Skip to main content

दर्शन लालबागच्या राजाचे...

लेखक सुहास झेले यांनी रविवार, 11/09/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्रीच्या सुमारास गेट वेच्या उधाणलेल्या समुद्रात काही सेकंदासाठी एक तेजस्वी प्रकाश पसरला. दिल्लीत परवा बॉम्बस्फोट झाला, त्यामुळे आज पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त होता. कोणाला वाटलं तो कॅमेराचा फ्लॅश आहे, तर कोणाला वाटलं लाईट हाऊसचा दिवा. कोणी ते विशेष गांभीर्याने घेतलं नाही आणि दुर्लक्ष केलं. इतक्यात एका हवालदाराने अंधारात उभ्या असलेल्या व्यक्तीला हटकले, "ए कोण रे तू, इतक्या रात्री इथे काय करतोयस, दिसत नाही इथे यायला बंदी आहे ते??" "नारायण नारायण...वत्सा तू मला ओळखले नाहीस काय? (हातातल्या चिपळ्या वाजवत) मी नारदमुनी, देवलोकी माझा मुक्काम असतो" पिऊन आला आहेस वाटतं? कुठे चालला आहेस? आणि .. हाता-पायाला गजरे, लांब केस, हा अवतार कसला रे? - इति हवालदार "देव तुला क्षमा करो, पण मी जरा घाईत आहे. मला वाटतं मी चुकीच्या ठिकाणी आलोय. असो मला लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायचे आहे... मी निघतो ...!!! ऑ.. तो हवालदार काही बोलायच्या आत नारदमुनी तिथून अदृश्य !! इकडे नारदमुनी लालबागच्या राजाच्या, इति मुंबईच्या राज्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोचले. तिथे पोलिसांनी परत त्यांना हटकले, आणि रांगेकडे काठी दाखवून, तिथं उभं राहायला सांगितले. मुनींनी मान वाकडी करून रांगेच्या शेवटचा अंदाज घेतला, आणि हताशपणे आकाशाकडे बघितले. तर लगेच तिथला एक कार्यकर्ता त्यांच्यावर खेकसला, "ए चल, मागे जा, दिसत नाही का इतकी लोकं इथे दर्शनासाठी उभी आहेत? चल मागे जा !!!" नारदमुनी आता वरमले, आणि पुढल्याक्षणी ते अदृश्यरुपात राजाच्या मंचावर अवतरले. मंचासमोर भक्तांची दर्शनासाठी अलोट गर्दी लोटली होती. गणपती बाप्पा मोरयाचा नाद आसमंतात दुमदुमत होता. राजा सर्वांना मनोभावे आशीर्वाद देत होता. तितक्यात राजाचे लक्ष नारदमुनींकडे गेले, डोळ्यात आश्चर्यकारक भाव दाटले आणि गडबडीत सिंहासनावरून पायउतार होऊ लागले. तो नारदमुनींच्या पाया पडला. "नारायण ..नारायण !!! कसा आहेस गणेशा? भूतलावर सगळं आलबेल नं?" "हो मुनिवर्य, पण आपण अचानक इथे कसे येणं केलंत? मी येतंच होतो काही दिवसांनी देवलोकी..." "हो हो.. माहित आहे, आपला मुक्काम रविवारपर्यंत आहे इथे. आज भगवान विष्णू आणि भगवान शंकर चर्चा करत असताना आपला विषय निघाला. आपल्या आगमनाची इतकी जोरदार तयारी बघून दोघेही भारावून गेले, मग मलाही राहवले नाही आणि तुमचा दरबार बघायला आलो इथे." "अहो, दरबार कसला? लोकांची प्रचंड श्रद्धा आहे माझ्या ह्या रुपावर. जगाच्या कानाकोपऱ्यातून भक्तमंडळी इथे येतात..." "नारायण नारायण...!! हे ऐकून खूप आनंद जाहला राजा. आपली कीर्ती जगभर पसरली आहे. आपल्यासमोर भक्तांचा महासागर आहे. केवळ मुखदर्शनासाठी पाच-पाच प्रहर लोकं रांगेत उभे राहतात. "मुनिवर्य, माझ्याकडून काही अपराध झालाय का? मला आपण आदरार्थी सन्मान का देत आहात? मी आपल्यासाठी तोच गौरीपुत्र गणेश आहे" "नाही रे गणेशा, अपराध कसला.... इथे तू राजा आहेस, तेव्हा तुला मान मिळायला हवाच. तू भक्तांचा लाडका आहेस, ते तुला विश्वासाने, श्रद्धेने नवस बोलतात आणि ते नवस पुर्ण झाल्यावर तो फेडायला ही येतात मोठी-मोठी दक्षिणा घेऊन. तुझे स्वयंसेवक रोज किती दक्षिणा अर्पण झाली याची जाहीर घोषणा देखील करतात. तुझे भक्त तहानभुक विसरून रांगेत उभ्याने तुझ्या नावाचा गजर करत असतात. भांडणे होतात, बाचाबाची होते. तुझ्या मंडपाच्या सुरक्षेसाठी हजारो माणसं दिवसरात्र झटत असतात. त्यावरून त्यांचे तुझ्यावर असलेले प्रेम दिसले रे मला" (हे ऐकून राजा वरमला) "माफी असावी, पण ह्यात माझा काही दोष नाही. मी कुठल्याही भक्ताकडून कसलीही अपेक्षा करत नाही. भक्तगण इथे माझ्या दर्शनासाठी येतात याचा मला आनंद आहेचं, पण त्यांनी फक्त इथेच यावे असा माझा अट्टहास कधीच नसतो. मी तर इथल्या बाजार वसाहतीचा मूळ गणपती, त्यांनी श्रद्धेने माझी नित्यनेमाने स्थापना केली. पण हळूहळू मला मोठ्ठं केलं गेलं आणि आता मला इतकं मोठं केलंय की मला शब्दात वर्णन करता येणार नाही मुनिवर. हौसेला मोल नसते, तसेच श्रद्धेला ही नसते हे ही तितकंच खरं. केवळ अमुकतमुक ठिकाणाचा गणपती पावणारा, मग फक्त तिथे भक्तांचा नुसता खच पडलेला, पण माझ्या कुठल्या छोट्याशा पडीक मंदिरात माझ्यासमोर साधा दिवा लागत नाही किंवा वर्षोनुवर्षे माझी पूजा केली जात नाही" :( "गणेशा, शांत हो, मी समजू शकतो !! ही मानवाची मनोवृत्ती आहे रे. तो देवाला पुजतो, मनोभावे सेवा करतो. देवाला इतकंच हवं असतं हे मात्र विसरतो. मोठ्या देणग्या दिल्यावर देव श्रीमंत होत नाही, श्रीमंत होणार ती केवळ माणसंच. तू कुठल्याही अपेक्षेविना भक्तांच्या मनोकामना पुर्ण करतोस, पण हे त्यांना ह्या जन्मात कळणे अशक्य आहे. गणपती म्हटलं की तू किंवा सिद्धिविनायक, साईबाबा म्हटलं की शिर्डी अशी धारणा लोकांच्या मनावर बिंबवली गेली आहे, मग त्यासाठी त्यांचेच एखादे छोटे रूप आपल्या आसपास दुर्लक्षित राहिले तरी चालेल" :( "अगदी मनातलं बोललात तुम्ही मुनिवर, पण...पण मी कसं समजावू....काय करू मी?" "नारायण नारायण..!! हताश नको होऊस गणेशा, तुझ्या ह्या रुपाने जी स्वार्थी लोकं आपला फायदा उचलत आहेत, ते तू बघतो आहेसच, पण तुझ्या दर्शनासाठी आलेली ही भक्तमंडळी भोळी आहेत, तुझ्या भक्तीने त्यांना मानसिक समाधान मिळतंय त्यांना निराश नको करूस. सदैव तुझी कृपा त्यांच्यावर असू देत." "जशी आपली आज्ञा मुनिवर !!" (राजा नारदमुनींच्या पाया पडतो) "नारायण नारायण... चल गणेशा आता मला निघायला हवं. तुझा हा दरबार प्रत्यक्ष बघायचा होता म्हणून इथे आलो, पण मी जे बोललो ते लक्षात असू दे !!" "होय मुनिवर, अजुन थोडावेळ थांबता नाही का येणार? कितीतरी महिन्यांनी कोणाशी प्रत्यक्ष बोलायला मिळालंय" "माफ कर गणेशा, पण मला निघायला हवं. तुझ्या प्रवेशद्वारासमोर एका पडवीत गरीब कुटुंबाने तुझी मनोभावे स्थापना केली आहे. मला तिथे थांबायला जास्त आवडेल.. नारायण नारायण !!!" (नारदमुनी अदृश्य होतात. राजा हताशपणे आपल्या सिंहासनावर बसतो आणि भक्तांना हात वर करून आशीर्वाद देतो) - फोटो गुगलवरून साभार ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- तळटीप - कोणाला राग आला असेल तर मानून घ्या, मनात जे होत, तेच इथे प्रामाणिकपणे लिहायचा प्रयत्न केलाय. (मिपावर लिखाणाचा पहिला प्रयत्न, चूभूघ्याद्या) - सुझे :)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 9328
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

मस्त लिहिलंय... जे काही लिहिलंय ते आजचं वास्तव आहे. तसं पाहायला गेलं तर भांडुप पश्चिमच्या टेंभीपाडयाच्या एखादया मंडळाचा छोटासा गणपती आणि लालबागचा राजा हे दोन्ही गणपतीच. पण या लालबागच्या राजाच्या मंडळाने अगदी पद्धतशीर मार्केटींग केलंय. देव, भक्ती वगैरे सगळं राहीलं बाजूला. लालबागच्या राजाला जाणं हा आजचा स्टेटस सिंबॉल बनला आहे. असो. आणि "लालबागचा राजा नवसाला पावतो" या वाक्याबद्दल काही न बोलणंच उत्तम. राष्ट्रसंत तुकडोजी महराजांची एक ओळ आठवते, "देव एका जागी जागृत मग दुसर्‍या जागी काय ते भूत?"

देवाच्या नावे भक्तांना जागं करण्याची ही पण १ पद्धत आहे...बाकी तुंम्ही राग येणाय्रांचं अजिबात मनावर घेऊ नका...तुंम्हीच त्यांच्या मनाच्या कित्येक पातळ्या वर आहात हे जाणून उदार मनाने दुर्लक्ष करा... (जंसं ते या अश्या लेखां मधल्या आशयाकडे करतात,तंसं ;-) )...इसी लीये लडते रहो...मानवतावाद झिंदाबाद... लेख छान आहे..असेच लिहित रहावे ही विनंती... :-)

राष्ट्रसंत तुकडोजी महराजांची एक ओळ आठवते, "देव एका जागी जागृत मग दुसर्‍या जागी काय ते भूत?">>> अगदी अगदी. लोकांची मानसिकता हेरुन लोकांच्या श्रद्धा कॅश करणार्‍या लबाड स्वार्थी माणसांपुढे देवांनी सुद्धा हात टेकले आहेत हो. बादवे, सुहास लेख आवडला. पु.ले.शु.

मनात जे होत, तेच इथे प्रामाणिकपणे लिहायचा प्रयत्न केलाय.
प्रामाणिक प्रयत्न आवडला रे सुश्या. :)

लालबागचा तो राजा आणि इतरत्र प्राणप्रतिष्ठा करून बसविलेले गणपती त्याची प्रजा. गणपती-गणपतीत हा भेदभाव स्वार्थी माणसांनी निर्माण केला आणि मूर्ख भक्तांनी त्याला खतपाणी घातले आहे. घालत आहेत. 'अंधश्रद्धा' विषयावर चर्चासत्र आयोजित करणार्‍या दूरचित्रवाणी वाहिन्या आणि अग्रलेख लिहिणारी वृत्तपत्रेच ह्या पोकळ भक्तीभावाला, अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. मोठमोठे राजकारणी, अभिनेते आवर्जून (फक्त) प्रसिद्ध गणेशाच्या दर्शनाला येतात आणि आपल्यापरिने अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. रोजच्या रोज किती कोटी रुपये जमा झाले ह्याच्या बातम्या प्रसिद्ध करून 'राजा'च्या वाढत्या ऐश्वर्याचे प्रदर्शन मांडून अधिकाधिक मूर्ख भक्तांना आकर्षित करण्याचा, जास्तित जास्त 'दान' पदरात पाडून घेण्याचा रितसर यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. लालबागच्या राजाच्या अंगावर अमुक एक कोटीचे दागिने आहेत असे प्रसिद्ध केल्यावर लगेच गौड सारस्वत ब्राह्मणांच्या गणपतीच्या अंगावर किती (जास्त) कोटींचे दागिने आहेत ह्याची बातमी प्रसिद्ध होते. सर्व देवस्थानांना, तिथल्या पवित्र देवांना विश्वस्त मंडळांनी, संयोजकांनी सोन्यात आणि पैशात अक्षरशः पुरलं आहे. भक्ती भाव उरला आहे कुठे? 'देव भावाचा भुकेला', 'भाव तेथे देव', वगैरे उक्ती तोंडी लावण्यासाठीही ऐकू येत नाहीत. सिद्धी विनायकाच्या मंदिराच्या घुमटाला सोन्याचा पत्रा, ज्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात फकिरी पत्करली होती त्या, साईबाबांसाठी चांदीचे आसन आणि बुद्धीचे दैवत मानल्या गेलेल्या गणेशाच्या गळ्यात कोटी कोटींचे दागिने आणि अंधश्रद्ध भक्तां(?)च्या दानासाठी मैलोनमैल पसरलेल्या रांगा हा सर्व विरोधाभास अंगावर काटा आणणारा आहे. लालबागचा गणपती, गौडसारस्वतांचा गणपती, दगडूशेठ गणपती १-१/२ ते २ फूट उंचीचे असते आणि दागिन्यांनी मढविलेले नसते तर भक्तांची एवढी गर्दी उसळली असती का? भव्यतेचे, श्रीमंतीचे आकर्षण सर्वसामांन्याच्या मनात नेहमीच असते त्याचेच हे फलित आहे. त्याला स्वार्थी राजकारण्यांनी, मंडळांनी, विश्वस्तांनी 'श्रद्धे'चा बेगडी मुलामा देऊन स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले आहे. येणार्‍या पैशातून थोडेफार दिखाऊ समाजकार्य करायचे आणि स्वतःच्या तुंबड्या भरायच्या असा उद्योग अनेकांनी मांडला आहे. संत तुकडोजी महाराज, मदर तेरेसा ह्यांना समाज कार्य करताना कधी एवढ्या पैशांची गरज नाही भासली. आणि ह्या मंडळांच्या एवढ्या श्रीमंतीतूनही महाराष्ट्राच्या शेतकर्‍यांना आत्महत्येतून वाचविता नाही आले. पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरात(?) 'मानाचा गणपती' हे एक अजून प्रस्थ आहे. एक गणपती मानाचा बाकिचे काय अपमानाचे? मानाचा गणपती आधी निघणार तो पर्यंत इतर बापुड्या गणपतींनी ताटकळत खोळंबून राहायचे. गणपती गणपतीं मध्ये हा भेदभाव कोणी केला? विसर्जनाची मिरवणूक २५ तास, ३० तास हे सर्व कशासाठी? समाज जागृतीची गरज आहे. सरकार कडून काही सक्त कायदे करण्याची गरज आहे. सतीचा कायदा, हुंडा विरोधी कायदा, बालविवाह विरोधी कायदा ह्यांच्या जोडीला आता तथाकथित 'श्रद्धे' पोटी खर्च करण्यात येणार्‍या पैशांना लगाम घालण्यासाठी एखादा कठोर कायदा करण्याची आत्यंतिक गरज आहे.

लेख आवडला. प्रभाकरपंतांचा प्रतिसाददेखिल उत्तम. (पंत बर्‍याच दिवसांनी आले पण आता केवळ प्रतिसादमात्र न राहता विविध रेसिप्यांच्या पाऊस पाडतील काय?) (ठाण्याचा राजा) सुनील

In reply to by सुनील

लेख आवडला. प्रभाकरपंतांचा प्रतिसाददेखिल उत्तम.
सहमत आहे.

लेख मनापासून आवडला. 'नवसाचा', 'जागृत', 'पावणारा' अशी विशेषणे चिकटली की देवाचा 'ब्रँण्ड' झालाच म्हणून समजा. ही सगळी माणसाचीच करामत. आपला स्वार्थ साधण्यासाठी देवाचे ब्रँण्डीकरण करून पैसा गोळा करायचा आणि मग आपल्या शंभर पिढ्यांची सोय करून ठेवायची हा त्यामागचा शुद्ध हेतू. पुण्यात दगडूशेठ गणपती हा अगदी साधा, पटकन जवळ येणारा, मनसोक्त दर्शन देणारा गणपती होता. गेल्या ८-१० वर्षात पुण्यात बाहेरची मंडळी खूप जास्त प्रमाणात आली आणि आयटी, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसोबत सुबत्ता आली. मग आपल्या श्रद्धेचे फिल्मी पद्धतीने प्रदर्शन करण्याची गरज वाटू लागली. गणपती आधीच फेमस देव आणि त्यात दगडूशेठ हे आधीच एक बर्‍यापैकी प्रसिद्ध टूरिस्ट अ‍ॅट्रॅक्शन असल्याने गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली. आधी मूर्तीसमोरच्या तांब्यातून हाताने तीर्थ घेऊन गणपतीसमोर मनोभावे हात जोडणारा साधा भाविक दूर फेकला गेला. मग आला तो शंभर-शंभर रुपयांचे मोठे हार घेऊन आणि किलो-किलोभर पेढ्यांचे पुडे घेऊन नोटांची पुडकी दानपेटीत टाकणारा श्रीमंत भाविक! मग नुसते हात जोडून देवाच्या देवत्वाला नमस्कार करणारा सामान्य भाविक मागे पडला आणि श्रीमंत, गडगंज पैसा असणारा भाविक पुढे आला. त्याने कदाचित केलेल्या काही लबाड कृत्यांची सोयीस्कर क्षमा म्हणून तो नोटांची बंडले दानपेटीत टाकू लागला, पाच किलो चांदीचे मखर, दहा किलो सोन्याचे सिंहासन, पन्नास किलो सोन्याचे दागिने, दहा किलो मलई पेढ्यांचा नैवेद्य, साजूक तुपातल्या शंभर किलो जिलेब्यांचा नैवेद्य...श्रीमंतीचा थाट वाढतच गेला. साध्या भाविकाकडे काय होते? फारतर सव्वा रुपया आणि कधीतरी एखादे नारळ! त्याच्या मागण्याही किती साध्या असाव्यात? नोकरी मिळू दे, परीक्षेत पास होऊ दे, प्रमोशन मिळू दे....मग आपल्या गुणाने, मेहनतीने पास होणारा, प्रमोशन मिळवणारा, साधीशी नोकरी मिळवणारा सामान्य माणूस बाप्पाची कृपा म्हणून उत्साहाने एखादे फूल आणि नारळ घेऊन दर्शनाला यायचा. मी स्वत: कितीतरी वेळा अशा नमस्कारासाठी दगडूशेठ गणपतीला गेलेलो आहे. सरळ मूर्तीजवळ जाऊन (अगदी अर्ध्या-एक फूटावर मूर्ती असायची) नमस्कार करायचा, गुलाबाचे फूल अर्पण करायचे, तीर्थ घ्यायचे, समोर ठेवलेल्या भांड्यातून साखरफुटाण्याचे दोन दाणे तोंडात टाकून बाहेर यायचे. आता मला दगडूशेठ गणपतीचे इतरवेळी २०० फूटावरून आणि गणेशोत्सवात १००० फूटावरून दर्शन घ्यावे लागते. गणपती तोच पण बाकीचा थाट कितीतरी बदलला. भपका आला, श्रीमंती आली, सोन्या-चांदीचा लखलखाट आला, टीव्हीवरून २४ तास प्रक्षेपण आले, पेट्या भरून देणग्या आल्या...आणि तो गणपती दुरावला. शनिवारी (१०-सप्टें-२०११) दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो. अपेक्षेप्रमाणे अशक्य गर्दी होती. बाजूने दर्शन घेऊन जवळच असलेल्या व्यंकटेश बालाजी देवळात गेलो. अचानक दिसले म्हणून उत्सुकता चाळवली गेली होती. मला अशी साधी, जुनी देवळे खूप आवडतात. बालाजीचे इतके साधे पण प्रसन्न देऊळ बघून मला आश्चर्य वाटले. बालाजी तसा पंचतारांकित देव! पण देऊळ खूप छान होते. जुन्या पद्धतीचा गाभारा, प्रदक्षिणेसाठी छोटीशी बोळवजा जागा, बाहेर मंडपात जुने खांब आणि त्यावर देवदेवतांच्या जुन्या तसबिरी, गाभार्‍यात दोन समया मंद तेवत होत्या. खूप शांत वाटत होते. बाहेर दगडूशेठसाठी भक्त धडपडत होते; गर्दीचा महापूर उसळला होता आणि इकडे हा बालाजी शांतपणे आतून सगळी गंमत बघत होता. काय म्हणावे या विरोधाभासाला? त्यामानाने सारसबाग गणपती अजून बराच मध्यमवर्गीय आहे. छान वाटते तिथे. ती मंडळी मार्केटिंगमध्ये कमी पडली बहुधा. शिर्डी, तिरुपती, वैष्णोदेवी, सिद्धीविनायक, अजमेरचे ख्वाजा मोईउद्दीन चिश्ती बाबा दर्गा, थोड्या प्रमाणात हाजी अली, अमृतसरचे सुवर्णमंदिर ही सगळी पंचतारांकित भक्तीकेंद्रे आहेत. खिसा वजनदार असेल तरच हे सगळे देव पावतात असा नियम असावा बहुधा... --समीर

In reply to by समीरसूर

प्रतिसाद तर आवडलाच पण जुन्या देवळाचे वर्णन मस्त! लगेच शांत वाटायला लागलं. पाच मिनिटं अश्या ठिकाणी (अगदी नास्तिकांनीही) जाऊन पहावे. अगदी मनात खोल उतरत जाणारी शांतता अनुभवता येते. अश्याच वेळी मला नेहमी भरून येते. नव्या जागी येताना जुन्या मित्रांपकी एकाने स्वामीनारायन मंदीराला भेट देण्याचा आग्रह केल्यावरून जाऊन आलो. फार छान वाटले व तसे त्यांना कळवले तर लगेच १००० डॉलर्स डोनेशन मंदीराला द्या म्हणून मागे लागले आहेत. एक हजार डॉ. आपण कुठेही खर्च करतो आणि समजतही नाही तसेच ते देवळाला दिले तर चांगले काम होईल म्हणाले. आता १००० डॉ. न समजता कुठे गेलेत काय याचा मी अंदाज घेतला.;)

In reply to by प्रभो

गप रे मेल्या! त्यांच्या चांगल्या कामाला चांगलं म्हणायला काय जातय रे तुझं? पण १००० ह डॉलर्स तर कसेही न समजता खर्च होतात या विधानाशी सहमत नाही.

लेख वाचला, प्रतिक्रियाही वाचल्या. तूर्तास नो कॉमेन्टस् या निमित्ताने येथे इतकेच विनम्रपणे नमूद करू इच्छितो की मिपाची सुरवात ही लालबागच्या राजाच्या आशीर्वादानेच झाली. देव हा एकच. सगळीकडेच सारखा. अर्थात, 'एक तत्त्व नाम'! हे पूर्णत: मान्य करून असेही नमूद करावेसे वाटते की आमची मात्र लालबागच्या राजावर (किंवा असे म्हणुया की लालबाग येथे 'लालबागचा राजा' या नावाने ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते ती मूर्ती!) अगदी नितांत श्रद्धा आहे.. लालबागच्या राजाचा विजय असो.. तात्या.

"माफ कर गणेशा, पण मला निघायला हवं. तुझ्या प्रवेशद्वारासमोर एका पडवीत गरीब कुटुंबाने तुझी मनोभावे स्थापना केली आहे. मला तिथे थांबायला जास्त आवडेल.. नारायण नारायण !!!"
"अवश्य रे नारदा. जमल्यास पुन्हा ये सवडीने..!" "आणि हो, जाता जाता "इथे मात्र अवश्य चक्कर टाक..!" :) तेवढीच तुझ्या ज्ञानात/बुद्धीत भर...! ;) -- (बुद्धीदाता) लालबागचा राजा.

In reply to by विसोबा खेचर

अलभ्य लाभ म्हणायला हवा... तात्यांनी माझ्या लेखावर प्रतिसाद दिला ;-) तात्या, जी लिंक दिली तिथे चक्कर टाकली, किंवा म्हणता येईल की मी सुद्धा त्यांच्या उपक्रमात ह्या न त्या कारणाने सहभागी आहे. माझं वावडं त्या लालबागच्या राजाशी नाही आहे, हे इथे स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. मी स्वतः ६-७ तास रांगेत उभं राहून दर्शन घेतलं आहे त्याचं. असो, वर दिलेले असंख्य मिपाकारांचे प्रतिसाद हे कोण्या नास्तिकाचे नाहीत. सगळेच देवाचे भक्त आहेत. मुद्दा हा आहे की आता आता भक्ती दाखवण्याची पद्धत बदलली आहे, हेच मला अधोरेखित करायचे होते.... :)

श्री. विसोबा खेचर ह्यांनी दिलेल्या 'लिंक'ला भेट दिली. लालबागच्या राजा(?)च्या 'कमाई'तील काही अंशी संपत्तीचा विनियोग फार चांगल्या प्रकारे समाजकार्यासाठी केलेला दिसतो आहे. त्या बद्दल त्यांचे करावे तितके कौतुक कमीच म्हणावे लागेल. हार्दीक अभिनंदन. पण हा सारा पैसा आला कोठून? कोट्यावधी भकतांच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालून, श्री. गणेशाच्या अंगाखांद्यावर त्याच्या 'श्रीमंती'चे उथळ प्रदर्शन मांडून, 'नवसाला पावणारा' असा प्रचार करुन किंवा अनायसे तसा तो होत असेल तर त्याला प्रतिबंध न करता हे साधलं जातं. स्पर्धेच्या युगात अनेकांच्या मनांत नैसर्गिकरित्या जे वैफल्य निर्माण होते त्यांना खोटा आशेचा किरण दिसतो तो देवादिकांमध्ये. मी फक्त लालबागचा गणपती किंवा गौड सारस्वत ब्राह्मणांचा गणपती किंवा दगडूशेठ गणपती बद्दल बोलत नाहीए. पण ह्याच जनतेच्या वैफल्यग्रस्त अवस्थेचा फायदा मोठमोठ्या देवस्थानांना मिळतो. नवसांचा, देणग्यांचा ओघ सुरु होतो. देवाला अर्पण केलेल्या ह्या देणग्यांचा विनियोग करण्याचा अधिकार त्या मुर्तीला नसतो तो असतो देवस्थानाच्या विश्वस्तांकडे. त्यांचा फायदा जास्तितजास्त देणग्या मिळविण्यात असतो. त्यांचा धंदा तेजीत चालण्यासाठी भक्तांच्या 'अंधश्रद्धे'लाच 'श्रद्धा' असे गोंडस नांव देण्यात येते. काही समाजकार्य जरूर घडते. त्यातून विश्वस्तांचा समाजात मान वाढतो. त्यामुळे आर्थिक फायद्यासाठी किंवा मानमरातबासाठी 'दुकान' चालू राहणे आवश्यक असते. पण ह्या समाजकार्यासाठी, आर्थिक फायद्यासाठी, मानमरातबासाठी ज्या पद्धतशीरपणे भक्तांना अंधश्रद्ध बनविले जाते, मनाने पंगू बनविले जाते ते समाजघातक आहे. ह्या देवस्थानांनी केलेल्या समाजकार्याचा पडदा डोळ्यांवर ओढून त्या समाजघातक वृत्तीकडे डोळेझाक करता येत नाही. लालबागचा गणपती, गौड सारस्वत ब्राह्मणांचा गणपती किंवा दगडूशेठ गणपती ह्या देवस्थानांमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत नसेलही पण त्यांना पाहून आपापल्या गणपतींना मोठेपण (आकाराने आणि ऐश्वर्याने) बहाल करून त्यावर आपली पोळी भाजणार्‍या अनेक गणेश मंडळांना जन्म देण्याचे कार्यही कळत नकळत ह्या देवस्थानांकडून घडते आहे. हुंडा पद्धत का बंद करावी लागली? ज्यांना परवडतं ते आपल्या मुलीला चांगला वर मिळावा म्हणून भरमसाठ हुंडा देतात. त्याच्या हुंड्याचा 'रेट' पाहून सामान्य समाजही आपापल्या मुलांचा 'रेट' ठरवतात. मुलींचे बाप ह्या स्पर्धेत भरडले जातात. मुलाचा बाप म्हणतो,' मी मुलाच्या शिक्षणावर इतका-इतका खर्च केला आहे, तेवढा मला मिळालाच पाहिजे'. म्हणजे तोही पैसा 'शिक्षणा' सारख्या उदात्त कार्यासाठी घेत असतो. मग हुंड्याला विरोध का असावा? मुलीच्या बापाची अगतिकता आणि लग्न जुळत नसल्याने आलेले वैफल्य त्याला माहित असते. 'जातो कुठे, देईल हुंडा' हि वृत्ती असते. ह्यात आणि देवस्थानांच्या देणग्यांमध्ये फार फरक दिसत नाही. वैफल्यग्रस्त भक्त जाणार कुठे? येतोच देवाच्या पायाशी. आपलं काम व्हावं म्हणून देतो देवाला 'लाच'. पुण्यात गल्लोगल्ली गणेश मंडळं आहेत. आधी एक मंडळ असतं. त्यात भांडणं होतात.(कारणं आपणा सर्वांना माहित आहेतच). एका मंडळाची दोन मंडळं होतात. पुढे तिथेही भांडणं होतात दोनाची चार मंडळे होतात. अमिबा सारखी मंडळं वाढत जातात. भक्तांची कमी नसते. पैसा येत राहतो. प्रत्येक नविन मंडळ जुन्या मंडळावरील 'खुन्नस'मुळे आपल्या गणपतीला 'मोठ्ठा' करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करतात. ह्याला आवर कसा घालावा? मला काही उपाय सुचतात. १) प्रत्येक १५ किलोमीटर परिस॑रात जास्तीत जास्त एकच सार्वजनिक गणपती असावा. २) गणपतीची मुर्ती २ फुटांपेक्षा जास्त उंच नसावी. ३) मुर्तीवर सोन्या-चांदीचे दागिने नसावेत. फुलाच्या माळा असाव्यात. ४)मंडप आरास १० बाय १० फुट पेक्षा मोठी नसावी. ५) सार्वजनिक रस्ते अडवून मंडप उभरू नये. ६) वाद्यांवर बंधन असावे. ७) विसर्जन मिरवणूक १ तासापेक्षा जास्त वेळ चालू नये. ८) जमा झालेल्या सर्व देणग्या विसर्जनानंतर १० दिवसांत सरकारात जमा कराव्यात. मी अश्रद्ध नाही. मी कुठल्याही देवस्थानाच्या, मंडळाच्या विरोधात नाही. मी देवांचा हा जो बाजार मांडला जातो आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे.

In reply to by प्रभाकर पेठकर

प्रभाकर पेठकर काकांच्या काहि सुचना आहेत त्या बद्दल माझि स्वतःची वैयक्तिक मत १) प्रत्येक १५ किलोमीटर परिस॑रात जास्तीत जास्त एकच सार्वजनिक गणपती असावा. हि अट सध्याच्या घडीला कोणी मान्य करु शकत नाही २) गणपतीची मुर्ती २ फुटांपेक्षा जास्त उंच नसावी. कबुल मुर्तीच पावित्र टिकुन रहाव ह्यासाठी उंच उंच मुर्ती विसर्जनस्थळी नेताना अपघात होउ शकतो ३) मुर्तीवर सोन्या-चांदीचे दागिने नसावेत. फुलाच्या माळा असाव्यात. देवाला जर एखाद्या भक्ताने दिला एखादा दागिना तर तो तर घातलाच पाहिजे ना काका ४)मंडप आरास १० बाय १० फुट पेक्षा मोठी नसावी. १० बाय १०च्या मंडपाने काय होते काका ५) सार्वजनिक रस्ते अडवून मंडप उभरू नये. मुंबईसारख्या शहरात हे शक्य नाहि हो ईकडे मोकळी मैदान नाहित आणि मंडप जास्तीत जास्त १५ दिवस असतो काका.. ६) वाद्यांवर बंधन असावे. वाद्यांवर बंधने असण्यापेक्षा ती वाजवण्यावर काहि नियम घालावेत ७) विसर्जन मिरवणूक १ तासापेक्षा जास्त वेळ चालू नये. १ तास शक्य नाहि ते नीट विचार केलात तरी शक्य नाहि ८) जमा झालेल्या सर्व देणग्या विसर्जनानंतर १० दिवसांत सरकारात जमा कराव्यात. चला राजकारण्याना भ्रष्टाचाराला अजुन एक कुरण उपलब्ध करुन देउया

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

श्री. घाशिराम कोतवाल १.२ प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद. माझ्या सुचना ह्या सद्य समस्येवरील एक भावनिक स्पंदन आहे असे म्हणायला हरकत नाही. त्याचे नियमांमध्ये रुपांतर करताना कांही वास्तविक बदल नक्कीच करावे लागतील. पण ह्या समस्येवर सरकारने विचार करून काही पाऊले उचलणे फार आवश्यक आहे. १) प्रत्येक १५ किलोमीटर परिस॑रात जास्तीत जास्त एकच सार्वजनिक गणपती असावा. हि अट सध्याच्या घडीला कोणी मान्य करु शकत नाही. शिस्त लावून घेणे काही जणांना मान्य नसते. तसेच ज्यांचे ज्यांचे 'हितसंबंध' गुंतलेले असतात ते धार्मिक कारणे पुढे करून, भक्तांच्या भक्तीभावनांचा हवाला देत ह्यात खोडा घालायचा प्रयत्न तर करणारच. पण पुण्यातील एकमेकांना चिकटून उभी असलेली गणेश मंडळं पाहिली आणि ज्या वेगाने त्यांचे विभाजन होऊन नवनवी मंडळे आपापले दुकान थाटत आहेत ते पाहता वरील सुचनेवर विचार व्हावा. निदान १५ किमी च्या परिसरात जास्तीतजास्त किती सार्वजनिक गणपती असावेत ह्याला काही मर्यादा असावी. कारण कार्यकर्त्यांच्या स्वार्थाला मर्यादा नाही. आज मला मंडळात आर्थिक लाभ होत नाही (इतरांना होतो आहे.) मला मिळायला पाहिजे तेवढा मान मिळत नाही, माझा राजकिय आश्रयदाता (नगरसेवक) बदलला मग मी आता माझे स्वतःचे मंडळ स्थापून वेगळा सार्वजनिक गणपती सुरु करणार. अशी भावनेतून अनेक मंडळे स्थापन झालेली आहेत. त्यावर अंकुश हवा. २) गणपतीची मुर्ती २ फुटांपेक्षा जास्त उंच नसावी. कबुल मुर्तीच पावित्र टिकुन रहाव ह्यासाठी उंच उंच मुर्ती विसर्जनस्थळी नेताना अपघात होउ शकतो नुसत्या अपघाताचे निमित्त नाही. सर्वसामान्यांना भव्यतेची जी आवड असते त्याचे भांडवल करून मोठमोठ्या मुर्ती बनवायच्या जेणे करून आपल्या गणेशोत्स्वाला जास्तीतजास्त 'प्रेक्षक' जमावेत आणि पर्यायाने जास्तीतजास्त पैसा जमावा ह्या साठी ही स्पर्धा, ही चढाओढ असते. ३) मुर्तीवर सोन्या-चांदीचे दागिने नसावेत. फुलाच्या माळा असाव्यात. देवाला जर एखाद्या भक्ताने दिला एखादा दागिना तर तो तर घातलाच पाहिजे ना काका मला एक कळत नाही हे भक्त लोकं देवादिकांना सोन्याचे दागिने का बहाल करतात. अरे ज्याने विश्व निर्माण केले असे आपण मानतो त्याला सोनं आणि पैसे देऊन त्याच्या विश्वनिर्मितीच्या क्षमतेचा अपमानच करतो. देवाला हवा असतो तो भक्ताच्या मनातील भाव, दोन हात आणि मस्तक जोडून मनापासून केलेला नमस्कार. देवाला दागदागिन्यांचा सोस नसतो. त्याला सोन्याने मढवून आपण त्याला मानवी ऐहिक पातळीवर आणून ठेवतो. ४)मंडप आरास १० बाय १० फुट पेक्षा मोठी नसावी. १० बाय १०च्या मंडपाने काय होते काका घरच्या गणपतीची आरास किती मोठी असते? २ फुटी गणेशमुर्तीला किती जागा लागते? मुर्ती मोठी, आरास मोठी, मंडप मोठा म्हणजे भक्ती मोठी असं काही समीकरण आहे का? उलट त्यातून संयोजकांची हाव मोठी हेच दिसून येते. ५) सार्वजनिक रस्ते अडवून मंडप उभारू नये. मुंबईसारख्या शहरात हे शक्य नाहि हो ईकडे मोकळी मैदान नाहित आणि मंडप जास्तीत जास्त १५ दिवस असतो काका.. गणपती १५ नाही १० दिवसच असतो. मुंबई सारख्या शहराला भव्य चर्नीरोड, दादर, वरळी, जूहू सारख्या चौपाट्या आहेत, ओव्हल, आझाद (इथे रामलिला व्हायची), शिवाजी पार्क आहेत, हँगिंग गार्डन, जिजामाता उद्यान, नॅशनल पार्क आरे पार्क सारखी विशाल उद्याने आहेत. वेगवेगळ्या जिमखाना आणि क्लब्जची मैदानं आहेत. म्युनिसिपल तसेच खाजगी शाळांची मैदानं आहेत, हिरानंदानी सारख्या गृहसंकुलांच्या मध्यवर्ती जागा आहेत.रेसकोर्स आहे, स्टेडियम्स आहेत सरकारी विद्यापिठांच्या जागा, मैदानं आहेत. सर्व आहे. नाहिए ती इच्छाशक्ती. उपाय शोधण्यापेक्षा बहाणे शोधणं सोप्प असतं. ६) वाद्यांवर बंधन असावे. वाद्यांवर बंधने असण्यापेक्षा ती वाजवण्यावर काहि नियम घालावेत थोड्याफार फरकाने मला तेच सुचवायचे आहे. पण समजा आपण नियम केला एका मंडळाने एकच ताशा वाजवावा. ठीक आहे. त्या मंडळाची १० मंडळे होतात तेंव्हा अर्थात १० ताशे वाजू लागतात. ध्वनी प्रदूषण दहापट वाढते. गणपती आणताना आणि विसर्जनासाठी नेताना 'स्पिकर्स वॉल्स' (दोन्ही बहुवचनी) ठणाणा करत असतात. सनई-चौघडा वाले उपाशी मेले आहेत. दोन्ही कान झाकले तरी ह्या 'स्पिकर्स वॉल्स्'चा जो 'थम्प' असतो तो हृदयावर वजन टाकत असतो. आजूबाजू परिसरात अभ्यासू विद्यार्थी असतात, विकलांग म्हातारे असतात, रुग्ण असतात नवजात अर्भक असतात ह्या सर्वांवर अत्याचार करून गणेश भक्तांना 'पुण्य' मिळतं का? मला नाही तसं वाटत. सर्व मंडळांना असणारा राजकिय आश्रय पाहता कुठलाही नियम पाळला जाणार नाही. ह्याची खात्री आहे. पण नियम असेल तर न्यायालयाकडे धाव घेता येते. ७) विसर्जन मिरवणूक १ तासापेक्षा जास्त वेळ चालू नये. १ तास शक्य नाहि ते नीट विचार केलात तरी शक्य नाहि चार तास करा. पण २५ आणि ३० तास मिरवणूक असमर्थनिय आहे. बंदोबस्तावरील पोलिसाला विचारा काय त्रास असतो ते. ८) जमा झालेल्या सर्व देणग्या विसर्जनानंतर १० दिवसांत सरकारात जमा कराव्यात. चला राजकारण्याना भ्रष्टाचाराला अजुन एक कुरण उपलब्ध करुन देउया भोळ्या भक्तांनी ते आधीच उपलब्ध करून दिले आहे. सामाजिक नियम धाब्यावर बसवून मनमानी करणार्‍या मंडळांना काय राजकारण्यांचा वरदहस्त नसतो? भ्रष्टाचारा विरुद्ध लढा चालू आहेच. पण देणग्या सरकारात जमा करायच्या असतील तर त्या गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटणार नाहीत. राजकारण्यांना कुरण उपलब्ध होईल ह्या विधाना मागे सद्य परिस्थितीतील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचे कुरण नष्ट होईल हि सुप्त भिती आहे.

मस्त लेख आहे, त्याचबरोबर पेठकर काका आणी समीरसूर यांचे प्रतिसाद पण सुंदर आहेत. - (नित्य-नियमाने सिध्दीविनायकाची वारी करणारा) किसना

In reply to by किसन शिंदे

मस्त लेख आहे, त्याचबरोबर पेठकर काका आणी समीरसूर यांचे प्रतिसाद पण सुंदर आहेत. -दिलीप बिरुटे

काही म्हणा ब्वॉ, लालबागच्या या गणपतीची मूर्ती अंमळ दुष्काळी जिल्ह्यातली वाटते. गणू कसा मस्त लठ्ठ आणि लंबोदर पाहिजे... त्यामुळे मला ही मूर्ती फारशी आवडत नाही. बाकी नवस वगैरेंबद्दल काय बोलणार? तात्यासाहेबांनीच अजरामर केलेलं वाक्य म्हणतो... "ज्याची त्याची जाण, ज्याची त्याची समज" ;) पेठकरकाकांनी सिक्सर मारल्या आहेतच.

पेठकर काकांचे प्रतिसाद मनापासून आवडले. विशेषतः त्यांची सामाजिक कार्यावरची टीपणी तर जबरदस्त. भक्तांच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालून स्वार्थ साधणार्‍या आणि लोकांनी बोंबाबोंब करु नये म्हणून चार थेंब समाजकार्यासाठी फेकणार्‍यांचा त्यांनी बुरखा फाडला आहे.

पेठकर काकांच्या प्रतिसादाशी सहमत! देवाला हवेत कश्याला सोन्या चांदीचे दागिने? पुन्हा सुरक्षिततेची काय हमी? घरच्या गणपतीला दुर्वा फुलांच्या हारांनी सजवतात. तो गणपती जास्त मोहक आणि 'आपला' वाटतो. श्रीमंत गणपती भक्तांपासून लांब गेल्यासारखा वाटतो. एका गणेशमंडळाचे थोड्याच वर्षात अनेक तुकडे झालेले पाहता येतात. एका पेठेने सार्वजनिक मंडळ सुरु केल्यावर दुसर्‍याच वर्षी फूट पडून तरण्यांनी 'तरूण गणेश मंडळ' स्थापन केले. त्यानंतर त्यातही काही तरणे आणि बरेच लहान यांची एकी झाल्याने पुन्हा फूट पडली आणि 'बाल-तरूण गणेश मंडळ' झाले. गल्लीत सगळ्यांची हसून पुरेवाट झाली. त्यानंतर लवकरच फक्त 'बाल गणेश मंडळ' आले. आता मात्र सगळ्यांना तीन तीन गटांना वर्गण्या द्याव्या लागतात म्हणून वैतागायला होते. यापुढे फक्त 'तान्हे गणेश मंडळ' यायचे राहिले आहे.;)

पेठकर काकांना नम्रतापूर्वक सलाम...अतिशय छान विश्लेषण... अवांतर- धर्म एक बहुत बडी अ(न)र्थ व्यवस्था है...लेकिन आजकल कुछ लोग इसे ''कंपनी'' के नाम से जानते है...कंपनी.. चंदा है तो धंदा है ये,,,चंदा है तो धंदा है ये... ;-)