घूंघटके पट खोल
संत कबीर यांच्या काव्याचा परिचय करून देतांना पहिली अडचण ही येते की सुरुवात कोठून करावी हेच कळत नाही. भजन की दोहे ? सकाळी रेडिओवर एखाददुसरे भजन ऐकावयास मिळते, रात्री कुमारांच्या निर्गुण भजनांची कॅसेट आठवड्यातून दोन-तीनदा तरी लागतेच.पण वाचावयाचे म्हटले की समोर येते दोहे-साकी यांचे पुस्तकच. कुठलेही पान उघडा, दोन ओळीत एखादा सुंदर विचार मन लुभावून टाकतो. आणि मुख्य म्हणजे या दोन ओळीत पाठभेदाची कटकट फार त्रास देत नाही. भजनांचे तसे नाही. रुचकर बिर्याणी खातांना कचकन खडा लागावा तसा हा पाठभेद सर्व मूड घालवून टाकतो. आता आज आपण बघणार आहोत त्या भजनाच्या ध्वनिमुद्रिका ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येकात शब्द निरनिराळे आहेत, काहीत तर ओळीच बदलल्या आहेत ! ते असो. प्रथम भजन बघू.
घूंघटका पट खोल रे तोरे पिया मिलेंगे !
घट घट में वह साइ रमता, कटुक वचन मत बोल रे !
धन जोबनका गरब न किजै, झूटा पंचरंग चोल रे !
सुन्न महलमे दिया जला दे, आसनसे मत डोल रे !
जोग जुगुतसे रंगमहलमे, पिय पायो अनमोल रे !
कहे कबीर आनंद भयो है, बाजत अनहद ढोल रे !
(साइ... ईश्वर, कटुक...कडू, टोचणारे, जोबन .. यौवन, पंचरंग ... अनेक रंगी, इथे निरनिराळे आविष्कार दाखवणारा देह, चोलना ...सोडून देणे, सुन्न... निश्चेष्ट, ओसाड, आसनसे डोलना ... मन चंचल होणे, एकाग्रता न होणे, अनहद ... अनाहत (नाद), आघात न केलेला)
कबीर सुरवात करतांना म्हणतो प्रियकर-प्रियतमा यांच्यात जर पडदा-आडपडदा असेल तर मनोमीलन कसे होणार ? चुकूनही बोलतांना काही कडवट वाक्य निघून गेले तर एकमेकांचे प्रेम कमी होईल, रमणीयतेला बाध येईल. पती आपल्या धनाचा व पत्नी आपल्या यौवनाचा गर्व करत राहिली तर घडी विस्कटून जाईल, ही वरवरची आवरणे सोडून दिली पाहिजेत. रंगमहालात युक्तीने, प्रेमाने वागले तरच अनमोल प्रीत मिळणार आहे. असे सुस्वर, मनोरंजक सूर जुळले तरच खरा आनंद मिळणार आहे.
मागे कबीरबेटी कमालीच्या "सैया निकस गये " मध्ये आपण पाहिले तसे हे ही एक रुपकच आहे. जीवात्मा-परमात्मा यांच्या संबंधांवर बेतलेले. जीवात्मा हा जर परमात्म्याचाच अंश असेल तर त्याला आपल्या स्वरूपाची ओळख पटली पाहिजे. का होत नाही तसे ? याचे कारण असे दिले आहे की जीवात्म्यावर मायेचे, अविद्येचे एक पटल, आवरण असते. हे जो वर दूर होत नाही तो वर जीवात्म्याला आपली खरी ओळख होत नाही व तो परमात्म्याला भेटू शकत नाही. कबीर म्हणतो हा "घूंघटका पट" पहिल्यांदी दूर कर.
दुसर्या ओळीत तो सांगत आहे की बाबा रे, तुझ्या शरीरात परमात्मा आहे तसा तो दुसर्याच्या शरीरात आहेच की. मग तू दुसर्याला बोचेल असे कसे बोलू शकतोस ? तेथेही परमात्मा रमलेला आहेच ना ? नाही, तुला दुसर्याला टोचून कडवटपणे बोलण्याचा अधिकार नाही.
ज्ञानेश्वर माऊलीही "अहिंसे"वर टीका करतांना हेच सांगतात. कडवट बोलणे त्यांच्या मते "हिंसा"च आहे.
सर्व संत सांगतात त्याप्रमाणे कबीरही सांगतो की ही संपत्ती, हे यौवन मेघाच्या सावलीप्रमाणे अशाश्वत आहे; त्याचा गर्व धरू नकोस. हा पंचमहाभूतांपासून बनलेला देह खोटा आहे, भ्रांती आहे, सोडून दे हे सर्व.
हे विश्व मायेच्या अंध:काराने भरलेले आहे, ते चैतन्ययुक्त नाही. त्यात ज्ञानाचा दीप लावलास तरच तरणोपाय आहे. हे चंचल मन तुला विषयांच्या खाईत ढकलावयाला टपलेले आहे. त्याला पहिल्यादी आवर.
गड्या, हा विश्वाचा रंगमंच तसा पार करावयास अवघडच आहे. इथे धसमुसळेपणाने वागून चालणार नाही. युक्तीयुक्तीनेच काम घेतलेस तरच या नाटकाचा नायक मिळाला तर मिळेल. मनोनिग्रह करून, संतजनांच्या पायाशी बसून, त्यांची सेवा करून, संयमाने वाग ; जमले तर जमेल !
कबीर म्हणतो हा ब्रह्मानंद मला मिळाला आहे. मला अनाहताचा ढोल ऐकू येत आहे. सर्वसाधारणपणे नाद निर्माण होण्याकरिता दोन गोष्टींचा एकमेकावर आघात व्हावा लागतो. पण जेंव्हा तुम्ही समाधीस्थितीच्या जवळ पोचता तेव्हा तुम्हाला शरीराच्या आंतून,हृदयातून, ध्वनी ऐकावयास येतात. इथे कोणत्याही गोष्टीचा कशावरही आघात होत नसल्याने त्याला "अनाहत नाद " म्हणतात. समाधी जवळ आली असल्याची ही एक खूण. सत्, चित् आणि आनंद् ही ब्रह्माची तीन लक्षणे. हा "आनंद " तुम्हाला लाभला महणजे तुम्ही आता "पोचणारच "!
हे एक लोकप्रिय भजन आहे. ज्युथिका रे, गीता दत्त,( चित्रपट : जोगन, १९५०) हरिशरण सहाय व इतरांच्या ध्वनिमुद्रिका ऐकावयस मिळतात. पहिल्या दोघींची भजने तर करूण रसाने चिंब भिजलेली आहेत. अतिशय गोड. पण करूण रस का व शेवटची ओळ का गाळली हे मात्र उमगत नाही. गंमत म्हणजे शेवटची ओळ गाळल्याने चक्क मीराबाईचे भजन असेही म्हटले आहे !
शरद
याद्या
3355
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा! संत कबीरांची निर्गुणी
मस्त.... आवडले...
छान निरुपण
निरुपण आवडले.
वा
रसग्रहण आवडले
हे वाचुन खालील भजन आठवले,
मदनबाण यान्चा प्रश्न
In reply to हे वाचुन खालील भजन आठवले, by मदनबाण
धन्यवाद ! :)
In reply to मदनबाण यान्चा प्रश्न by रमेश आठवले
गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊँ जी। दूजे के संग नहीं जाऊँ जी
आवडले