायला शिकू लागले. अंगणाअंगणातून लोक धुळीवर मूळाक्षरं गिरवायला लागले. स्वतःचे नाव लिहिता येईल, सही करता येईल इतपत मजल तर कित्येकांनी मारली. शिक्षणाची ताकद त्यांनी अनुभवली आणि आता आमच्या पोराबाळांनाही शिक्षण पाहिजे, त्यांचे भवितव्य सुधारले पाहिजे या इच्छेने जोर धरला.
आंदोलनातील कार्यकर्त्यांशी विचार विनिमय झाला. शिक्षण पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे म्हणून मग तालुक्याला, जिल्ह्याला निवेदनं घेऊन लोक गेले. आमच्याही गावात शाळा सुरू करा. आमच्या पोरांना शिक्षण उपलब्ध करून द्या अशा मागण्या होत्या. सरकारी पद्धतीप्रमाणे चकरा मारल्यानंतर एक अतिशय धक्कादायक माहिती लोकांना कळली.
सरकारने म्हणाले, "तुमच्या गावागावातून जिल्हा परिषदेच्या शाळा तर चालूच आहेत की! शाळा आहेत, शिक्षक आहेत, इतकंच काय, विद्यार्थीसुद्धा आहेत! नियमितपणे शाळा भरतात आणि हजेरीपत्रकंही भरली जातात. मग कशाला आलात आमच्याकडे?"
हे सगळे एकदम चक्रावून टाकणारे होते. आज पर्यंत शाळेत जाणे सोडाच, शाळा काय ते ही माहित नाही. पण सरकार तर म्हणत होते की तुमच्या गावात शाळा आहेच. नियमितपणे भरणारी. आदिवासींचा अजून एक लढा सुरू झाला. कागदपत्रं तयार झाली आणि अर्ज विनंत्या एका साहेबाकडून दुसर्या, त्याच्याहून मोठ्या साहेबाकडे, असे प्रवास करू लागल्या. शिक्षण खात्याच्या ऑफिसात खेटे पडायला लागले. त्यातून खूपच रंजक माहिती बाहेर यायला लागली. एक उदाहरण खूपच बोलके आहे. एका गावतली एक मुलगी कागदोपत्री नियमित शाळेत जात होती. प्रत्यक्षात मात्र तिचे लग्न होऊन जमाना उलटला होता, ती दुसर्याच एका गावी सुखेनैव संसार करत होती आणि तिला दोन मुलंही होती. तरीही सरकारी रेकॉर्डनुसार ती अगदी नियमित शाळेत येत जात होती!!!
हे "शाळा पाहिजेत वि. शाळा तर आहेतच की" प्रकरण धुमसत राहिले. पार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांपर्यंत चर्चा झाली. फलनिष्पत्ती काहीच नाही. अर्ज चालू राहिले, विनंत्या चालू राहिल्या, सरकारची उत्तरं येत होती. सरकारचे हेच म्हणणे राहिले की शाळा चालूच आहेत. ते नाकारले तर आजपर्यंत ही भ्रष्ट व्यवस्था चालवणारे मेलेच की! मग कोण कबूल करेल? हे झाले लेखी उत्तराचे. तोंडी चर्चांमधून जे काही बोलले गेले त्याला तर तोडच नाही. तुमची गावं दुर्गम आहेत, आमचे शिक्षक तिथे पोहोचू शकत नाहीत इथपासून ते त्यांना सापविंचूकाट्याचे भय वाटते, त्यांच्या जीवाचे काही झाले तर जबाबदार कोण? इथपर्यंत बोलाचाली झाली. मात्र या सगळ्या युक्तिवादानंतरही लोक चिकाटीने मागणी पुढे रेटत राहिले. हे सगळे युक्तिवाद फिके पडतील अशी अंतिम भूमिका शीर्ष अधिकार्यांकडून घेतली गेली. "एवीतेवी तुमची गावं बुडणारच आहेत, तेव्हा आम्ही त्या शाळा पुनरूज्जिवित करू शकत नाही." असं लोकांना सुनावलं गेलं. इतकंच नाही तर नर्मदा खोर्यातील बहुतेक सगळ्या गावांमधील विकासकामं अधिकृतरित्या थांबवण्यात आली. एकीकडे, सरकार अजून पुनर्वसनाबद्दल चकार शब्द काढत नव्हते, पण दुसरीकडे 'तुमची गावं बुडणारच आहेत' असं म्हणून विकासकामं थांबवत होते.
हा सगळा प्रकार चालूच राहिला. सरकारने आदिवासींच्या शिक्षणाविषयी कोणतीही बांधिलकी अथवा उत्तरदायित्व घेण्यास साफ नकार दिला. आता आपले भविष्य आपणच घडवायचे, कसेही करून आपल्या मुलाबाळांना शिक्षण मिळालेच पाहिजे या उद्देशाने प्रेरित झालेले गावोगावचे डायाडायी (म्हातारे म्हातार्या) एकत्र जमले. इ.स. १९९१ च्या अखेरीस अक्कलकुवा आणि अक्राणी (धडगाव) तालुक्यातील ग्राम प्रतिनिधी एकत्र जमले. विचार विनिमय झाला. आणि आपण स्वतःच शाळा काढायची आणि चालवायची असा निर्णय झाला. आपल्या शाळांमधून नुसतेच पुस्तकी ज्ञान नाही द्यायचे, आपली मुलं जीवनाला सामोरी जायला तयार झाली पाहिजेत, त्या दृष्टीने त्यांचे शिक्षण झाले पाहिजे असे त्यांचे मत होते. मग या नवीन शाळांना नाव दिलं गेलं .... जीवनशाळा.
आपले वडिलधारे कसा संघर्ष करत आहेत हे ही मुलं अगदी जवळून बघत होती. हा संघर्ष आपल्याही प्राक्तनात आहे हे ही स्वच्छ दिसत होते. मग जीवनशाळेचे घोषवाक्य ठरले....
"जीवनशालाकी क्या है बात! लडाई पढाई साथ साथ!"
पहिली जीवनशाळा ता. ६ ऑगस्ट १९९२ रोजी अक्कलकुवा तालुक्यात चिमलखेडी येथे स्थापन झाली. या तारखेमागील सांकेतिकताही अशी की याच दिवशी हिरोशिमावर पहिला अणुबाँब पडला होता. त्या संहाराचा विरोध म्हणून त्याच दिवशी या एका विधायक आणि नवनिर्माणाच्या दिशेने जाणार्या नवीन कामाची सुरूवात केली गेली. लागोपाठच, आठ दिवसांनी ता. १४ ऑगस्ट १९९२ला धडगाव तालुक्यातील निमगव्हाण इथे दुसरी जीवनशाळा सुरू झाली. पहिली शाळा सुरू झाली चिमलखेडी इथे. पण नंतर जेव्हा ते गाव धरणाच्या पाण्यात बुडले तेव्हा मग हीच शाळा मणिबेली इथे स्थलांतरित झाली. वास्तविक मणिबेली हे ही बुडितातलेच गाव. महाराष्ट्रातले, बुडणारे पहिले गाव. इथे, काही लोकांचे पुनर्वसन झाले. बाकीच्यांचे झालेच नाही. ज्यांचे झाले त्यांचेही समाधानकारकरित्या झालेच नाही. अगदीच निरुपाय झाला, गाव पाण्याखाली गेले, म्हणून मग पाणी चढल्यानंतर तिथले गावकरी नुसते वर डोंगरावर सरकले. गाव कागदोपत्री बुडालेले, प्रत्यक्षात अजूनही नांदते! नर्मदा बचाओ आंदोलनाचा पहिला मोठा सत्याग्रह झाला मणिबेली इथे. आजही ही शाळा इथे अतिशय जोमाने चालू आहे.
मणिबेलीत नांदत असलेली आजची जीवनशाळा. © 2003 Dana Clark येथून साभार
शाळा स्थापन करणे हे तसे फार सोपे काम होते. संकल्प केला, ठराव केला, तो संमत झाला की झाली शाळा स्थापन. पण त्या शाळेत मुलांना आणणे हे एक फार मोठे जिकिरीचे काम बनले. परिस्थिती अशी होती की लहान मुलंच काय, मोठे लोकही शर्टपँटमधला माणूस बघितला की जंगलात आत मधे पळून जायचा जमाना फारसा दूरवरच्या भूतकाळातला नव्हता. आंदोलनामुळे मोठे लोक हळूहळू शहरी वातावरणाला रूळले होते. पण लहान मुलं मात्र अजूनही या शहरी माणसांच्या वार्यालाही उभी राहत नव्हती. त्यांच्याशी मैत्री करणं हेच मुख्य काम बनलं सुरूवातीच्या काळात. मग त्यांचे शिक्षक बनलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना गोळ्या, बिस्किटं देऊन त्यांचं मन वळवायला सुरूवात केली. ही युक्ती सफल झाली. मुलं हळूहळू रूळली. बोलायला लागली. दोस्ती झाली आणि मग कुठे अक्षर ओळख सुरू होऊ शकली.
ज्या गावात शाळा उभ्या राहिल्या त्या पंचक्रोशीतील लोकांनी स्वतःच पुढे येऊन, साहित्य जमवून शाळा उभारल्या. कोणी लाकडं दिली, कोणी बांबू दिले. आदिवासी लोकांमधे 'लाहा' नावाचा एक प्रकार असतो. 'लाहा' म्हणजे संपूर्ण गावाने / समूहाने एकत्र येऊन एखाद्या घराचे, कुटुंबाचे एखादे काम करून देणे. ज्याच्या घरचे काम आहे त्याने मग गावकर्यांना जेवण द्यायचे त्या कामाच्या बदल्यात असे साधारण स्वरूप असते. इथे तर कामच सगळ्या गावाचे होते. त्यामुळे 'लाहा' करून शाळा बांधली गेली.
शाळा सुरू झाल्या. हळूहळू मुलंही येऊ लागली. अगदी लहान मुलांपासून ते दहा बारा वर्षांच्या मुलांपर्यंत सगळ्याच वयोगटाच्या मुलांना शिक्षणाची गरज होती. अशी सगळीच मुलं मग शाळेत यायला लागली. सुरूवातीला शाळा सकाळी भरायची आणि संध्याकाळी सुटायची. मग मुलं आपापल्या गावाकडं जायची. तिथे गावंही जरा वेगळ्या प्रकारे वसलेली असतात. एखादं गाव अगदी सलगपणे वसलेलं असेलच असं नाही. गाव हे अनेक पाडे, वस्त्या यांनी बनलेलं असतं. हे सगळं एकमेकांपासून थोड्या थोड्या अंतरावर वसलेलं असतं. लहान लहान मुलं जेव्हा संध्याकाळी आपापल्या घरांकडे, गावांकडे जायची तेव्हा साहजिकच चालत जायची. अंतरं मोठी. दोन चार किलोमीटर चालणं हे अगदी सहजच. रस्त्यात नाले, ओहोळ, नद्या. मुलं थकायचीही. ही एक मोठीच समस्या बनायला लागली.
परत सगळी मंडळी एकत्र जमली. निर्णय झाला की शाळेतच मुलांच्या राहण्याची व्यवस्था करायची. खरं तर नुसती शाळा चालवणं हेच एक आव्हान होतं. त्यात परत निवासी व्यवस्था करणे हे जवळजवळ अशक्यप्राय काम होतं. पण काही पर्यायच नव्हता. बैठकीत असं ठरलं की गावकर्यांनी अर्ध्या वर्षाच्या धान्याची सोय करायची आणि उरलेल्या धान्याची सोय नर्मदा बचाओ आंदोलनाने करायची. मात्र नुसती धान्याची आणि राहण्याची सोय करून भागण्यासारखं नव्हतं. ते धान्य शिजवणार कोण? मुलांचं करणार कोण? वरकड कामं कोण करणार? या समस्यांची आता यादीत भर पडली. मग असं ठरवण्यात आलं की मुलांना स्वैपाक करून जेवूखाऊ घालायला एक बाई नेमायची आणि वरकड कामे, पाणी भरणे, साफसफाई करणे वगैरे साठी एक पुरूष नेमायचा. अशा रितीने मग शाळेत शिक्षकांव्यतिरिक्त एक 'मावशी' आणि एक 'कामाठी' अशी अजून दोन जणांची भर पडली. या सगळ्याच लोकांना काही मानधन मिळावे अशीही इच्छा होतीच. मग शिक्षकांना महिना दीडशे रूपये आणि मावशी व कामाठ्याला महिना शंभर रूपये असे मानधनही त्यावेळी ठरले.
अशा रितीने जीवनशाळा या निवासी शाळा बनल्या.
आता शाळेत मुलंही यायला लागली. मुलांपेक्षाही त्यांचे आईबाप, गावातली इतर बुजुर्ग मंडळी शाळेबाबत अतिशय जागरूक होती. गावातल्या लोकांचीच शाळा देखरेख समिती स्थापन झाली. शाळेची जबाबदारी गावाने स्वीकारली. शाळेत प्रवेश घ्यायला मुलांवर वयाचे कोणते बंधन ठेवले गेले नाही. जी मुले खरंतर आठवी नववीमधे असायला पाहिजे होती ती तिसरी चौथीमधे दिसत होती. कारण, त्या मुलांना तो पर्यंत शाळाच उपलब्ध नव्हत्या. आता आपल्याच गावात, ते ही आपल्याच शाळेत शिक्षण मिळतंय म्हणल्यावर मुलांचाही उत्साह वाढला. उपस्थिती वाढली आणी नियमितही झाली. मुलांना लागणार्या निरनिराळ्या साधनांची सोय ठिकठिकाणच्या हितचिंतकांनी केली. कोणी वह्यापुस्तकं पाठवली तर कोणी अजून काही.
जीवनशाळा नियमितपणे चालायला लागल्या, मुलं शिकू लागली. मुलांच्या जेवणाचा आणि अन्य खर्चाचा भार गावकरी आणि नर्मदा अभियान यांच्यावतीने संयुक्तपणे उचलला गेला होता. साधनं, पैसा काहीच विपुलतेने उपलब्ध नव्हते. पण जिद्दीने आणि हितचिंतकांच्या मदतरूपी प्रोत्साहनामुळे हे सगळे कसेबसे रेटले जात होते. दर वर्षी मुलं पुढच्या इयत्तेत गेली की ती इयत्ता चालू होत होती. असं करता करता १९९६ साल उजाडलं आणि मुलं चौथीचा अभ्यासक्रम संपवून परिक्षेला तयार झाली. आणि इथेच आजपर्यंतचा सगळ्यात मोठा अडसर समोर आला.
शाळा चालू झाल्या होत्या खर्या, पण त्यांना सरकारी मान्यता मात्र मिळालेली नव्हती. ती मिळवण्याचे प्रयत्न चालूच होते. सरकार दरबारी अर्ज जात होते. ते तिथे तिथल्या कारभाराच्या गतीने मागेपुढे सरकत होते. पण शेवटी परवानगी नाकारली गेली, मिळाली नाही ती नाहीच. सरकारी कागदपत्रांप्रमाणे त्या त्य भागातल्या सरकारी शाळा तर सुखेनैव नांदत होत्या. मग त्याच भागात अजून एका शाळेला कशी मान्यता देईल सरकार? तशी मान्यता देणे म्हणजे जो काही भ्रष्टाचार म्हणा किंवा सावळागोंधळ चालला होता त्याची कबुली दिल्यासारखेच होते. त्यामुळे सरकारमान्यता काही मिळत नव्हती. पहिली ते तिसरीचे वर्ग तसेच चालवले गेले, परिक्षाही झाल्या. चौथीत मात्र खरा प्रश्न समोर ठाकला. शाळा चौथीपर्यंतच चालवायच्या असे ठरले होते. त्यामुळे मुलांना पाचवीसाठी दुसर्या शाळेत अथवा एखाद्या हायस्कूलात जाणे भाग होते. आणि जो पर्यंत त्यांची चौथीची परिक्षा एखाद्या सरकारमान्य शाळेतून होत नाही तो पर्यंत त्यांना दुसरी कोणतीही शाळा पाचवीत प्रवेश देणार नाही. असे हे त्रांगडे होते.
शेवटी १९९६ साली मुलांना चौथीची परिक्षा देताच आली नाही. वर्ष वाया गेले. नवीन शैक्षणिक वर्षही सुरू झाले. मास्तरांनी परत तोच अभ्यासक्रम शिकवायला सुरूवात केली. मुलांच्या ते लक्षात आलेच. काही धीट मुलांनी शिक्षकांना त्याबद्दल विचारायला सुरूवात केली. शिक्षकही हतबल होते. त्यांनी सगळी परिस्थिती मुलांना समजावून दिली. सरकार मान्यता देत नाही म्हणल्यावर मुलांचे प्रश्न सुरू झाले...
सरकार म्हणजे नक्की कोण?
कुठे असतं ते?
सरकार आमचे नाही का?
त्याला आमच्या भल्याची फिकीर नाही का?
या शाळेला मान्यता नाही देत तर मग त्यांना मान्य असलेल्या शाळा का नाही सुरू करत?
आम्ही शिकायचंच नाही का?
एक ना दोन... त्या मुलांचा असंतोष अगदी योग्य होता. त्यांचे प्रश्नही चपखल. पण उत्तरं सोपी नव्हती. त्यांना शांत करता करता शिक्षकांची त्रेधा उडाली. आणि मग नर्मदा बचाओ आंदोलनाचा मुख्य लढा थोडा बाजूला ठेवून, स्वतः मेधाताई आणि इतर काही प्रमुख कार्यकर्ते या सगळ्या घाडामोडीत जातीने उतरले. सरकार दरबारी जोरदार धडक मारली. पार मंत्रालयापर्यंत पोचले प्रकरण. मग मंत्रालयातूनच आदेश आला की मुलांना परिक्षेला बसता येईल असा तोडगा काढावा. हा एक खूप मोठा दिलासा होता. पण नोकरशाहीचे स्वतःचे असे काही नियम, पद्धत वगैरे असतात. मुख्यमंत्र्यांचा आदेश आला म्हणून काय झालं? त्याची कार्यवाही तर नोकरशहांनीच करायची असते. त्याप्रमाणे मग तालुका आणि जिल्हापातळीवरचे अधिकारी शाळांच्या तपासणीला आले. शाळांमधून जे शिक्षक होते त्यांच्यापैकी कोणीच डीएड बीएड वगैरे झालेले नव्हते. मुलांनी शिकावं, त्यांच्यासाठी आपण काही करावं या तळमळीतून ते शिक्षक बनले होते. शिक्षण देतानाही काही अभिनव पद्धती वापरल्या जात होत्या. मुलांच्या वयावरही काही बंधनं नव्हती. नेमक्या याच सगळ्या गोष्टींवर बोट ठेवत सरकारी यंत्रणेने खूप आक्षेप घेतले. वरून आदेश असूनही चौथीची वार्षिक परिक्षा घेण्याबाबत खूपच घोळ घातला गेला. पण या सगळ्याला चिकाटीने तोंड देत, शक्य तिथे नीट खुलासे देत एकदाची वार्षिक परिक्षा पदरात पडली. साल होते १९९७.
परिक्षा शाळेत होऊ शकत नव्हती. विद्यार्थ्यांना इतर मान्यताप्राप्त शाळांशी परिक्षेपुरते जोडून दिले गेले. निमगव्हाणच्या शाळेसाठी रोषमाळ खुर्द येथील शाळेत परिक्षा घेतली गेली. आणि चिमलखेडीतील शाळा, जी एव्हाना बुडितामुळे मणीबेलीत सरकली होती, तिच्यासाठी वरखेडी येथील शाळेत परिक्षेची व्यवस्था केली गेली. मुलांचा अभ्यास तयार होताच, शिवाय चौथीचा अभ्यासक्रम दोनदा शिकला होता त्यांनी. दणकून पेपर लिहिले पोरांनी. मग एक नवीन आक्षेप घेतला गेला. ही एवढी मोठी मुलं ही खरी जीवनशाळेत शिकलेलीच नाहीयेत. ती दुसरीकडून कुठून सातवी आठवी पास झालेली मुलं आहेत आणि परिक्षेला बसवायला म्हणून आणली गेली आहेत असा आक्षेप घेण्यात आला. पर्यायाने त्यांनी लिहिलेले पेपर बाद धरण्यात आले.
![]() |
| सियाराम पाडवी... मेळाव्यात भाषण करताना. |
![]() |
| बटेसिंग गुरूजी... आम्हाला जीवनशाळांची (कर्म)कहाणी सांगताना. |
***
जाता जाता : जीवनशाळांवर बनवलेली ही एक डॉक्युमेंटरी इथे बघायला मिळेल.
क्रमशः

प्रतिक्रिया
अपेक्षेप्रमाणे
ऋषिकेश, धन्यवाद. हे लेखन
महत्त्वपूर्ण लेखन. या विषयावर
आरा, तुमच्याकडून मिळालेली
काही नाही
संपुर्ण वाचल्यावर २१व्या
वाचतो आहे ...
छान
धन्यवाद!
न राहवून लेख पुन्हा वाचला
सुंदर... ह्या गोष्टी कायम
एकतर वाचुन सुन्न झालोय... खरच
-१
सुन्न...
सहमत
दुसरा
परा, मला आवडेल सहभाग घ्यायला.
मी काय करु शकतो?
सुन्न होणार्यांना जाहिर सूचना!
+१
+२
वाट बघतो आहे
वाचतेय
सुंदर शब्दांकन
जीवनशाळेसाठी केलेल्या
सांगा!
.
बरोबर. मात्र, मॉरल सपोर्ट
मॉरल सपोर्ट द्यायला सोबत
बोलू! अजून इतरांचीही मतं
>>सगळ्यांनाच मेधाताई होता
हे खरे लढवय्ये
हे जगणं आपल्या अनुभावापलीकडचं आहे
पहिल तर धन्यवाद देतो तुम्हाला
असुरी समाधन ??
निसर्गाशी जुळलेली नाळ कायम ठेवत
वाचते आहे
सर आताच हि लिंक पहिली
अतिशय विस्ताराने आणि अत्यंत
धन्यवाद!
काय लिहू?????
मुद्दा