विद्या बालनचे भजे...
लेखनप्रकार
विद्या बालनचे भजे...
गोष्ट मुंबईची, ४-५ वर्ष झाली असावीत. विद्या बालनचा नुकताच सिने-सृष्टीत प्रवेश झाला होता. परिणीता, लगे रहो मुन्नाभाई प्रदर्शित झाले होते. त्यावेळे मी माझ्या दोन मित्रांसोबत चेंबूर परिसरात राहत होतो. विद्या बालनने माझ्या ह्यातल्याच एका मित्राचे बुब्बुळ फिरवली होती. मुन्नाभाई ४-५ वेळा बघून झाला होता, परिणीताची गाणे शेकडो वेळा रूम मध्ये वाजवल्या जात होती. सकाळचा अलार्म, मां का फोन, मित्राचा फोन वा मैत्रिणीचा मिस्सड कॉल काहीही वाजले तरी तेच.. 'पल पल हर पल... पियू बोले पियू बोले...'!! हा मित्र तार सप्तकात! त्याचे सूर-ताल-लय सगळेच बिघडले होते... आम्ही परेशान.. विद्या बालन छानच हो.. पण आता अजीर्ण झाले होते... त्याला समजावून बघितले, धमकावून बघितले पण काहीही उपयोग नाही.. तो काही स्वर्गातून उतरेना... बर असले उद्योग एकट्याने करावेत तर हा कसला ऐकतोय.. स्वतः मुन्नाभाई झाला आणि आम्हाला 'circuit ' करून टाकले होते. मग आमचा तरी काय ईलाज.. 'भाई तू टेन्शन मत ले भाई, तू पढाई पे ध्यान दे' हा मंत्र आम्ही स्वीकारला आणि ह्याची 'गांधीगिरी' आम्ही सहन करायला लागलो.
कधी काय करावे लागेल ह्याचा नेम नव्हता. विद्या बालन येणार म्हटले की हा कधीही आणि कुठल्याही मॉल मध्ये आम्हाला घेऊन जायचा. त्या विद्या बालनला म्हणे पॉल कोहेलो चे पुस्तके आवडायची. झाल्ल.. शोधून शोधून वाचून काढली! एक दिवस तर सकाळी सकाळी बोंबाबोंब करून आमची झोप उडवली. घाबरून उठलो आणि ह्याला विचारले, तर आम्ही चाट पडलो. 'मुंबई टाईम्स' मध्ये तिच्या फोटो सहित तिचा प्रोफील आला होता. ती चेम्बुराचीच म्हटल्यावर आमच्या ह्या मुन्नाभाईच्या अशा पल्लवित झाल्या. त्यातलाच कुठल्या तरी भज्याच्या ठिकाणाचा उल्लेख होता. तिथली भजे म्हणे ह्या विद्या बालनला खूप आवडायची! मुन्नाभाई पेटले... दिवस रविवाराचाच होता... वेळ घालावायाचाच होता... भजे खायचा ठराव पास केला. कसेतरी सकाळचा प्लान संध्याकाळवर ढकलून आम्ही ताणून दिली...
संध्याकाळी बोंबाबोंब करून ह्याने उठवलेच. उठतो तर काय, नवीन नवीन ड्रेस घालून, x - men सेंट मारून हा तयारच बसला होता. ह्याला जसे काही विद्या बालन बघायलाच येणार होती. ती काही येणार नव्हती आणि आम्हाला कोणी 'कांदे-पोहे' देणार नव्हते. बेत होता तो कांद्याच्या भज्याचा..
आमची शोध मोहीम चालू झाली...प्रथम भज्याचा गाडा असावा का छोटे हॉटेल यावर वाद झाला. एका ठिकाणी भजे खाता-खाता वाद मिटला. विद्या बालन ती, साध्या गाड्यावर का भजे खाणार, ह्या मुन्नाभाईच्या वक्तव्यास तोड नव्हती... आम्ही मग चेम्बुरचे छोटे हॉटेल धुंडाळायला लागलो. प्रत्येक ठिकाणी आधी भजे खायचे आणि मग हॉटेल मालकाकडे चौकशी करायची, अशी strategy मुन्नाने ठरवली. आम्ही 'circuit ' होतोच साथ द्यायला. ह्याला म्हणे ह्याची आणि विद्या बालनची taste किती match होते ते बघायचे होते. ४-५ ठिकाणी हा असा प्रयोग झाला, आणि फसला. ह्याला सगळीच भजी आवडली. पण विद्या वाली भजी एकही नव्हता. आम्ही तिसऱ्याच ठिकाणीच नांगी टाकली होती. मग strategy बदलण्यात आली. आधी चौकशी आणि मग खाणे असे ठरले. त्यानुसार अजून ५-६ ठिकाणी बोंबलत फिरलो. सगळी हॉटेल्स पालथी पाडून झाली. मग भज्यांच्या गाड्यांची शोध-मोहीम चालू झाली. २-३ गाडे शोधल्यानंतर शेवटी अखेर तो गाडा सापडला, गाड्यावाल्याने पण दुजोरा दिला आणि घाण्यात भजे पण दिसली...
आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. मुन्नाभाईने लगेच 'ती भजे व तो' असे फोटो काढली. मग 'फक्त भज्यांचा' फोटो झाला. मग त्या फोटोत आम्हीही आलो, भज्जेवालाही आला. त्याने खूष होऊन तीच भजे परत घाण्यात टाकली. फिरून फिरून आमचेही कावळे 'विद्या विद्या' करत होतीच. २-२ डिश फस्त झाल्या. मुन्नाभाई तर 'आम्रखंड' खातोय या अविर्भावात ती भजे खाऊ लागला. ह्याचे स्वतःचे लग्न असल्यासारखे आग्रह करून करून तिसरी डिश पण खाऊ घातली. मग आम्ही थांबलो. ह्याचा उत्साह काही मावळत नव्हता. आणखीन दोन डिश ह्याने गिळल्या. मग थोडा ताळ्यावर आला आहे, आता थांबवेल म्हटलं, तर तेवढ्यात आमच्या तिसऱ्या मित्राला हुक्की आली. विद्या बालनचा भाऊ असल्यासारखा हा पेटला. अजून घे, अजून घे करत हा मुन्नाभाईच्या 'पोटा'वर चालून गेला. गेल्या कित्येक दिवसाचा राग त्या आग्रहात होता. 'हीच बहती गंगा', म्हणून मग मीही पेटलो. विद्या बालनचे गाणे म्हणू म्हणू, तिचे वेगवेगळे फोटू दाखवत दाखवत त्याला डझनावारी डिशss खाऊ घातल्या. शेवटी गाड्याचा मसाला संपला, घाण्याचे तेलही आटले. मग आम्ही आवरते घेतले. ह्याचे काळीज पण वरमले होते. मग ह्या अजगराला आम्ही उचलले आणि घरी नेले.
... नंतर १५ - २० दिवस ह्याचा काळजातला चुकलेला ठेका पोटात शूल होऊन पेटला होता. office नाही ना जेवण! ना मां का फोन ना मैत्रिणीची आठवण! पोट धरून पोटातून बोंबलायचा... आमच्या नावाने शंख करायचा.. असंख्य शिव्या घातल्या.. अगदी पोटातून... आम्ही 'room - freshner ' आणून शांत पणे मज्जा पाहत होतो. विद्या बालनचे सगळे पोस्टर फाडले. मोबाईल मधील एकनाएक गोष्ट डिलीट केली. 'मुंबई टाईम्स' बंद केला. अखेर तो 'शूल' शांत झाला. आम्ही सुटलो, तोही सुटला आणि विद्याही.... ही बघा कशी हसत आहे --
वाचने
6610
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
हा हा हा! मजा आली.. आधी मला वाटलं 'डर्टी पिक्चर' वगैरे काही आहे की काय! ;)
In reply to मस्त! by मेघवेडा
हा हा हा.
मलाही असच वाटलं. म्हटलं रिलीज व्हायच्या आत रिव्ह्यु आला की काय? ;)
.
लेख आणि विद्या बालन दोन्ही खतरनाक.
भज्यांचे छायाचित्रही मस्त आहे. शीर्षकात बदल हवा.
In reply to खतरनाक... by प्रभाकर पेठकर
सुचवा
:) लेख भज्यांसारखाच खुसखुशीत झालाय.
गंमतीशीर लेख :)
विद्या बालन मला वाटते त्याप्रमाणे चेंबूरला नसावी राहत. का कोण जाणे असे ऐकल्याचे वाटते की कुलाब्याला रहायची. अर्थात कल्पना नाही. आणि प्रेमज्वर चढलेल्यांना कशामुळे काय होईल याची काही खात्री नाही.
In reply to छान by चित्रा
विद्या बालन चेंबुरचीच आहे, कालच कुठल्याश्या लेखात वाचले होते.
बाकि लेख मस्त खुसखुशीत झालाय हे मात्र खरं :)
In reply to छान by चित्रा
फक्त विद्याच नाही, तर बिपाशा, अनिल कपूर इ. मंडळी ही चेंबूरचीच. बरेच लोक अजून इकडेच राहतात आणि सर्वसामान्यांप्रमाणे रस्त्यावर/दुकानात दिसतात.
बाकी लेख मस्त खुसखुशीत जमलाय.
In reply to फक्त विद्याच नाही, तर बिपाशा, by मस्त कलंदर
होय विद्या बालन हि खरेतर 'अय्यर' आहे अन हो ती चेंबूरचीच आहे. St. Anthony's Girls High School ची ती एक माजी विद्यार्थिनी नंतर तीने आपले शिक्षण St. Xavier's College मधून पूर्ण केले.
तिचे वडिल पी आर बालन हे ETC चैनेल चे Vice-President होते म्हणून ती सहज चित्रपटात झळकू ही शकली.
पण एक आहे चेंबूरची St. Anthony's खरंच मस्त शाळा आहे.
In reply to होय विद्या बालन हि चेंबूरचीच आहे by वाहीदा
हायला, असं आहे का?
मला वाटलं हिला कित्ती स्ट्रगल करावं लागलं असेल.
खूप दिवसांनी असं काहीतरी छान चमचमीत धमाल विनोदी वाचलं. अजून लिहीत रहा.
वा!! एकुण सुटका झाली तर !
फोटो फार सुरेख निवडला आहे.
मस्त लिहिलंय. :)
ही बघा कशी हसत आहे
लै टायमिंग गाठलं आहे. :)
-दिलीप बिरुटे
प्रेमवीराला चांगलाच त्रास झालेला दिसतोय.;)
उलाला उलाला... ;)
''स्वतः मुन्नाभाई बनून आम्हाला 'सर्किट' करुन टाकले ' ही नवीन फ्रेज आवडली.
:)
मस्त टायमिंग आणि लेखन सुद्धा एकदम मस्त झाले आहे.
मस्त खुसखुशीत लेखन
मस्त हो अभिषेकराव!
मजा आली वाचताना आणि तो फोटो तर काय (विद्याचा, भज्याचा नाही)...उफ्फ्फ
- ('डर्टी पिक्चर' ची वाट बघणारा) सोकाजी
हा हा हा .. एकदम खुसखुशीत :) :)
मस्तच!!!! मजा आली
असंही डर्टी पिक्चर चालला नाही तर विद्या बालनचही भजंच होणार आहे.
फारच आवडला .. विशेष म्हणजे वाचताना कुठेही कंटाळायला होत नाही :)
हसून हसून पुरेवाट .
माझ्या समोरचा क्लायंटला आपण सांगतोय त्यात हसण्यासारख काय आहे ?हा प्रश्न नक्की पडला असणार!
एकदम मजेदार लेख...मस्त मस्त मस्त...
असंही डर्टी पिक्चर चालला नाही तर विद्या बालनचही भजंच होणार आहे.
आणि चालला तरी तिचे भजंच होणार आहे...
(बाकी विद्याला पाहिल्यावर मला का कोणास ठावूक ती confused वाटते...सोज्वळ भुमिका करायच्या का "डर्टी" टाईप भुमिका करायच्या या विचारामुळेच confused असावी. तिची अवस्था मनिषा कोईराला टाईप होणार असे वाटते..(म्हणजे सुरूवातीला सोज्वळपणाचा आव आणून नंतर डर्टी टाईप आणि त्यानंतर आपल्याला कळणार पण नाही की कधी ही बया गायब झाली))
In reply to हहपुवा... by योगी९००
भ या न क सहमत.
मला ती नेहमी कन्फ्युज्ड वाटत आलेली आहे.
मस्त लेख!
राघव
विद्या बालनच्या भज्यांसारखाच खमंग झालाय लेख! मजा आली. :)
मला वाटले कि विद्या बालन ने भजी बनवली .... ;)
छान आहे लेख !!
भज्यांसारखाच मस्त कुरकुरीत लेख!
सर्वांना माझ्याकडून भजे... dirty picture बघत बघत ख निवांत...
आंम्ही(ही) शीर्षक वाचुन गंडलो... वाटलं होतं की ''विद्या बालनचे भजे....'' हा धागा उघडल्यावर आत ..''झाले''.. असं काहितरी वाचायला मिळणार की काय? आगामी चित्रपटाला अनुसरुन ;-)
पण लेख छान जमलाय हे मात्र नक्की...
In reply to आंम्ही(ही) शीर्षक वाचुन by अत्रुप्त आत्मा
आगामी चित्रपटाचा अनुशंघाने शीर्षक बदलू का -- " Dirty भजे"
फ्या: फ्या: फ्या: खि: खी: खि: :) वाचता वाचताच हसतोय!
पिक्चर आल्यावर अशे लेख लिले तर पैशे भेटतात का
कुणी माहिती द्यु शकेल्का

मस्त!