Skip to main content

कागदोपत्री माणूस सी.व्ही.वारद गेले

कागदोपत्री माणूस सी.व्ही.वारद गेले

Published on शनीवार, 13/08/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
सुन्न झालो. चार ओळींची बातमी होती.फारशी कुणी दखल घेतली नव्हती.काळाच्या ओघात विसरला गेलेला एक माणूस. बातमी वाचली नसती तर कदाचित कळलंही नसतं. आहेत की नाहीत. काहीच आगापिछा नसलेला हा मनस्वी माणूस दोन-तीन वर्षं सेंट जॉर्जेस इस्पितळात वास्तव्य करून होता.आपल्या विकलांग देहातील व्याधींशी निकराने झुंजत होता.धुगधुगी अजून कायम होती. त्या अंधार्‍या खोलीतील त्यांच्या कॉटखाली पत्र्याच्या जाडजूड दोन-तीन ट्रंका होत्या.तीच त्यांची संपत्ती.काय होतं त्यात ? एकदा मला त्यांनी ती ट्रंक उघडून दाखवली. जुनी कागदपत्रे ,बाँबे रिजनल काँग्रेस समितीने केले ठराव, बापूजी, जवाहरलाल, ईंदिराजी यांच्याबरोबर काढलेले फोटो ,वर्तमानप्त्राची कात्रणं, लोकसभेतील कामकाजाचे अधिकृत वृतांत ,लिहिलेली पत्र ,आलेली उत्तरं. तसं पाहिलं तर त्या कागदपत्रात काय अर्थ होता. आजच्या हिशेबात तो माणूस , त्याच्या निष्ठा , त्याची कार्यपध्दती जशी काळाच्या ओघात निष्प्रभ झाली होती तसंच त्या कागदपत्रांचं.त्यांची कुणाला कधी गरज पडणार नव्हती.ती कागदपत्रं फक्त वारद या व्यक्तीसंबंधी नव्हती.तो एका व्यक्तीच्या कर्तृत्वाचा आलेख कागदपत्रांद्वारे उभा राहत होता.त्याचं महत्व मानलं तर खूप होतं. नाही तर काहीच नव्हतं. वारद यांनी ना वारस ना रुढ अर्थाने काही संस्था उभ्या करून ठेवल्या.एक वादळी व्यक्तिमत्व स्वतःच संस्था बनलं. मुंबईचं जीवन व्यापून राहीलं. ज्या गोष्टी त्यांना महत्वाच्या वाटल्या त्यासाठी त्यांनी आकाश पाताळ एक केलं.मोठमोठ्या गर्विष्ठ , उर्मट लोकांना नमवलं आणि स्वतःबरोबरच आपलं संस्थान बरखास्त केलं. कॉग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांनी महात्मा गांधींची सेवा केली. जवाहरलाल नेहरूंना मुंबईत असताना कधी सोडलं नाही.राजीव गांधींचा जन्म झाला त्यावेळी ते हॉस्पिटलात उपस्थित होते. इंदिराजी जेव्हा मुंबईत येत तेव्हा त्यांना ते भेटत. हातात आपला कागद कोंबत. त्यात स्वतःसाठी कधीही काही त्यांनी मागितलं नाही.राष्ट्रध्वजाचा अभिमान अतिशय जाज्वल्य. त्यासाठीच त्यांनी आयुष्य वाहिलं. अनेक खटले भरले.अनेक अधिकारी , पुढारी यांचा पाठपुरावा केला. राष्ट्रध्वज कसा वापरावा याची आचार संहिता तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा.तशी लोकसभेच्या इतिवृत्तात कायमची नोंद आहे. दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचं राष्ट्राला उद्देशून भाषण होतं. ती एक प्रथाच नेहरूंच्या काळात सुरु झाली होती .पुढेही चालू राहील. पण मूळ कल्पना वारद यांची.तसा ठराव त्यांनी स.का. पाटील बीआरसीसीचे अध्यक्ष असताना संमत करवला.त्याची प्रत नेहरू यांना पाठवली आणि सातत्याने पाठपुरावा केला. राज्यातील राज्यपालांचे राजभवनावर स्वतंत्र ध्वज असत.राष्ट्रध्वजाशिवाय कुठलाही ध्वज असू नये अशी चळवळ त्यांनी उभी केली आणि राज्यपालांचे मानमरातब कायम राहिले तरी त्यांचा ध्वज मात्र खाली उतरला. पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी म्हणजे वारद यांच्या दृष्टीस दसरा-दिवाळी. सकाळी पांढरा कुडता आणि पायजमा घालून ते हातात काठी घेऊन मुंबईत फेरफटका मारायला बाहेर निघत. मग कुणी उलटा ध्वज लावला, कुणी चुकीची सलामी दिली याची पध्दतशिर नोंद त्यांच्या वहीत व्हायची आणि संध्याकाळी मुंबई पोलीस कमिशनरांना अहवाल जायचा .त्याच्यावर कारवाई व्हायची.त्यांनी केलेल्या केसेस या देशात सर्वत्र प्रमाण मानल्या जायच्या.राष्ट्रध्वजासाठी इतकं काम वर्षानुवर्षं न थकता करणारे वारद एकमेवच. त्यांच्या तडाख्यातून आएस अधिकारी, मंत्री ,आमदार सुध्दा सुटले नाहीत.एका अधिकार्‍याने आपल्या व्हिजीटींग कार्डावर तीन सिंहाची राजमुद्रा छापली.तडक त्यांच्या विरुध्द वारद कोर्टात गेले आणि अशा राजमुद्रेचा वापर करता येणार नाही असा कोर्टाचा निकाल आला.मोटारीवर कोणता ध्वज लावावा, कोणता दिवा लावावा याबाबतही त्यांनी नियम करायला लावले.राष्ट्रध्वज हा सर्वात उंचावर लावला पाहीजे असा त्यांचा आग्रह असायचा. विविध व्यापारी कंपन्या राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रध्वज यांचा खाजगी उद्योगासाठी गैरवापर करीत.त्याविरुध्द त्यांनी प्रथम आवाज उठवला.एका थर्मास कंपनीने जवाहर थर्मास काढला आणि त्यावर नेहरूंचं चित्र छापलं .वारस यांनी हजारो थर्मास रद्द करायला लावले आणि राष्ट्रपुरुषांचा व्यापारी कामासाठी उपयोग होउ नये म्हणून कायदा झाला. वारदांचं आवडतं लक्ष्य होतं बेस्ट बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर.टोपी घालून काम करावं असा नियम. तो बहुतेक पाळत नाहीत.वारद बसमध्ये शिरून नाव लिहून घेत आणि तक्रार करीत.वारद लांबून दिसले की कंडक्टर, ड्रायव्हर, पोलीस आपली खिशातली टोपी काढून डोक्यावर चढवत. आता वारद यांच्यासारखी धाक वाटावी अशी निस्पृह माणसं फारशी राहिली नाहीत पण त्यांनी घालून दिलेले नियम ते नसतानासुध्दा किमान मुंबई शहरात पडलेली सवय म्हणून का होईना पाळले जातील असं वाटतं. त्यांच्या अमूल्य कागदपत्रांचं काय झालं असेल असा विचार मनात घेऊन अस्वस्थता येते. (आज दिनांक १० फेब्रुवारी ९४ )
लेखनप्रकार

याद्या 3865
प्रतिक्रिया 25

आपण संदर्भ दिल्याप्रमाणे लेख जरी जुनाच असला तरी मला आत्ता वाचायला मिळाला..सी व्ही वारद हे नुसते नावच नाही तर व्यक्तीमत्व आणि एका व्यक्तीचा इतिहास त्यातून समजला!. धन्यवाद! असेच अजूनही येउंदेत.

In reply to by विकास

आपण संदर्भ दिल्याप्रमाणे लेख जरी जुनाच असला तरी मला आत्ता वाचायला मिळाला..सी व्ही वारद हे नुसते नावच नाही तर व्यक्तीमत्व आणि एका व्यक्तीचा इतिहास त्यातून समजला!. धन्यवाद! विकास सारखेच म्हणते, स्वाती

सी. व्ही. वारद ह्यांचे नाव वाचनात आले होते पण त्यांच्या कारकिर्दीचा आणी व्यक्तिमत्वाचा परिचय ह्या लेखातूनच झाला. धन्यवाद.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एका निष्ठावान, चिकाटीच्या व्यक्तीमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल आपले आभार! तुम्ही सांगितलेल्या घटनांपैकी काही वाचल्याचं आठवत असलं, तरी या माणसाविषयी मला काहीच माहिती नव्हती याचा खेद वाटला. चटका लावणारं वर्णन. तुमचा लेख वाचून या व्यक्तीचं छायाचित्र तरी कुठे आंतर्जालावर मिळतं का पहाण्यासाठी शोध घेतला, अजून तरी सापडलं नाही (तुमच्या लिखाणातील त्यांच्या वर्णनावरून, ते सहज सापडलं नाही याचं आश्चर्य वाटलं नाही, प्रसिध्दीसाठी ते कधी आसूसलेले असतील असं वाटत नाही, तरीही त्यांचा फोटो कुणाला इथे देता आला तर निदान या स्वातंत्र्यदिनासाठी माझा दिवस चांगला जाईल.) नाही म्हणायला एक लेख सापडला त्यांचं वर्णन करणारा. मनःपूर्वक आभार.

In reply to by बहुगुणी

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एका निष्ठावान, चिकाटीच्या व्यक्तीमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल आपले आभार! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणते. सुंदर लेख.

In reply to by शुचि

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला एका निष्ठावान, चिकाटीच्या व्यक्तीमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल आपले आभार! अगदी असेच म्हणतो. धन्यवाद.

राष्ट्रध्वजासाठी वर्षानुवर्षं न थकता करणा-या श्री. सी.व्ही.वारद यांची माहिती करून दिल्याबद्दल. सी.व्ही.वारद यांना आदरांजली.

माझ्या लहानपणी मी दै. मराठा नियमित वाचत असे. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनानंतरच्या दुसर्‍या दिवशींच्या अंकात हटकून सी. व्ही. वारदांनी आदल्या दिवशी, मुंबईभर किती ठिकाणी राष्ट्रध्वजाचे वेगवेगळे अपमान झालेले नोंदवले व त्यांजबद्द्दल पोलिसांत तक्रारी केल्या ह्याची रीतसर नोंद असे. ह्यात ध्वज उलटा लावला होता, फाटलेला होता, ध्वज भिंतीस टेकलेला होता, इथपासून ध्वजातील चक्राच्या आर्‍या २४ नव्हत्या, अशा तर्‍हेच्या अनेक केसेस असत. राष्टृध्वजाच्या पावित्र्याविषयी माझ्यासारख्या सामान्य वाचकाच्या मनातही ह्यामुळे जाणीव निर्माण झाली. त्यांच्या ह्या विषयासंबंधीच्या कार्याचा असा माझा थोडा परिचय असला, तरी त्यांची तीव्र निष्ठा व इतर सामाजिक कार्य ह्या सगळ्यांची मला काहीच कल्पना नव्हती. ह्या लेखामुळे ती माहिती, उशीरा का होईना, समजली. स्वातंत्र्यदिन काही दिवसांवर आला असतांना हा लेख येथे पुनःप्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद.

प्रदीप याच्याशी सहमत. इतर सामाजिक कार्याविषयी माहिती नव्हती. धन्यवाद.

आम्हांला सी व्ही वारद हे नावही माहीत नव्हतं. परंतु या लेखामुळे त्यांना सलामी द्यावीशी वाटते आहे. जयहिंद.

खुप माहिती मिळाली. आमच्या सोसायटीत एकदा उलटा ध्वज लावला गेला, अर्थात लक्षात आल्या बरोबर लगेच खाली उतरवुन परत एकदा ध्वजारोहण केल होत. धन्यवाद प्र्.बा. जोशी साहेब. जमल तर त्या चित्राचा संदर्भ कळेल का?

जोशीसाहेब, ओळख आवडली. एक प्रकारची वेडी माणसे ही. वाचून कर्तारसिंह थत्त्यांवर दळवींनी लिहिलेला लेख आठवला एकदम.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कर्तारसिंह थत्त्यांवर
हे नाव ऐकलेले आहे, परंतु अधिक माहिती नाही. कृपया विशद करता येईल काय? (इथेच हवी असा आग्रह नाही.)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

तात्पुरत्या दुव्याबद्दल आभार. दुव्यातून फारच वरवरची, अतिशय त्रोटक आणि फारशी खात्रीलायक म्हणता येणार नाही अशी माहिती मिळाली. माझ्याजवळ अगोदर असलेल्या अगदीच नावापुरत्या* माहितीत फार मोलाची भर पडली असे म्हणू शकणार नाही**. तरीही, सुरुवात म्हणून वाईट नाही. तेवढी विस्तृत माहिती लवकर लिहायचे मनावर घ्याच. (आधीच्या - म्हटले तर आमच्या आजोबांच्या - पिढीतील बुजुर्गांकडून हे नाव कधी काळी उडतउडत ऐकले होते एवढेच, पण माहिती नव्हती. आता हे नाव पुन्हा ऐकून कुतूहल जबरदस्त चाळवले गेले आहे.)
* दुवा वाचण्यापूर्वीची माझी नेट माहिती, म्हणजे बुजुर्गांकडून उडतउडत ऐकलेले होते, ते असे: १. हे गृहस्थ 'थत्ते' आडनावाचे एक मराठीभाषक गृहस्थ होते. २. यांनी एक तर शीख धर्म स्वीकारला तरी होता किंवा स्वतःला शीख समजत असत / म्हणवून घेत असत / शीख असल्यासारखे वावरत असत. (माहिती ऐकीव आणि अर्धवट असल्यामुळे यांपैकी नेमके कोणते याबद्दल खात्री नाही. पण यदाकदाचित शीख धर्म स्वीकारला असल्यास, बिगरशीख मराठीभाषक माणसाने शीख धर्म स्वीकारण्याचे हे एकमेव उदाहरण असावे काय, याबद्दल कुतूहल आहे.) ३. वरील २. मधील कारणास्तव त्यांनी आपल्या मूळच्या नावाऐवजी 'कर्तारसिंह' हे नाव वापरावयास सुरुवात केली होती. ४. राजकारणाशी संबंधित होते. (याहून अधिक तपशील मला तेव्हा उपलब्ध होऊ शकला नाही आणि अजूनही मला माहीत नाही.) ५. अतिशय चक्रम मनुष्य! ** दुवा वाचून मला नव्याने उपलब्ध झालेली माहिती पुढीलप्रमाणे: ६. यांचा सावरकरांशी काहीतरी संबंध असावा. किमानपक्षी, सावरकर.ऑर्गवरील 'सावरकरांचे सहचारी' (येथे 'सहचारी' हा शब्द मी associates अशा अर्थी वापरलेला आहे - चूभूद्याघ्या.) अशा अर्थीचे इंग्रजीतील शीर्षक असलेल्या एका छायाचित्रात यांचा समावेश आहे. ७. 'घाशीराम कोतवाल' हे नाटक लिहिल्याबद्दल या गृहस्थांनी श्री. विजय तेंडुलकर यांना काठीने बदडून काढले होते. ८. प्रखर हिंदुत्वाभिमानी. हिंदुस्थानात हिंदूंचे समृद्ध आणि प्रबळ राज्य प्रस्थापित करण्याच्या कल्पनेस वाहून घेतलेला माणूस. 'इतरां'ना आणि हिंदुत्वविरोधी फितुरांना (यात मोहन आगाशे, विजय तेंडुलकर आणि जब्बार पटेल हेही आले.) मारून टाकले पाहिजे, दुसरा पर्याय नाही, नव्हे असे होईल हे पाहणे हे आपले (श्री. कर्तारसिंह थत्ते यांचे) व्यक्तिगत कर्तव्य आहे, हे मत. (संदर्भ. कितपत विश्वसनीय आहे, कल्पना नाही.) अर्थात, आपण दिलेल्या गूगलशोधाच्या दुव्याच्या फलितातील दुव्यांवरील माहिती ही त्रोटक आहे, तिचे स्रोत पूर्णपणे विश्वसनीय नाहीत, आणि ती तोलूनमापून ('बॅलन्स्ड'ला समर्पक मराठी शब्द मला येथे आठवला नाही.) नाही, 'रिलाएबल' (मराठी?) असे चित्र ती उभे करत नाही, हे उघड आहे. आणि म्हणूनच, विस्तृत माहिती देण्याचे आपण लवकरात लवकर मनावर घ्यावे, ही कळकळीची विनंती. अन्यथा, श्री. कर्तारसिंह थत्ते यांबाबत वाटणार्‍या जबरदस्त कुतूहलाच्या जोडीला, श्री. सी. व्ही. वारद आणि श्री. कर्तारसिंह थत्ते यांच्या तुलनेबद्दलचे कुतूहलही मनात घर करू लागेल. श्री. (जयवंत?) दळवी यांनी श्री. कर्तारसिंह थत्ते यांच्या संदर्भात नेमके काय म्हटले असावे, याबद्दलही कुतूहल निर्माण होऊ लागले आहे.

In reply to by पंगा

१. हे गृहस्थ 'थत्ते' आडनावाचे एक मराठीभाषक गृहस्थ होते. बरोबर २. यांनी एक तर शीख धर्म स्वीकारला तरी होता किंवा स्वतःला शीख समजत असत / म्हणवून घेत असत / शीख असल्यासारखे वावरत असत. (माहिती ऐकीव आणि अर्धवट असल्यामुळे यांपैकी नेमके कोणते याबद्दल खात्री नाही. पण यदाकदाचित शीख धर्म स्वीकारला असल्यास, बिगरशीख मराठीभाषक माणसाने शीख धर्म स्वीकारण्याचे हे एकमेव उदाहरण असावे काय, याबद्दल कुतूहल आहे.) शीख असल्यासारखे वावरत असत हे अगदी बरोबर. फेटा आणि दाढी होती. ३. वरील २. मधील कारणास्तव त्यांनी आपल्या मूळच्या नावाऐवजी 'कर्तारसिंह' हे नाव वापरावयास सुरुवात केली होती. बरोबर. ४. राजकारणाशी संबंधित होते. (याहून अधिक तपशील मला तेव्हा उपलब्ध होऊ शकला नाही आणि अजूनही मला माहीत नाही.) बरोबर. हिंदु महासभेचे कार्यकर्ते होते. ५. अतिशय चक्रम मनुष्य! या बद्दल वाद होउ शकतो. हिंदुत्वाने भारलेला माणूस होता हे नक्की. (कुठल्याही क्षेत्रातील ध्येयवेड्या माणसांचा "चक्रम" असेच संबोधले जाते) ** दुवा वाचून मला नव्याने उपलब्ध झालेली माहिती पुढीलप्रमाणे: ६. यांचा सावरकरांशी काहीतरी संबंध असावा. किमानपक्षी, सावरकर.ऑर्गवरील 'सावरकरांचे सहचारी' (येथे 'सहचारी' हा शब्द मी associates अशा अर्थी वापरलेला आहे - चूभूद्याघ्या.) अशा अर्थीचे इंग्रजीतील शीर्षक असलेल्या एका छायाचित्रात यांचा समावेश आहे. हिंदु महासभेचे कार्यकर्ते होते हे वरती लिहीलेले आहे.स्वा. सावरकरांशी एव्हढाच संबंध होता. ७. 'घाशीराम कोतवाल' हे नाटक लिहिल्याबद्दल या गृहस्थांनी श्री. विजय तेंडुलकर यांना काठीने बदडून काढले होते. बरोबर. (थोडी दुरूस्ती. वेताच्या छडीने) ८. प्रखर हिंदुत्वाभिमानी. हिंदुस्थानात हिंदूंचे समृद्ध आणि प्रबळ राज्य प्रस्थापित करण्याच्या कल्पनेस वाहून घेतलेला माणूस. 'इतरां'ना आणि हिंदुत्वविरोधी फितुरांना (यात मोहन आगाशे, विजय तेंडुलकर आणि जब्बार पटेल हेही आले.) मारून टाकले पाहिजे, दुसरा पर्याय नाही, नव्हे असे होईल हे पाहणे हे आपले (श्री. कर्तारसिंह थत्ते यांचे) व्यक्तिगत कर्तव्य आहे, हे मत. (संदर्भ. कितपत विश्वसनीय आहे, कल्पना नाही.) हे चुकीचे आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. एव्हढे माथेफिरू नक्कीच नव्हते. तसे असते तर तेंडुलकरांने वेताने मारण्याऐवजी चाकु अथवा इतर शस्त्राने मारले असते.

In reply to by चिंतामणी

मुद्देसूद उत्तरांच्या प्रयत्नाबद्दल आभारी आहे.
५. अतिशय चक्रम मनुष्य!
या बद्दल वाद होउ शकतो. हिंदुत्वाने भारलेला माणूस होता हे नक्की. (कुठल्याही क्षेत्रातील ध्येयवेड्या माणसांचा "चक्रम" असेच संबोधले जाते)
शक्य आहे. मी जे मत ऐकले होते ते जसेच्या तसे मांडले. फॉर-व्हॉटेवर-इट-इज़-वर्थ तत्त्वावर. याहून अधिक मला माहीत नाही. याहून वेगळी मते अर्थातच असू शकतात. म्हणूनच सविस्तर माहिती आवडली असती.
हे चुकीचे आहे असे माझे वैयक्तीक मत आहे.
चुकीचे असू शकेल. म्हणूनच, गूगलशोधाचा कोणतातरी दुवा देण्याऐवजी वरील प्रतिसादकाने (अर्थात श्री. बिपिन कार्यकर्ते यांनी, अथवा अन्य कोणीही) आपल्याजवळ उपलब्ध असलेली माहिती मुद्देसूद रीत्या आणि सविस्तर मांडली असती तर अधिक आवडले असते. आणि म्हणूनच श्री. कार्यकर्ते यांना तसे लवकरात लवकर करण्याचे आवाहन आहे.
एव्हढे माथेफिरू नक्कीच नव्हते. तसे असते तर तेंडुलकरांने वेताने मारण्याऐवजी चाकु अथवा इतर शस्त्राने मारले असते.
एखाद्या व्यक्तीचे मत अथवा अभिव्यक्ती पटली नाही या कारणास्तव त्यावर शारीरिक हल्ला करताना, (१) वेताचे छडीने मारण्याकरिता आणि (२) चाकू अथवा इतर शस्त्राने मारण्याकरिता अनुक्रमे किती आणि किती माथेफिरू असणे आवश्यक (आणि ग्राह्य) आहे याची तुलना करता आली असता कदाचित मार्गदर्शक ठरली असती. या ब्याकड्रापावर, श्री. सी.व्ही. वारद आणि श्री कर्तारसिंह थत्ते यांची तुलना अधिकाधिक कुतूहल चाळवू लागली आहे.

वेगळ्याच व्यक्तिमत्त्वाची ओळख आवडली. ज्या नियमांच्या पालनाकरता श्री. वारद लढत, त्यांचे गांभीर्य बरेच कमीअधिक असल्याचे जाणवले. राजमुद्रेचा खाजगी उपयोग टाळणे हा मुद्दा मला जितका महत्त्वाचा वाटतो, त्या मानाने बेस्ट बसगाडीतील चालक-वाहकांनी टोपी घातली वा घातली नाही, हा मुद्दा क्षुल्लक वाटतो.

बापरे!! केवढं मोठं व्यक्तिमत्व होतं हे. आपण भेट घडवून दिलीत त्याबद्दल आभार.