Skip to main content

कट्टा - मुंबई २८ ते पुणे १३.

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 24/11/2011 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर भेटणा-या आयडिंच्या मागचे चेहरे कसे असतात, ती बोटं कशी असतात जी आपल्या डोक्याला शॉट लावणारे प्रतिसाद लिहितात अन नंतर ह.घ्या असं लिहुन खरड टाकतात. आपल्या सगळ्यांना बरंच आकर्षण असेल, कोण असतात ती माणसं जी आपलं सुंदर अप्रतिम असं कौतुक करतात, प्रत्यक्ष भेटल्यावर सुद्धा ती आपल्याला त्याच अन तशाच शिव्या देतील का त्यांच्या चेह-यावर फक्त प्रकाटाआ लिहिलेलं दिसेल. आपले प्रतिसाद ओढत ओढत स्क्रिनच्या पार उजव्या कोप-यात घेउन जाणारे खरंच उजव्या विचारांचे असतात का डाव्या, या आणि अशा प्रश्नांचं उत्तर मिळण्याची जागा म्हणजे कट्टा.' या महिन्याचा कट्टा आयोजित केलेला होता १९ तारखेला, एकत्र जमायची जागा होती हॉटेल पुणे गेट, निगडी. पुणे-मुंबई दोन्हीकडच्या लोकांच्या सोयीनं हे ठिकाण निवडलेलं होतं. नेहमीचं यशस्वी कट्टाबाज वगळता एक दोन नविन आयडिंचे मालक या कट्ट्याला सामील झाले होते. (आता या मालकांचे किती आयडि आहेत हे आम्हाला माहित नाही.) मुंबई २८ हुन गवि, किसन, प्रास, गणेशा हे सगळ्यात आधी पोहोचले होते. त्यानंतर वल्ली, चतुर चाणक्य आले, नंतर धनाजीराव, विमे, सुधांशु, वपाडाव, प्यारे अन मी एकत्र पोहोचलो. जवळ्पास त्याचवेळी पुण्याच्या दुस-या टोकावरुन म्हणजे पुणे १३ वरुन सोकाजीराब व पिंगु सुद्धा पोहोचले. आज सकाळी काढलेल्या १९ जणांच्या यादीपैकी १४ जण पोहोचले होते, म्हणजे किमान कोरम पुर्ण झालेला होता, आयोजक खुष कट्टा सुरु. मग ओळखी अन ज्यांचे फोटो आधी पाहिलेले नाहीत त्यांच्या ओळखी झाल्यावर चेह-यावर येणारे आश्चर्याचे भाव हा कार्यक्रम झाला. खरंच मिपावरचे आयडि, त्यांचे अर्थ अन प्रत्यक्ष त्यांचे मालक यांचा किती कमी संबंध असतो याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. सगळ्यांनी आपल्याला सोयीच्या खुर्च्या पकडुन बसल्यावर कॅप्टननं एंट्री मारली. हा असला डिजिटल ऑर्डर बुक वाला कॅप्टन मी तरी पहिल्यांदाच पाहात होतो, मग गणेशानं प्रसिद्ध केलेली 'हातभर तवा फ्राय सुरमई,फ्रुट पंच, चिज मलई टोस्ट, मांचुरिअन,होडन सावर सुप अशा विविध प्रकारच्या ऑर्डर घेताना कॅप्टन अन त्याचं डिऑबु एवढं गोंधळलं होतं की, त्या डिऑबुकाचा प्रोसेसर बंद होउन त्यातुन धुर निघतो का काय अशी शंका यायला लागली. यातच हातभर तवा फ्राय सुरमई विदौट सौथ इंडियन मसाला , हे विदौट सौथ इंडियन मसाला हे प्रकरण कॅप्टनला समजावुन सांगण्यापेक्षा विमानाचा डॅशबोर्ड समजावुन सांगणं सोपं असं गविंना वाटत होतं, शेजारी बसलेल्या विमेंनं दुपारीच पुणेरी हॉटेलातिथ्याचा अनुभव घेतला होता त्यामुळं पुन्हा या लढाईत तो पडला नाही, पण ऑर्डर आली की लगेच आपल्याला फोन येवु नये अशी प्रार्थना तो करत होता. कट्टे हॉटेल मध्ये असले तरी ऑर्डरी सर्व्ह होईपर्यंत तोंड बंद राहणार नाहीत याची काळजी मिपाकर नेहमीच घेतात, आज पहिला नंबर लागला तो वल्लीनं हैदराबादहुन आणलेली अन प्रचंड संयमानं, न संपवता आमच्यासाठी जपुन ठेवलेली फ्रुट बिस्किटांचा आणि फोटो काढेपर्यंत ती संपली यावरुन ती किती चांगली होती हे लक्षात घ्या. मग नंतर नंबर लागला रमबॉलचा, पण यावेळी एक फोटो काढुन घेण्याचा चान्स मिळाला. मिपाकरांच्या कट्ट्यावर गप्पांचे मुख्य विषय असतात ते मिपा गाजवत असलेले धागे अन मिपाकर, आणि आता सुद्धा तेच सुरु झालं. आता हे लाईमलाईट मध्ये राहणारे धागे अन मिपाकर कोणते ते वाचकांच्या लक्षात आलेलंच असेलच. साधारण दहा मिनिटांनी पहिली ऑर्डर आली ' हातभर सुरमई तवा फ्राय विदौट सौथ इंडियन मसाला' , यावेळेपर्यंत आजुबाजुला फोटो काढ्ण्यासारखं फार कुणी नसल्यानं आम्ही प्रत्येक डिशचे फोटो घेणार आहोत याची कल्पना कॅप्टनला आलेली होती, त्यामुळं बहुतेक प्रत्येक डिश तो फोटोसाठी पेश करत होता. खाणं समोर आल्यावर गप्पा अजुनच रंगत गेल्या, आता गप्पा कोणत्याही विषयावर असल्या तरी त्या एकाच दिशेनं जात होत्या, ती म्हणजे विनोद, हसणं. एवढ्या लांबुन सगळे एकत्र जैतापुर प्रकल्पाच्या फायद्यातोट्यावर चर्चा करण्यासाठी थोडेच येतात. मग अतृप्त आत्माचं आगमन झालं, आयोजक अजुन खुष. पंधरा जण एकत्र आल्यानं साहजिकच दोन ग्रुप झाले होते अन दोन्ही ग्रुपचं टारगेट सेंटरला बसलेला गणेशा होता, त्याच्या निमित्तानं सगळ्याच बॅचलर लोकांना लग्न झालेल्या मिपाकरांनी काही सल्ले देउन घेतले. यावेळी सोकाजींनी काय पिल्यानं शरीराच्या कोणत्या भागाला कधी जळजळ होते यावर एक छोटा क्लास घेतला. यथावकाश एक दोन राउंड स्टार्टर होउन मेन कोर्सची ऑर्डर फायनल होईपर्यंत चेतन गुगळे आले, आणि टेबलच्या दुस-या टोकाला असलेली खुर्ची भरुन गेली, (आयोजक भरुन पावले) आणि अधांतरी होउ लागलेला कट्ट्याला एक जडता प्राप्त झाली. गप्पा अखंड चालुच होत्या. जेवणं संपत आली होती, शेवट पुन्हा एकदा सुरुवातीच्या गोंधळाप्रमाणे झाला, 'वन बाय टु फ्रुटपंच वुईथ लेयर्स' यावर गणेशानं कॅप्टनचा क्लास घेतला. सुरुवातीचा ' तवा फ्राय सुरमई विदौट सौथ इंडियन मसाला' आणि हे 'फ्रुटपंच वुईथ लेयर्स' खाण्याबाबतचं आणि प्रेझँटेशनचं एवढं ज्ञान वाढवण्यामध्ये मिपावरच्या सुगरणी, बल्लवाचार्यांचा अन खवय्यांचा खुप मोठा हात आहे. निघताना विमेंनं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, ' हे असे कट्ट्रे व्यनि, फोन अन एसेमेस वरुन का करता, धागा का नाही काढत ?' याचं काही खास कारण निश्चीत नाही पण यापुढचे कट्टे जाहीर धागे काढुनच करायचं ठरलं. मुंबईकरांना परत जायचं असल्यानं लवकर निघायचं ठरलेलंच होतं, त्यानुसार साडेदहाच्या सुमारास हॉटेलच्या बाहेर फोटो काढुन आम्ही परत निघालो. कट्ट्याला आलेल्या सगळ्या मिपाकरांचे आभार, आणि न आलेल्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही एक छान संध्याकाळ मिस केलीत, अर्थात यामागं दुसरी मिस असण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि या पुढचे कट्टे करु तेंव्हा धागा काढुच, खरडफळ्यावर सुचना येईल आणि एक विनंती आम्हां नेहमीच्या कट्टेकरांच्या खवमध्ये हे कट शिजताना दिसतीलच, तरी थोडं लक्ष ठेवा अन पुढच्या कट्ट्यांना नक्की या. अजुन मजा करु अजुन दंगा करु. यापुढचा कट्टा जास्त मोठा अन जास्त व्यवस्थित करायचं ठरलं आहे, तसंच एक ट्रिप काढायचं सुद्धा ठरलं आहे, कोकणात. याबद्दल सुद्धा सुचना तुमच्या सोयीच्या तारखा यावर चर्चा होउद्या इथंच. शक्यतो जानेवारीचा चवथा शनिवार / रविवार ठरवावा असा विचार आहे. बघताय काय जॉईन व्हा.

वाचने 12444
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

ठरलेल्या वेळेच्या तासभर आधी घरातून निघूनही कोपर्‍याकोपर्‍याला जबरा ट्रॅफिक लागायला सुरुवात झाली, तेही शनिवारी दुपारी.. तेव्हा म्हटलं न कर्त्याचा वार होतोय की काय? पण वाटेत पिकअपची वाट पहात तासभर उभ्या असलेल्या किसनने आणि त्याहीपुढच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या प्रास आणि गणेशाने खूप पेशन्स दाखवला. गणेशाची बहीण तिचा आणि छोटा बच्चू थांबलेले असल्याने मला अधिकच अपराधी भावना येत होती.. पण ट्रॅफिकपुढे इलाजही नव्हताच. सुदैवाने प्रासला स्टेशनवरुन पिकअप केल्यानंतर फार वाहतूक मुरंबा न होता आम्ही रबाळ्याला पोहोचलो आणि गणेशा, त्याची बहीण आणि भाच्याला सोबत घेतलं. बसताक्षणीच भाचेराव झोपी गेले आणि आमचा गप्पांचा ओघ सुरु झाला. किसनदेव ऊर्फ गॅजेट गुरु एकीकडे गप्प बसून आपल्या विविध मोबाईल्स आणि तत्सम उपकरणांसह जागतिक मित्रांशी माहितीची देवाणघेवाण करत होते. मागच्या सीटवर गणेशा आणि किसनदेवांच्या काहीबाही मैत्रीपूर्ण चकमकी उडत होत्या. मी आणि प्रास पुढच्या भागात आयुर्वेद, संगीत आणि मिपा या विषयांवर ज्ञानकण एक्सचेंज करत होतो. वाटेत फूडमॉलमधे खवळलेल्या पोटाने उतरलो तर "अमुक शिल्लक नाही","तमुक ठेवत नाही", "ढमुक संपले" अशा नकारघंटा ऐकून शेवटी "जे आहे ते अन्न वाढा" असं म्हणून खाल्लं. तुलनेत लवकरच पुण्याला पोहोचलो. गणेशाने आपल्या घरी नेऊन चापाणी केलं. भाचेराव एव्हाना जागे होऊन फ्रेश झाले होते. प्रचंड गोड आहे पोरगं.. गणेशाच्या घरी लग्नघाईचं वातावरण दिसत होतं. तिथे खूप छान वाटलं. तिथून मग गणेश यांच्या कन्फ्यूज्ड मार्गदर्शनाखाली पुणे गेटचा रस्ता अखेरीस पूर्ण केला. पुणे गेटच्या बाहेर वल्ली, चतुरचाणक्य उभे होते. सर्वांशी गाठभेट झाली.. आत गेलो आणि पाहतो तर प्लॅस्टिकच्या खुर्च्या.. पण यावेळी माझ्या साथीला प्रासभाऊ होते. आम्ही दोघांनी एकत्रितपणे संकोच झटकला आणि प्लॅस्टिकऐवजी लोखंडी किंवा लाकडी खुर्चीची विनंती केली. आमच्या आकारांकडे पाहताक्षणीच हॉटेल व्यवस्थापनाने ती मागणी तात्काळ मान्य केली.. पुढे आम्ही प्रचंड स्वाहाकार करुन बिल वाढवणार आहोत अशा आशेने आम्ही मागू ती सोय करायला हॉटेलवाले तयार होते. :) थोड्याच वेळात जवळजवळ सगळेजण आलेच. सोकाजीराव बरेच शांत होते. पण एखादं वाक्यच मधेच टाकायचे ते एकदम ठ्ठो असायचं. सोकाजीराव, प्यारे ही मंडळी आपल्या आराध्यदेवतेची उपासना एकाग्रचित्ताने करत होते. वपाडावने संपूर्णवेळ जोरदार धमाल केली.. मस्त्स्याहारी मंडळींनी एकत्र बसणे सोयीचे असा प्रस्ताव मी मांडल्यावर विमें माझ्या बाजूला आले. गणेशाने आधी सांगितलं होतं की पुणे गेटला हातभर लांबीची सुरमई मिळते. त्यामुळे मी मोठ्या अपेक्षेने आलो होतो. खरंच अखंड लांबलचक सुरमई चापायला मिळाल्या. नुकत्याच आलेल्या महेश लंच होमच्या "मेंगलोरी" अनुभवामुळे "मेंगलोरी किंवा साउथ इंडियन मसाला" नको असं पुन्हापुन्हा समजावून सांगितलं. मग कसला मसाला? म्हटल्यावर मी त्याला तिखट,मीठ, हिंग हळद वगैरे असं सर्व सांगायला लागलो. तेव्हा तो "समजलं" असं करुन गेला. नंतर भरपूर खोबर्‍याचे वाटण लावून तवा फ्राय केलेल्या, तंदूर केलेल्या आणि डीप फ्राय केलेल्या अशा तीन व्हरायटी सुरमई आणि पापलेटात मिळाल्या. गणेशाला हे ठिकाण सुचवल्याबद्दल असंख्य धन्यवाद. पापलेट अत्युत्कृष्ट होतं. सुरमईही एकदम खास. सर्व मासे मुंबईतही मिळत नाहीत इतके ताजे होते. इथे मासे पाण्याच्या टँकमधे जिवंत साठवले जातात असं कळलं. त्या खमंग चविष्ट मासळीसोबत चर्चाही खमंग झाली नसती तरच आश्चर्य.. सर्वजण नुसते धमाल हसण्या-हसवण्याच्या मूडमधे होते. मी त्यादिवशी "ड्रायव्हर" असल्याने पूर्ण सुके रहावे लागले, सोकाजी, वप्या, प्यारे वगैरेंच्या सोबत "बसणे" शक्य झाले नाही.. पण पुन्हा कधीतरी जुळून येईलच. चेसुगुंना पाहून आनंद झाला. खर्‍या अर्थाने मोठा कट्टा झाल्याचं समाधान मिळालं. सर्वांचा निरोप घेऊन मी विमें प्रास आणि गणेशा परत निघालो. मध्यरात्रीचा तो एक्सप्रेसवे आणि तो अंधारात रुद्रभीषण की काय म्हणतात तसा दिसणारा पर्वताळ परिसर आमच्या परतीच्या गप्पांना जबरदस्त बॅकड्रॉप देऊन गेला. मला ड्रायव्हिंग करत सोडून कोणीही झोपले नाही. इनफॅक्ट अगदी ठाण्यात पोहोचेपर्यंत श्वासही न लांबवता अखंड गप्पा चालू होत्या. महिन्याला एकदातरी पुण्याला ड्राईव्ह होतो.. पण इतका लगेच संपलेला ड्राईव्ह यापूर्वी मिळाला नाही. प्रास आदिंच्या मनातही हीच भावना आहे का माहीत नाही, पण दीडशे किलोमीटर कधी संपून गेले आणि परत कधी पोचलो हे मला कळलंच नाही. मला वाटतं कॉलेजच्या दिवसांनंतर आज इतक्या वर्षांनी मध्यरात्रीपर्यंत मित्रांशी अड्डा जमवून पहाटे तीनला घरी परत पोचणं हे पहिल्यांदाच घडलं. ते सुंदर दिवस परत आणल्याबद्दल सर्व कट्टेकर्‍यांचे शतशः आभार..

In reply to by गवि

आपला प्रतिसाद अन अन्नावरची निष्ठा दोन्हीही वाखाणण्याजोगे आहे मालक !!! आपण इतक्या सर्व जणांना जुळवुन यशस्वीरित्या ने-आण केल्याबद्दल शतशः आभार..... धनाजीरावांचे विशेष.... कारण त्यांनी आम्हाला रात्री ३ वाजता माउलीचे दर्शन करविले.... सर्व कट्टेकर्‍यांचे मनपुर्वक अभिनंदन व धन्यवाद..... प्रासजींशी नाळ जोडण्यास आलेली असमर्थता पाहता पुढील वेळी आम्ही त्यांच्याच बाजुची खुर्ची बळकावणार आहोत हे ही आत्ताच सांगुन ठेवतोय..... असो..... येतो...

In reply to by बिपिन कार्यकर्ते

असेच म्हणतो. ५० फक्तचा वृत्तांत, आणि त्यात प्रास व गविंचा खास प्रतिसाद म्हणजे सोने पे सुहागा. मुख्य वृत्तांत आला असला तरी मी कालपासून या प्रतिसादांची वाट पहात होतो.

फुल्ल धमाल कट्टा झालेला दिसतोय. पण च्यायला, मी कुटं होतो बे या सगळ्यात........?????????? ;) ;) ;) (वि. सू.: आता 'बारीक सारीक मुलेबाळे'- 'तुझे विमान उडत होते' वगैरे बोलल्यास फाट्यावर 'नेऊन' मारण्यात येईल. (सोकाजींनी शांत राहून सहकार्य करावे . ;) ) हे म्हणण्याचं खरं कारण म्हणजे सदस्य संख्या अम्मळ जास्त झाल्याने कम्पार्ट्मेंट्स झाल्यासारखे झाले हे बरीक खरे. वरती कुणीतरी म्हटल्याप्रमाणं नाळ जुळायला 'अडचणी' आल्या. ;) नुसत्या आयडींची ओळख आणि नंतर मा. ना. गुगळे साहेब आल्यानंतर ची नावांची ओळखपरेड हाच विषय जास्त झाला. हा तक्रारीचा सूर फक्त आणि फक्त पुन्हा एकदा 'निवांत' भेटण्याची आणि गप्पा मारण्याची अत्यंत निकड यांतून आलेला आहे हे चाणाक्ष मिपाकरांनी ओळखले असेलच. ;) काय लोकहो. बरोबर ना???????? :)