Skip to main content

पुनर्जन्म आणि कर्मविपाक

लेखक शरद यांनी बुधवार, 21/09/2011 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
पुनर्जन्म आणि कर्मविपाक श्री. रमताराम यांनी लिहलेला लेख मनोरंजक होता. नावच "रमताराम" असल्याने त्यांनी "फिरस्त्या"सारखी "धर्म. समाज, जीवनमान, मौजमजा,.. विरंगुळा " इत्यादि विभागातून आपला लेख फिरवला. मजा आली. पण एक राहिलेच. "माहिती". पुनर्जन्म (व विशेषत: कर्मविपाक ) या विषयी पूर्वासूरींनी काय विचार मांडले आहेत याची माहिती सर्वांना असतेच असे नाही. मग "एक चांगले कृत्य दुसर्‍या वाईट कृत्याच्या परिणामाला नाहिसे करते का ? " असे प्रश्न मनात उद्भवतात.( मागे या संबंधी लेख आला होता का हे मला माहीत नाही. असल्यास कृपया त्याचा संदर्भ द्यावा.) ही "माहिती" आहे, माझे मत नाही. सगळ्यांना हा विचार पटलाच पाहिजे असे नाही. तसेच सर्व प्रश्नांना उत्तरे मिळतीलच असेही नाही. पण प्रत्येकाला हे प्रश्न पडतातच व पूर्वीच्या विचारवंतांनी , (याचा दुसरा अर्थ धार्मिक विचारवंतांनी) काय मते मांडली ते आता पाहू. पुनर्जन्म हिन्दू, बौद्ध व जैनांनी स्विकारला आहे. मुसलमान व ख्रिश्चन धर्मांनी नाही. पहिल्या तिघांच्या विचारात थोडेथोडे फरक आहेत. आपण फक्त हिन्दू विचारसरणी बघू. प्रत्येक जण बघत असतो की या जगात काही जण सुखसंपदेत जगतात तर काही जण दु;खविपदेत. सज्जन कष्ट भोगतात तर दुष्ट मजा करतात. हे असे का ? याचे उत्तर सापडत नाही. कोणताही "तर्क" याचे पटणारे उत्तर सांगू शकेल असे नाही. पण प्रयत्न अनेकांनी केला. जेंव्हा या जन्मातील बरीवाईट कृत्ये व या जन्मातील भोगावी लागणारी सुखदु:खे यांचा सुसंगत मेळ जमवता येईना तेंव्हा असे मत मांडले गेले कीं मागे या माणसाचा जन्म होता व त्यावेळी त्याने केलेल्या चांगल्या कृत्यांची चांगली फळे त्याला आज मिळत आहेत मग भले तो आज वाईट वागेना का ! आज सज्जन असणार्‍या माणसाने मागील जन्मी पाप केले असेल तर त्याला त्याचे फळ आज भोगलेच पाहिजे. मागचा जन्म म्हटले कीं पुनर्जन्म आला व कर्माची फळे चुकत नाहीत हा कर्मविपाक सिद्धांत आला. ऋग्वेदात पुनर्जन्माचा विचार आला आहे. . ऋ.१०.१६.३ व रु.१.१६४.३१-३२ इथे या कल्पनेचा उगम आहे व नंतर कठोपनिषद, बृहदारण्यक, छांदोग्य व कौषितकी या उपनिषदांमध्ये त्याचा विस्तार झाला. कर्मविपाकाचा विचार याचवेळी वाढला. पुनर्जन्म व श्राद्धकल्पनेत विसंगती आहे कारण मृत पूर्वजांचे आत्मे पुनर्जन्म घेतल्यानंतरही १०० वर्षांनी पिंड ग्रहण कसे करू शकतील ? गीतेत मनुष्य जीर्ण वस्त्रे टाकून नवी वस्त्रे धारण करतो तसे आत्मा जीर्ण शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो असे म्हटले आहे. पुत्र-प्रपौत्र होऊन वंशसातत्य रहात असल्याने पुत्राच्या रुपाने वडील पुनर्जन्म घेतात असेही म्हटले आहे.हल्ली आजोबा नातवाच्या रुपाने परत येतात असेही समजले जाते. पुनर्जन्म ही कल्पना स्विकारावयाची असेल तर "आत्मा " ही कल्पना प्रथम स्विकारावीच लागते.कारण नाशवंत शरीर दुसरे रूप धारण करू शकणार नाही. पण आत्म्याला अविनाशत्व दिलेले असल्याने तो कुठल्याही शरीरात स्थलकालाबाधित प्रवेश करू शकतो. म्हणजे माणसाचा आत्मा कुत्र्याच्या शरीरात प्रवेश करू शकतो व तो कुत्रा मेल्यावर परत माणूसही होऊ शकतो. एक गंम त म्हणजे फक्त मानवच आपली प्रगती करून घेऊन "मोक्ष " मिळवू शकतो, या चक्राच्या बंधनातून सुटका करून घेऊ शकतो. पण पुन्हा असा प्रश्न पडला कीं पुनर्जन्म तरी का व्हावा ? मागच्या कर्माची फळे मी भोगली, संपले ! इथे " कर्मविपाका " चा संबंध येतो. "विपाक " याचा अर्थ परिणाम, शेवट किंवा फळ. कर्मविपाक म्हणजे तुम्ही केलेल्या कृत्यांची, कर्मांची फळे. ही तुम्हाला भोगावीच लागतात. उदा. मी चोरी केली. मला पकडले व त्या बद्दल शिक्षा झाली. मला कर्माचे फळ मिळाले; संपले. पण मी या ज्न्मात सापडलो नाही, मेलो. तरी ते फळ चुकत नाही. मला पुढील जन्मात त्याचे फळ भोगावे लागते. त्यातून सुटका नाही. प्रत्यक्ष परमेश्वरही त्यात ढवळाढवळ करत नाही.याचा अर्थ तुमचा पुनर्जन्म होतो कारण हिशोब चुकता केल्याशिवाय तुमची सुटका नाही. चांगल्या कर्माची शुभ फळे व वाईट कर्माची अशुभ. कर्माच्या जातीप्रमाणे (Gradation) फळाची जात. हा झाला सिद्धांत. पण या मध्ये बरेच प्रश्न अनुत्तरित रहातात. म्हणून काही जास्त कलमे-उपकलमे जोडली आहेत. ती बघू. काही कर्मे मागील ज्न्मांतील असतात. त्यांची फळे अजून भोगावयास सुरवात करावयाची असते.त्या पैकी काहींची सुरवात सुरू झालेली असते. काही चालू जन्मातील असतात.यांना निरनिराळी नावे दिली आहेत. यातील काही स्पष्ट अर्थ माहीत नसला तरी गोळाबेरिज अर्थ व्यवहारात नेहमी वापरले जातात. (१) संचित : कोण्याही मनुष्याने सांप्रतच्या क्षणापर्यंत केलेले कर्म म्हणजे संचित. ते मागच्या जन्मातील व या जन्मातील केलेया कर्मांची बेरीज. याला अदृष्ट किंवा अपूर्व असेही म्हणतात. अदृष्ट म्हणावयाचे कारण करतेवेळी कर्म दृश्य असते पण नंतर ते केवळ परिणाम रूपाने शिल्लक राहते. (२) प्रारब्ध : संचित कर्मांची फळे एकदम भोगता येत नाहीत. ती परस्पर विरोधीही असतात. बरीवाईट फळे एकाचवेळी कशी भोगणार ? जी कर्मे फलोन्मुख झालेली असतात म्हणजे ज्यांची फळे मिळावयास सुरवात झालेली असते त्यांना प्रारब्ध म्हणतात. (३) क्रियमाण : प्रारब्ध भोगत असतांना तुम्ही या जन्मीही कर्मे करत असताच. अशा कर्मांना क्रियमाण वा वर्तमान कर्मे म्हणतात. वर सांगितल्याप्रमाणे या कर्माचे फळ तात्काळ मिळाले तर भो्ग तेथेच संपतो. पण तसे झाले नाही तर पुढी्ल जन्माकरिता तो तुमच्या खात्यात जमा होतो. असा हा चक्रव्युह आहे. मागील जन्मांची फळे आज भोगा व या जन्माची फळे भोगावयास पुढचा जन्म घ्या. यातून सुटका कधीच नाही कां ? नसेल तर सगळेच निरर्थक ठरेल. आहे. सुटकेचा मार्ग आहे. कर्म करूच नका. फळ नाही, पुनर्जन्म नाही. अर्जुनाने हाच मुद्दा मांडला. भगवान म्हणाले " मुर्ख आहेस. कर्मे चुकत नाहीत. जगतो आहेस तोवर कर्मे करावीच लागतात." हा ही मार्ग खुंटल्यावर भगवान दिलासा देतात. तेच गीतेचे मर्म म्हणावयास हरकत नाही. फळे कर्म केले म्हणून मिळत नाहीत. त्या कर्मामागे तुमची जी वासना आहे, कामना आहे त्यामुळे फळे मिळतात. कामना नसेल तर कर्म करूनही फळ मिळणार नाही. तेव्हा भगवंतांचे सांगणे असे की निष्काम बुद्धीने, फळे मला अर्पण करून युद्ध कर, या कर्माची बरीवाईट फळे तुला भोगावी लागणार नाहीत. परमेश्वराने एकदा ही सृष्टी निर्माण केली व त्याचे नियम लागू केले की मग तो यात ढवळाढवळ करत नाही.विस्तवाने हात भाजतो हा नियम. मग तो सर्वांना सर्वकाळ लागू होतो.( दुर्जनांना तसेच सज्जनांनाही) तसेच एकदा तुम्हाला बुद्धीस्वातंत्र्य दिले की ते कसे वापरावे ही तुमची जबाबदारी. तुम्ही ती चुकीच्या मार्गाने वापरली व त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागले तर मग ईश्वराला दोष देणे बरोबर नाही. कर्माचे फळ नेमून दिले की मग तो उदासिन राहतो.त्याला विषमता व निर्दयता हे दोष लागत नाहीत.(वे.सू.२.१.३४. "पेरलेलेच उगवते व पेराल तेच उगवेल " हा सृष्टीनियम असल्याने तुम्ही आपल्या विपदांबद्दल ईश्वराला जबाबदार धरू शकत नाही. तुमची फळे तुम्हालाच भोगावयाची असतात. ती दुसर्‍याला देता येत नाहीत व दुस‍याला ती घेता येत नाहीत. एका दुष्कृत्याचे फळ दुसर्‍या सत्कृत्याने नाहीसे होत नाही. सत्कृत्याचे फळ मिळेल पण दुष्कृत्याचे भोगावेच लागेल. कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य यांचा संबंध असा की या स्वातंत्र्याने आज फक्त सत्कृत्ये करा व पुढील जन्म सुखात घालवा ; त्याच वेळी ( मागील दुष्कृत्यांची ) प्रारब्धाची फळे भोगतांना विवेकाने ती सुसह्य होतात याकडे लक्ष द्या. तुम्ही एखाद्याला मदत केली व त्याची दु :खे कमी केलीत म्हणजे काय झाले ? त्याच्या प्रारब्धातील सत्कृत्यामुळे तुम्हाला तशी बुद्धी झाली व त्याची दु:खे कमी झाली व त्याच वेळी तुमच्या यादीत सत्कृत्याची भर पडली. बायकोने " हा पती मला सात जन्म मिळावा " असे व्रत केल्याने नवर्‍याच्या नशिबात ढीम काही फरक पडत नाही. एक मोठा विषय थोडक्यात लिहावयाचा असल्याने बर्‍याच गोष्टी राहिल्या आहेत. नाइलाज अहे. शरद

वाचने 21780
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

- अगदी योग्य ! गुरु हाच यातून मार्ग काढून बाहेर नेउ शकतो. माझ्या माहितीप्रमाणे गुरु प्रारब्धात ढवळाढवळ करु शकतो..पण अनन्यता ( शिष्याची) आणि योग्यता ( गुरुची) असयला हवी. कदाचित याचा अन्वयार्थ असाही असेल की गुरुपाशी अनन्यभावाने शरण गेल्याने क्षुद्र शरिरिक अथवा मानसिक दु:खाची तमा वाटत नाही..कोणत्याही अवस्थेत चित्ताची समतोलता रहात असल्याने दु:खाची जाणीवच नाहीशी होते. ( ईन्सुलेशन ) पण प्रत्यक्ष दु: ख भोगावेच लागते.... .. कारण कर्माचा सिद्धांत ! सुयोग्य गुरु हाच खरा प्रश्न आहे आणि आपली अनन्यता हा त्याहीपेक्षा महाकठीण प्रश्न आहे!

वाचकांसाठी काही दुवे :--- http://en.wikipedia.org/wiki/Reincarnation http://www.youtube.com/watch?v=hZhMDU9GcVg&feature=related http://www.youtube.com/watch?v=lB_j-chZvR0 जाता जाता :--- ही चित्रे माझ्यावर बराच प्रभाव टाकुन गेली आहेत.