एक हे विश्व, शून्य हे विश्व
विश्व आहे कांद्यासारखे. त्याचा अर्थ आणि गाभा शोधता-शोधता मोठेच आश्चर्य होते.
शून्य
कांद्याचा बाहेरचा पदर काढला, की काय होते? पदर होतो वेगळा - तो कांदा नाही. असला काय आणि नसला काय. राहातो तो गड्डा म्हणजे कांदा. कांदा ही कल्पना पदराशिवाय शिल्लक राहाते. "कांदा" हा शब्द त्या कल्पनेसाठी उपयोगी राहातो. एक एक पदर काढता-काढता शेवटी असे होते - शेवटचा पदर बाजूला केल्यावर काहीच शिल्लक राहात नाही.
गाभा शोधायला गेले, तर कांदा असा नसतोच. म्हणजे "कांदा" कल्पनेसाठी आवश्यक काय? हाती येते शून्य. शून्य कल्पनेकरिता असलेला शब्दही शून्य. कांद्यासारखी कुठलीही गोष्ट घेतली, तरी असेच दिसते. "धनंजय"ची टोपी उतरवल्यावर राहातो तो "धनंजय". त्याचे केस कापल्यावर केस जातात केरात, राहातो तो "धनंजय". त्याचा श्वास आत-बाहेर होतो. बाहेर गेलेल्या श्वासाचा हिशोब खलास - मागे उरतो तो "धनंजय". अपघातात हात-पाय गमावले, तर हात-पायांचे सोडावेच. त्यांच्याविना राहातो तो "धनंजय". हार्ट ट्रान्स्प्लांट करा. मूळचे निकामी हृदय सोडून द्यायचे - राहातो तो "धनंजय". गाढ झोपेत बोलणे आणि विचार करणे ठप्प झाले. ते जाऊ द्या. ते नसतानाही तो "धनंजय". असे एक-एक अवयवाचे बघा. एका-एका विचाराचे बघा. हालचालीचे बघा. कुठलीच जरुरीची नाही. "धनंजय" कल्पनेचा गाभा शून्य आहे. "धनंजय" हे नाव शून्य कल्पनेसाठी आहे.
तर हे विश्व शून्य आहे.
एक
कोणी म्हणेल कांदा सोलायचा तर नाहीच. इतकेच काय, बोट दाखवून म्हटले - "हा घ्या कांदा", तर काहीच कल्पना येत नाही. खायचा कांद्याचा काय आणि निशिगंधाचा कांदा काय आणि फिरतीचा भोवरा काय. कांदा काय ते ज्ञान हवे? तो कुठे असतो, ते बघा. कसा असतो, ते बघा. कांद्याला मुळे असतात, आणि पाती असतात. त्या कळल्याशिवाय कांदा काय ते कळायचे नाही. कांद्याला स्वाद असतो नि रंग असतो. कांद्याचे पदार्थ लक्षात आले, तर मग कांदा कळेल. पण मुळे आणि पाती आणि पदार्थ समजायला हवेत ना? मुळे रुजतात भूमीत. पाती फोफायतात हवेत. शोषतात सूर्याचे तेज. म्हणजे कांदा नीट समजायचा, तर सूर्यमंडळ कवेत हवे. कांद्याचे रायते, कांद्याची फोडणी, व्हिनीगरचे कांदे... समजता समजता सगळे समाजशास्त्र कळायला हवे. कांदा खरोखरचा कळणे म्हणजे अवघे विश्व खरोखरचे कळणे. मग त्या विश्वाचे तुकडे-तुकडे केलेले ते खरे ज्ञान नाहीच. उगाच "कांदा" नाव तरी का द्या? तसेच "धनंजय" समजण्यासाठी सगळे विश्व समजणे भाग आहे.
तर सगळे विश्वच एक आहे.
दोन्ही कसे खरे?
आणि इतक्या संत-महंतांनी "शून्य" किंवा "एक" विचार आपल्याला सांगितला आहे. सांगता-सांगता आपल्याला पटला आहे. तर आपण आयुष्यात "शून्य" किंवा "एक" आचरणात का बरे आणत नाही? थोरामोठ्यांनी, आईवडलांनी समजावून सांगितलेल्या कितीतरी गोष्टी आहेत. पटत नाहीत तरी आपण तसे वागतो. आणि "शून्य" आणि "एक" हे विचार तर पटतात!
दोन्ही विचारधारांमधली पहिली-पहिली पायरी तितकी अनुभवाने उपयोगाची असते. कधीकधी वस्तू उपयोगात आणण्यासाठी तिचे थोडेसे नकोसे भाग छाटायचे असतात. कधीकधी वस्तू उपयोगात आणण्यासाठी तिचे आजूबाजूचे भागही सामील करून घ्यायचे असतात. न्हाव्याच्या दुकानात माझे वाढून त्रासदायक झालेले केस छाटायचे असतात. केसांबरोबर कान छाटायचे नसतात. सणावारात माझ्याबरोबर कुटुंबालाही छानछान खायला मिळाले तरच मला आनंद मिळतो. पण जगाभराच्या तोंडात गोड पडण्याची वाट बघत नाही.
महत्त्वाचे काय?
कल्पना एकदा छाटून किंवा एकदा जोडून अधिक अर्थपूर्ण झाली, समजा. तर आणखी-आणखी छाटून किंवा जोडून फायदाच होईल का? खात्री नाही. जितपत कातरून-वधारून उपयोगी, तितपत कल्पना बदलावी. त्या उपयोगी कल्पनेला शब्द जोडावा.
बौद्धांच्या शून्यवादापासून वेदांत्यांच्या अद्वैत(एक)वादापर्यंत कितीतरी जणांनी "सोला" किंवा "जोडा" वादांना टोकापर्यंत नेले आहे. परंतु मग काय? आपले मत आपल्या वागण्यात लागू करून दाखवावे लागते. आणि वागणे असेच होते : अनेक व्यक्ती आहेत, अनेक वस्तू आहेत. त्यासाठी सोय करावी लागते. म्हणजे स्वतः सिद्ध केलेल्या सिद्धांताशी तडजोड करावी लागते.
उगाच तो तडजोडीचा व्याप. खरे तर व्यवहारासाठी "विश्व शून्य" किंवा "विश्व एक" असे टोकाशी न जाता उपदेश करता येतो. कपडे-धन-... वगैरे "मी"पासून सोला. किंवा आप्त-राष्ट्र-मानवता... वगैरे "मी"मध्ये जोडा. हे उपदेश व्यवहारात आणता येतात. आणि "विश्व शून्य" विरुद्ध "विश्व एक" या चक्रावणार्या वादामध्ये उगाच गुंततही नाही.
अगदी अंतिम सत्य काय आहे? काही दशके सबुरीने वाट बघितली, तर "धनंजय" शून्य होईल किंवा विश्वाशी एक होईल. "शून्य" खरे की "एक" खरे? सध्या त्याचा काही फरक पडत नाही. आणि मग तर सत्यच असेल, प्रश्नच पडणार नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अन्यत्र प्रकाशनाचा दुवा
लेखन आवडले. कल्पना एकदा छाटून
हे सगूण निर्गूण, यीन यांग,
नवीन नाही. पण यीन-यांगशी संबंधित नाही
लोक टोकाचे वाद जितक्या
अनुभव कळणे चांगलेच
छान लेखन!
कल्पना एकदा छाटून किंवा एकदा
ह्म्म... चांगली चर्चा चालु
अगदी पटले.. यावरुन पुलंचे
सगळा संख्यांचा खेळ
ये लगा सिक्स्सर्र !
काय गोंधळ आहे समजलं नाही पण
तत्वज्ञांचं आणि माझं कधीच सूत
जग केवळ बायनरी नाही - काँप्लेक्स आहे.