✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अलविदा मिसळपाव!

स
सुधीर काळे यांनी
Tue, 10/18/2011 - 14:18  ·  लेख
लेख
अलविदा, मिसळपाव! या शेवटच्या लेखासह मी तात्पुरता 'मिपा'वरून एक "सहभागी लेखक" म्हणून नाहींसा होत आहे. या संस्थळावर मी आलो तो तात्यांच्या आग्रहावरून. आल्यापासूनच मला कधीच comfortable (याला मराठी प्रतिशब्द सुचत नाहींय्) वाटले नाहीं. कदाचित् हा माझ्या वयाचा परिणाम असेल. कदाचित् श्री सामंत याच कारणाने बाहेर पडले असतील. पण मला आता इथे बरे वाटत नाहीं म्हणून मी रजा घेत आहे. मला इथे अनेक नवीन "पुतणे-पुतण्या" मिळाल्या. कांहींची तर खूपच गट्टी झाली. एक सभासद तर (खराखुरा) भाचा निघाला. या सर्वांची आठवण येऊन कांहींसे औदासिन्य वाटेलच. पण त्याला इलाज नाहीं. जसे जायला कुठलेही ठाम (एकादी घटना वगैरे) कारण नाहीं तसेच कधी परत आलोच तर त्यालाही कांहीं 'ठाम' कारण लागेलच असे नाहीं. थोडक्यात हा "संगीत मानापमाना"चा प्रयोग नाहीं. ज्यांना माझ्याशी संपर्क साधायचा असेल त्यांनी माझ्या ई-मेलवर जरूर संपर्क ठेवावा. या खेरीज मूड आलाच तर काश्मीरवरील फरूक अब्दुल्ला यांच्या "बहु बायकात बडबडला"ची खबर घ्यायला एकदा येईन. त्याला कदाचित् अजून दोन-तीन आठवडे हवेत. कारण ते चिन्यांना "उन्हाळा सुरू झाल्यावर दम मारणार होते". उन्हाळा संपायला अद्याप एक महिना बाकी आहे. म्हणून थांबलो आहे. असो. आता शेवटच्या लेखाकडे वळतो.
========================================
अलविदा जगजीतसिंग! जगजीत सिंग यांच्या गायनाबद्दलच्या माझ्या आठवणी पोलाद बनविण्यासारख्या नीरस कामात सारी व्यावसायिक हयात 'घालवलेला' इसम या नात्याने माझे कला क्षेत्राशी नाते तसे 'चुलत'सुद्धा नाहीं. संगीताच्या/काव्याच्या जगात मी एक नाचीज माणूसच. माझे संगीताशी नाते आहे ते केवळ एक हौशी श्रोता म्हणूनच. पण मी जगजीत सिंग यांच्याच्या गायनाचा एक प्रचंड चहाता आहे. त्यांचे गायन मी जवळ-जवळ १९७५-१९८० सालापासून सातत्याने ऐकत आलेलो आहे. मी त्यावेळी मुकुंद या पोलाद बनविणार्‍या प्रख्यात कंपनीत 'Kalwe Steel Plant Division'चा प्रमुख म्हणून काम करत होतो व आम्ही कंपनीच्या कळव्यातील कॉलनीत रहात असू. बाहेर जाणे फारसं व्हायचं नाहीं, गेलो तरी आठवड्यातून एकादे वेळी. त्यामुळे बर्‍याचदा घरी आलो कीं "दूरदर्शन-एक्के-दूरदर्शन" हाच पाढा असायचा आणि जे दाखविले जाईल ते आम्ही (मुकाट्याने) पहायचो. मला त्या काळात हिंदी सिनेसंगीत ऐकायची खूप आवड होती व माझी आवडती हिंदी गाणी टेप-प्लेयरवर ऐकणे हाही एक विरंगुळा असायचा. मी जगजीत सिंग यांचे गायन सर्वप्रथम ऐकले ते दूरदर्शनच्या वाहिनीवरच. त्यावेळी ते नव्यानेच प्रसिद्धीस येऊ लागले होते. गझल हा काव्य (आणि गान)प्रकारही आजच्याइतका लोकप्रिय झाला नव्हता. उर्दू भाषा समजायची नाहीं. म्हणजे उर्दूतील बहुतांश क्रियापदांचे हिंदी क्रियापदांशी (व म्हणूनच संस्कृत क्रियापदांशी) बरेच साम्य असल्यामुळे गझल ऐकताना असे वाटायचे कीं आपल्याला अर्थ कळतोय् बरं कां, पण लक्ष देऊन ऐकल्यावर समजून यायचे कीं तो फक्त एक भासच होता. शिवाय सिनेसंगीताच्या मानाने गझलांच्या चालीत फारसे वैविध्यही नसायचे. शेवटी अर्थही कळत नाहीं व संगीतही कांहींसे गंभीर धाटणीचे आणि चालींमध्ये फारसे वैविध्य नसलेले इत्यादी कारणांमुळे मी उर्दू गझलांपासून (आणि जगजीत सिंग यांच्या गायनापासून) तसा दूरच राहिलो. पुढे मुकुंदमधील एका मुस्लिम सहकार्‍याला न समजलेल्या उर्दू शब्दांचा अर्थ विचारायचा सपाटा लावला. खरा अर्थ कळल्यावर "युरेका-युरेका"ची नशा यायची. पण असे किती दिवस चालणार? मग मी देवनागरीतील शब्दकोषाचा शोध सुरू केला. शब्दकोष खूप पाहिले पण त्यातले उर्दू शब्द उर्दू लिपीत असल्यामुळे त्या माझ्यासारख्याला उर्दू लिपी न येणार्‍याला उपयोगी नव्हत्या. शेवटी (मरहूम जरीना सानी) आणि डॉ. विनय वाईकर यांनी संकलित केलेल्या "आईना-ए-गझल" हा शब्दकोश हातात पडला आणि एकादे घबाड मिळावे तसा आनंद झाला[१]. त्यात शब्दांचे अर्थच आहेत असे नाहीं तर त्या शब्दाचा उपयोग कसा करतात हे वाचकाला कळावे म्हणून जवळ-जवळ १०,००० अत्यंत सुंदर, अर्थपूर्ण शेरही दिलेले आहेत. हा शब्दकोष घेतल्यावर मात्र गझलांचा अर्थ कळू लागला आणि गझला ऐकायची गोडी वाढू लागली आणि मग मात्र मी जगजीत सिंग यांच्या गायनाच्या पार प्रेमात पडलो व त्यांचे गायन जास्त-जास्त आवडू लागले. त्यांच्या आवाजातला "दर्द" मला फार भावायचा. अर्थ कळायला लागल्यापासून त्यांच्या आवाजातली मिठ्ठास, आवाजातला दर्द, आधुनिक वाद्यवृंदाचा वापर (पूर्वी गझल गायकांच्या साथीला केवळ ’तबला-पेटी’च असायची, पण जगजीत सिंग आपल्या साथीला भारतीय आणि पाश्चात्य वाद्येही वापरायचे) या त्यांच्या गायकीतील सर्व बाबींपेक्षा मी त्यांच्या गझलांच्या "निवडी"च्या सर्वात जास्त प्रेमात पडलो. जगजीतसिंग यांच्या आवाजातला ’दर्द’ खूप आवडतो तर त्यांच्या पत्नी चित्रा सिंग यांच्या गायनाच्या बाबतीत त्यांचा आवाज व त्यांच्या गाण्यातला डौल, गाण्याची सहजता या बाबी मला खूप आवडतात. हळू-हळू जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांचे गायन ऐकण्याचा मला आणि सौ.ला छंदच लागला. अर्थ चांगला व चालीही कांहींशा सोप्या, मग आणखी काय हवे? आजही त्यांनी निवडलेल्या गझलांच्या अर्थानेच मी मंत्रमुग्ध होतो. आता जगजीत सिंग यांच्या मी ऐकलेल्यापैकी मला आवडणार्‍या गझलांकडे वळतो. (बर्‍याच मी ऐकलेल्या नाहींत.) बर्‍याचदा त्यांनी निवडलेल्या कांहींशा गंभीर गझलांमध्ये खट्याळ शेर यायचे व मजा वाटायची. ज्यांनी सईद राहींनी लिहिलेली त्यांची "कोई पास आया सवेरे सवेरे" ही गझल ऐकले आहे त्यांना तिच्या शेरात दोन्ही रस दिसतील. "कहता था कल शब संभलना-संभलना, वही लडखडाया सवेरे सवेरे" असा कवीच्या मित्राबद्दलचा हा खट्याळ शेर संपतोय्-न संपतोय् तोच.... "कटी रात सारी मेरी मयकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे" या ओळींचे गांभिर्य माझ्या हृदयाला स्पर्शून जाते. तसेच "बडी हसीन रात थी" या गझलेतील "मुझे पिला रहे थे वो कि खुदहि शम्मा बुझ गयी, गिलास गुम, शराब गुम, बडी हसीन रात थी" हा शेर आपल्याला प्रियकर-प्रेयसींच्या अंधारातील प्रेमचेष्टांचा मखमली स्पर्श जाणवून देतो तर त्यातलाच पुढचा शेर "लबसे लब जो मिल गये, लबसे लबही सिल गये, सवाल गुम, जवाब गुम, बडी हसीन रात थी" हा शेर ऐकल्यावर प्रश्नोत्तरे "बंद" व्हायचे कारण लक्षात येऊन चेहर्‍यावर नक्कीच हास्य उमटते. त्यांच्या "बाद मुद्दत उन्हे देखकर यूं लगा, जैसे बताब दिलको करार आ गया" या गझलेतील दुसर्‍या कडव्याचा अर्थ किती बहारदार आहे! दारूच्या प्याल्यात दारू ओतणार्‍या "साकी"ला "आज तेरी जरूरत नहीं" असे हा शायर कां बरे सांगत आहे? कारण 'बिन पिये बिन पिलाये' खुमार आलेला आहे! "तिश्न नजरें मिली, शोख नजरोंसे जब, मय बरसने लगी, जाम भरने लगे! साकिया आज तेरी जरूरत नहीं बिन पिये बिन पिलाये, खुमार आ गया! "कल चौदहवी की रात थी, शब-भर रहा चर्चा तेरा.." ही गझल गुलाम अली आणि जगजीत अशी दोघांनी आपापल्या चालीत गायलेली आहे, दोन्ही चाली चांगल्या आहेत पण मला तर जगजीत यांचीच चाल आवडते. तसेच दिलके दीवारों-दर पे क्या देखा" या गझलेत "तेरी आँखोंमें हम ने क्या देखा" असा प्रश्न करत ते "कभी कातिल कभी खुदा देखा" असे बहारदार उत्तर देतात, आणि शेवटी "फिर न आया खयाल जन्नत का, जब तेरे घर का रास्ता देखा" असेही प्रेयसीला सांगून मोकळे होतात! ही गझलही माझी खूप आवडती आहे. आणखी एक सुंदर गझल आहे "होठोंसे छूलो तुम" आणि त्यातले शेवटचे कडवे तर लाजवाब आहे: "जगने छीना मुझसे, मुझे जो भी लगा प्यारा, सब जीता करे मुझसे, मैं हरदम ही हारा, तू हारके दिल अपना, मेरी जीत अमर कर दो" असे आपल्या प्रेयसीला सांगत हा प्रियकर तिच्या प्रेमाची परिणामकारकपणे पण कारुण्यपूर्ण याचना करतो आहे. त्याकाळी अदलीब शादानी यांची "देर लगी आनेमें तुमको, शुकर है फिरभी आये तो" ही गझलही माझी आवडती गझल होती. त्यातला हा शेर किती अर्थपूर्ण आहे: शफक धनुक महताब घटायें तारे नगमें बिजली फूल उस दामनमें क्या क्या कुछ है, वो दामन हाथमें आये तो...! वा क्या बात है!! त्यांनी संगीत दिलेल्या "अर्थ" या चित्रपटातील त्यांची "झुकी झु़की सी नजर..", "तुमको देखा तो ये खयाल आया" आणि "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो" ही तीन गीते मला खूपच आवडतात. मला त्यांची अतीशय खट्याळ असलेली (आणि म्हणूनच आवडती) गझल आहे अमीर मीनाई यांनी लिहिलेली "सरकती जाये है रुखसे नकाब आहिस्ता, आहिस्ता" ही! त्यात "आहिस्ता-आहिस्ता" हा "रदीफ" आहे. तरुण मंडळी अगदी आजही ही गझल तंद्रीत गातात. मला आवडते ते हे शेवटचे कडवे: शायर म्हणतो कीं माझी प्रेयसी माझी मान निर्दयपणे कापत असली तरी मी तिला प्रेमानेच म्हणतो की "बाई, काप पण जरा आहिस्ता-आहिस्ता"! वो बेदर्दीसे सर काटे "अमीर" और मैं कहूं उनसे हुजूर आहिस्ता-आहिस्ता, जनाब आहिस्ता-आहिस्ता" त्यांच्या मला सर्वात जास्त आवडणार्‍या दोन गझला आहेत (कीं नज्म? हे आपल्याला कधी कळलेही नाहीं व त्याची कधी गरजही वाटली नाहीं) "ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी लेलो..." ही पहिली आणि सरफरोशमधील "होशवालों को खबर क्या" ही दुसरी. त्यापैकी ’ये दौलत भी लेलो’मधील मक्ता (शेवटचा शेर) आहे माझा आवडता आहे: कभी रेतकी ऊंचे कीलोंपे जाना, घरोंदे बनाना बनाके मिटाना, वो मासूम चाहतकी तस्वीर अपनी, वो ख्वाबों-खिलौनोंकी जागीर अपनी, न दुनियाका गम था न रिश्तोंके बंधन, बडी खूबसूरत थी वो जिंदगानी" हा शेर प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यात पाणी आणते. "होशवालोंको" ही गझल तर जगजीतजींच्या डोक्यावरील मुकुटच आहे! त्यातलाही मक्ता फारच हृदयाला भिडतो "हम लबोंसे कह न पाये उनको हाल-ए-दिल कभी, और वो समझे नहीं है खामोशी क्या चीज है"! वाह वा क्या बात है! जगजीत सिंग यांच्या गायनाची गोडी लावण्यात व उर्दू भाषेशी परिचय करून देण्यात सिंहाचा वाटा होता डॉ. विनय वाईकर यांचा आणि त्यांच्या "आईना-ए-गझल" या शब्दकोषाचा. म्हणून जगजीत सिंग गेल्यावर मला त्यांची खूप आठवण झाली आणि मी त्यांना नागपूरला फोन करून तसे सांगितलेही. त्यावेळी त्यांच्या सौ.नी (मीनाताईंनी) जगजीत सिंग यांच्या "जिंदादिली"च्या दोन हृद्य आठवणी सांगितल्या त्या इथे सांगायलाच हव्यात. "आईना-ए-गझल"चे हस्तलिखित तयार झाल्यावर डॉक्टरसाहेब प्रकाशक शोधू लागले, पण त्यांनी संपादित केलेल्या या "रत्ना"ची त्यावेळी कुणाला पारखच झाली नसावी बहुदा. शेवटी त्यांनी हे पुस्तक स्वत:च प्रकाशित करायचे ठरविले. १९७८ साली त्याला ५०,००० रुपये खर्च येईल असा अंदाज होता व तेवढी रक्कम कशी उभी करायची असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला. कुणी तरी त्यांना सांगितले कीं तुम्ही जगजीत सिंग यांना भेटा, त्याप्रमाणे हे दांपत्य त्यांना प्रत्यक्ष भेटले. जगजीत-जींनी ते हस्तलिखित पाहिले आणि एक पैसाही मानधन न घेता एक पूर्ण कार्यक्रम त्यांना दिला व त्यातूनच "अमित प्रकाशन"ची स्थापना झाली व "आईना-ए-गझल" प्रकाशित झाले. सौ. मीनाताई दुसरी आठवण सांगत होत्या....! एकदा जगजीत सिंग छिंदवाडाला मेहफिल करून रात्री परत येत होते तेंव्हा वाटेत चहासाठी एका ठिकाणी थांबले. तिथे त्यांना एका ट्रक ड्रायव्हरने ओळखले. तो बिचकत-बिचकतच त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांच्या गायनाची मनापासून खूप तारीफ केली. एका आड जागी एकाद्या ट्रक ड्रायव्हरसारखा रसिक श्रोता भेटल्यामुळे सद्गदित झालेल्या जगजीत सिंग यांनी त्यांना छिंदवाड्याच्या कार्यक्रमात मिळालेली शाल त्या ट्रक ड्रायव्हरला पांघरली व त्याच्या हातात श्रीफळ ठेवले. माझी खात्री आहे कीं त्या ट्रक ड्रायव्हरने ती शाल आजही त्यांची आठवण म्हणून जपली असणार! अशा थोर गायकाला आणि जिंदादिल मनुष्याला भावपूर्वक आदरांजली! आज जगजीत सिंग यांच्या (आणि चित्राजींच्या) एका गाजलेल्या गझलेतील या ओळी ओठावर येतात..... मिलकर जुदा हुए तो, न सोया करेंगे हम इक दूसरेकी यादमें, रोया करेंगे हम..... आँसू छलक छलक के, सतायेंगे रात भर मोती पलक-पलकमें, पिरोया करेंगे हम..... जब दूरियोंकी याद, दिलोंको जलायेगी जिस्मोंको चाँदनीमें, भिगोया करेंगे हम..... गर दे गया दगा हमें, तूफानभी 'कतिल' साहिलपे कश्तियोंको, डुबोया करेंगे हम..... अलविदा, जगजीत सिंग! तुम्ही तुमच्या गझलांच्या रूपाने अमर आहात!! ------------------------------------------------ टिपा: [१] या शब्दकोशामुळेच मला मत्ला (गझलेचा पहिला शेर), मक्ता (गझलेचा शेवटचा शेर), रदीफ (गझलेच्या पहिल्या दोन्ही शेरात शेवटी येणारा आणि नंतरच्या शेरात दुसर्‍या ओळीत येणारा शब्दसमुदाय), काफिया वगैरे गोष्टी कळू लागल्या. गझलेतील कडव्यांना ’शेर’ म्हणतात हेही तिथेच कळले. कांहीं शब्दांचे अर्थ: (१) तिश्न-तहानलेली, प्यासी (२) शोख-खट्याळ, नटखट (३) मय-मद्य (४) जाम-मद्याचा प्याला (५) खुमार-नशा (६) शफक-अरुणिमा, संधिप्रकाश (७) धनुक: इंद्रधनुष्य (८) महताब-चंद्र (९) घटा-ढग (११) जिस्म-शरीर (१२) साहिल-किनारा (१३) कश्ती-नाव "गझल"चे अनेकवचन "गझलें" आहे (गझलियात हे अनेकवचनसुद्धा वापरतात). पण मी इथे त्याचे "गझला" असे मराठीकरण केले आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
गझल
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
11680 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

मी तात्पुरता 'मिपा'वरून एक

गवि
Tue, 10/18/2011 - 14:26 नवीन
मी तात्पुरता 'मिपा'वरून एक "सहभागी लेखक" म्हणून नाहींसा होत आहे. आल्यापासूनच मला कधीच comfortable (याला मराठी प्रतिशब्द सुचत नाहींय्) वाटले नाहीं. कदाचित् हा माझ्या वयाचा परिणाम असेल. मला इथे अनेक नवीन "पुतणे-पुतण्या" मिळाल्या. कांहींची तर खूपच गट्टी झाली. एक सभासद तर (खराखुरा) भाचा निघाला. या सर्वांची आठवण येऊन कांहींसे औदासिन्य वाटेलच. जसे जायला कुठलेही ठाम (एकादी घटना वगैरे) कारण नाहीं तसेच कधी परत आलोच तर त्यालाही कांहीं 'ठाम' कारण लागेलच असे नाहीं. मूड आलाच तर काश्मीरवरील फरूक अब्दुल्ला यांच्या "बहु बायकात बडबडला"ची खबर घ्यायला एकदा येईन. ....................... उपरिनिर्दिष्ट वाक्यांमधून तुम्हाला जावंसं वाटत नाही असंच जास्त वाटतंय. तर मग थांबाच की.. नकाच जाऊ.. :)
  • Log in or register to post comments

काय हे

रश्मि दाते
Tue, 10/18/2011 - 14:27 नवीन
आज खुप दिवसांनी मि पा वर आले,आपल्या धाग्यावर प्रतीसाद दिला आणि आता हा धागा दिसला,असे करु नका हो आपले लीखाण आवडते आम्हाला,
  • Log in or register to post comments

काळेकाका, यांना विणंती आहे की

वपाडाव
Tue, 10/18/2011 - 14:34 नवीन
काळेकाका, यांना विणंती आहे की मिपावरुन रजा घेउ नये.... मागे अवलियांनी रजा घेतली, काही दिवसांपुर्वी पंगा ब्यान झाले.... हे काही बरे वाटत नाही..... मिपावरील जाणत्या मंडळींनी exit घेतल्यास नवीन सदस्यांना प्रोत्साहन कसे येणार? आपल्यासारखी मंडळी ही मिसळपावचा ठेवा आहेत..... तरीही, ही तात्पुरती रजा लौकरात लौकर संपावी.... अन आपण पुन्हा येथे सक्रिय व्हावे हीच इ. प्रा......
  • Log in or register to post comments

काळेकाका मिपावर काही अनुभव

विजुभाऊ
Tue, 10/18/2011 - 14:45 नवीन
काळेकाका मिपावर काही अनुभव जरा वेगळेच येतात. ते तसे बर्‍याच जणाना येतात. वयाचे वगैरे म्हणाल तर तुम्ही सिनीयर आहात वगैरे असे आम्हाला कधी वाटलेच नाही. ( तुमच्याशी फोनवर बोलेपर्यन्त) एखाद्या गेटटुगेदर ला भेटला असतात तर तुम्हाला अजून वेगळेच लोक दिसले असते. तुम्ही इथे पाकिस्तान विषयक लिहीत होतात ती माहिती इथे नवीनच होती "जगने छीना मुझसे, मुझे जो भी लगा प्यारा, सब जीता करे मुझसे, मैं हरदम ही हारा, तू हारके दिल अपना, मेरी जीत अमर कर दो" या अनुभवातून प्रत्येकजण कधीना कधी गेलेला असतो. थोडा विचार केला तर हे शब्द फार वेगळे सांगून जातात. अर्थात हे श्रेय गीतकाराचे. जगजीत सिंगाच्या गाण्यातील महत्वाचा भाग म्हणजे त्यानी निवडलेल्या गजला सोप्या असायच्या. चाली गुणगुणता येतील अशा सोप्या असायच्या. त्या श्रोत्यांपर्यन्त पोहोचवण्याच्या त्यांच्या कौशल्याला मात्र कडक सॅल्युट.
  • Log in or register to post comments

विजूभौ, जगजीत सिंगांनी

पाषाणभेद
Tue, 10/18/2011 - 14:52 नवीन
विजूभौ, जगजीत सिंगांनी गायलेल्या गझला कुणी लिहीलेल्या होत्या? चारदोन नावे देता येतील का? माझा अभ्यास जरा कच्चा आहे, अन होमवर्क तर करतच नाही मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

फिराख गोरखपुरी , कतील शिफाई

विजुभाऊ
Tue, 10/18/2011 - 16:02 नवीन
फिराख गोरखपुरी , कतील शिफाई ,मिर्झा गालीब ,निदा फाजली सुदर्शन फकीर ,.बहादूर शहा जफर ही काही नावे. काही गजला मिश्र होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

ह्म्म्म... काळे काका, एक मिपा

मदनबाण
Tue, 10/18/2011 - 14:51 नवीन
ह्म्म्म... काळे काका, एक मिपा सदस्य म्हणुन मला तुम्हाला विनंती करायची आहे,की कॄपया असा निर्णय घेउ नका. फक्त तात्पुरती रजा घेण्यास हरकत नाही,पण परत याच... चांगले सदस्य असे जायला लागले तर आमचे कसे व्ह्यायचे ? तुमच्या अभ्यासाची,अनुभवाची गरज आम्हाला आहे... तुम्हाला इथे कोणता त्रास होत आहे का ? तसे असल्यास संपादकांना /नीलकांतला त्या बद्धल नक्की सांगा. संपादीत.
  • Log in or register to post comments

तात्पुरते जावे की कायमचे जावे

गणपा
Tue, 10/18/2011 - 15:04 नवीन
तात्पुरते जावे की कायमचे जावे आदी निर्णय हे ज्या त्या सदस्यांचे खाजगी निर्णय आहेत. त्यामगे त्यांची काही खाजगी कारणे असु शकतात. ती जाणुन घेण्याचा हक्क मला नाही. त्यामुळे मी एक सामान्य वाचक म्हणुन तुमचा जो काही निर्णय आहे त्याचा आदरच करतो. पण त्याच बरोबर वर आलेलेल्या बर्‍याच प्रतिसादावरुन इथे आपल्या लिखाणाचे बरेच चहाते आहेत याची ही नोंद घेतली जावी. आपल्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा. -गणपा
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

ऋषिकेश
Tue, 10/18/2011 - 15:11 नवीन
आपल्या राजकीय विचारांत मतभेद असले तरी त्यासंबंधी काथ्याकूट करताना वैयक्तिक टिपणी आपण कटाक्षाने टाळायचात ही आठवण - प्रतिमा- कायम स्मरणात राहिल :) असो. पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

नका!

दिगम्भा
Tue, 10/18/2011 - 15:19 नवीन
काळेजी, तुमचे लिखाण आवडते, असा निर्णय घेऊ नका, एवढे सांगण्यासाठीच लॉगिन केले आहे. लेखन करावे, आम्ही वाचनमात्र का होईना वाचणारे आहोत. - दिगम्भा
  • Log in or register to post comments

निर्णयाविषयी लेखनसीमा !

सुहास..
Wed, 10/19/2011 - 12:11 नवीन
निर्णयाविषयी लेखनसीमा, मात्र दंगा-मस्तीच्या नादात माझ्याकडुन एखादा शब्द उणा-दुणा गेला असल्यास क्षमस्व ! सुहास.. ------------------ क्काय ! आज तुम्ही राम-नामाचा जप करणार्‍या भगिनीची छेड नाही काढलीत, छ्या! राष्ट्रध्वजाच्या चड्ड्या घालणार्‍या माजोरड्या देशातुन, आंजावर विज्ञान-प्रचार कसा करणार मग तुम्ही !
  • Log in or register to post comments

आपले लिखाण नेहमीच आनंद देवून

अमोल केळकर
Tue, 10/18/2011 - 15:51 नवीन
आपले लिखाण नेहमीच आनंद देवून गेले :) मला माहित नाही तुम्हाला आठवते की नाही पण मी मुकंद कंपनीत काम करतो म्हणल्यावर तुम्ही एकदा आवर्जून फोन केला होतात आणि आपण बोललो होतो. त्यानंतर अनेक दिवस मी मुकंद मधे कॉलर टाईट करुन फिरत होतो की मी काळे साहेबांना ओळखतो. असो. बघू या प्रत्यक्षात आपणास भेटायच योग येतो की नाही अमोल केळकर
  • Log in or register to post comments

अनावश्यक आणि अनपेक्षीत

श्रावण मोडक
Tue, 10/18/2011 - 16:04 नवीन
सुधीर काळे यांच्याकडून अनपेक्षीत.
या संस्थळावर...आल्यापासूनच मला कधीच comfortable (याला मराठी प्रतिशब्द सुचत नाहींय्) वाटले नाहीं.
हे विधान कशासाठी? कंफर्टेबल वाटत नव्हतं तर तेव्हाच वावरणं बंद करायचं. ते न करता, तेव्हा धाग्यावर धागे काढले (जे इथले उद्दिष्ट्यच आहे), एक पुस्तकही इथं लिहिलंत. आणि आता, कम्फर्टेबल वाटत नाही, ही टिप्पणी?
कदाचित् हा माझ्या वयाचा परिणाम असेल. कदाचित् श्री सामंत याच कारणाने बाहेर पडले असतील.
याला काहीही अर्थ नाही. सामंत का बाहेर पडले वगैरे बाजूला ठेवा. तुमच्यापुरते बोला. तुमचे लेखन मी वाचले आहे. त्यावर कधी साधक, सकारात्मक प्रतिसाद दिले आहेत. कधी त्यावर टीकाही केली आहे. पण तशा स्वरूपाचा संवाद अपेक्षीत नसेल तर अशा संस्थळांवर वावरू नये. आपल्यापुरती वेबसाईट काढावी स्वतःची आणि खुशाल नांदावे. अधिकाधिक लोकांनी वाचावे म्हणून सार्वजनिक संस्थळावर यायचे, सारे एन्जॉय करायचे, आणि मागाहून त्या संस्थळाची गुणवत्ता, श्रेणी, चारित्र्य याविषयी संदिग्ध टिप्पणी करायची हा कृतघ्नपणा आहे. काळे यांच्याकडून तो अपेक्षीत नाही. (हे लेखन त्यांनी भावनेच्या भरात केले असेल तर ते संपादित करून माझा हा प्रतिसाद उडवावा.) याच धाग्यावर 'काळे यांनी रजा घेऊ नये,' असे सांगणारे प्रतिसाद आहेत ते या संदर्भात बोलके आहेत. तेही काळे यांना कम्फर्टेबल वाटत नसेल तर आणि फक्त तेच त्यांच्या कम्फर्टला पूरक असतील तर मात्र नक्कीच त्यांनी इथून मोकळे व्हावे हे उत्तम. हे आणि अशी स्थळे त्यांच्यासाठी नाहीत. वेगळ्या वाटा आहेत, असं वाटतंय ना? वेगळ्या वाटेवर रहा.
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Tue, 10/18/2011 - 22:24 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

१+

पांथस्थ
Tue, 10/18/2011 - 23:05 नवीन
सहमत. परखड पण संतुलित प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

शब्दांशी नाही

मन१
Tue, 10/18/2011 - 23:39 नवीन
शब्दांशी नाही पण आशयाशी काहीसा सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+१

छोटा डॉन
Wed, 10/19/2011 - 11:56 नवीन
+१ - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

काळे काका, तुम्ही नका ना

पिंगू
Tue, 10/18/2011 - 16:01 नवीन
काळे काका, तुम्ही नका ना जाऊ.. प्लीज्ज.. - पिंगू
  • Log in or register to post comments

सुधीर काळेकाका,

प्रास
Tue, 10/18/2011 - 16:30 नवीन
सहभागी लेखक म्हणून मिपावर राहणे किंवा न राहणे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यावर तुम्ही जो निर्णय घ्याल त्याचा आदर राखण्याचा प्रयत्न राहील. मात्र तुमचे लिखाण आणि खरडफळ्यावरच्या खरडी (ज्या बर्‍याचदा उत्तम कार्टून्सच्या स्वरूपातही असायच्या) दोन्ही आवडायचे आणि त्यावर साधक-बाधक प्रतिक्रिया द्यायचे प्रयत्नही केले आहेत हे इथे नोंदवून ठेवतोय. भारताबाहेर राहून भारत-पाक संबंधाविषयीची आणि जागतिक घडामोडींसंदर्भात तुमची मतं मांडून एका नव्या दृष्टीकोनातून या समस्येकडे बघायची सवय तुम्ही आम्हाला लावलेली. आत्ताही तुमच्या 'ऑक्युपाय स्टॉक मार्केट', 'लिबीया घडामोडी' आणि 'चीनची आगळीक' यावर लेख येतील या अपेक्षेत असताना तुमचा एक्झिट सांगणारा हा लेख दिसला. असो. तुम्हाला उपरति होईल अशी आशा आहे. तोपर्यंत "शिवास्ते पन्थानः।" @ प्रस्तुत लेखासंदर्भात - जगजीतसिंहांच्या काही गजलांचे अर्थ समजल्याने आता त्या जास्तीच आवडू लागल्या आहेत. धन्यवाद काळेकाका!
  • Log in or register to post comments

लेख नेहमीप्रमाणे मस्तच.

आत्मशून्य
Tue, 10/18/2011 - 16:52 नवीन
बाकी निघण्याचा विषय सार्वजनीक कशासाठी ? व्यनीमधे ही चर्चा होऊ शकतेच की ? बाकी सध्या मिपा जरा जास्तच कडक झालयं हे मात्र खरयं पण म्हणून लगेच एग्जिट योग्य न्हवे.
  • Log in or register to post comments

काका असं करु नका.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/18/2011 - 17:06 नवीन
नमस्कार काळे काका, आपण मिपावर विविध विषयांवर लिहिले आहे. बर्‍याचदा साधक-बाधक चर्चा झाल्या. कधी दर्जेदार प्रतिसाद आले तर कधी काही प्रतिसादातून टींगल-टवाळीही झाली. खरडफळ्यावरील व्यंगचित्रेही तितकीच झकास असायची. आपल्या काही लेखनाची उंची अधिक असल्यामुळे कदाचित आपल्या उंचीवरुन आम्हाला काही लेखनाचा आस्वादही कधी कधी घेता आला नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या वृती प्रवृतीची माणसं एकाच ठिकाणी आल्यावर त्यांच्या विविध विचारांसोबत त्यांच्या गुण-दोषांसह एकमेकांना स्वीकारतो कधी फटकारतोही तेव्हा असे अनुभव काही विशेष नसावेत. मात्र, सुखद क्षणांपेक्षा त्रासदायक प्रवृती-प्रतिसादांचा कधी कधी त्रासही होत असतो. आणि मग वाटायला लागतं की सालं बस झालं आता. आणि मग कोणत्या तरी क्षणी 'अलविदा' म्हणायला मन उतावीळ व्हायला लागते. असेच आपले झाले असावे किंवा आपल्या काही खासगी कारणांमुळे आपल्याला पुढे अधिक मोकळा वेळ मिळणार नसेल हेही कारण असेल परंतु दीडशेपेक्षा अधिक लेख लिहिल्यानंतर (सर्व प्रकारचे लेखन) आज मिपाला 'अलविदा' करण्याचे जे comfortable चे कारण सांगत आहात ते मला तरी अजिबात पटत नाही. असो, आपण मिपावर असेच विविध विषयांवर लिहित राहावं असं मला वाटतं. फार तर एक मोठा ब्रेक घ्या. एक महिनाभर, पंधरा दिवस, आणि नव्या उत्साहाने पुन्हा इथे लिहिण्यासाठी या. बाकी, मिपावर लिहावं की न लिहावं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. अवांतर : सध्या आम्हीही मौन पाळतो आहे. व्य.नि, खरड आणि प्रतिसाद दोन दिवसांसाठी लिहिणे बंद केले आहे. पण आपल्या दोघांचे आदर्श जसे मौन बाळगून ब्लॉग लिहिण्याची सूट घेतात तशी मी इतकाच प्रतिसाद लिहिण्याची सूट घेतली आहे. :) तमाम रिश्तों को मै घर पे छोड आया था. फिर उस के बाद मुझे कोई अजनबी न मिला. -बशीर बद्र. -दिलीप बिरुटे (आपला पुतण्या)
  • Log in or register to post comments

अवांतर + अवांतर

मदनबाण
Tue, 10/18/2011 - 17:21 नवीन
सध्या आम्हीही मौन पाळतो आहे. व्य.नि, खरड आणि प्रतिसाद दोन दिवसांसाठी लिहिणे बंद केले आहे. पण आपल्या दोघांचे आदर्श जसे मौन बाळगून ब्लॉग लिहिण्याची सूट घेतात तशी मी इतकाच प्रतिसाद लिहिण्याची सूट घेतली आहे. काय हो औरंगाबाद आणि राळेगणसिद्धी यात अंतर कमी झालं हाय काय ? नाय कारण अण्णा पण अमर्यादित काळा पर्यंत मौन घेउन बसले आहेत म्हणे ! ;) (बाबा मौनी मराठी) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुढील वाटचालीसाठी अनेकानेक

यशोधरा
Tue, 10/18/2011 - 19:25 नवीन
पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा काळेकाका. तुमचे लेख आवर्जून वाचले आहेत हे सांगण्यासाठी ही पोस्ट. लिहिणे थांबवू नका. :)
  • Log in or register to post comments

का सोडता हो काळेकाका? रहा ना

क्राईममास्तर गोगो
Tue, 10/18/2011 - 19:25 नवीन
का सोडता हो काळेकाका? रहा ना इथेच. तुमचे अभ्यासपूर्ण लेख कसे मिळणार आम्हाला?
  • Log in or register to post comments

आज तुम्हाला व्य. नी तून

रेवती
Tue, 10/18/2011 - 20:26 नवीन
आज तुम्हाला व्य. नी तून विचारणारच होते की या वर्षी कोणत्या दिवाळी अंकात तुमचा लेख छापून येतोय म्हणून! तर तुम्ही ही बातमी दिलीत.:( तुम्ही मिपावर कंफर्टेबल नव्हता हे आधीपासूनच जाणवत होते. पुन्हा यावेसे वाटले तर स्वागतच आहे.
  • Log in or register to post comments

तुमचे लेख अन खफवरील

शिल्पा ब
Tue, 10/18/2011 - 21:26 नवीन
तुमचे लेख अन खफवरील व्यंगचित्र आवडतात.
  • Log in or register to post comments

जगजीतसिंहांची गाणी आवडतात. +१

धनंजय
Tue, 10/18/2011 - 22:41 नवीन
कम्फर्टेबल=आरामशीर, स्वस्थ, सुचित्त; अन्कम्फर्टेबल=अस्वस्थ, कसेनुसे जगजीतसिंहांची गाणी आवडतात. +१
  • Log in or register to post comments

आदिओस !!

अर्धवटराव
Tue, 10/18/2011 - 22:43 नवीन
थोरामोठ्यांनी पानसुपारीचं आगोदरच लिहिलय... त्यात आणखी नवीन काय भर घालणार मी.... पण तुमच्या अन्कंफर्टेबल वाटण्याचं कारण काहि पल्ले नहि पडा... वय म्हणत असाल, तर तुमच्या वयाला साजेसे , अनुभवाने-ज्ञानाने मुरलेले अनेक रथी महारथी इथे मैफील जमवुन बसलेत... मग तुमचा बेरंग का व्हावा ? आता कुठे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणाचे नवे डाव मांडल्या जात आहेत, त्यावर अभ्यासपूर्ण लेखन हि तुमची खासियत आणि वाचकांना पर्वणी... मग इतका इंटरेस्टींग माहोल असताना तुम्हाला एक्झीट घ्याविशी वाटतेय... स्ट्रँज... वांजळे काकु हरल्याचं दु:ख म्हणावं काय? ;) असो... सी यू सून. (पुतण्या) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

हो +१. तुमचे लेख वाचनीय

विनीत संखे
Wed, 10/19/2011 - 13:49 नवीन
हो +१. तुमचे लेख वाचनीय असताना आम्हा मिपावरील पामरांना तुमच्या निरोपाची धग लागणार हाच विचार दयनीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

प्रतिक्रिया

चतुरंग
Tue, 10/18/2011 - 22:45 नवीन
मला असं वाटतं की तुमचा बराच गोंधळ उडालाय. मिसळपाववर येण्याआधीच्या जालीय अनुभवातून काही एक विविक्षित हेतू ठेवून तुम्ही इथे आला असाल असे वाटते. तुमच्या आधीच्या अनुभवाशी मेळ बसणारे असे इथे काही आढळते का हे चाचपडणे बराच काळ चालले असेही वाटते. त्यादरम्यान तुम्ही अनेक धागे काढून इथल्या लोकांची प्रकृती आणि प्रवृत्ती आजमावत राहिलात. मिसळपाव हे त्याच्या गुणदोषांसह वेगळे संस्थळ आहे हे इतर ठिकाणी जाऊन आल्याशिवाय उमगत नाही हे खरे. इथे काहीतरी असे हटके आहे की जे इतर ठिकाणी आढळत नाही. तुम्हाला अपेक्षित प्रतिसाद लोकांकडून मिळत नाही असे तुम्हाला वाटत राहिले कारण तुम्ही एकाच चौकटीतून बघत राहिलात. तुम्हाला जे इश्यूज ज्वलंत वाटले ते इतरांनाही वाटावेत असा तुमचा आग्रह बर्‍याचदा दिसला. तसे होत नाही म्हटल्यावर मग तुमच्या मनातून संस्थळ उतरु लागले. पण म्हणून संस्थळाला आणि सभासदांनाच नावे ठेवून इथून तुम्ही जाणे हे पटत नाही. तुम्हाला जायचे असल्यास (मर्यादित काळासाठी किंवा कायमचे) तो तुमचा वैयक्तिक मामला आहे. त्यासाठी इतरांना दोष देणे पटत नाही. आत्ताही तुम्हाला मनातून जाऊ की नको, जाऊ की नको असे वाटतच आहे हे तुमच्या लेखनातून दिसते. जो काय निर्णय घ्याल त्यासाठी शुभेच्छा! :) -रंगा
  • Log in or register to post comments

इथे काहीतरी असे हटके आहे की

यकु
Tue, 10/18/2011 - 23:05 नवीन
इथे काहीतरी असे हटके आहे की जे इतर ठिकाणी आढळत नाही.
१०००% सहमत आहे. सध्या हपिसातून फक्त मिपा वगळता मराठीतली सगळी संकेतस्थळे दिसत असल्याने गेल्या आठ-पंधरा दिवसांत जवळपास सगळ्या मसंवरील लिखाणाचे खोदकाम केले... त्यातून हे अगदी १०००% पटले. काही ठिकाणी अगदी शष्प लिखाणाला येणारे तसलेच शुष्क प्रतिसाद आणि इतर ठिकाणी लांबट चेहेरे (हो.. झालेल्या लिखाणातूनही लांबट चेहेरे दिसतात) ठेवत, कसल्याही भंकस मुद्द्यावर साखरेची साल काढणारे, अंतर्जालीय विनयशीलतेची परमावधी गाठलेले, वाक्या-वाक्यात शून्य मूल्याची घोटीव प्रगल्भता दाखवणारे प्रतिसाद पाहिले की मिपा काय चीज आहे ते कळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

लै भारी...

मन१
Tue, 10/18/2011 - 23:38 नवीन
व्वा. शब्द संग्रह व शब्द पखरण आवडली. शष्प लिखाणाला येणारे तसलेच शुष्क प्रतिसाद आणि इतर ठिकाणी लांबट चेहेरे (हो.. झालेल्या लिखाणातूनही लांबट चेहेरे दिसतात) आणि अंतर्जालीय विनयशीलतेची परमावधी गाठलेले, वाक्या-वाक्यात शून्य मूल्याची घोटीव प्रगल्भता दाखवणारे प्रतिसाद ही दोन्ही वाक्ये त्यातही "शून्य मूल्याची घोटीव" हा वाक्प्रचार पुन्हा पुन्हा वाचून पाहिला. आपण पत्रकार नसावात. पत्रकारांची भाषा एकाच छापाची("सदर इसम" , "मयताचे वारस" वगैरे बातमीबाज छापील भाषा) असल्याचे निरिक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

>>>आपण पत्रकार नसावात. या

यकु
Tue, 10/18/2011 - 23:56 नवीन
>>>आपण पत्रकार नसावात. या वाक्यापूर्वी "व्यक्तिगत होत असेल तर क्षमा करा" हे लिहायचं राहिलं ;-) >>>पत्रकारांची भाषा एकाच छापाची("सदर इसम" , "मयताचे वारस" वगैरे बातमीबाज छापील भाषा) असल्याचे निरिक्षण आहे. आणि इथं "हे अवांतर संपादकांनी उडवले तरी माझी हरकत नाही" असं लिहायचं राहिलं ;-) दर प्रतिसादात वर ठळक शब्दात दिलेल्या वाक्यांचे सारण भरलेल्या प्रतिसादांची सवय झालेल्या लोकांना मिपाची ठसका लाऊन नाकातून पाणी काढणारी चव मानवत नाही. असे सदस्य सहसा 'ज्येष्ठ नागरिक' असतात असेही निरिक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

मी दोन-तीन संकेतस्थळांवर वावरतो

धनंजय
Wed, 10/19/2011 - 01:03 नवीन
मी दोन-तीन संकेतस्थळांवर वावरतो. प्रत्येक संकेतस्थळाचे काहीतरी वैशिष्ट्य आहे. त्यामुळे वरील दोन्ही प्रतिसादांच्या प्रमुख आशयाशी असहमत आहे. (म्हणजे "मिसळपावात वैशिष्ट्य आहे" याच्याशी सहमत आहे. पण अन्य संकेतस्थळांची नालस्ती केल्याशी असहमत आहे.) तर्री मला आवडतेच. पण रबडी, कोरा चहा या दोन्ही गोष्टी मी तर्री न मिसळता चाखतो. घोटीव रबडी किंवा शष्प* कोरा चहा नावडणे ठीकच आहे. पण या गोष्टी आवडीने चाखणार्‍या लोकांची चर्या कशी असते? त्याची नक्कल रबडी/चहा नावडणार्‍याने केली, तर नकलेत कडू/मळमळणारे तोंडच दिसेल. प्रत्येक संकेतस्थळावर अन्य संकेतस्थळांची नालस्ती होते ही बाब आता सवयीची झालेली आहे. अन्य संकेतस्थळांची नालस्ती करणारे ज्येष्ठ सदस्य मात्र मला अधिक उदास करतात. ज्येष्ठ सदस्यांनी नालस्ती सुरू करण्यामागील घटना मला ठाऊक आहेत. बहुधा असे दिसते, की एका संकेतस्थळावर सुस्थापित सदस्य दुसर्‍या संकेतस्थळावर अवचित जातो, आणि त्याची टिंगल होते. प्रत्येक संकेतस्थळावर सन्मान वेगवेगळा अर्जित करावा लागतो, ही बाब सोयिस्कर नाही. हे खरे आहे. पण ही बाब अन्य संकेतस्थळांवर जितकी खरी आहे, तितकी मिसळपावावरही खरी आहे. अन्य ठिकाणच्या सुस्थापित सदस्यांनी येथे चंचुप्रवेश करता त्यांची टिंगलही होते. त्याचे स्मरण मिसळपावावरील सुस्थापित सदस्यांना अंधुकच होत असेल. आणि व्यत्यासही खराच. तरी उदास वाटते. (त्यानंतरही "इथे मारे सांगतोस, तिथे का नाही सांगत?" छाप प्रतिसाद येऊ शकतील, त्याचे आधीच उत्तर देतो : मी अन्य संकेतस्थळांवरही "सर्व संकेतस्थळांचे आपले-आपले वैशिष्ट्य" असे समर्थन करतो.) - - - *"शष्प" शब्दाचे सामान्य अर्थ आहेत : (१) कोवळे गवत आणि (२) कमरेखालील इंद्रियांवरचे केस. वरील प्रतिसादात कुठला अर्थ अपेक्षित होता, ते मला ठाऊक नाही. पण जो काय अर्थ लाक्षणिक अर्थाने त्यांनी नावडत्या लेखनाला लावला, तोच लाक्षणिक अर्थ कोरा चहा नावडणारा व्यक्ती कोर्‍या चहाला लावेल, असे मी मानतो. "शष्प"सारख्या घोटीव शब्दांची प्रगल्भ परमावधी सर्वच संकेतस्थळांवर वाचकांना आवडते. "लव्हाळे" शब्दात नावड नाही. "शें*" शब्दात द्वर्थ नाही, शिवाय संपादित होण्याची शक्यताही फार आहे. या शर्करेला द्व्यर्थाची साल असल्यामुळे "शष्प" शब्दाची निवड ही अतिशय कुशल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

सगळ्यांना एक विनंती: असं वर

शिल्पा ब
Wed, 10/19/2011 - 02:08 नवीन
सगळ्यांना एक विनंती: असं वर लिहीलंय तसं करड्या रंगातलं वाचायला खुप त्रास होतो त्यापेक्षा जरा भडक रंगात लिहिलं तर वाचता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

माउसच्या कर्सरने तेवढा मजकुर

वपाडाव
Wed, 10/19/2011 - 10:35 नवीन
माउसच्या कर्सरने तेवढा मजकुर सिलेक्ट करत चला त्रास होणं थांबेल......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

धनंजय, मी माझ्या प्रतिसादातून

यकु
Wed, 10/19/2011 - 09:52 नवीन
धनंजय, मी माझ्या प्रतिसादातून कुठल्याही संकेतस्थळाची नालस्ती केलेली नाही. हां, माझे शब्द वाचून तुमच्या डोळ्यासमोर विशिष्ट संकेतस्थळ उभं रहात असेल तर त्याला ती गोष्ट वेगळी. शष्पचा तुम्ही सांगितलेला क्रमांक २ चा शब्दकोशातला अर्थ मला पहिल्यांदा इथेच कळतो आहे, खरं माना अथवा मानू नका. शष्प म्हणजे काहीही दम नसणे या लाक्षणिक अर्थाने मी आजवर तो शब्द ऐकत आलो आहे.
प्रत्येक संकेतस्थळावर अन्य संकेतस्थळांची नालस्ती होते ही बाब आता सवयीची झालेली आहे. अन्य संकेतस्थळांची नालस्ती करणारे ज्येष्ठ सदस्य मात्र मला अधिक उदास करतात. ज्येष्ठ सदस्यांनी नालस्ती सुरू करण्यामागील घटना मला ठाऊक आहेत. बहुधा असे दिसते, की एका संकेतस्थळावर सुस्थापित सदस्य दुसर्‍या संकेतस्थळावर अवचित जातो, आणि त्याची टिंगल होते. प्रत्येक संकेतस्थळावर सन्मान वेगवेगळा अर्जित करावा लागतो, ही बाब सोयिस्कर नाही. हे खरे आहे. पण ही बाब अन्य संकेतस्थळांवर जितकी खरी आहे, तितकी मिसळपावावरही खरी आहे. अन्य ठिकाणच्या सुस्थापित सदस्यांनी येथे चंचुप्रवेश करता त्यांची टिंगलही होते.
माझ्या बाबतीत असं काही घडलेलं नाही; कारण मी त्या संकेस्थळांवर लॉग ईन होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

माझ्या बाबतीत असं काही घडलेलं

वपाडाव
Wed, 10/19/2011 - 11:07 नवीन
माझ्या बाबतीत असं काही घडलेलं नाही; कारण मी त्या संकेस्थळांवर लॉग ईन होत नाही.
हेच म्हणतोय.... आमच्यासाठी मराठी संस्थळ म्हणजेच मिसळपाव...... आता तुम्ही जर आम्हाला झापडा लावलेले घोडे म्हणाल तर तेही मान्य.... पण मिपा इस मिपा.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

सुभानल्ला!!!

पिवळा डांबिस
Wed, 10/19/2011 - 03:12 नवीन
"शष्प लिखाणाला येणारे तसलेच शुष्क प्रतिसाद..." "कसल्याही भंकस मुद्द्यावर साखरेची साल काढणारे...." "वाक्या-वाक्यात शून्य मूल्याची घोटीव प्रगल्भता दाखवणारे प्रतिसाद..." वा, वा, यशवंतराव! आज साक्षात सरस्वती "कजरा रे!" गात नाचते आहे!!!! जियो!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

निषेध!

नेत्रेश
Wed, 10/19/2011 - 06:31 नवीन
> आज साक्षात सरस्वती "कजरा रे!" गात नाचते आहे डोळ्यासमोर ऐश्वर्या राय 'त्या' कॉस्चुममध्ये' हातात तंबोरा (वीणा म्हणवत नाही) घेऊन नाचताना दीसली. तसेच आमच्या पुज्य देवतेविषयी असे लिहील्यापद्दल आपला ऑफीशीयल निषेघ नोंदवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

डांबिसकाका, थैंक्यू!

यकु
Wed, 10/19/2011 - 09:58 नवीन
डांबिसकाका, ;-) ;-) ;-) ;-) थैंक्यू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हाहाहा

श्रावण मोडक
Wed, 10/19/2011 - 11:26 नवीन
आज साक्षात सरस्वती "कजरा रे!" गात नाचते आहे!!!!
या पिडांची दृष्टीच दिव्य. त्यांच्या नजरेसमोर काय येईल सांगता येत नाही. सालं, हा माणूस हे प्रतिसादच फक्त का लिहितो? अपुऱ्या गोष्टी करा हो पुऱ्या जरा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

+१

गणपा
Wed, 10/19/2011 - 13:03 नवीन
या पिडांची दृष्टीच दिव्य. त्यांच्या नजरेसमोर काय येईल सांगता येत नाही. सालं, हा माणूस हे प्रतिसादच फक्त का लिहितो? अपुऱ्या गोष्टी करा हो पुऱ्या जरा. Smile
श्रामोंशी बाडिस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सुका

परिकथेतील राजकुमार
Wed, 10/19/2011 - 14:02 नवीन
लेखनाचे तात्पर्य येवढेच की अजुनही तुम्हाला तुमची कातडी गेंड्याची बनवण्यात यश आलेले नाही. असो... @ पिडांकाका
आज साक्षात सरस्वती "कजरा रे!" गात नाचते आहे!!!!
आमच्या डोळ्यासमोर एकदम अनवाणी चालणारे एम.एफ. डांबिस आले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

हम्म!

पिवळा डांबिस
Wed, 10/19/2011 - 22:04 नवीन
@नेत्रेशः पुज्य देवतेविषयी असे लिहील्यापद्दल आपला ऑफीशीयल निषेघ नोंदवतो. जरूर! निषेध नोंदवणं हा तुमचा हक्क आहे! बाकी, पुज्य देवता नाही; पूज्य देवता असं लिहितात!!! तुम्ही चुकीचं लिहिल्याबद्दल आम्ही आपला एक ऑफिशियल निषेध नोंदवून ठेवतो!! :) @श्रामो आणि गंपा: का साल्यो माझ्या मागे हात धुवून लागलांय? च्यामारी, आता "लास वेगास: काही नोंदी तशातशाच!!" किंवा "ऑक्टोपसच्या कलामारीची रेसेपी" असंच काहीतरी लिहितो बघा!! :) @ परा: आमच्या डोळ्यासमोर एकदम अनवाणी चालणारे एम.एफ. डांबिस आले खीक!! एम एफ डांबिस? पण आमचं तुमच्या खारी-बटरवाल्याशी काहीही नातं नाही हे निक्षून सांगतोय!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

शुभास्ते पंथानः सन्तु||

पिवळा डांबिस
Wed, 10/19/2011 - 03:07 नवीन
काळेकाका, तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! बाकी चतुरंगाने वर लिहिलंय त्याच्याशी सहमत. विशेषतः, मिसळपाव हे त्याच्या गुणदोषांसह वेगळे संस्थळ आहे.... इथे काहीतरी असे हटके आहे की जे इतर ठिकाणी आढळत नाही. माझ्या मते हीच मिसळपावची निश् आहे. ज्या दिवशी मिसळपावमधून हे जे काही 'हटके' आहे ते काढून टाकून त्याला इतर संस्थळांसारखं (भलं होवो त्यांचं बिचार्‍यांचं!) बनवण्यात येईल त्या दिवसापासून मिपाचा र्‍हास सुरु होईल असं माझं मत आहे... असो. आपला सस्नेह, पीतठक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

काळजी घ्या ....

मन१
Tue, 10/18/2011 - 23:44 नवीन
तुम्ही काही दिवसानी इथे पुन्हा लिहु लागलात तर तुमचे लेखन वाचता येते म्हणून बरे वाटेल. तुम्ही आलाच नाहित तर तुम्ही आहात तिथे अत्यंत comfortable असल्याचे पाहून बरे वाटेल. तुमच्या लिखाणाच्या निमित्तानं बर्‍याच गोष्टी नव्यानं माहिती होत होत्या. पण असो. तुम्ही उगीच स्वतःला त्रास करून घेउन इथे थांबणं तुमच्यासारखच मलाही आवडणार नाही. http://mr.upakram.org/node/3180#comment-54117 इथे एक ओळ सापडली.... 'राम-कृष्णही आले-गेले, जग का त्यांविण ओसची पडले' असे कायसे आहे बघा!
  • Log in or register to post comments

टेबल

विनायक प्रभू
Wed, 10/19/2011 - 10:20 नवीन
इथे कुणाला अक्षत, हत्ती, घोडे,हेलीकॉप्टर वरुन आमंत्रण पाठवत नाहीत. आपल्या मर्जीने यायचे. आपल्या मर्जीने जायचे. उगाच ग्लोरीफिकेशन कशाला? राहता राहीले कंफर्ट लेवल चे. यू कम फॉर द टेबल ऑन युअर ओन बॉस. चतुरंग, श्रा.मो. पि.डां शी सहमत.
  • Log in or register to post comments

त्यांना आमंत्रण मिलाले होते

मन१
Wed, 10/19/2011 - 11:01 नवीन
मिपा संस्थापकाकडून त्यांना आग्रहाचे आमंत्रण मिलाले होते असे त्यांनी लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

काही मान्यवर, आदरणीय, जेष्ठ

इरसाल
Wed, 10/19/2011 - 11:19 नवीन
काही मान्यवर, आदरणीय, जेष्ठ आणि सुटसुटीत सदस्यांनी आपापले ताट फिरवून बघावे असे राहून राहून वाटत आहे. कार्पोरेटाच्या भाषेत टर्न द टेबल असा कायसं हाये म्हणे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा