Skip to main content

गोष्ट जन्मांतरीची

लेखक विकास यांनी मंगळवार, 18/09/2007 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव या उपक्रमावर, जो काही चालू केल्या केल्या ऐन गणपतीत काही जणांनी शिमगा केला, तो वाचताना जे वाटले, त्याबद्दलचे हे मनोगत! :) आंतर्जालावर मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव या तीन मराठी संकेतस्थळांशी माझा संबंध त्याच क्रमात आला. यातील आंतर्जाल कालचक्राच्या संदर्भात मनोगत प्रौढावस्थेत, उपक्रम पौंगाडावस्थेत आहेत तर मिसळपाव "तान्हेच" म्हणायला हवे. आता तान्ह्याबद्दल त्याला शिंग फुटे पर्यंत बोलणे अयोग्य वाटते. पण मनोगत आणि उपक्रम या दोन्हीमधे व्यक्तीस्वभावाप्रमाणेच चांगल्या-वाईट गोष्टी आढळतील. त्यात प्रत्येकाचा हवा असलेला आणि नसलेला लोकसंपर्क घडणे पण साहजीकच आहे. वास्तवीक ही तीन संकेत स्थळे आणि अनेक इतर (मला माहीत नसलेली) जी अनेकांच्या सहकार्याने चालत आहेत, मोठी होत आहेत ते वास्तवीक पहाता, देशविदेशातील समस्त मराठी समाजाला अभिमानाची गोष्ट आहे, असायला हवी. त्यात जर का स्पर्धा चालू झाली तरी काही चूक नाही , उलटी हवीच, जो पर्यंत त्याचे रुपांतर व्यक्तिगत अहंकारात होत नाही. म्हणुन विचारावेसे वाटते की त्याचा व्यक्तिगत "इगो इशू" करत "घालीन डवी टांग पाडीन उताणा, असाच आमुचा मराठी बाणा" या पद्धतीने वागणे योग्य आहे का? मराठ्यांचा (--हा जातीवाचक शब्द नाही) इतिहास किती जुना आहे ते लक्षात घेतले आणि त्यातील प्रत्येक वेळेस मराठी सत्तेचा/प्रभावाचा उदयास्त लक्षात घेतल्यास इतकेच समजते की पुन्हा पुन्हा आपण एकमेकांचे पाय ओढ्ल्यामुळे सर्वच पडलो आणि परीणाम हा समस्त समाजाला भोगावा लागला. हे बोलताना मला गोष्ट जन्मांतरीची हे शिर्षक द्यावेसे वाटले कारण त्या नावाचे मधुकर तोरडमल यांचे नाटक, आपल्यास माहीत नसल्यास असेच इतिहासाची पुनरावृत्ती दाखवते. एकेकाळचा राजा आजचा बिझिनेसमन होतो, राजवाडा मोठे हॉटेल होते, राजदासी नर्स तर राणी अजून कोणीतरी इत्यादी... पण या पात्रांचे स्वभाव आणि प्रतिक्रीया देण्याची पद्धत मात्र बदलत नाही. परीणामी काळ बदलला तरी प्रतिक्रीया त्याच आणि त्यांचे होणारे दुर्दैवी परीणामही तेच... आज आपण एका वेगळ्या अर्थाने हेच नाटक तर जगत नाही ना असे वाटू लागले. त्यासाठी केवळ "शहाण्यासारखे" वागण्याची सर्व जबाबदारी तात्यांवर आणि मिसळपाव वर टाकणे हा अन्याय होईल. म्हणून वाटते की, जेथे जेथे गुंडोपंतांच्या भाषेत, आपण पिंक टाकत असू , तेथे आपल्या प्रतिक्रीया आणि क्रीया, या आंतर्जालावरील मराठी वृद्धींगत होण्याच्या मधेतर येणार नाहीत ना याची काळजी आपण सर्वांनीच घ्यावी. म्हणून काही गोष्टी लिहाव्याशा वाटतातः
  1. आयोजकांनी एकमेकांविरुद्ध "नो फर्स्ट यूज" (टिका/ व्यक्तिगत होणे) असा अलिखीत करार करावा.
  2. सदस्यांनी एकमेकांची थट्टा मस्करी जरूर करावी, पण मस्करीची कुस्करी होणार नाही ना याची एक समंजस सदस्य म्हणून काळजी घ्यावी
  3. आपण सर्वच वयाने आणि (होपफुली बहुतेक सर्वच) डोक्याने प्रौढ झालो आहोत. त्याबरोबर विचार, आचार आणि आदर्शांचे कॉक्रीटीकरणपण झालेले आहे. परीणामी विरुद्ध विचारांशी न पटणे, वाद होणे हे होणारच पण ते किती करावे. तेंव्हा "ऍग्री टू डिसऍग्री" हे समजून वागले पाहीजे असे वाटते.
असो. सुरवातीस म्हणल्याप्रमाणे मिसळपाव चालू झाल्या झाल्या जे काही वाद एका "काथ्याकूट" मधे पहायला मिळाले ते वाचल्यावर जे काही वाटले ते लिहीत आहे...

वाचने 18819
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया