खादाडांसाठी कुपोषितांचे रक्तदान
जागतिक अर्थव्यवस्था आज एका ऐतिहासिक वळणावर उभी आहे. युरोपातल्या सगळ्या देशांची एकत्र मोट करून एकच चलन असलेली एकत्रित अर्थव्यवस्था त्यातल्या अंतर्भूत दोषांमुळे टेकीला आली आहे. युरोपातल्या जर्मनीसारख्या देशांची स्वतःची परिस्थिती बरी असली तरी ग्रीस, स्पेन आणि इटली या दिवाळखोरांच्या धोंडी गळ्यात बांधल्या गेल्याने भलेभले देशही बुडायला लागले आहेत.
"युरोप बुडतोय आणि स्वतःबरोबर जगातल्या दोन सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था घेऊन बुडतोय" यावर सगळ्यांचंच एकमत झालंय. या दोन सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था म्हणजे अर्थातच अमेरिका आणि चीन. त्यापैकी अमेरिकेची स्वतःची परिस्थिती एकादशीसारखी असताना युरोपची शिवरात्र आमंत्रित करणे त्यांना परवडणारे नाही.
प्रत्यक्षात अमेरिकेच्या आणि इतर पाश्चात्य देशांच्या हातातले बाहुले असलेल्या आणि इतके दिवस उगाचच विकसनशील अर्थव्यवस्थांना कानपिचक्या देणार्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचीही अवस्था रक्तक्षय झाल्यासारखीच आहे. आकड्यांत सांगायचं तर नाणेनिधीकडे फक्त ३८४ अब्ज डॉलर्स उरले आहेत. तितके तर ग्रीसचं कर्ज फेडायलाही पुरणार नाहीत मग स्पेन आणि इटलीचं कोण निस्तरणार?
शेवटी राहता राहिले कोण? तर इतकी वर्षे गरीब आणि मागासलेले समजले गेलेले आणि पै-पै करून आता बर्यापैकी सुस्थितीत आलेले विकसनशील आणि त्यातल्या त्यात आशियातले देश.
चीन, ब्राझील, भारत आणि रशिया या ब्रिक देशांकडे स्वकमाईचे साठवलेले हजारो अब्ज डॉलर्स आहेत आणि स्वतःचं खाऊन घालवलेले ते खादाड बोके या पैशांच्या शिंक्याकडे डोळे लावून आता बसले आहेत.
हे सगळं पाहून मनात चीड तर उत्पन्न होतेच पण अनेक प्रश्नही पडतात.
इतकी वर्षं हालाखीत काढल्यानंतर आणि या अमेरिकन-युरोपियन टोणग्यांनी एवढी आघाडी घेतलेली असतानाही जागतिकीकरणानंतर या देशांनी आपली बर्यापैकी प्रगती साधण्याचे जोरदार प्रयत्न केले. या प्रयत्नांचं फळ म्हणून त्या देशांमधल्या मूलभूत सुविधा, लोकांचं जीवनमान, आरोग्य इत्यादी सुधारण्याची वेळ आलेली असताना आणि त्यासाठीचा पैसाही हाती असताना तो पैसा पुन्हा या ऐशोआरामाची चटक लागलेल्या गुलछबू लोकांना देऊन टाकायचा का?
केवळ अमाप भोगवटा हेच या लोकांचं भांडवल आहे का आणि त्यांच्या उपभोगामुळे सगळ्या जगाची अर्थव्यवस्था चालेल असं समजून आशियातल्या लोकांनी पुन्हा त्यांना कर्जाऊ पैसे देऊन त्यांना आणखी उत्तेजनच द्यायचे का?
जागतिक अर्थव्यवस्था कोसळेल आणि त्याबरोबर चीन आणि इतर आशियाई देशही कोसळतील अशी हाकाटी करून ही भांडवलशाहीची पिलावळ एक प्रकारचे ब्लॅकमेलिंग करत आहे असे वाटत नाही काय?
आपली बाजारपेठ आहे म्हणून आपणच त्यांना पैसे द्यायचे आणि मग त्याच पैशाने ते आपला माल किंवा सेवा विकत घेऊन आपल्याला उपकृत करणार याला कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था म्हणतात?
तसंही फक्त या युरोपियन देशांची सरकारं अडचणीत आहेत, खाजगी कंपन्यांकडे अजून अमाप पैसा आहेच. एरवी आपल्या या तथाकथित खाजगी कंपन्यांचे हितसंबंध सांभाळायला धडपडणारी ही सरकारं आता त्यांच्याकडेच हात का नाही पसरत? शुद्ध भांडवलशाहीचे हे भोक्ते आता का अर्थव्यवस्थेला तिच्या गतीने जाऊ देत नाहीत? शिवाय हा पैसा दिल्यावर त्या देशांमधले हपापलेले बँकर्स, धोरणकर्ते आणि वित्तसंस्थांमध्ये पोसलेले पोळ पुन्हा हडप करणार नाहीत याची काय खात्री?
सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचं म्हणजे विकसनशील देशांपेक्षा अनेकपटीने चांगले जीवनमान असलेल्या आणि अत्यंत बेजबाबदार उपभोगवृत्ती असलेल्या या विकसित देशांना विकसनशील देशांकडून मदत घेण्याचा नैतिक अधिकार आहे काय?
येत्या काही दिवसात अशी मदत ते देश स्वीकारताना दिसतीलच आणि ते अत्यंत किळसवाणं दृष्य असेल यात शंका नाही.
प्रतिक्रिया
नीटसे कळले नाही ननि. गरीब
ग्रीस, इटली, स्पेन इत्यादी
खादाड लोक बकाबका खात असताना
एकेकाळी आम्ही संपत्ती निर्माण
हम्म्म...... लेखन आवडले, पटले
दुसरी
लेखन छान झाले
लेखन चांगले; पण....
नक्की triggering event काय
भन्नाट उपाय
कोणी मागितले पैसे आपल्याला
कोणी मागितले पैसे आपल्याला ?
भावनिक नव्हे आर्थिक
http://www.project-syndicate.
लेख वाचला. लेखातला सूर
इतकं सोपं नाही
थोडक्यात बॅंकेचाच हप्ता
अमेरिकन वाहिन्यांवरील अनेक
काही विचार
मुद्देसूद विचारांबद्दल
प्रतिसाद