✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

साखर चौथीचा गणपती

ज — जागु, Tue, 09/27/2011 - 12:15
भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष! या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. जिकडे तिकडे अत्तर, उदबत्त्यांचा सुगंध, फळांच्या गाड्यांवर फळांच्या सुबक राशी, फुलमार्केटमध्ये सजावटीची फुले, कंठ्या नी दूर्वा, सुगंधी फुलांनी मार्केट इतके मंगलमय झालेले असते की तिथून पाय पुढे निघत नाहीत. काही सजावटीची दुकाने तोरण, माळांनी घरा-घरांतील गणेशाचे स्वागत करायला सज्ज झालेली असतात. हलवायांच्या दुकानांत मोदकांच्या सुबक राशी रचल्या जातात. सीडींची दुकाने गणेश भक्तीच्या गीतांनी सुरेल झालेली असतात. गणपतीच्या आगमनापूर्वीचे दोन दिवस तर बाजारपेठ तुडुंब भरलेली असते. गणेशमूर्तीही बाजारातील दुकानांमध्ये आपापल्या मेकअपवर फायनल टच मारून मखरात विराजमान होण्यासाठी तयार होत असतात. घराघरात रंगरंगोटी चालू असते. घरातील आडोशाची भांडीही चमकू लागतात. चिवडा, लाडू गणपती बाप्पाच्या व पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपला खमंगपणा पणाला लावतात. थर्माकोलचे मखर, पुष्परचना, दीपमाळा घरात ट्रायल घेत असतात. नाक्यावर सार्वजनिक गणेशोत्सवाचे मंडप घालून पडद्याआड देखावे, सजावटीचे काम चालू असते. चलचित्रांची रिहर्सल चालू होते. दीड दिवसांचा गणपती असेल तर दुसर्‍या दिवशी संध्याकाळी धामधुमीत विसर्जन केल जातं. असे ५ दिवसांचे, १० दिवसांचे, २१ दिवसांचे गणपती असतात. अनंतचतुर्दशीपर्यंत सर्व गणपतींचे विसर्जन झाले की घरातील माणसे जड अंत:करणाने सुन्या असलेल्या मखराजवळ येउन आरती करतात. मग सगळंच उदास होउन जात. अगदी सगळी घरं, बाजारपेठा, दुकाने, रस्ते, गल्ली सगळेच.... एक मलूल वातावरण होतं आणि ते पूर्ववत व्हायला काही दिवस जातात. अहं... पण कोकणात, विशेषतः रायगड जिल्ह्यामध्ये मात्र इतक्या लवकर संपत नाही हा उत्सव! आमच्याकडे ह्या गणपतींचं विसर्जन झाल की चाहुल लागते ती भाद्रपदातल्याच संकष्टीची - म्हणजेच साखरचौथीची. पुन्हा नव्याने तेच वातावरण अनुभवण्याची. साखरचौथीच्या गणपतीची प्रथा वर्षानुवर्षे, परंपरांगत चालत आली आहे. या प्रथेकरता काही लिखित आधार मिळत नाही किंवा कोणती पौराणिक कथा आढळून येत नाही. पितृपक्ष जरी असला तरी गणेश हा गणनायक असल्याने स्थापनेसाठी पितृपक्षाचा विचार केला जात नाही. ही प्रथा कोकणातच प्रचलित आहे. कोकणात गणपती मुख्य कुटुंबात एकच बसवला जातो. कुटुंबातील मूळ गणपतीची सेवा मुख्य कुटुंबाला करावी लागते. अशा कुटुंबातील भक्त श्रद्धेने गणेशाकडे काही नवस करतात आणि त्याची पूर्तता झाली की भाद्रपदातल्या संकष्टी चतुर्थी म्हणजेच साखरचौथीला गणपतीबाप्पाची स्थापना करतात. नवसाचे हे गणपती तीन वर्षे आणेन, पाच वर्षे आणेन असे नवस बोलले जातात पण ज्यांना ह्यांचा सहवास कायम हवा असतो ते कायम म्हणजे दर साखरचौथीला गणपतीबाप्पाची स्थापना करतात. ह्यातही दीड दिवस, पाच दिवस, २१ दिवस असे गणपती आणले जातात. ह्या स्थापनेमागचा दुसरा उद्देश म्हणजे हल्ली विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालली आहे. त्यामुळे काही हौशी भक्त मूळ कुटुंबात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती असल्यामुळे आपल्याही घरात गणपती यावा, आपल्या घरातील वातावरण पवित्र व्हावं ह्या उद्देशाने साखरचौथीच्या दिवशी आपल्या घरात गणपतीची स्थापना करतात. अजून एक प्रथा म्हणजे गणेश चतुर्थीच्या काळात जर घरात काही सुयेर किंवा सुतक आले तर ते संपल्यावर त्यावर्षी साखरचौथीच्या दिवशी ते गणेशभक्त गणपतीची स्थापना करतात. हल्ली तर सणांची हौस म्हणून साखरचौथीचा सार्वजनीक गणपतीही आणला जातो. हा देखील ५ दिवस, १० दिवस अथवा २१ दिवसांचा ठेवला जातो. साखरचौथीच्या गणपतीच्या स्थापनेचा विधी गणेश चतुर्थीच्या विधी सारखाच केला जातो. फक्त गणपती बापाचे आवडते मोदक हे साखरेच्या पुरणाचे केले जातात. उंदीरमामाच्या मोदकांची कावड साखर भरुन केली जाते. गणेशचतुर्थीच्या दिवशी पहिल्या दिवशी चंद्र पाहिला जात नाही. काही जण तर चंद्र पहायचा नाही म्हणून घरातूनही बाहेर पडत नाहीत पण साखरचौथीला मात्र पुराण कथेत गणपतीने चंद्राला जो उ:शाप दिला होता तो पाळावा लागतो. त्यामुळे चंद्रोदय झाल्याशिवाय, चंद्राचे तोंड पाहिल्या शिवाय गणपती बाप्पाला नैवैद्य दाखविला जात नाही. आधी चंद्राची पूजा केली जाते. आरती करताना ती ताटात, ताम्हणात नसून मोठ्या परातीत केली जाते. साखरेचे मोदक, ५ दिवे, काकड्यांच्या जाड्या गोल चकत्या करुन एक आख्ख केळं, जिबिडाच्या ५ फोडी, एखाद फळ असे ठेवून काकडी व केळ्यात झेंडूची देठासकट फुले तुर्‍याप्रमाणे किंवा नारळाच्या झावळीच्या पातीची काड्यांमध्ये पाच फुले लावतात. ताटात नागदौण्याची फुले (कळलावी) ठेवतात. सजवण्यासाठी अजुन फुले लावतात. केळ्यावरच अगरबत्ती लावली जाते व या ताटाची आरती प्रथम चंद्राला ओवाळून मग गणपतीबाप्पाची आरती केली जाते. साखरचौथीचे व्रतासाठी महत्व असते. जे भक्त ११ संकष्टी, २१ संकष्टीचे व्रत करतात त्यांच्या व्रताची सांगता साखरचौथीच्या दिवशी केली जाते. मग ह्या दिवशी साखरेच्या मोदकांमध्ये एक मोदक मिठाचा खडा ठेवून केला जातो. उपास करणार्‍याने त्या दिवशी हे मोदक खाऊन उपास सोडायचा असतो. एक एक मोदक खाताना, मीठाचा खडा असलेला मोदक आला की जेवण बंद करायचे. पहिलाच मोदक मीठाचा आला तर मग तेवढाच खायचा. या उलट शेवटपर्यंत मीठाचा मोदक आला नाही तर? बापरे...... आमचा दीड दिवसाचा गणपती असतो. दुपार पर्यंत भरपूर पाहुण्यांची रेलचेल असते. संध्याकाळी बाप्पा निघायची लगबग सुरू होते. एक वेगळंच शांत वातावरण तेव्हा घरात पसरतं. लेक सासरी जाते तेव्हा जशी संमिश्र भावना मनात दाटते तशीच काहीशी. घरातून अगदी दारकशीबाहेर आणून बाप्पाची पाठवणी करताना आरती केली जाते. आणि मग 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' हे आग्रहाचे निमंत्रण बाप्पांना निघतानाच केले जाते. हाच जयघोष पूर्ण रस्ताभर चालू असतो. शेजारचे, त्या परिसरात असलेले गणपतीबाप्पा एकमेकांची वाट पाहत थांबलेले असतात निघण्यासाठी सगळे सोबतच निघतात. आमच्या इथे गणेशजयंतीच्या गणपती विसर्जना एवढीच गर्दी ह्या साखरचौथीच्या बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळी होते. वाट काढत रांगेत बाप्पा आपल्या भक्तांसोबत निघतात. विसर्जन स्थळी पोहोचल्यावर पुन्हा आरती करुन बाप्पाचे विसर्जन केले जाते. बाप्पांचे पाण्यात पूर्णपणे विसर्जन होईपर्यंत पाणीभरल्या डोळ्याने भक्त त्यांना निरोप देतात आणि पुढच्या वर्षीच्या त्यांच्या आगमनाची वाट पाहतात. माझ्या लग्नापुर्वीपासूनच माझ्या सासरी साखरचौथीच्या दिवशी गणपतीबाप्पा आणतात.आम्ही निसर्गप्रेमी म्हणून थर्माकोलचे वगैरे मखर न करता जास्तीत जास्त फुलांचे डेकोरेशन करतो. आमच्या कडे जेवण करण्या करीता ठेवलेल्या सुगरण बायकांनी हे दिवे केले. ९) माझ्या आईने अश्या प्रकारे मला ताट भरून दिले. ताटात मध्य भागी दिवे, बाजुला मोदक, जिबूडच्या, काकडीच्या पाच फोडी, त्यावर नागदौणा (कळलावी) ची फुले, नारळ, एक फळ, पाच केळी त्या केळींच्या वर नारळाच्या पातीतील काडीचे तुकडे करुन त्यात पाच फुले ओऊन ती केळींमध्ये खोचली आहे. पानाचा विडा १०) ११) १२) १३) दिवे लागल्यावर ही आरती तेजोमय झाली व सगळ्या पाहुण्यांची ह्याचे फोटो काढायची रिघ लागली. १४) १५) १६) अंगणात ररांगोळी काढून हे ताट चंद्राच्या पुजेसाठी पाटावर ठेवले व चंद्राला हळद कुंकु वाहुन ह्या ताटाने ५ जणींनी चंद्राची आरती ओवाळली. १७) त्या आधी गणपती बाप्पाची आरती झाली. १८) १९) दुसर्‍या दिवशी बाप्पा विसर्जनासाठी तलावावर केलेली आरती. २०) बाप्पा विसर्जनाला निघाले. २१) गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. पुढचे छोटे बाप्पा आमचे.

प्रतिक्रिया द्या
26979 वाचन

💬 प्रतिसाद (23)

अप्रतिम

परिकथेतील राजकुमार
Tue, 09/27/2011 - 12:25 नवीन
मस्त ग जागु तै :) मागणी केल्या केल्या येवढा सुंदर माहितीपूर्ण लेख टाकल्याबद्दल आभार. वाचनखून साठवल्या गेली आहे. सजवलेल्या ताटाचे फटू तर मस्तच. बाकी हे 'जिबूड' काय प्रकरण आहे ?
ह्या स्थापनेमागचा दुसरा उद्देश म्हणजे हल्ली विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालली आहे. त्यामुळे काही हौशी भक्त मूळ कुटुंबात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती असल्यामुळे आपल्याही घरात गणपती यावा, आपल्या घरातील वातावरण पवित्र व्हावं ह्या उद्देशाने साखरचौथीच्या दिवशी आपल्या घरात गणपतीची स्थापना करतात.
हे आवडले. (लेख चुकीच्या विभागात पडला अहे, तो कोणी हलवेल काय ?)
  • Log in or register to post comments

असेच म्हणते

चित्रा
Wed, 09/28/2011 - 04:36 नवीन
>येवढा सुंदर माहितीपूर्ण लेख टाकल्याबद्दल आभार. प्रसन्न करणारे फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धन्स राजकुमार. जागा खरच

जागु
Tue, 09/27/2011 - 12:39 नवीन
धन्स राजकुमार. जागा खरच चुकली आता काय करायच ? एडीट करुन पण काही होत नाही.
  • Log in or register to post comments

चिंता नक्को

परिकथेतील राजकुमार
Tue, 09/27/2011 - 12:53 नवीन
संपादक हलवतील धागा योग्य विभागात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जागु

चुकून चुक झाली असे वाटते.

पाषाणभेद
Wed, 09/28/2011 - 00:16 नवीन
चुकून चुक झाली असे वाटते. सवयीचा परीणाम असावा. बाकी लेख वाचून साखरचौथी व्रताची नवीन माहीती समजली. साखरचौथी हे नाव कसे पडले असावे? साखर वापरतात म्हणून हे असावे. पण साखर पुर्वीपासून होती का? शतकांपुर्वी गूळ असायचा. मग त्यावेळी हे व्रत होते की नव्हते? असल्यास ते व्रत गुळचौथी असावे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

बर चालेल.

जागु
Tue, 09/27/2011 - 12:58 नवीन
बर चालेल.
  • Log in or register to post comments

वा वा..!!!

नरेश_
Tue, 09/27/2011 - 13:10 नवीन
फारच सुंदर फोटो + वर्णन + हौस खरंच अशी हौस असायला पाटील / म्हात्रे / भोईर घराण्यात जन्मा यावे लागते. :) शंकानिरसन : जिबूड / चिबूड म्हणजे टरबूजाची खास रायगड स्पेशल एडिशन ;) (भोईरांचा जावई)- नरेश.
  • Log in or register to post comments

आता जिबुड शोधून मला जिबुडाचा

जागु
Tue, 09/27/2011 - 13:14 नवीन
आता जिबुड शोधून मला जिबुडाचा फोटो काढायला लागेल. कामाला लावलत अजुन एक. सध्या भरपुर येत आहेत बाजारात. भोईरांचे जावई धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुंदर

जाई.
Tue, 09/27/2011 - 17:47 नवीन
फोटो आणि लेखन दोन्हीही अप्रतिम आहेत. :)
  • Log in or register to post comments

+१

मदनबाण
Tue, 09/27/2011 - 17:50 नवीन
हेच म्हणतो म्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.

जाई, मदनबाण धन्यवाद.

जागु
Tue, 09/27/2011 - 19:14 नवीन
जाई, मदनबाण धन्यवाद.
  • Log in or register to post comments

भारी!!

प्रभो
Tue, 09/27/2011 - 19:29 नवीन
भारी!!
  • Log in or register to post comments

मस्त ग!

पैसा
Tue, 09/27/2011 - 19:39 नवीन
जागु, फोटो नेहमीसारखे सुरेख आहेतच, पण या निमित्ताने एक नवीन प्रथा कळली.
  • Log in or register to post comments

जागुतै, मस्त लेखन. पैसाताईशी

रेवती
Tue, 09/27/2011 - 19:49 नवीन
जागुतै, मस्त लेखन. पैसाताईशी सहमत. नवीन प्रथा समजली. फोटू छान आलेत. तुमच्याकडे नेहमीच्या गणपती उत्सवात आणलेला गणपती आणि हा गणपती वेगळा असेल ना? म्हणजे दोनदा गणपती आणायचा असतो. परा, जिबूड म्हणजे चिबूड किंवा टरबूज. कलिंगड नव्हे. केशरी गर असलेले चेंडूसारखे मोठे फळ.
  • Log in or register to post comments

रेवती नाही नाही एका घरात

जागु
Tue, 09/27/2011 - 19:55 नवीन
रेवती नाही नाही एका घरात कुठला तरी एकच असतो. दोनदा नाही आणला जात. मी सविस्तर लिहिले आहे वर.
  • Log in or register to post comments

सुंदर !

प्राजक्ता पवार
Tue, 09/27/2011 - 22:06 नवीन
माहितीपूर्ण लेख .
  • Log in or register to post comments

ज्योती, प्रभो, प्राजक्ता

जागु
Tue, 09/27/2011 - 22:58 नवीन
ज्योती, प्रभो, प्राजक्ता धन्स.
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण लेख + फोटो पण छान

अविनाशकुलकर्णी
Tue, 09/27/2011 - 23:30 नवीन
माहितीपूर्ण लेख + फोटो पण छान आहेत..
  • Log in or register to post comments

जागु ताइ लेख खुप अवडला...

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/27/2011 - 23:51 नवीन
जागु ताइ लेख खुप अवडला... तुमच गाव रायगड जिल्ह्यात कुठे येतं?...माझं अजोळ हरिहरेश्वर आहे... :-)
  • Log in or register to post comments

:)

पल्लवी
Wed, 09/28/2011 - 10:08 नवीन
सहीच. दिवे किती सुबक केले आहेत ! :)
  • Log in or register to post comments

स्वीटमेलन...

प्रभाकर पेठकर
Wed, 09/28/2011 - 10:31 नवीन
जीबूड्/चिबूड म्हणजे स्वीटमेलन. हे बाहेरून दिसायला राखाडी/पांढर्‍या रंगाचे असून आतून पांढरे/नारंगी रंगाचे असते. अतिशय पाणीदार, मऊ, गोड आणि विशिष्ट मधूर उग्र वासाचे असते. ह्याच्या विविध जाती/प्रजाती आहेत. रंगात, चवीत काही प्रमाणात फरक असू शकतो. गुगल वर स्वीटमेलन किंवा कँटलोप नांवाने शोधल्यास चित्र आणि इतर माहिती मिळेल. लेख माहितीपूर्ण आणि मोजक्या शब्दात मांडला आहे. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

आभार

ऋषिकेश
Wed, 09/28/2011 - 10:41 नवीन
सुंदर! नवी माहिती + प्रथा समजली फोटू देऊन उत्साहपूर्ण वातावरणात नेल्याबद्दल आभार
  • Log in or register to post comments

अविनाश, पराग, पल्लवी,

जागु
Wed, 09/28/2011 - 12:27 नवीन
अविनाश, पराग, पल्लवी, प्रभाकर, ऋषीकेश, धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा