कोण तू ?
आठ वर्षांचा पोरगेला शंकर गेले दोन दिवस गुहेसमोर हात जोडून बसला होता. आंणखी किती वेळ प्रतीक्षेत जाणार हेही त्याला माहीत नव्हते.पण ज्याकरिता आपण घर सोडून इतके दूर आलो ते आपले आराध्य समोरच्या गुहेच्या तमांत आहेत व तेच आपणाला प्रकाशाची वाट दाखवणार आहे याची त्याला खात्री होती. त्याला आपल्या खेडेगावातील बालपणाची आठवण झाली. त्या खेड्यात त्याचे बालपण खेळापेक्षा शिक्षणातच गेले म्हणावयास हरकत नव्हती. पाच वर्षांचा होण्याआधीच वडील निर्वतले. आईने धीराने त्याची मुंज करून गावातील गुरूजींकडे ज्ञानोपासनेकरता पाठवले. त्यांच्याकडील सर्व विद्या त्याने तीन वर्षांतच ग्रहण केली व तो स्वत:च इतर विद्यार्थांना शिकवत असे. पण त्याने त्याचे समाधान होत नव्हते. त्याला आत्मोन्नती करता सन्यास घेऊन ज्येष्ट गुरूंकडे पुढील ज्ञान प्राप्त करून घ्यावयाचे होते. त्याला त्याच्या गुरूने पातंजल योगशास्त्र शिकवतांना सांगितले होते की नर्मदेच्या काठी गोविंदभगवत्पाद नावाचा महान योगी रहातो व लोक त्याला भगवान पतंजलीचा अवतार मानतात. या "शास्त्रेच परेच" श्रेष्ट गुरूचा शिष्य होण्याचे त्याने मनोमन ठरवले होते. पण नवरा वारलेला व एकुलता एक मुलगा सन्यास मागतो म्हटल्यावर आईने साफ नकार दिला. मातृभक्त शंकरला आईच्या परवांगीशिवाय घराबाहेर पडावयाचे नव्हते. काही दिवसांनी शंकर आणि आई नदीवर अंघोळीला गेले असतांना शंकराचा पाय एका मगरीने पकडला. आता सुटका नाही म्हटल्यावर शंकर आईला म्हणाला, " आता मी एवीतेवी मरणारच तर मला संन्यास घेण्याची परवांगी दे. मी मनाने संन्यास घेईन व माझा मरणोत्तर मार्ग सुलभ होईल." आई कष्टाने म्हणाली, " घे बाबा संन्यास". एव्हड्यात काही कोळी धावून आले. त्यांनी ढोसूनढोसून मगरीला हाकलून लावले. पायाला जखम झाली पण शंकर जीवानिशी सुटला. घरी आल्यावर "तुझ्या मृत्युसमयी मांडी द्यावयाला मी नक्की येईन " असे वचन मातेला देऊन बाळ शंकर केरळहून जंगले, दर्याडोंगर, नद्या ओलांडत नर्मदेच्या काठी पोचला. गावातल्या लोकांनी त्याला गोविंदपाद जेथे रहात त्या गुंफेचा पत्ता सांगितला. शंकर तेथे पोचला. गोविंदस्वामी काही दिवसांची अखंड समाधी घेत असत व अशा वेळी त्यांचे शिष्य तेथे थांबत नसत. अशाच वेळी शंकर तेथे पोचला. आता वाट पहाणे एवढेच त्याच्या हातात होते.
काही वेळाने स्वामींची समाधी उतरली. गुहेबाहेर कोणीतरी बसले आहे असे पाहून त्यांनी विचारले " कस्त्वं "? कोण तू? आनंदाने भारलेला शंकर उत्तर देणार तोच तो चमकून थबकला. आपण तर अज्ञान बालक ! आणि आपण आपली ओळख "शंकर", तो योग्यांचा योगी शंकर, त्याचे नाव घेऊन द्यावयाची ? हा मोठा उद्धटपणा नव्हे काय ? आणि स्वामींनी आपले नाव थोडेच विचारले आहे ? त्यांनी विचारले "तू कोण ?" क्षणभर थांबून, त्याने नम्रतेने पण आत्मविश्वासाने उत्तर दिले
मनोबुध्द्ह्ङ्कारचित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वै न च घ्राणनेत्र !
न च व्योमभूमिर्न तेजो न् वायु-
श्चिदानन्दरूप: शिवोsहं शिवोsहम् !! १ !!
न च प्राणसंज्ञो न च वै पञ्चवायु-
र्न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश: !
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु-
श्चिदानन्दरूप: शिवोsहं शिवोsहम् !! २ !!
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभाव् !
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष-
श्चिदानन्दरूप: शिवोsहं शिवोsहम् !! ३ !!
न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खं
न मन्त्रो न तीर्थो न वेदो न यज्ञा : !
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानन्दरूप: शिवोsहं शिवोsहम् !! ४ !!
न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद:
पिता नैव मे नैव माता न जन्म !
न बन्धुर्न मित्रं गुरूर्नैव शिष्य-
श्चिदानन्दरूप: शिवोsहं शिवोsहम् !!५ !!
अहं निर्विकल्पो निराकाररुपो
विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् !
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेय-
श्चिदानन्दरूप: शिवोsहं शिवोsहम् !!६ !!
{व्योम्..आकाश्; चिदानन्द.. सत्,चित् आणि आनन्द ही ब्रह्माची तीन लक्षणे सांगितली आहेत. पंचवायु .. प्राण,व्यान, उदान, समान व् अपान हे शरीरस्थ पाच् वायु; सप्तधातु .. रस, रक्त, मांस, मेद, अस्ति, मज्जा, शुक्र हे सात धातु;अन्नमय,प्राणमय,मनोमय,विज्ञानमय आणिआनंदमय या पाच कोशांनी (आवरणांनी) आत्म्याला फ़ीवरूप प्राप्त होते. उपस्थ .. जननेंद्रिय, पायु ..गूदद्वार ; द्वेष,राग, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडरिपू; धर्म,अर्थ, काम, मोक्ष.. चार पुरुषार्थ; भोजन-भोज्य-भोक्ता ही त्रिपुटी दुसरे उदा. दर्शन-दृष्य-द्रष्टा.; विभुत्व.. मालकी,अधिकार , आसंग.. संबंध, आसक्ती, मेय.. मोजण्यासारखे }
शंकर आपण कोण ते सरळ सांगत नाही. त्याने उपनिषदांची नेति नेति हीच पद्धत उचलेली दिसते. ब्रह्म, आत्मा अशा संकल्पनांबद्दल बोलतांना हे सोपे जात असावे. चवथ्या ओळीतील ठाम विधानाचा विचार आपण पाचव्या कडव्याबरोबर घेऊ. आपण कोण नाही हे सांगतांना त्याने प्रथम मन बुद्धी व अहंकार व चित्त यांना नाकारले. हे चार कोठून आले ? त्याकरिता सांख्यांची तत्वगणना पहावयास् पाहिजे. ही तत्वे अशी :
(१) पुरुष, (२) प्रकृती, (३) महत, (४) अहंकार, (५)मन, (६,७,८,९,१०) पृथ्वी, आप, तेच, वायू व आकाश ही पंचमहाभुते, (११,१२,१३,१४,१५) शब्द,स्पर्श,रूप,रस व गंध ही पाच तन्मात्रे, (१६,१७,१८,१९,२०)नेत्र, श्रोत्र,घ्राण,रसना व त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये, (२१,२२,२३,२४,२५) मुख, हात, पाय, गूदद्वार व जननेंद्रिय ही पाच कर्मेंद्रिये (योगसूत्राप्रमाणे ईश्वर हे सव्विसावे तत्व)
सांख्य व अद्वैत यांचे काही जुळत नाही. तेव्हा मन, अहंकार, कर्म-ज्ञानेंद्रिये, पंचमहाभुते इत्यादि तत्वे पहिल्यांदि नाकारली. क्षर शरीराला कारणीभूत असलेले पंचवायु, सप्तधातु इत्यादि म्हणजे मी नव्हे हेही सांगितले. त्या नंतर षडरिपू,पुरुषार्थ, पाप-पुण्य, सुखदुख:, तीर्थ, मंत्र, वेद व यज्ञ यांना निकालात काढले. त्रिपुटीची सुट्टी केली, जन्म-मृत्यु नाकारत असतांनाच कौटुंबिक-सामाजिक नातीगोती हीही सोडली. मग "मी कोण " याचे उत्तर दिले " निर्विकल्प, निराकार, अमेय, सर्व विश्वाचा विभाता, चिदानंदरूपी शिवाचा मी अंश आहे. "
शरद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शरदकाका, ही घ्या तुम्हाला एक
प्रत्येक कडव्यावर अजून लिहिता
शिवोsहं शिवोsहम्
लहानपणीच्या आठवणी जागृत
निर्वाण षटक
कथा माहिती नव्हती.
धन्यवाद !
धन्यवाद
शंका
न मे द्वेषरागौ न मे
वाह वा!
छानच. लेख आवडला.
आत्मषटकं
भाषेबद्दल
+१
कोण तु?
काव्य
माझ्या मुलीच्या वेळी मला
शरदराव
"भारत एक खोज" चालु होताना जी
डॉ. श्री. द. देशमुख यांच्या प्रवचन/पुस्तकातून
येऊ द्या.
लेख आवडला